Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स प्रपंचाच्या आसक्तीने दुःख येते

प्रपंचाच्या आसक्तीने दुःख येते

Related Story

- Advertisement -

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्‍या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार? मो बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणार्‍यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःस विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामधे कसेही केले तरी दुःखच पदरात पडते.

आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही. प्रपंचाच्या आसक्तीने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो, हा दोष नव्हे काय? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले! जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त असते असे सिद्ध होते.

- Advertisement -

गोंदवलेकर महाराज म्हणतात ‘मी तुमच्याकडे येतो. पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे सतत नामस्मरणात रहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जीवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.

जो माझा म्हणतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ति मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.’

- Advertisement -