घरफिचर्सस्पंदने ओळखू पर्यावरणाची!

स्पंदने ओळखू पर्यावरणाची!

Subscribe

मानवीय पर्यावरण विषयावर 1972 वर्षी स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे संमेलन झालं होतं तेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक जागरुकतेसाठी सकारात्मक आंदोलन केलं जावं, या विषयावर संपूर्ण जगाचं एकमत झाले. वृक्षारोपण व इतर विधायक कार्यक्रमातून पर्यावरणासाठी आपले योगदान देऊन एक अल्पसा प्रयत्न केल्याचं समाधान लोकांना लाभत होतं. पर्यावरण संरक्षणासाठी असा हा सक्रिय सहभाग लोकांकडून मिळत होता. परंतु करोना विषाणूमुळे आलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरातच स्वतःला बंदिस्त करून घेतले.

मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषण टाळले गेले, नद्या-समुद्रकिनारे स्वच्छ झाले, हवेतील दूषित वायूंचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले व जे कधी दूरवर चांदणे दिसत नव्हते ते लोकांना दिसू लागले. पर्यावरण विषयक लोकांनी केलेले सक्रिय योगदानाच्या तुलनेत लोकं निष्क्रिय असताना पर्यावरणाच्या घटकांनी केलेल्या ‘सेल्फ हिलींग’ मुळे पर्यावरणात झालेली सुखद सुधारणा दिसून आली. काहीही न करता पर्यावरण स्वच्छ झाल्याचे दिसण्याचं लोकांना भाग्य लाभले आणि लोकांनी जर सक्रियरित्या पर्यावरण संवर्धनासाठी काम केले तर किती विलक्षण यश मिळू शकते, याची त्यांच्या मनात जाणीव निर्माण झालेली आहे. करोना महामारीपासून वाचण्यासाठी लॉकडाऊनमध्ये पर्यावरणाच्या ‘सेल्फ हिलींग’ ही एक चांगली गोष्ट अधोरेखित झाली आहे.

- Advertisement -

शहरात काँक्रीटच्या जंगलामुळे सरासरीपेक्षा 10 डिग्री जास्त तापमानाची नोंद होत आहे. विकासात्मक कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना पर्यावरणातील विविध घटकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे जंगलात राहणार्‍या जैविक घटकांचे नागरी वस्तीमध्ये स्थलांतराचे प्रमाण सुद्धा अतिशय वेगाने वाढत आहे. माणसाने आपल्या सुखद जीवनासाठी यांत्रिकी व विद्युत उपकरणांचा अमर्याद वापर केला आहे. निसर्गाच्या सीमित परंतु मौल्यवान साधन सामग्रीचे उत्खनन केल्यामुळे आम्ही आमच्या येणार्‍या पिढीला काय वारसा देणार आहोत, हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे.

नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या नियमांची पायमल्ली माणूस करतो, परंतु पर्यावरण कधीही तसे करीत नाही. पर्यावरण आपल्याला भविष्यातील येणार्‍या धोक्याची जाणीव करून देतो. नद्यांचे प्रदूषण, झाडांच्या कत्तली, पिण्याच्या पाण्याचा अमर्याद वापर यामुळे आपण पर्यावरणाचे किती नुकसान करीत आहोत, हे लोकांना समजले पाहिजे. पर्यावरणाच्या हृदयाची स्पंदने ओळखण्यात संवेदनशील श्रवणक्षमता मनुष्याच्या श्रवणेंद्रियांनी विकसित करणे आवश्यक आहे. गरज आणि विलासिता यातील अंतरावर पर्यावरणाची सुरक्षितता अवलंबून आहे.

- Advertisement -

पर्यावरणाबद्दल जागृती लोकमानसात दिसली पाहिजे. माणसांना निसर्गाच्या सान्निध्यात चांगलं जीवन जगता यावे म्हणून पर्यावरणाच्या समस्या आहेत. त्यांना मानवी समस्या समजून जगातील सर्व लोकांनी जबाबदार नागरिक म्हणून आपआपली जबाबदारी पार पाडावी लागेल. पर्यावरणासाठी लोकांच्या मनातआपुलकीची भावना जागृत केली पाहिजे. जगातील संपूर्ण देशात लोकसहभागातून यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणे खूपच गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छतेसोबतच पर्यावरणाविषयक स्वच्छता या दोघांनाही समस्त नागरिकांनी आपल्या जीवनात महत्त्व दिले तर आपण आपले जीवन सुसह्य करू शकतो व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा. करोनाच्या संकटातून सुरक्षित राहण्यासाठी स्वच्छतेचे जे योगदान आहे तसेच महत्त्व आपल्या पर्यावरणाला सुरक्षित व संवर्धित करण्यासाठी सुद्धा आहे. पर्यावरण सुरक्षित राहिलं तर आपण सुरक्षित राहू त्यामुळे पर्यावरणाच्या समस्त घटकांच्या बाबतीत लोकांनी जागृत राहणे फार महत्त्वाचे आहे. फक्त एक दिवस पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे न करता सातत्याने वर्षभर सगळ्यांनी आपले योगदान दिले पाहिजे, तरच या पृथ्वीवरील लोकजीवन सुसह्य होऊ शकेल.

-प्रा. कुलदीप भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -