घरनवरात्रौत्सव 2022नाते निर्मितीशक्तीशी

नाते निर्मितीशक्तीशी

Subscribe

नवरात्रौत्सवाकडे एक सण म्हणून पाहिले जाते. मात्र हा सण म्हणजे नेमके काय? या सणाशी आपले नाते काय? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? केवळ देवीची पूजा करणे वा आराधना करणे हा या उत्सवाचा उद्देश नाही, तर आपले नाते आहे या निर्मितीशक्तीशी. निर्मितीशक्तीचा जागर करण्यात येतो त्यामुळेच एक पवित्र वातावरण निर्माण होते असे म्हटले जाते.

आपला देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपले सणही कृषीला पूरक असतात. या अश्विन महिन्यात शेतात आलेले धान्य हे कापणीयोग्य झालेले असते. त्यामुळे हे सुगीचे दिवस असतात. म्हणूनच या काळाला निर्मितीशक्तीचा काळ असेही म्हटले जाते आणि या काळाशी शेतकर्‍यांचे आणि साहजिकच प्रत्येकाचे नाते जोडलेले असते. नवरात्रात दुर्गादेवीची म्हणजे आदिशक्तीची – निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. पृथ्वीच्या निर्मिती शक्तीचाच नवरात्र हा एक उत्सव असतो. नवरात्री हा नवनिर्मितीचा, सृजनाचा उत्सव मानून त्यात मातृशक्तीची पूजा करण्याची आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.

घटस्थापना म्हणजे नक्की काय तर, चौरंगावर मातीचा घट ठेऊन त्यामध्ये माती, पाणी घालून धान्य पेरले जाते या घटाची पूजा अर्थात घटस्थापना. अश्विन शुक्ल नवमी या नऊ दिवसांचा हा उत्सव असतो. नवनिर्मिती करणार्‍या सर्व संख्यांमध्ये नऊ ही संख्या सर्वात मोठी आहे. धान्य पेरल्यानंतर ते उगवायला, रोप अंकुरायलासुद्धा नऊ दिवस लागतात. म्हणून नवरात्र हा नवनिर्मितीचा उत्सव आहे. बर्‍याचदा लोकांना केवळ देवीच्या उत्सवाबाबत माहीत असते. मात्र नक्की नवरात्र अथवा आपले या नवनिर्मितीशी काय नाते असते याची जराही माहिती नसते. वास्तविक ही सृजनशीलता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असते.

- Advertisement -

नवरात्र हा दुर्गादेवीचा उत्सव आहे. स्त्रीमध्ये सृजनाची, नवनिर्माणाची क्षमता असते. म्हणूनच आपण स्त्रीला निर्मितीशक्ती मानतो. स्त्रीच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस बाळ वाढत असते आणि नंतर ते जन्माला येते. म्हणून नवरात्र हा उत्सव मातृत्वाचा आदर करणारा अर्थात स्त्रीचा आदर करणारा उत्सव आहे. निसर्गात असणारे सूर्य, चंद्र, नद्या, समुद्र, पर्वत, झाडे, वेली, ऊन वारा, पाऊस यांच्यामध्ये एक शक्ती आहे. तिच्यामुळेच सजीवांना जीवन जगणे शक्य असते. त्या आदिशक्तीची पूजा आपल्याकडे हजारो वर्षांपासून होत आहे. हजारो वर्षांच्या परिवर्तनाच्या या काळात त्या आदिशक्तीनेच दुष्ट अन्याय करणार्‍या राक्षसांना ठार मारले आणि सामान्य लोकांना भयमुक्त केले.

देवीची अनेक रूपं आपल्याला लहानपणापासूनच सांगितली जातात. ही रूपं अर्थातच निर्मितीशक्ती. केवळ देवी आहे असे न मानता आपल्याला प्रत्येक परिस्थितीत कशा प्रकारे झगडता यायला हवे हे या देवींच्या गोष्टींमधून दिसून येते. दुर्गामाता दुष्ट राक्षसांना मारते. तसे आपण भ्रष्टाचार, अनीती, खोटेपणा, अन्याय यांना नाहीसं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याचबरोबर आपल्या स्वत:मधले आळस, उद्धटपणा, मत्सर, द्वेष, राग हे दुर्गुणही नाहीसे केले पाहिजेत हेच या कथांमधून लहानपणापासून आपल्याला धडे दिले जातात.

- Advertisement -

निर्मितीशक्तीशी आपले नाते हे एका तर्‍हेने जन्मापासूनच जोडले जाते. कारण आपली निर्मिती करणारी आपली माता जन्मापासूनच आपल्याला हे नाते शिकवत असते. या निर्मितीशक्तीचा आदर करता यायला हवा. तरच या नात्याचा योग्य आदर होऊ शकतो. मातृत्वाची, सृजनाची प्रेरणा देणा-या नवरात्रीच्या या उत्सवाची अगदी खालच्या पातळीपर्यंत घसरण होताना दिसत आहे. मात्र हे नाते आपल्या निर्मितीशक्तीशी आणि सणाशी कसे जपायचे हे सर्वस्वी आपल्या वागण्यावर अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -