घरफिचर्सका वाढताहेत अपघात?

का वाढताहेत अपघात?

Subscribe

– विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते

गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. त्या निमित्ताने देशातील रस्ते अपघातांच्या वाढत्या प्रमाणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. खरं तर एकूण रस्ते अपघातांपैकी बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होतात. त्यामुळे असे अपघात टाळणं शक्य आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचं नियमन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणं तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं गरजेचं ठरणार आहे.

- Advertisement -

रस्ते अपघातात वाढ 

गेल्या वर्षी देशात रेल्वे अपघातांच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्या संदर्भात एकूणच रेल्वे खात्याच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनानं तातडीनं काही पावलं उचलली. कदाचित त्यामुळे रेल्वे अपघातांचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत आहे. मात्र, देशातील रस्ते अपघातांना आळा घालणं अजूनही शक्य झालेलं नाही. उलट वरचेवर रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असल्याचं वेळोवेळी समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खरं तर रस्ते अपघात रोखण्यासंदर्भात सातत्यानं बोललं आणि लिहिलं जात आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं या संदर्भात सामाजिक जागरूकतेवरही भर दिला जातो. शिवाय वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन व्हावं, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जातात. परंतु या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. साहजिक आता रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी काही वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकता दिसून येत आहे. खरं तर एकूण रस्ते अपघातांपैकी बहुतांश अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत असल्याचं वेळोवेळच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. साहजिक काहीशी जागरूकता दाखवल्यास असे अपघात टाळता येण्यासारखे आहेत. त्या दृष्टीने वाहन चालक आणि प्रशासन या दोघांनीही पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू

देशात २०१६ मध्ये रस्ते अपघातांची संख्या घटल्याचं मात्र अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचं निदर्शनास आलं होतं. २०१७ मध्ये या परिस्थितीत फार सुधारणा झाल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे आजही देशातील रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण रोखण्याचं आव्हान कायम आहे. देशात दर वर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोक मरण पावतात तर जखमींची संख्या पाच लाखांहून अधिक असते. यावरून देशात रस्ते अपघातांचं प्रमाण किती मोठं आहे, याची कल्पना येते. अशा स्थितीत २०१९ पर्यंत देशातील अपघातांचं प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तसं झाल्यास देशातील रस्ते अपघात रोखण्यासंदर्भात मोठा दिलासा ठरेल. मात्र, रस्ते अपघातांची संख्या इतक्या प्रमाणात एकदम कमी होणार का, हा खरा प्रश्न आहे. देशात वर्षभरात कुठं ना कुठं अपघातांच्या अनेक घटना समोर येतात. मात्र, सर्वसाधारणपणे रस्ते अपघातांचं प्रमाण उन्हाळ्यात तसंच पावसाळ्यात अधिक राहत असल्याचं आढळतं. साहजिक यामागील कारणं लक्षात घ्यायला हवीत. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात निसरड्या रस्त्यांवरून वाहन घसरल्यानं तसंच जोरदार पावसामुळे समोरचं काही दिसत नसल्यानं अपघात होतात. उन्हाळ्यात लग्नसराई वा पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा स्थितीत अपघातांची शक्यता वाढते. गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी लग्नासाठी जाणाऱ्या मंडळींच्या टेम्पोला, ट्रकला अपघात झाल्याच्या काही घटना समोर आल्या. अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याही गाडीला अलिकडेच लोणावळ्याजवळ अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातातून दोघेही बचावले.

मोबाईलमुळे होतात सर्वाधिक अपघात 

देशात विविध रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे सर्वाधिक बळी जात असल्याचं आकडेवारी सांगते. त्या पाठोपाठ चारचाकी तसंच हलक्या वाहनचालकांचा समावेश होतो. शिवाय देशातील रस्ते अपघातात पादचारी मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही लक्षात घेण्यासारखं आहे. भरधाव वेगानं वाहन चालवणं हे अपघातामागील महत्त्वाचं कारण राहिलं आहे. २०१६ मधील आकडेवारीनुसार वाहनांच्या भरधाव वेगामुळे झालेल्या अपघातात तब्बल ७३ हजार ८९६ जणांना प्राण गमवावे लागले. अलिकडच्या काळात वाहन चालवताना मोबाईल वापराचं प्रमाण बरंच वाढलं आहे. वाहन चालवताना मोबाईल वापरल्यानं झालेल्या अपघातांमध्ये २०१६ या वर्षात दोन हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. खरं तर वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. शिवाय कोणी वाहन चालवताना मोबाईल वापरत असल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तरीही वाहन चालवताना मोबाईल वापरण्याच्या बेपर्वा वृत्तीला आळा घालणं शक्य झालेलं नाही.

रस्ते अपघातग्रस्तांना मिळणार मदत 

या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईची रक्कम दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय वाहतूक मंत्रालयाकडून नुकताच घेण्यात आला आहे. साहजिक दुर्घटनेत किरकोळ वा गंभीर जखमी झालेल्या, अपंगत्व आलेल्या तसंच मृत्युमुखी पडणाऱ्यांना दहा टक्के जास्त नुकसानभरपाई मिळू शकणार आहे. या निर्णयानुसार रस्ते अपघात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये दिले जाणार आहेत. तसंच अपघातात अपंगत्व आलेल्यांसाठी ५० हजार ते पाच लाख रूपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. एवढंच नाही तर नुकसानभरपाईच्या या रकमेत दर वर्षी पाच टक्क्यांनी वाढ करण्याचंही ठरवण्यात आलं आहे. सध्याच्या वाहन कायद्यांतर्गत अपघातात मृत्यू पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार रूपये तर अपंगत्व आलेल्यांना प्रत्येकी २५ हजार रूपये देण्यात येतात. आता यामध्ये केलेली वाढ महत्त्वाची मानली जात आहे. खरं तर यात नुकसान भरपाईच्या रकमेत वाहनधारकांसाठी असलेल्या थर्ड पार्टी प्रिमिअममध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच अपघातग्रस्तांना अधिक नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांवर टाकण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

एकंदरीत, यापुढे वाहनांच्या इन्शुरन्स प्रिमियमच्या रकमेत वाढ होऊ शकते. म्हणजेच शेवटी याद्वारे सामान्यांच्याच खिशात हात घातला जाणार आहे. शिवाय सरकारच्या या निर्णयाचं विमा कंपन्यांकडून काटेकोर पालन होणार का, असाही प्रश्न समोर येत आहे. मात्र, अशा स्वरूपाच्या उपाययोजना करतानाच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाईसाठी संबंधित यंत्रणा अधिक सक्षम केली जाण्याची आवश्यकता आहे. वाहनांच्या वाढत्या अपघातांमागे मर्यादेपेक्षा अधिक वेग असणं हे ही एक प्रमुख कारण आहे. देशात मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधणीवर विशेष भर दिला जात आहे.

वेगाच्या मर्यादेचे भान ठेवा 

नवनव्या महामार्गांच्या उभारणीची घोषणा केली जात आहे. एकंदर विविध मार्गांवर प्रशस्त रस्त्यांची सुविधा उपलब्ध होत आहे. मात्र, अशा रस्त्यांवरून वाहन चालवताना अनेकांना वेगाच्या मर्यादेचं भान राहत नाही किंवा त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केलं जातं. यातूनच अपघाताची शक्यता वाढते. या संदर्भात परदेशातील परिस्थिती लक्षात घेतली तर तिकडे वाहनांची वेगमर्यादा साधारणपणे १०० किलोमीटर प्रति तास इतकी असते. ती ओलांडल्याचं आढळल्यास संबंधित वाहनधारकाला कडक शिक्षा केली जाते. या शिक्षेच्या भीतीपोटी वाहन चालवताना वेगाच्या मर्यादेवर आवर्जून लक्ष दिलं जातं.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -