घरफिचर्सधुरंधर आणि परिवर्तनवादी राज्यकर्त्या राष्ट्र माता अहिल्यादेवी

धुरंधर आणि परिवर्तनवादी राज्यकर्त्या राष्ट्र माता अहिल्यादेवी

Subscribe

भारताच्या संसद भवनात अहिल्यामातेच्या फोटोला वंदन करून कामकाज चालू होते. युनोमध्ये अहिल्याबाईंच्या नावे अभ्यास केंद्र चालते. जर्मनी, फ्रान्समध्ये अहिल्याईंच्या विषयावर पीएचडी होते. लोकशाहीत राजकारण हा अविभाज्य असा महत्त्वपूर्ण घटक आहे. राजकारणात कुणी यावे? राजकारण कसे करावे? का करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आदर्श मातृत्व, कर्तृत्व, आणि नेतृत्व यांचा संगम असलेल्या राष्ट्रमातेजवळ मिळतात. अहिल्यामाईंच्या वेळी न्याय खाते ही उत्पन्नाची बाब नव्हती. प्रजेला न्याय फुकट मिळे. वर्तमानकाळात न्याय प्रक्रियेत खर्च आणि विलंब अधिक लागत असल्याने आर्थिकदृष्ठ्या दुर्बल लोक न्याय मागावयास पुढे येतच नाहीत. अहिल्यामाईचा विचार घेऊन क्रांतीची ज्योत पेटवू आणि या अंधारलेल्या समाजाला लख्ख प्रकाश देण्याचे कार्य होईल अशी अपेक्षा बाळगू.

इतिहासाने पानोपानी…
जिची गायिली गाथा !
होळकरांची तेजस्वी ती…
पुण्यश्लोक माता !
अहिल्या मातेने आपल्या कर्तृत्वाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवला आहे. भारताच्या राज्य प्रशासनात त्यांच्या कार्याचे स्थान अढळ आहे. पुढील संकट ओळखून सर्व स्वकियांना इंग्रज फिरंग्यांविरुद्ध एकत्र होण्याचे त्यांनी आवाहन केले होते. संपूर्ण जग आजही ज्यांची उत्तम प्रशासक, प्रजावत्सल समदृष्टी, कर्तृत्व सृष्टी आणि दूरदृष्टी असलेली राणी म्हणून दखल घेते त्या होत राष्ट्रमाता अहिल्याई. ज्या समाजरचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्त्रियांना उपलब्ध नसताना, त्याकाळी या महान कर्तृत्वशालिनीने पतीबरोबर सती न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला. ही प्रजावत्सल राणी जनमानसाच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी लोकमंगल माता झाली.

अहिल्यामाता पुण्यशील, धार्मिक म्हणून तर अवघ्या जगाला माहीत आहेतच. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी, तळी, कुंडे, रस्ते यासारखे प्रचंड कार्य तर असेतुहिमाचल पसरलेले आहे. पाणपोया, अन्नछत्रे आज अडीचशे वर्षानंतरही चालू आहेत. परंतु आश्चर्याने थक्क करतं ते त्यांचं अपार शहाणपण, मुत्सद्दीपणा, ज्ञानलालसा, असामान्य तडप, हिशोबातली समूळ पारंगतता, झुंज घेण्याचा खंबीरपणा, प्रजा वत्सलता, अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, संरक्षण व्यवस्था, गुप्तहेर खाते, उदार परराज्य धोरण, स्वाभिमान, राज्यकारभाराची जाण आणि माणुसकीची घट्ट नातं असणारं परदुःखकातर असं मन.

- Advertisement -

त्या स्वतः रणांगणात युद्धाला उतरत. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी या जगातील पहिले ठरलेले स्त्रियांचे सैनिक दल ही तयार केले होते. होळकर संस्थानातील एकही कर्ता पुरुष कारभारी जिवंत नसताना राज्यावर चाल करून आलेल्या रघुनाथराव पेशव्याला अहिल्याईने एका पत्रातच त्याची भूमिका बदलण्यास भाग पाडले होते. “आमच्या पूर्वजांनी कुणाची भाटभडवेगिरी करून हे राज्य कमावले नाही तर रक्ताचे पाणी केले आहे. मी एक अबला असहाय्य स्त्री आहे या भ्रमात कोणी राहू नये. मी खांद्यावर भाले घेवून समोर उभी राहिले तर, सगळेच मनसुबे जागच्या जागी विरतील. माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पहिले तर, आमचीही तलवार चालेल. आपली गाठ आता रणांगणातच पडेल.” पण आज स्त्रीयांवर होणारे अन्याय पाहता, आपण या राष्ट्रमातेचा वारसा जपण्यास नालायक ठरत आहोत की काय? असा प्रश्न पडतो. समाजातील सर्वच स्त्रियांनी आपला लढाऊपणा जोपासला पाहिजे. आज प्रत्येक पुरुषाने स्वतःला मल्हारबाचे वैचारिक वारसदार बनवून आचरण करणे गरजेचे आहे. तरच या पुरुषप्रधान सामाजिक, मानसिक, दास्यातून महिलांची मुक्तता होईल.

अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक बाबींचे योग्य निवारण, समता, शांतता, बंधुता, सामाजिक न्याय, विचार-उच्चारांचे स्वातंत्र्य आणि प्रत्येक लहान मोठ्या समाज घटकांचा आत्मसन्मान जपला जाण्याची कायदेशीर हमी असलेले लोककल्याणकारी राज्य, एका स्त्री शासकाद्वारे सुमारे तीस वर्षे सुदृढ, संपन्न आणि शांततापूर्णपणे करण्याचे उदाहरण इतिहासात कुठे आढळत नाही.

- Advertisement -

“दौलत” आणि “खाजगी” असे उत्पन्नाचे दोन विभाग असणारे इंदूर हे एकमेव राज्य होते. अहिल्यामाईंनी भारतभर जी लोककल्याणाची कामे केली त्याचा सर्व खर्च आपल्या स्त्रीधनाच्या “खाजगी” च्या उत्पन्नातून केला ही बाब अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आणि अभूतपूर्व आहे. आजचे शासन व प्रशासन याच्या अगदी विरुद्ध वागताना आपल्याला दिसते.
अहिल्यामाईंच्या वेळी न्याय खाते ही उत्पन्नाची बाब नव्हती. प्रजेला न्याय फुकट मिळे. वर्तमानकाळात न्याय प्रक्रियेत खर्च आणि विलंब अधिक लागत असल्याने आर्थिकदृष्ठ्या दुर्बल लोक न्याय मागावयास पुढे येतच नाहीत.

शेती, पाणी, व्यापार, रस्ते या विविध क्षेत्रात अतिशय योजनाबद्ध रीतीने आणि विचारपूर्वक त्यांनी आपले धोरण राबविले. विविध राज्यांशी सलोख्याचे स्नेहपूर्ण संबंध ठेवून परिपूर्ण लोकहितदक्ष परदेशी धोरणाचा अर्थात फॉरेन पॉलिसीचा स्वीकार केला. त्यांची दयापूर्ण दृष्टी केवळ मानवा पुरतीच मर्यादित नव्हती. गुरांना चारा आणि पक्षांना दाणा मिळावा म्हणून कुरणं आणि शेतं त्यांनी राखून ठेवली होती. अहिल्यामाईंच्या राजाश्रयामुळे महेश्वरी वस्त्रोद्योगाची भरभराट झाली. नामवंत वैद्यांना आमंत्रणे देऊन क्षयरोगावर संशोधन सुरू करणे, संस्कृत पाठशाळा, विद्वानांना- कलावंतांना राजाश्रय, सांस्कृतिक वैभव, मुलींची पाठशाळा आणि स्त्रियांना शस्त्रशिक्षण हे काम अहिल्याईने अडीचशे वर्षापूर्वी सुरू केलेले पाहून मन चकित होते. जिल्हा परिषद, खेड्यापर्यंत न्याय, कुटीरोद्योग, हुंडाबंदी, दारूबंदी हे सारे कार्यक्रम त्यांनी प्रथम सुरू केले. त्यांनी जंगलतोडीस विरोध केला. आज आपण इतर देशात आपले राजदूत पाठवतो, पण याची सुरुवात त्याकाळी अहिल्याईंनी केली. इतर राज्यातील वकील त्यांच्या दरबारात होते व त्यांचे वकील इतर राज्यात. एका सामान्य कुळात जन्माला आलेल्या अहिल्येला लोकमातेची पदवी दिली ती प्रजेने. एक राज्य शासन म्हणून त्यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प आपण आजही राबवतो आहोत हे केवढे आश्चर्य? या योजना त्यांच्या बुद्धीवैभवाची साक्ष देत आहेत.

वडिलांचा आदर करण्याच्या भारतीय संस्कृतीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होत. जो प्रवाशांना लुटणार्‍या भिल्लांचा बंदोबस्त करेल त्या शूरवीराला माझी कन्या देईल अशी घोषणा केली. लूटारूंचे नायक करण्यातला अहिल्यामाईचा दूरदर्शीपणा थक्क करणारा आहे.

प्रजेच्या सुखासाठी अहिल्यामाई जागृत होत्या. विधवांचा, स्त्रीयांचा छळ करणार्‍यांना क्षमा नव्हती. छत्रपतींच्या स्वराज्याचे खरे सुराज्य केले ते अहिल्यामातेने. आणि आज आपण आमिषाला बळी पडून, चुकीच्या लोकांच्या हाती कारभार देतो आणि राज्याची दुर्दशा करून ठेवतो.

एखादे छोटेसे काम करूनही आज त्याची खूप मोठी जाहिरात करणारे शासन, आणि त्या काळात अनेक लोकोपयोगी कामे, खाजगी संपत्तीतून करूनही नावाची अपेक्षा न करणार्‍या अहिल्यामाई. लोककल्याणकारी कामामुळे कवी अनंत फंदी यांनी अहिल्यामातेचे गुणगाण गाणारे काव्य लिहिले, तर त्यांना जनतेच्या दुःखाचे, प्रबोधन करणारे पोवाडे गाण्याचा सल्ला अहिल्यामाईने दिला.

सर्व जिवलगांचे मृत्यू आणि अठरा सतींच्या किंकाळ्या ज्यांनी ऐकल्या त्यांच्या वेदनांचं, दुःखाचं वर्णन कोण आणि कसं करणार? तरीसुद्धा ही बाणेदार स्त्री शेवटपर्यंत कुणालाही शरण न जाता कठोर कर्मयोग आचरत राहिली. पण या स्वार्थी जगाला कर्तृत्ववान माणसाची किंमत नसते. ते आपले उखळ पांढरे करायच्या मागे असतात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, गंगोबातात्या चंद्रचूड, महादजी शिंदे आणि राघोबादादा यांची नावे आपल्याला घ्यावी लागतील.

युद्ध ही विनाशकारी प्रथा आहे, असे अहिल्याईचे मत होते. त्याची अनेक कारणे त्या देत. प्रजेची अपरिमित हानी होते. ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्या धनाचा दुरुपयोग होतो. समाजाचे, राज्याचे नेतेपण करणार्‍या व्यक्ती युद्धात गुंतल्यामुळे त्यांचा प्रजेस उपयोग होत नाही. बुद्धिमान व्यक्तीचा युद्धात नाश होण्याचा संभव असतो. सुरक्षिततेची काळजी घेण्यात मनुष्यबळ खर्ची होते. सामान्य माणसे किडा-मुंगी सारखी मरतात. राज्याच्या तिजोरीवर भर पडतो. शक्तीचा उपयोग राज्याचे नंदनवन करण्यासाठी व्हावा असा त्यांचा दृष्टीकोण होता. म्हणून युद्ध टाळण्याकडे त्यांचा कल होता. अहिल्याबाईंचे हे विचार आजही, आजच्या घडीतील युद्धालाही लागू होतात. त्यांचे विचार आजही तेवढेच ताजे वाटतात हेच त्यांचे मोठे यश आहे.

भारताच्या संसद भवनात अहिल्यामातेच्या फोटोला वंदन करून कामकाज चालू होते. युनोमध्ये अहिल्याबाईंच्या नावे अभ्यास केंद्र चालते. जर्मनी, फ्रान्समध्ये अहिल्याईंच्या विषयावर पीएचडी होते.लोकशाहीत राजकारण हा अविभाज्य असा महत्त्वपूर्ण घटक आहे. राजकारणात कुणी यावे? राजकारण कसे करावे? का करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आदर्श मातृत्व, कर्तृत्व, आणि नेतृत्व यांचा संगम असलेल्या राष्ट्रमातेजवळ मिळतात. अहिल्यामाईचा विचार घेऊन क्रांतीची ज्योत पेटवू आणि या अंधारलेल्या समाजाला लख्ख प्रकाश देण्याचे कार्य होईल अशी अपेक्षा बाळगू. लोककल्याणकारी राज्य कारभार करून आदर्श राज्याची संकल्पना साकार करणार्‍या आणि दुःखाच्या अविरत प्रवाहातही सतत लोकहिताचा आविष्कार करणार्‍या राष्ट्रमाता अहिल्यामाई यांच्यातील आदिम स्त्रीशक्तीला सादर प्रणाम.

डॉ. वर्षा रामचंद्र चौरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -