समाजवादी नेते जयप्रकाश नारायण

जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1902 रोजी बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक व पुढे पाटणा येथे माध्यमिक शालेय शिक्षण झाले. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले. विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले. गांधींची विचारप्रणाली व कार्यपद्धती यासंबंधी काही काळ ते असमाधानी होते. तथापि काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीसंबंधीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेशीही ते सहमत नव्हते.

मार्क्सवाद्यांनी मध्यमवर्गीयांशी सहकार्य करावे, त्यांनी चालविलेल्या वसाहतींमधील राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून एकाकी पडू नये, या लेनिनच्याच मताचे ते होते. म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसर्‍या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाश यांनी चळचळीची सूत्रे सांभाळली. १९३३ मध्ये मद्रास येथे त्यांना अटक होऊन एक वर्षाची शिक्षा झाली. अन्य समाजवादी तरुणांच्या साहाय्याने आणि सहकार्याने त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.

ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या वाटाघाटींना, ब्रिटिश सरकारने नेमलेल्या संविधान परिषदेला तसेच देशाच्या फाळणीला जयप्रकाश यांचा विरोध होता. अखेर महात्मा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही; म्हणून त्यांनी १९४८ मध्ये अन्य सहकार्‍यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. जयप्रकाश यांनी कामगार व किसान संघटनेकडे १९४८ ते १९५० च्या दरम्यान विशेष लक्ष दिले.

त्यांनी १९५३ नंतर विनोबाजींच्या भूदान आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९ एप्रिल १९५४ मध्ये बोधगया येथील सर्वोदय संमेलनात भूदान कार्यासाठी पक्षीय राजकारणातून त्यांनी संपूर्णतः अंग काढून घेतले. पक्षीय राजकारणाचा त्याग म्हणजे देशातील घडामोडींसंबंधी उदासीन राहणे नव्हे; उलट राष्ट्रीय जीवनात अधिक परिणामकारक व अधिक रचनात्मक भाग घेण्यासाठी पक्षीय व सत्तात्मक राजकारणातून आपण दूर झालो आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

१९७० मध्ये त्यांनी बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. १९७१ मध्ये त्यांनी बांगलादेशामधील परिस्थिती जगापुढे मांडण्यासाठी जागतिक दौरा केला आणि त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविली. मे १९७२ मध्ये मध्य प्रदेशातील २६७ अट्टल दरोडेखोरांनी जयप्रकाश यांच्या विनंतीवरून भारत सरकार व मध्य प्रदेश सरकार यांच्यापुढे शरणागती पत्करली. देशातील सर्वंकष भ्रष्टाचार, दुबळ्या घटकांच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष इ. प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्यांनी देशाला सर्वंकष क्रांतीची गरज आहे ही भूमिका घेतली व त्यानुरूप गुजरात राज्यातील राजकीय सत्तांतर व बिहारमधील आंदोलन यांचा पुरस्कार केला. अशा या महान समाजवादी नेत्याचे ८ ऑक्टोबर १९७९ रोजी निधन झाले.