नातं बाप्पाशी

Subscribe

गणपती हा अनेक लोकांचे आराध्यदैवत आहे. तर अनेक विद्या आणि कलांचा तो देव आहे. त्यामुळे बाप्पाशी एक अनामिक नातं जुळतं. बाप्पाशी असलेलं नातं हे कदाचित प्रत्येकाला शब्दातून व्यक्त करता येणं शक्य नसतं. पण आपल्या कृतीतून त्याच्याशी असलेलं नातं हे प्रत्येकजण दाखवून देत असतो. कदाचित त्यामुळेच सगळीकडेच गणेशोत्सव यशस्वी होत असतात.

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, हे शब्द आपल्याला जेव्हा बोलायलाही येत नसतं तेव्हा कानावर पडतात आणि तेव्हापासूनच नकळत बाप्पाशी एक नातं जुळून जातं. आस्तिक असो वा नास्तिक गणपतीबाप्पाच्या रूपानं कोणाला आपलंसं केलं नाही असं होत नाही. गणपती हा सर्वांचाच लाडका बाप्पा आहे. त्याच्याशी प्रत्येक माणसाचं एक वेगळं नातं असतं हे नक्की. देवाला मानणारी माणसं बाप्पापुढे नतमस्तक होताना आपण बघतो. खरं तर हेच त्याच्याशी असलेल्या नात्यातील वेगळेपण आहे.

बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यानंतर दोन आठवडे आधीपासूनच आपली सगळ्यांचीच घरामध्ये लगबग चालू होते. त्याच्या घरात येण्याने मांगल्य, चैतन्य, उत्साह येतो आणि त्याच्या जाण्याने घरात आणि मनातही एक रितेपण भरून राहतं. हे का होतं? याचा कधी विचार केला आहे का? हे होतं कारण आपलं अगदी लहानपणापासूनच बाप्पाशी जवळकीचं नातं असतं. बर्‍याचदा ज्या गोष्टी आपण माणसांशी बोलू शकत नाही त्या बाप्पाच्या मूर्तीशी बोलल्यानंतरही बरं वाटतं? नाही का? अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकत नाही हे मान्य आहे. पण तरीही असे बरेच लोक असतात ज्यांचं बाप्पाशी अतिशय सलोख्याचं नातं असतं. काही जण तर बाप्पालाच आपलं सर्वस्व मानतात.

- Advertisement -

खरं तर बाप्पाबरोबर असलेलं नातं हे वयानुसार बदलत जातं. लहान असताना बोबड्या शब्दात आपल्याला बुद्धी देणारा आणि आपल्याला काय हवं काय नको ते देणारा बाप्पा असतो. तर जसजसे मोठे होत जातो तसं हे नातं बदलत जातं. आपण आपला मित्र म्हणून आपले प्रश्नही त्यालाच विचारतो. माहीत असतं कदाचित त्याच्याकडून उत्तर येणार नाही. पण का कोण जाणे? त्याच्याशी बोलल्यानंतर, भांडल्यानंतर बरं वाटतं. त्याच्याशी भांडून मन शांत होतं. त्याच्यावर नाराज होतो पुन्हा एकदा उत्तर मिळाल्यावर तूच मार्ग दाखवलास म्हणून त्याचाच आधार घेतो. येणार्‍या अडचणी वाढत गेल्या की, त्याच्या अस्तित्वावर आपण संशय घेतो, तर त्याच्या असण्यालाही नाकारतो. पण हेच जर त्या संकटातून बाहेर आलो तर, संकटात धीराने उभं राहण्याची शक्तीही बाप्पानेच दिली असंही म्हणतो.

प्रत्येक रूपात आपण बाप्पाशी असलेलं नातं जपतो. कधी जगातल्या दुःखासाठी, अन्यायासाठी आपण बाप्पाला जबाबदार धरतो. आपलं श्रेय स्वतःकडे घेतो पण काहीही चुकीचं झालं की, त्याच्यावर ढकलून देतो. पण बर्‍याचदा आपल्याबरोबर जे चांगलं होतं, त्यासाठी त्याचे मनःपूर्वक आभारही मानतो. जे मिळतंय त्यामध्ये आनंद न मानता बाप्पाला कोसत राहणंही आपला त्याच्यावरचा असलेला विश्वास आणि त्याच्याशी असलेलं नातं दर्शवतो. ‘मला चांगली बुद्धी दे’ ही निरागसतेची एक फेज असते आपली. पण त्यानंतरही बाप्पाच्या असलेल्या नात्यामुळे त्याच्याजवळ आपली निरागसता मात्र टिकून राहते. भले समाजात आपल्याला निरागस म्हटलं जात नाही. पण बाप्पाजवळ आपण निरागस म्हणूनच नेहमी उभे राहतो. आपण काय आहोत, हे खरं तर आपल्याला माहीत असतं किंवा बाप्पाला हा समज आपल्या मनात नेहमीच असतो.

- Advertisement -

गणपती हा अनेक लोकांचे आराध्यदैवत आहे. तर अनेक विद्या आणि कलांचा तो देव आहे. त्यामुळे बाप्पाशी एक अनामिक नातं जुळतं. बाप्पाशी असलेलं नातं हे कदाचित प्रत्येकाला शब्दातून व्यक्त करता येणं शक्य नसतं. पण आपल्या कृतीतून त्याच्याशी असलेलं नातं हे प्रत्येकजण दाखवून देत असतो. कदाचित त्यामुळेच सगळीकडेच गणेशोत्सव यशस्वी होत असतात. बाप्पावरील असलेल्या विश्वासामुळे आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळेच गणेशोत्सवात सतत ११ दिवस न थकता आणि न थांबता सगळे मनापासून काम करतात आणि हा उत्सव यशस्वी करतात. चेहर्‍यावर इतकी काम करूनही कोणताही थकवा नाही आणि त्यानंतरही तासतास बाप्पासाठी रांगेत उभं राहणं, बाप्पाचा आशीर्वाद मिळावा अशी भक्ती असणं हे केवळ त्याच्याबरोबर असणार्‍या नात्यामुळेच शक्य होतं. बाप्पाच्या आगमनापासून ते बाप्पा जाईपर्यंत प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह असतो. हा उत्साह कायमस्वरुपी बाप्पाशी असलेल्या नात्यामुळेच दिसतो. बाप्पाशी असलेले प्रत्येकाचं नातं हे अलौकिक असतं आणि हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. कोणीही मानत असो वा नसो, पण बाप्पाशी प्रत्येकाचं नातं सहजपणाने जोडलंलं असतं हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -