घरफिचर्सआम्ही काळ दिवस अनुभवला!

आम्ही काळ दिवस अनुभवला!

Subscribe

इंट्रो : मागच्या शनिवारी २८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाची सहलीसाठी निघालेली बस आंबेनळी घाटाच्या खोल दरीत कोसळली. योगायोगाने बचावलेल्या एकाचा अपवाद सोडला तर तब्बल ३३ लोक जागीच मरण पावले. खोल दरीत फेकल्या गेलेल्या या माणसांचे मृतदेह बाहेर काढायला ट्रेकर्सनी अक्षरश: प्राण पणाला लावले. ‘सह्याद्री ट्रेकर्स’टीमचे प्रमुख संजय पारठे यांनी घेतलेला तो थरारक अनुभव...

सकाळी साडेदहा वाजता अचानक फोन वाजला. पलिकडून बोलणारा म्हणत होता, ‘मी रांजणे वाडा कुंभरोशी वरून बोलतोय. तुम्ही असाल तसे दाभीन टोक येथे या, बस घाटातून खाली गेली आहे. नंतर लगेच अमित कोळी यांचाही निरोप मिळाला. मी घाईने ट्रॅकसूट चढवला. बायकोला सांगितले, ‘अपघातस्थळी चाललोय. कधी परत येईल, सांगता येत नाही.’ अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन पॅट्रोल पंपावर गेलो. त्यावेळेस पेट्रोल टाकण्यासाठी एक रुपया नव्हता. तशीच पेट्रोलपंपवाल्याला विनंती करून, दहा लिटर पेट्रोल टाकून अपघाताच्या दिशेने जाता-जाता अमित कोळीला तसाच गाडीत बसवला. संजय भोसले यांचे दुकान जातानाच रस्त्यावर लागलेले होते ते तसेच उघडे ठेऊन त्यांनासुद्धा गाडीत बसवले. विजय केळगणे, किरण चव्हाण यांनाही वाटेतच सोबत घेतले. बाकीच्या सदस्यांना फोन करत रवाना झालो.

घटनास्थळी गाडीमधून वाचलेला व्यक्ती उभा होता. दरी खूप खोल होती. त्यातील काही व्यक्ती झाडाझुडपात अडकून असतील, जिवंत असतील अशी आशा वाटत होती. या भावनेने आम्ही लगेच समोरच दिसलेल्या झाडाला विजय केळगणे यांना रोप बांधायला सांगितला. रोप बांधायला सुरुवात केल्यानंतर लगेच अमित कोळी, किरण चव्हाण या दोघांना रोपजवळ पाठवले. विजय केळगणे यांना रोपवरची सर्व जबाबदारी तुमची आहे असे सांगितले. संजय भोसले यांना येणार्‍या ट्रेकर्सना काय काम सांगायचे याची जबाबदारी दिली. अमित कोळी आणि किरण चव्हाण यांच्यासह पुढील टप्प्यावर रोप टाकत टाकत निघालो. पहिल्या टप्प्यावर किरणला थांबवून त्याच्यावर बाकीच्या मदतीची जबाबदारी टाकली. अमित कोळी याला घेऊन खडतर वाट काढत तिसर्‍या टप्प्यात आलो. तोपर्यंत उर्वरित सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी पोहचली. मग त्यातील तिसर्‍या टप्प्यावर सुमीत पाटील व सुनिल जाधव यांना त्यांनी तिथे काय काय कामे करायची ही जबाबदारी घेऊन पुढील चौथ्या टप्प्यात पोहचलो. पहातो तर संपूर्ण अस्ताव्यस्त निपचित अवस्थेत पडलेले लोक दिसले. त्यावेळेस गावातील काही गुराखी तिथे उपस्थित होते.

- Advertisement -

आम्ही वेळ न घालवता सगळ्यांच्या नाड्या तपासायची सुरुवात केली. एका व्यक्तीची थोडीशी नाडी लागत होती. आम्ही लगेच त्या व्यक्तीला बाजूला घेतले. पण तेवढ्या वेळात त्याचीही नाडी बंद पडली. नंतर बाकीच्या लोकांच्या नाड्या तपासल्या. सर्वच मृत्यूमुखी पडल्याचे निष्पन्न झाले. आता आमच्यासमोर सर्व मृत लोकांना दरीतून बाहेर काढण्याचे खूप मोठे आव्हान होते.

यापूर्वी मांढरदेवला पस्तीस मृतदेह व पसरणी घाटातील खाजगी बसमधले मृतदेह तसेच विशालगड येथील दरीतले दहा मृतदेह काढण्याचा अनुभव गाठीशी होता. रेड क्रॉस व यशदा या संस्थांचे प्रशिक्षणही गाठीशी होते. व्हॅली क्रॉसिंगची पद्धत वापरून आपल्याला सर्व मृतदेह वर पाठवायचे आहेत याची माहिती बाकीच्या ट्रेकर्सना दिली. मृतदेह प्लास्टिक गोणी आणि पोतं यात रॅपिंग करून कसे पाठवावे याचे मार्गदर्शन केले. जबाबदार्‍या वाटून दिल्या. तोपर्यंत क्रॉसिंगचा सेटअप तयार झाला होता. ‘हरहर महादेव’ बोलून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. एकामागून एक असे दहा मृतदेह दरीतून वर काढले होते. तोपर्यंत क्रेन आली. क्रेन कशी लावायची याची पूर्ण जबाबदारी अक्षय शेलार यांच्यावर होती. त्याप्रमाणे काम सुरू होते. त्यामुळे कामात कोणताही व्यत्यय आला नाही.

- Advertisement -

सर्व ट्रेकर्सचे काम शिस्तीत चालू होते. सायंकाळी सहापर्यंत अखंड काम करत होतो. सहानंतर अंधारामुळे अडथळा होऊ लागला. यापुढे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून काम थांबवण्याची सूचना दिली. ट्रेकर्सना दरीतून वरती बोलावले आणि मीसुद्धा दरीतून वरती आलो. तोपर्यंत एनडीआरएफची टीम पोहोचली होती. सह्याद्रीच्या टीमने आजच्या दिवसात तब्बल चौदा मृतदेह दरीतून बाहेर काढले होते. बाकीचे काही मृतदेह काही बसच्या टपाखाली होते. त्यानंतर एनडीआरएफच्या वरिष्ठांसह चर्चा करून त्यांना दिवसभराच्या कामाचा आढावा दिला. सगळे नव्या जोमाने पुन्हा दुसर्‍या टप्प्यापर्यंत दरीत उतरलो. काळरात्र हा शब्द सगळे वापरतात. अनेकांनी काळरात्र अनुभवलीही असेल.पण काळ दिवस काय असतो ते आम्ही सगळ्यांनी साक्षात अनुभवलं!


– संजय पारठे

(लेखक ‘सह्याद्री ट्रेकर्स’चे संस्थापक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -