घरफिचर्सक्रांतिकारक रास बिहारी बोस

क्रांतिकारक रास बिहारी बोस

Subscribe

आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले क्रांतिकारक नेता रास बिहारी बोस यांचा आज जन्मदिन. ब्रिटिश सरकार विरोधात गदर षड्यंत्र रचण्यापासून ते देशातील ब्रिटिशराज विरोधात चळवळींचे नेतृत्व करण्याची कामगिरी रास बिहारी बोस यांनी बजावली. रास बिहारी बोस यांनी परदेशात राहूनही देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते आजन्म प्रयत्नरत राहिले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स हार्डींगवर बॉम्ब हल्ला करण्याची योजना आखणे. गदर कटानंतर जपानला पलायन करून तेथे इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात रास बिहारी बोस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २५ मे १८८६ मध्ये बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील सुबालदह गावात रास बिहारी बोस यांचा जन्म झाला. रास बिहारी बोस यांचे सुरुवातीचे शिक्षण चंदननगरमध्ये झाले. बालपणापासूनच रास बिहारी बोस देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत. तसेच क्रांतिकारक चळवळींमध्ये त्यांना खूप आवड होती. सुरुवातीच्या काळात रास बिहारी बोस यांनी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत मुख्य लिपिक म्हणून काम केले. त्याचदरम्यान क्रांतिकारक जतीन मुखर्जींच्या नेतृत्वाखालील युगांतर नामक क्रांतिकारक संघटनेचे अमरेंद्र चॅटर्जी यांच्याशी रास बिहारी बोस यांची ओळख झाली. अशाप्रकारे ते बंगालमधील क्रांतिकारकांशी जोडले गेले. त्यानंतर ते अरविंद घोष यांचे राजकीय शिष्य राहिलेले जतींद्रनाथ बॅनर्जी यांच्या संपर्कात आले. त्यानंतर रास बिहारी बोस हे संयुक्त प्रांत (सध्याचा उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील प्रमुख आर्य समाजी क्रांतिकारकांच्या जवळ आले.

१२ डिसेंबर १९११ रोजी भरविण्यात आलेल्या दिल्ली दरबारानंतर जेव्हा तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगची दिल्लीतून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी शोभायात्रेदरम्यान व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्याची योजना बनविण्यात रास बिहारी बोस यांची प्रमुख भूमिका होती. त्यानुसार अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंतकुमार विश्वासने त्यांच्यावर बॉम्ब फेकला, परंतु बसंतकुमार यांचा निशाणा चुकला. या घटनेनंतर ब्रिटिश पोलीस रास बिहारी बोस यांच्यामागे लागले. ब्रिटिशांची नजर चुकवून रास बिहारी बोस यांनी रातोरात रेल्वे पकडून डेहराडून गाठले. विशेष म्हणजे कोणालाही शंका येऊ नये याची रास बिहारी बोस यांनी काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी डेहराडूनमध्ये नागरिकांची सभा बोलावली. सभेत त्यांनी व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगवरील हल्ल्यावर टीका केली. १९१३ मधील बंगालमध्ये आलेल्या पुराच्या मदतकार्यादरम्यान रास बिहारी बोस यांची भेट जतिन मुखर्जींशी झाली. त्यांनी रास बिहारी बोस यांच्यात नवा जोश भरण्याचे काम केले. यानंतर दुप्पट उत्साहाने रास बिहारी बोस यांनी क्रांतिकारक चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिले. युरोपात युद्ध सुरू असल्याने सैनिक मोठ्या संख्येने देशाबाहेर गेले आहेत. तेव्हा देशात असलेल्या थोड्याफार सैन्याला आपण सहज पराभूत करू, असे युगांतरच्या अनेक नेत्यांना वाटले, पण त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी होऊन ब्रिटिशांनी अनेक क्रांतिकारकांना अटक केली. मात्र, रास बिहारी बोस ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. पुढे १९१५ मध्ये जपानमधील शांघाय शहरात पी एन टागोर या नावाने राहून रास बिहारी बोस यांनी विदेशी बनावटीच्या हत्यार्‍यांचा पुरवठा करत भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम केले. अशाप्रकारे रास बिहारी बोस यांनी अनेक वर्षे भारतापासून दूर राहत देशसेवा केली. जपानमध्येही आपल्या क्रांतिकारक मित्रांसोबत रास बिहारी बोस देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नरत राहिले. त्यांनी जपानमधील इंग्रजी जपानमध्ये अध्यापनासह लेखक आणि पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी न्यू एशिया नामक वृत्तपत्र सुरू केले. एवढेच नाही तर त्यांनी जपानी भाषा अवगत करून १६ पुस्तकं लिहिली. विशेष म्हणजे रामायणाचे जपानी भाषेत अनुवाद करण्याचे कामही त्यांनी केले. जपानमधील टोकियोमध्ये रास बिहारी बोस यांनी हॉटेल सुरू करून तेथील भारतीयांना संघटित करण्याचे काम केले.

- Advertisement -

जपानमध्येही ब्रिटिश सरकारने रास बिहारी बोस यांची पाठ सोडली नाही. ब्रिटिशांनी जपानकडे रास बिहारी बोस यांना ताब्यात देण्याविषयी मागणी केली. त्यामुळेच रास बिहारी बोस यांना जपानमध्ये सतत नावे आणि घरं बदलून रहावे लागत होते. १९१६ मध्ये प्रसिद्ध पॅन एशियाई समर्थक सोमा आईजो आणि सोमा कोत्सुको यांच्या सुपुत्री सोबत रास बिहारी बोस यांचा विवाह झाला. त्यांनतर १९२३ मध्ये रास बिहारी बोस यांनी जपानचे नागरिकत्व स्वीकारले. जपानमधील अधिकार्‍यांना भारताच्या राष्ट्रवादी भूमिकेत सामील करून घेत देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात जपानी अधिकार्‍यांचा सक्रिय पाठिंबा मिळवून देण्यात रास बिहारी बोस यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. २८ मार्च १९४२ रोजी टोकियो येथे रास बिहारी बोस यांनी संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनात त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. २२ जून १९४२ रोजी रास बिहारी बोस यांनी बँकॉकमध्ये लीगच्या दुसर्‍या संमेलनाचे आयोजन केले. ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांना लीगमध्ये सामावून घेत लीगच्या अध्यक्षस्थानी आमंत्रित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भारताला ब्रिटिश राजमधून मुक्ती मिळविण्यात रास बिहारी बोस आजन्म कार्यरत राहिले. अशातच २१ जानेवारी १९४५ रोजी रास बिहारी बोस यांचा मृत्यू झाला. रास बिहारी बोस यांच्या निधनापूर्वी जपान सरकारने रास बिहारी बोस यांचा ऑर्डर ऑफ द राइजिंग सनने सन्मानित केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -