घरफिचर्सबरं झालं, वैज्ञानिकाने कान टोचले...!

बरं झालं, वैज्ञानिकाने कान टोचले…!

Subscribe

गेल्या सात आठ वर्षांपासून देशात सुरू असलेलं अंधश्रध्देचं स्तोम आणि विज्ञानाला अंधश्रध्देत गुंडाळू पाहणार्‍यांच्या डोळ्यात नाशिक येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी झणझणीत अंजन टाकलं हे बरं झालं. हे इतर कोणाचं काम नाही. ज्यांनी ज्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात सत्तेने नको इतकी आग ओकली. त्यांच्या विरोधात कधी अविश्वास तर कधी देशद्रोहाच्या कारवाईलाही सामोरं जावं लागलं. इतकं होत असताना देश कुठल्या दिशेला चालला आहे, हे सांगण्याचं धाडस कोणीही केलं नाही. याचा गैरफायदा घेत या मंडळींनी देशाला जखडून ठेवलं होतं. अर्थात ते लागलीच बंद होईल, असं नाही. पण या मंडळींचे नारळीकरांसारख्यांनीच कान टोचायची आवश्यकता होती. जग हे विज्ञानावर चालतं की अज्ञानावर हे एकदा कोणी तरी या मंडळींना सांगण्याची आवश्यकता होती. कुठल्याशा गटारात गॅस तयार होतो आणि या गॅसवर चहा बनवण्याची कला जनतेपुढे ठेवली जाते. हा अतिरेक लोक डोळे मिटून ऐकतात आणि टाळ्याही पिटतात, याचं नवल वाटतं. फलज्योतिषाचं उघडपणे समर्थन करताना आपण संविधानाचा अवमान करतो, याचीही त्यांना तमा नाही. देशात कोणी विरोध करत नाही, असं पाहून त्यांचा धीर चेपला आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये ते फलज्योतिषाचं उघड समर्थन करू लागले. देशाचे पंतप्रधान आणि मंत्रीच असं समर्थनीय वक्तव्यं करू लागले तर न्याय मागायचा कोणाकडे? असल्या नेत्यांमुळेच देशातील वैज्ञानिकांकडे सर्वसामान्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला आणि सातत्याने अवैज्ञानाची री ओढणारेच खरे वाटू लागले. हे म्हणजे विज्ञानाचं अवमूल्यन होय. ते सुरू झाल्यापासून देशाच्या वैज्ञानिकतेकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं. नारळीकरांनी व्यक्त केलेल्या या भावनांशी सारा देश सहमत होईल. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचं महत्व हेच आहे. असे व्यासपीठच संबंधितांना खडे बोल सुचवू शकतात, हे यातलं यश म्हणावं लागेल.

खगोलशास्त्र आणि फलज्योतिषातील फरक अनेक सुशिक्षितांना कळत नाही, असं नाही. ते सोयीने आपली भूमिका बदलत असतात. सत्तेतल्यांना न दुखावणारा हा गट असल्या कृतीने स्वत: खुजा होतो आणि योग्यायोग्यतेचेही तीनतेरा वाजवतो. मात्र, यामुळे वैज्ञानिकांच्या कष्टाचं पाणी होतं, याची त्यांना काही पडलेली नसते. मनातच ग्रह असल्याने अशा सुशिक्षितांकडून फलज्योतिषाला विज्ञान म्हणवून घेण्याची स्पर्धा लागते. आपला आग्रह वैज्ञानिकांनीही मानला पाहिजे, असं मानणारी ही मंडळी वैज्ञानिकांनाही वेडे ठरवतात. नव्हे त्यांच्यावरही आक्षेपार्ह विधानं करत त्यांनाच गैर ठरवत असतात. जगभरात कोरोनाने थैमान घातलं असताना त्याच्या उच्चाटनासाठी थाळ्या पिटणं आणि दिवे पेटवण्याच्या प्रकाराने सारे जग आपल्याकडे पाहून हसत होते. तरीही हे सुशिक्षित आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. एखाद्या संसर्गाचा सामना करण्यासाठी केवळ आणि केवळ विज्ञानरूपी उपाय अपेक्षित असताना ही मंडळी शेण खाण्यासारखे आणि त्याचा लेप देण्यासारखे उपाय करून आपल्या अज्ञानाचीच साक्ष देत होते. विज्ञान युगात आपल्या पूर्वजांकडे सारी शक्ती होती, असे तारे सोडणारी ही मंडळी विज्ञानालाही आव्हान देऊ लागली आहेत. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रं, दूरदृष्टी असल्या बाबी या गोष्टी रुपाने असूनही त्यांना परिमाण देण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या मंडळींची डोकी ठिकाणावर आहेत की नाही, असंच विचारावंसं वाटतं. रफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवतात आणि त्याची विधिवत पूजा करतात तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंग यांना आपल्या अधिकाराची काही आहे की नाही? देशाचे संरक्षण मंत्रीच अशा अज्ञानमूलक गोष्टी करत असतील तर समाज प्रबोधनाची अपेक्षा असल्यांकडून करण्यात काय अर्थ आहे? असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे देशाला मागे आणत आहेत, हे त्यांना सांगावं कोणी?

- Advertisement -

अशुभ वेळेस संग केल्यास रांगडी, बेवडी पुत्रप्राप्ती होते, असं खुलेआम वक्तव्यं करणार्‍यांची खुशामतगिरी करणारे कमी नाहीत. यात तर शुचिर्भूत विद्धानही आहेत. त्यांचं काय कारायचं? राज्यात एकेकाळी गणपती दूध प्यायला होता. यातल्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला जराही थारा दिला जात नाही, तेव्हा हा समाज कोणत्या थराला जाईल, हे सांगणं अवघड आहे. एक कोणी गुरुजी उठतात आणि बागेतला आंबा खाल्ल्यावर पुत्रप्राप्ती होते, असं सांगतात. त्यांच्या या भावनेला आवाहन करणार्‍या आणि अशास्त्रीय विधानांवर जे अडलेले असतात, त्यांचा विश्वास बसतो, कारण गरजवंताला अक्कल नसते, असाच अनेकदा अनुभव येतो. ज्या व्यक्तीचा समाजमनावर प्रभाव आणि पगडा असतो, त्यांनी खरे तर अशी चमत्कारिक विधाने करताना फार सावधगिरी बाळगण्याची गरज असते. कारण ही मंडळी जे बोलतात त्याला लोक खरे मानून चालतात, यामुळे समाजाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे मग अशा अंधश्रद्धांचा गैरफायदा घेणार्‍यांचे पेव समाजात फुटते, त्यामुळे अडलेले लोक नाडले जातात. बरेचदा अशी मंडळी संतांच्या वचनांचा आधार देतात आणि आपल्या अंधश्रद्धायुक्त विधानांचे समर्थन करू पाहतात, पण ज्या संतांचे जीवन केवळ ईश्वर भक्तीला आणि समाजाच्या उद्धारासाठी वाहिलेले होते, त्या संतांनी शुभ अशुभ तिथी आणि पुत्रप्राप्तीबद्दल कुठलीही विधाने समाजासमोर केलेली नाहीत. इतकेच कशाला संतांच्या नावाने जे चमत्कार सांगितले जातात, तसे कुठले चमत्कार आपण केले असा उल्लेख त्यांनी स्वत:हून लिहिलेल्या संतसाहित्यात लिहून ठेवल्याचे आढळत नाही, पण हे विषय धार्मिक आणि भावनिक असल्यामुळे कुणी त्याविरोधात बोलत नाही, कारण लोकांच्या भावना कशाला दुखवा असा तो विचार करतो किंवा त्यावर बोलणार्‍याला धर्मद्रोही ठरवले जाते. भारतीय समाजात अंधश्रद्धा इतकी पराकोटीची आहे की, अगदी शिकलेले लोकही त्यावर सहज विश्वास ठेवतात आणि समर्थन करतात, त्यामुळे उद्या कदाचित काही लोक अशीही अफवा पसरवतील की, नारळीकर फलज्योतिष हे कसे आधारहिन आणि अवैज्ञानिक आहे, असे बोलणार होते, त्यामुळेच त्यांची प्रकृती बिघडली आणि ते संमेलनस्थळी येऊ शकले नाहीत. यावरही विश्वास ठेवणारे लोक आहेत. फलज्योतिषाला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, असे जयंत नारळीकर गेली अनेक वर्षे भाषणांमधून, पुस्तकांमधून आणि लिखाणांमधून समाजावर बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला काही प्रमाणात यश येत आहे, पण जो व्यापक परिणाम व्हायला हवा तो होत नाही. कारण आता तर सगळ्याच गोष्टींचे व्यापारीकरण होत चालले आहे. अनेक टीव्ही चॅनेल्सवर सकाळी ज्योतिष सांगितले जाते, ते पाहून पुढचा दिवस सुरू करणारे बरेच सुशिक्षित लोक आहेत. नारळीकरांनी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय नेत्यांपासून ते सुशिक्षितांचे कान टोचले आहेत. एका जागतिक किर्तीच्या वैज्ञानिकाने जे समाजहितैशी मार्गदर्शन केेले आहे, त्याचा सकारात्मकतेने विचार केला तर त्यातून अंधश्रद्धेची झापडे दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश सगळ्यांच्या जीवनात पडेल. राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू यांचा समाजमनावर प्रभाव असतो, त्यामुळे आपल्या वर्तनातून लोकांमध्ये अंधश्रद्धा बळावणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -