घरफिचर्सपराक्रमी वीरांगना राणी लक्ष्मीबाई

पराक्रमी वीरांगना राणी लक्ष्मीबाई

Subscribe

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई या झाशी राज्याच्या राज्यकर्त्या होत्या; हिंदुस्थानात १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते.

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही निपुन होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता.

- Advertisement -

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. त्यानंतर गंगाधररावांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.

त्यानंतर अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला.

- Advertisement -

दरम्यान, २१ मार्च १८५८ रोजी सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्वासन दिले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुंजवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’ अशा या पराक्रमी वीरांगनेचे 18 जून 1858 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -