कोरोनाहून भयंकर पुरुषी विकृतीचा विषाणू!

गेल्या ७ महिन्यांपासून जगभरात आणि ५ महिन्यांपासून भारतात कोरोना ठाण मांडून बसला आहे. कोरोनाचा कुणामध्येही भेदभाव करत नाही असं म्हणतात. गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण, शिक्षित, अशिक्षित, लहान, मोठे, वृद्ध, स्त्री, पुरूष अशा सर्वांनाच कोरोना होण्याची सारखीच भिती आहे. त्यातही काही वयोगट फक्त प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनापासून जास्त सुरक्षित असल्याचा दावा जरी केला जात असला, तरी आजपर्यंत जगभरात सापडलेल्या कोट्यवधी कोरोना रुग्णांमध्ये या सर्वच गटातल्या रुग्णांचा समावेश आहे. पण असं जरी असलं, तरी समाजातल्या काही घटकांसाठी कोरोनाचा विषाणू जास्त घातक ठरतो आहे. स्त्रियांना पुरुषांपासून असलेला धोका इतर सामान्य परिस्थितीपेक्षा कोरोना काळात वाढलाय की काय, असंच गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवरून वाटू लागलं आहे. 

राजकीय नेतेमंडळींनी यावर काय भूमिका मांडली हा भाग आपण काही काळासाठी बाजूला ठेऊयात. कारण त्या भूमिका किती प्रामाणिक आहेत, यावरच बहुतेक जनतेचा विश्वास नाही! पण यावर या समाजाचा जवळपास ५० टक्के घटक असलेल्या महिला वर्गामध्ये मात्र आता भितीची भावना निर्माण झाली आहे. आणि त्यासाठी कोरोना नसून काही पुरुषी वासनांध मेंदू कारणीभूत झाले आहेत. आणि ते कोरोनापेक्षाही भयानक आहेत!

प्रत्यक्ष कोरोनाची लागण झाल्यामुळे नव्हे, तर त्यासाठी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये किंवा कोरोना आयसोलेशनमध्ये दाखल झाल्यामुळे महिलांना आता जास्त धोका वाटू लागला आहे. त्याला कारण गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या या घटना. अगदी अलिकडचं उदाहरण घ्यायचं झालं, तर अमरावतीच्या बडनेरामध्ये घडलेली एक किळसवाणी आणि मानसिक विकृती दर्शवणारी घटना. (दुर्दैवाने) महिलांचा विनयभंग, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार या रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांसाठी सामान्य मन कोडगं झालं आहे. हे कानांना ऐकायला कितीही कटू वाटत असलं, तरी सत्य आहे. पण अमरावतीमध्ये घडलेली घटना किंवा त्यासारख्याच घडलेल्या इतर घटना या बाबतीत वेगळ्या आहेत. कोरोनाच्या उपचारांसाठी किंवा कोरोनामुळे संशयित असलेल्या महिला रुग्ण किंवा महिला संशयितांना त्यांच्या जीवितापेक्षाही त्यांच्या शीलाची काळजी जास्त वाटू लागणं हे या सरकारचं आणि प्रशासनाचं अपयश आहे असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं ठरणार नाही.

अमरावतीच्या बडनेरा भागात असणाऱ्या मोदी हॉस्पिटलमध्ये एका तरूणीचा कोविड चाचणीसाठी घसा आणि नाकातल्या स्वॅबसोबतच गुप्तांगातला देखील स्वॅब घेतला गेला. कोरोना चाचणीसाठी फक्त घसा आणि नाकातलाच स्वॅब घ्यावा लागतो हे समजल्यानंतर तिने यासंदर्भात तक्रार केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. संबधित लॅब टेक्निशियनवर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली हा भाग वेगळा. मात्र, या प्रकारामधून काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि एक समाज म्हणून त्या प्रश्नांचा विचार करण्यासोबतच त्यावर उत्तरं शोधण्यासाठी आणि उत्तरं देण्यासाठीही आपण बांधील आहोत.

हा सगळा प्रकार घडला, ती पीडिता एका प्रतिष्ठित व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करते. त्यामुळे साहजिकच शिक्षण, जाणीव किंवा जागृतीच्या स्तरावर ती अज्ञानी नक्कीच नव्हती. मात्र, अशा तरुणीसोबत देखील असा प्रकार घडला असेल, तर ग्रामीण भागात जिथे शिक्षण, जागृती या सगळ्याच बाबतीत आनंद आहे, अशा ठिकाणी चाचणीसाठी किंवा तपासणीसाठी गेलेल्या महिलांच्या बाबतीत काय घडत असेल, याचा अंदाज लावण्यासाठी मन धजावत नाही. अर्थात, तसं घडलंच असेल, असा जरी आपल्याला दावा करता येत नसला, तरी तसं काही कुठे घडलं नसेलच, असा देखील दावा कुणी छातीठोकपणे करू शकणार नाही. किमान बडनेराच्या घटनेनंतर तरी तसा दावा कुणी करू नये. याशिवाय सरकारमान्य लॅबमध्ये दिवसाढवळ्या असा प्रकार घडतो याचा सरळ अर्थ असा की या प्रक्रियेवर कुणाचंही लक्ष, वचक किंवा नियंत्रण नाही. याआधी किती होतं हा जसा अनुत्तरीत प्रश्न आहे, तसंच यानंतरही किती राहील, हा देखील अनुत्तरीत प्रश्नच राहणार आहे. कारण संबंधित पीडित तरूणीने हिंमत करून या प्रकाराबाबत तक्रार केली, म्हणून किमान हा प्रकार उघडकीस आला. उघडकीस न आलेले देखील अनेक प्रकार असण्याची दाट शक्यता आहे.

हा प्रकार काही फक्त बडनेरापुरताच मर्यादित नाही. त्यामुळे तो आत्ताच घडला किंवा त्यामुळे मोठा गोंधळ झाला असंही काही नाही. तपासणीच नाही, तर चक्क आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित महिलांवर देखील बलात्काराच्या निर्लज्ज घटना घडल्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रातही घडलेत, भारतातही घडलेत आणि जगभरात घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका महिलेवर तिथेच दाखल झालेल्या दुसऱ्या पुरुषाने बलात्कार केला. आपण डॉक्टर असल्याचं सांगून अंग दुखत असल्याच्या तक्रारीवर या विकृताने महिलेवर मसाजच्या नावाखाली बलात्कार केला. याचा अर्थ या काळात रुग्णालय प्रशासन, आसपासचे रुग्ण, रुग्णालय कर्मचारी या कुणालाही या घटनेची साधी कुणकुण देखील लागली नाही इतक्या शिताफीने तो विकृत हे कृत्य करू शकला. प्रशासकीय हलगर्जीपणाचा हा भीषण नमुना ठरावा. याच महिन्याच्या २४ तारखेला दिल्लीच्या कोविड केअर सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सेंटरच्या बाथरूममध्ये एका नराधम तरूणाने अत्याचार केले. विकृतीचा कळस इतका की त्या अत्याचाराचा त्यानं व्हिडिओ देखील बनवला. कोरोना चाचणी करण्याच्या नावाखाली राजस्थानच्या रतनगड परिसरात दोघा नराधमांनी एका ३६ वर्षीय महिलेवर रुग्णालयाच्या मागच्या बाजूला नेऊन बलात्कार केला. बिहारच्या गयामध्ये तर आयसोलेशनमध्ये असलेल्या गर्भवती महिलेवर रुग्णालयातल्याच एका कर्मचाऱ्यानं बलात्कार केला. ही यादी अशी वाढतच जाते.

कोरोनासारख्या गंभीर साथीच्या आजाराच्या काळात अशा प्रकारे महिलांमध्ये रुग्णालय, आयसोलेशन सेंटर किंवा कोविड सेंटर्समध्ये जाण्याबद्दल भिती निर्माण होणं हे एकूणच महिलांच्या सुरक्षेसाठीही आणि त्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. कोरोनाच्या नावाखाली या महिलांची फसवणूक होणं आणि त्यांच्यावर अत्याचार होणं ही बाब जशी गंभीर आहे, तशीच या महिला या अशा प्रकारांबाबत सतर्क नसणं ही देखील गंभीर बाब आहे. आणि याला कारण कोरोनाच्या आजाराचं स्वरूप हेच आहे. आपल्याला ज्या आजाराबद्दल पुरेशी माहिती नाही, ज्या आजारावर आजतागायत औषध किंवा उपचार सापडलेला नाही आणि हा आजार वाढला तर जीवघेणा ठरतोय, जगभरात लाखो लोकं अशा आजारामुळे मरण पावत आहेत, अशा आजाराच्या विषाणूची आपल्याला लागण झाली आहे किंवा होऊ शकते म्हटल्यावर आधीच या महिला घाबरलेल्या असतात. त्यात डॉक्टर किंवा रुग्णालयातील व्यक्तीच त्यासंदर्भात काही सांगत असेल किंवा उपचारांच्या नावाखाली काही करत असेल, तर त्यावर महिलांचा विश्वास बसणं ही साहजिक बाब आहे. त्यामुळे इथे सरकार किंवा प्रशासन या बाबींवर पुरेशी जनजागृती करण्यात अपयशी ठरल्याचंच यातून पुढे येत आहे. स्वॅब फक्त नाकातून किंवा घशातूनच घेतला जातो, इतकी मूलभूत बाब देखील सगळ्यांपर्यंत अद्याप पोहोचू शकलेली नाही हे वास्तव बडनेराच्या घटनेनं समोर आणलं आहेच.

खरंतर दिल्लीमध्ये घडलेल्या घटना, राजस्थानमध्ये घडलेल्या घटना, महाराष्ट्रात पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये घडलेली घटना किंवा अगदी परवाची बडनेराची घटना, या घटना घडल्यानंतर इतर कोणत्याही बलात्काराच्या किंवा महिला अत्याचाराच्या घटनांप्रमाणेच काही दिवस चर्चा होऊन ते विषय मागे पडले. या घटनांमधून महिला सुरक्षा आणि महिलांच्या डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी किंवा आरोग्य यंत्रणेवरच्याच विश्वासाला तडा गेला आहे. कोरोनाच्या काळात तर रोज नव्याने वाढलेले रुग्ण आणि कोरोनावरच्या लसींच्या शोधाचे किंवा संशोधनातल्या प्रगतीचे मुद्दे रोज नव्याने चघळले जात असताना कोरोनाच्या पडद्याआड महिलांवर झालेल्या (किंवा भयंकर अंदाजाने होत असलेल्या) घटनांविषयी ठोस पाऊल उचलणं आणि त्या घडू नयेत म्हणून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं नितांत आवश्यक झालं आहे. कारण कोरोनाचा विषाणू हे फक्त या वर्षीचं संकट आहे. त्यावर प्रतिबंधात्मक लसीची आपण सगळेच वाट पाहात असताना ती नजीकच्या भविष्यकाळात येईलही. पण पुरूषी विकृतीचा हा विषाणू आज समाजातल्या अनेक पुरुषांमध्ये भिनलाय, त्यावर प्रतिबंधात्मक उपचार गेल्या शेकडो वर्षांमध्ये सापडलेले नाहीत. कोरोनावर उपचार शोधणं ही जशी संशोधकांची आणि वैज्ञानिकांची जबाबदारी आहे, तशी या विकृतीच्या विषाणूवर उपचार शोधणं ही समस्त मानवजातीची जबाबदारी आहे!