घरताज्या घडामोडीदेव अत्यंत मायाळू आहे

देव अत्यंत मायाळू आहे

Subscribe

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, तुम्ही फार कष्ट करून गोंदवल्याला येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का? आपल्याला देव खरोखर हवासा वाटतो आहे का? याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ‘देवाने वाईट केले ’ असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे, त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख, कष्ट झालेले आवडेल? म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका.

द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली; आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली.

- Advertisement -

पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की,‘आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास? तो दुष्ट, केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला,‘त्यात माझा काय दोष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो.’ जगाची आशा, आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, असेही गोंदवलेकर महाराज सांगतात.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -