घरताज्या घडामोडीरॉकेट बॉईज : कथा दोन भारतीयांची !

रॉकेट बॉईज : कथा दोन भारतीयांची !

Subscribe

सोनी लिव्हने जेव्हा रॉकेट बॉईज ही वेबसिरीज जाहीर केली तेव्हापासूनच याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती, विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांच्याबद्दल विकिपीडियावर जितकी माहिती उपलब्ध आहे ,तितकीच माहिती ज्ञात असलेल्या सामान्य प्रेक्षकाला त्यांच्या व्यक्तिमत्वांची ओळख या वेबसिरीजमधून होईल. या वेबसिरीजमध्ये सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या कथेत कुठलेही पात्र लार्जर दॅन लाईफ नाही, ना यात पात्रांचे गुणदोष लपविण्याचा प्रयत्न झालाय, ना त्यांना देव बनवण्यात आलंय, ही 2 सामान्य व्यक्तींची कथा आहे, ज्यांनी आपल्या संशोधनातून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने भविष्यवेधी भारताचा पाया रचला.

देशाचा प्रवास कधीच एका मार्गाने पूर्ण होत नाही, भारताला भारत बनवलं ते अशाच विविध मार्गांनी आपलं योगदान देणार्‍या व्यक्तींनी. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजवर प्रत्येकजण आपापल्या परीने देशाच्या विकासात आपलं योगदान देत आला आहे. आज भारताचे अवकाश संशोधन आणि अणुऊर्जा क्षेत्रात जगभर नाव घेतले जाते, त्याला कारण आहे अशा दोन व्यक्ती ज्यांनी आपल्या प्रयत्नांतून आणि जिद्दीतून भारताला त्या काळात सक्षम बनवलं, ज्या काळात भारतात फार सुविधा उपलब्ध नव्हत्या. आज तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा वापर करून अनेक मोठमोठे सिनेमे वेबसिरीज बनवल्या जातात, पण भारताला ज्यांनी खर्‍या अर्थाने तंत्रज्ञानाशी ओळख करून दिली आणि संशोधन केले त्या वैज्ञानिकांची कथा आजही सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी सोनी लिव्हवर हाच एक प्रयत्न करण्यात आला. इंडियन न्यूक्लियर प्रोग्रामचे जनक डॉक्टर होमी जहागीर भाभा आणि इंडियन स्पेस रिसर्च प्रोग्रामचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांची कथा सांगणारी ‘रॉकेट बॉईज’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली.

दिवसरात्र लॅबमध्ये काम करणारे, कामासाठी वेडे झालेल्या वैज्ञानिकांच्या कथा फार ऐकल्या होत्या, पण पडद्यावर कधी पाहिल्या नव्हत्या, ते वैज्ञानिक स्वभावाचे कसे होते? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडलं होतं. त्यांच्या संशोधनाचा भारताला कसा फायदा झाला आणि त्यांच्या कथेबरोबरच चालणारी भारताची एक देश म्हणून कथा कशी होती. याचं चित्रण या 8 भागांच्या वेबसिरीजमध्ये करण्यात आलं आहे. सोनी लिव्हने जेव्हा रॉकेट बॉईज ही वेबसिरीज जाहीर केली तेव्हापासूनच याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती, विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांच्याबद्दल विकिपीडियावर जितकी माहिती उपलब्ध आहे ,तितकीच माहिती ज्ञात असलेल्या सामान्य प्रेक्षकाला त्यांच्या व्यक्तिमत्वांची ओळख या वेबसिरीजमधून होईल. या वेबसिरीजमध्ये सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या कथेत कुठलेही पात्र लार्जर दॅन लाईफ नाही, ना यात पात्रांचे गुणदोष लपविण्याचा प्रयत्न झालाय, ना त्यांना देव बनवण्यात आलंय, ही 2 सामान्य व्यक्तींची कथा आहे, ज्यांनी आपल्या संशोधनातून आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने भविष्यवेधी भारताचा पाया रचला.

- Advertisement -

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात विदेशात सुरू असणारं शिक्षण सोडून मायदेशात परतलेल्या दोन तरुण संशोधकांची कथा म्हणजे रॉकेट बॉईज, अतिशय सुखसंपन्न परिवारात जन्मल्यामुळे ना यांना फार स्ट्रगल करावा लागला, ना मायदेशात परतल्यानंतर समस्यांना तोंड द्यावे लागले. आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भारतातच संशोधन करायचं ठरवलं, पण इंग्रजांच्या तावडीत असलेल्या भारतात त्यांना नंतर अनेक समस्या उद्भवू लागल्या, या दोन तरुणांचा स्वभाव परस्परविरोधी असला तरी दोघांमध्ये ध्येयाप्रती असलेले समर्पण या वृत्तीमुळे मैत्री कायम राहते. विक्रम साराभाई मूळचे अहमदाबादचे. ज्यांचे वडील मोठे व्यावसायिक आहेत तर होमी भाभांचे वडील नामवंत वकील, सीव्ही रमण यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची भेट होते आणि तिथूनच खर्‍या अर्थाने या कहाणीचा आरंभ होतो.

विक्रम साराभाई ज्याला भारतातील पहिलं रॉकेट बनवायचं आहे आणि होमी भाभा ज्याला देशाला न्यूक्लियर पॉवर बनवायचं आहे, असे दोन वेगवेगळे विषय असलेल्या वैज्ञानिकांची ही कथा आहे, ज्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणार्‍या गोष्टींनादेखील तितकंच महत्व दिलंय. कथेतील काही दृश्यांचा उल्लेख नक्की करावा वाटतो, त्यातील पहिले म्हणजे इन्स्टिट्यूटवर युनियन जॅक काढून तिरंगा फडकावणे, बैलगाडीवर रॉकेट घेऊन येणे, पहिली अणुभट्टीची चाचणी, बलून एक्सपेरिमेंट ही सगळी दृश्ये आपली छाती अभिमानाने फुगविण्यासाठी पुरेशी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यात विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांसोबतच अनेक अशी इतिहासातील नावं पडद्यावर पाहायला मिळतात, नोबेल विजेते सी व्ही रमण, एपीजे अब्दुल कलाम, दूरदर्शनच्या पहिल्या न्यूज रीडर प्रतिमा पुरी, जेआरडी टाटा, पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी सारख्या पात्रांना पडद्यावर पाहणे खरंच पर्वणी होती.

- Advertisement -

होमी भाभांच्या वैयक्तिक जीवनाबाबत अनेक किस्से ऐकले होते जे इथे पाहायला मिळाले, नेहरूंसोबत असलेली त्यांची मैत्री असो किंवा टाटा सोबतचे संबंध, एखाद्या गोष्टीवर ठामपणे उभे राहणे आणि आपले म्हणणे मंजूर करून घेणे अशा अनेक पैलूंची नव्याने ओळख या माध्यमातून झाली. सिरीजमध्ये ड्रामा नसेल तर प्रेक्षक खिळून राहू शकत नाही आणि हीच गोष्ट लेखकांना माहिती होती म्हणून यात काहीसा मसाला देखील ऍड करण्यात आलाय, पण त्याची मात्रा कथेला साजेशी आहे. विक्रम साराभाई आपल्या प्रेयसीला बसमध्ये सर्वांसमोर प्रपोज करतात आणि तो सिन आपल्याला पूर्ण फिल्मी वाटतो पण पुढच्याच दृश्यात त्यांच्या प्रेयसीचे उत्तर आपल्याला वास्तवात घेऊन येते. दुसरा देखील एक सिन आहे ज्यात होमी भाभा आपल्या प्रेयसीच्या लग्नात वर्‍हाडी म्हणून जातात, अशा अनेक रंजक दृश्यांमुळे सिरीज जास्त रटाळ बनत नाही.

सुपरस्टार असणार्‍या लोकांची पात्रं साकारण्यासाठी अभिनेतादेखील सुपरस्टार हवा असतो, रॉकेट बॉईज या बाबतीत भाग्यशाली राहिली की, यातल्या प्रत्येक पात्राला न्याय मिळाला आहे. होमी भाभांची भूमिका साकारणारा जिम सरभ एक परिपूर्ण अभिनेता बनला आहे. ‘नीरजा’सारख्या सिनेमातील खलील असो किंवा ‘पद्मावत’मधला मलिक काफूर त्याच्या भूमिकांना काहीशी मर्यादा होती म्हणा किंवा त्या सहायक अभिनेत्याच्या भूमिका होत्या, पण यावेळी तो मुख्य भूमिकेत दिसलाय आणि त्याने पात्राला पुरेपूर न्याय दिला आहे. जिम सरभची हिंदी ऐकली की, एक वेगळेपणा जाणवतो. भाभा हे पारसी होते आणि त्या प्रकारचे पात्र साकारण्यासाठी अशीच हिंदी अपेक्षित होती. म्हणून जिम सरभचा भाषेचा लहेजा मग तो हिंदी असो किंवा इंग्रजी त्या भूमिकेला शोभतो, त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स आणि डायलॉग डिलिव्हरी भाभांचे पात्र पुन्हा एकदा जिवंत करते. दुसरी मुख्य भूमिका म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई यांची जी साकारली आहे ईश्वांक सिंगने. आता हे पात्र होमी भाभांच्या अगदी विरुद्ध होते. शांत आणि संयमी, प्रेम व्यक्त करण्यात लाजणारा, ब्रिलियंट सायंटिस्ट म्हणजे विक्रम साराभाई आणि त्यांची भूमिकादेखील ईश्वांक सिंगने उत्तम साकारली आहे. त्याच्या लूकवरदेखील बरेच काम केलेले आहे, गालावरची म्हस असो किंवा मोठे केलेले कान प्रत्येक गोष्ट साराभाई समोर आणण्यासाठी गरजेची होती.

ईश्वांक सिंगने यापूर्वी ‘पाताळ लोक’मध्ये काम केले होते आणि त्यातील भूमिकादेखील थोडी याच प्रकारातील होती. या दोन पात्रांच्या सोबत मृणालिनीच्या भूमिकेत असणारी रेजिना कसांड्रा, पिप्सीच्या भूमिकेतील साबा आझाद आणि एपीजे अब्दुल कलामांच्या भूमिकेतील अर्जुन राधाकृष्णन यांनीदेखील चांगलं काम केलंय. याव्यतिरिक्त दिव्येंदु भट्टाचार्य यांचा रजा मेहंदीदेखील उत्तम आहे आणि राहिला प्रश्न राजीत कपूरच्या पंडित नेहरूंचा, तर तो आता सर्वपक्षीय अभिनेता वाटतोय. महात्मा गांधी, पंडित नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान मोदींपर्यंत प्रत्येक पात्र हा कलाकार उत्तमरित्या साकारतो आहे. बॅकग्राउंड स्कोअर थोडा अधिक चांगला असता तर सिरीज अधिक उत्तम झाली असती. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. डायरेक्शन अभय पन्नूने पहिल्यांदा केलंय असं वाटत नाही. ‘रॉकेट बॉईज’ ही केवळ दोन वैज्ञानिकांची कथा नाही तर ती त्यांच्या प्रवासासोबत घडणार्‍या देशाच्या प्रवासाची कथा आहे, म्हणून जर वेगळं काही पाहायचं असेल तर एकदा ‘रॉकेट बॉईज’ पाहण्यास हरकत नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -