घरताज्या घडामोडीबाई आणि पुरुषातल्या अब्रूचं अंतर !

बाई आणि पुरुषातल्या अब्रूचं अंतर !

Subscribe

राजीव पाटीलच्या ‘जोगवा’च्या पडद्यावर उपेंद्र लिमयेनं थंड गोठलेल्या खडी डोळ्यांचा उभा केलेला तायप्पा माणूस म्हणून ऐन वयात खल्लास झालाय. लुगड्याच्या कफनात करकचून गुंडाळून देवीच्या देवळीत, अधून मधून जत्रेत, गोंधळात मिरवायला ठेवलेल्या कलेवराचं नाव तायप्पा आहे. सख्ख्या बापानं जोगत्या करून ‘जल्म नाशिवलेल्या’… ‘जल्माचा’ गोंधळ रंगलेल्यांची गोष्ट म्हणजे जोगवा. अंधाररात्रीतल्या संबळ, डफाच्या ठेक्यावर न संपणार्‍या मिट्ट काळोख्या रातंला मंडपात नाचणार्‍या ‘नासक्यां’ची पडद्यावरची गोष्ट म्हणजे दिग्दर्शक राजीव पाटील, संगीतकार अजय अतुलचा ‘जोगवा’ असतो.  जोगवा सिनेमाला नुकतीच दहा वर्षे झाली, त्यानिमित्त बाई आणि पुरुषातल्या अब्रूचं अंतर मिटवणार्‍या अनुभवाचा घेतलेला मन:स्पर्शी धांडोळा.

बाईपणाचं ओझं लुगड्यातल्या बाईच्या चमड्यालाच कसं अलवार वाहता येतं आणि मिरवताही येतं, मुक्ता बर्वेत आत खोलवर झिरपलेल्या अल्लड अवखळ सुलीला ते शक्य आहे. बाप्याचं ते काम नाहीचं, तायप्पाच्या अंगावरचं चमडं बाईचं नसावं, ही झाकलेली मूठ अंगावर फेकलेल्या चवल्यापावल्यांची… इथं बाईचं बाईपण रुढीच्या वरवंट्याखाली चिरडलेलं वाईटंच…जोगतिणीचं त्याहून टोकाचं वाईट आणि बाप्याची बाई बनवलेल्या तायप्पावर लादलेलं बाईपण गुणाकार पद्धतीनं पटीत वेदना वाढवणारं, मन मेंदू बधिर करणारं असावं, तायप्पा हिजडा नाही, तो ज्याला अभिजनांच्या शहरी भाषेत ‘समलैंगिक’ म्हणतात तायप्पा तसाही नाही, तो जोगत्याच असावा, मग जोगत्यासाठी त्याच्या नाकात नथ असावी, केसांना चोपलेल्या तेलाच्या ओघळलेल्या तेलकट चेहर्‍यावरच्या केसांत मधोमध बाईचा भांग असावा.

- Advertisement -

तायप्पाच्या पुरुषपणावर ओढलेलं बाईपणाचं ओझं बाईचं चमडं नसताना त्याला झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत लुगड्यातून सांभाळावं लागणार आहे. बाईपण कधीही वाईटंच असावं, त्यात जोगतिण बाईचं बाईपण वाईट की बाई झालेल्या जोगत्यांच बाईपण तुलनेने जास्त भेसूर, याबद्दल जोगवा पाहाताना शंका यावी. तायप्पाच्या साडीची घडी गावटग्यांना हवीशी वाटताना तायप्पाच्या डोळ्यातली वेदना ‘बाईची की बाप्याची’ हे ओळखणं कठीण व्हावं… जोगवाच्या पडद्यावर तायप्पाच्या गोठलेल्या डोळ्यात बरंच काही असतं…शरम, ज्याला बाईची अब्रू म्हणावं ती हतबलता, पुरुषी बंड, विद्रोह, आक्रंदन, राग, संताप असले कुठलेही शब्द आचके देण्याआधीच दम तोडतील अशा भेदरलेल्या भेसूर डोळ्यांची भाषा जोगवाच्या पडद्यावर संवादाच्या पलिकडे ‘तायप्पा’ आणि ‘यमन्या’ च्या डोळ्यातून ऐकू येते….ही भाषा समजून घेण्यासाठी म्हणून जोगवा वारंवार पाहावा लागतो.

तायप्पाच्या साज शृंगारात उणीव राहायला नको, यल्लमाला ‘सोडलेली’ किंवा ‘सोडलेल्या’ तायप्पाला बाई म्हणा किंवा बाप्या….त्याला काय हवं ते म्हणावं, त्याच्यासाठी लिंगवाचक नावाचा नियम गुंडाळून ठेवावा…किंवा त्या क्षणी जी आठवेल ती शिवी तायप्पाला खुशाल द्यावी, ही शिवीच तायप्पासाठीची बक्षिसी आहे. तरण्याबांड तायप्पाला ‘हेमल्या, हेमलं’ असं काहीही म्हणावं. खास मराठवाडी हेल काढून शिवी हासडल्यावर तायप्पा आता बाप्यांच्या उलट अंगावर यायला बाप्या राहिला नाही, यावरून त्याची यथेच्छ टिंगल टवाळी करावी, तायप्पाच्या कधीकाळच्या टग्या मित्रांनी तायप्पाला खेटून बसावं, त्याच्या साडीची घडी मोडायला मिळणार या संधीतून भेसूरी आनंद ओरबडावा…समाज व्यवस्थेनं एकजात खाकरून बेंबीच्या देठापासून थुंकलेल्या तायप्पाच्या जिंदगानीचं कुणीच काहीच सोयरसुतक पाळू नये. तायप्पाच्या हातावर गोंदाच्या तापलेल्या सुईचे खुशाल चटके, डाग द्यावेत, ही तापलेली तांबडी सुई लोण्याच्या गोळ्यासारखी तायप्पाचे काळीज भेदून त्याच्या मन मेंदूच्या आरपार जावी.

- Advertisement -

‘जोगवा’च्या पडद्यावर उपेंद्र लिमयेचा आवाज एकाच वेळेस कोरडा आणि कमालीचा पातळ असतो. ये ‘मुंबई की गटर है…बंद है तो बेहतर है’…असं म्हणतात तो ‘पेज थ्री’मध्ये पोलिसाच्या आवाजात जरबेतल्या खर्जात जातो किंवा ‘कोकणस्थ’तल्या गौतम पगारेचा कडक जयभीम आठवावा… किंवा ‘मुळशी पॅटर्न’मध्ये ‘याला एकदा नागडा करून मारला पाहिजे’ हा इन्पेक्टर  उपेंद्रच्या आवाजात आठवावा, पण जोगवाची गोष्ट वेगळीच असावी, बाप्याचं बाई होत जाणं, जोगवाच्या पडद्यावर उपेंद्रच्या आवाजातून अनुभवू शकतो. ही वेदना बाईची की बाप्याची? जोगवामध्ये उपेंद्रच्या खर्जातल्या आवाजाला असलेली बाईच्या पातळ मार्दव नाजूक किनारही स्पष्ट ऐकू येते. हा खरंचं बाप्या आहे…? त्याला देवीला सोडून त्याच्या बापानं चूक केलीय ? की त्याच्या लघवीतून पडलेलं रक्त मुतखड्याचं नसावंचं..त्याला देवीचा कौलचं म्हणावं, इतका भीषण संदिग्ध अनुभव उपेंद्र लिमयेनं जोगवाच्या पडद्यावर दिलेला असतो आणि ही संदिग्धता नेमकी कॅमेर्‍यातून टिपणार्‍या राजीव पाटीलने निवडली की, ती उपेंद्रच्या अभिनयातून पडद्यावर आली याबद्दल शंका यावी.

रुढी परंपरेच्या भेसूर अंधारल्या जात्यात तायप्पाचं कलेवर हळूहळू भरडत जाणं पडद्यावर अनुभवत असताना या जात्याची घरघर काळजाला चर पाडून जाण्याचा अनुभव जोगवाचा असतो, या जात्यात तायप्पाच भरडला जातोय असंही नाही, यमन्या (किशोर कदम) ची वेदना जोगवाच्या पडद्यावर समांतर जाते. शांतारामबापूंच्या पिंजर्‍यातल्या मास्तर (डॉ. लागू)ची  वेदना आपण पाहिलेली असते. त्यातल्या निळूभाऊंनी साकारलेल्या तुनतुनंवाल्याची वेदना एक ते दोन प्रसंगात मनाला खड्डा पाडून गेलेली असते. जोगवाच्या पडद्यावरही यमन्या नावाचा लुगड्यात गुंडाळलेला माणूस नावाचा दोन पायांचा मांसाचा गोळा असावा. यमन्याला उसाच्या फडात नेणार्‍यांनी यमन्याच्या लेकुरवयातच त्याच्या कंबरंची चाळण केलीय. चमडंच खरं…बाकी झूट…असं यमन्याच्या जगण्याचं भेसूर तत्वज्ञान या चाळणीतून झिरपत आलंय. ‘करपलेलं, विस्कटलेलं बालपण’ असले पांढरपेशी शब्द यमन्याच्या कमरेखालून कधीचेच गळून गेलेत, यमन्या मेला नाही म्हणूनच जिवंत आहे. जिवंत म्हणजे त्याचा श्वास सुरू आहे. असा यमन्या ‘समभाडखाव’ तायप्पाला धीर देताना म्हणतो….‘चार पाच वर्साचा होतो, तवा हे लुगडं अंगात आलं, मेलं, कसं नेसायचं ते बि कळत नव्हतं, ‘जोगत्याच्या जल्माची वाट अशीच असते, तायप्पा….ही वाट कुनाला चुकलीय’ असं म्हणताना यमन्याचे डोळे ठार मरून गेलेल्या मुडद्याच्या असतात. यमन्याही कधीकाळी प्रेमात पडलेला आहे….यमन्यावर कमळा नावाची जोगतिण जीव टाकत असल्याचं तो तायप्पाला सांगतो, कमळेनं संधी बघून अंधारात मेळ्यातल्या कोपर्‍यात यमन्याला ‘गप्पकन्न मिठी’ मारल्यावर यमन्याच्यानं  ‘काहीच’ होत नाही…यमन्या हतबल असतो, पुरुषांच्या पालखीचा भोई असतो, अशी शिव्या देऊन जोगतीण कमळा दुसर्‍या बाप्याशी झुलवा लावून परमुलखात पसार होते. यमन्याची वेदनाबाई आणि बाप्याची समांतर वेदना असावी, यमन्या माणूस नसल्यानं आणि बाईही नसल्यानं त्याच्या वेदनेत फरक करता येणारा नसतो. ही निखळ मानवतेची वेदना असावी. पुढं जोगवाच्या पडद्यावरच्या यमन्या गटाराची दारु पिऊन अधिकृतपणे लिव्हर फुटून सडून मरतो. त्यावेळी यमन्याला ‘पुन्यांचा जल्म मान्साचा यावा’, म्हणून त्याच्या दफनाच्या मातीला जोगवाच्या पडद्यावर जोगते, देवदासी, जोगतिणींकडून जोडं हानली जातात. लेकराच्या वयात उसाच्या फडात गावातल्या बाप्प्यांनी साडी फेडली तवा कुटं होतं तुजं सरकारं…हे यमन्याचं आक्रंदन देवदासी प्रथेविरोधातल्या लढ्याची  मर्यादा समोर आणतं.

सुली (मुक्ता बर्वे) ची वेदना तायप्पा नि यमन्याच्या तुलनेत सुसह्यच म्हणायला हवी. केसात जट पकडल्यानं तिला देवदासी केलंय. या सुली नि तायप्पाची लव्हस्टोरी इतकाच जोगवाचा विषय नाही. जीव रंगला…गाण्यात सुली तायप्पाच्या अंगावरची साडी, पदर बाजूला करून त्याचा ब्लाऊज उतरवताना…सुलीचं बाईपण आणि तायप्पाच्या डोळ्यात आलेली लाज….बाई आणि पुरुषातल्या अब्रूचं अंतर मिटवणारा हा अनुभव आहे. जोगवाच्या पडद्यावर हा अनुभव अनेकदा येत राहतो.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -