घरफिचर्ससारांशअभिनयाचं शंभर नंबरी सोनं !

अभिनयाचं शंभर नंबरी सोनं !

Subscribe

चरित्र अभिनेता, नायक, खलनायक, विनोद अशा सर्वच अभिनय प्रकारात अशोक सराफ हे एका अमिट अशा ठशाचं नाव आहे. ठेंगडींच्या ‘वजीर’मधला ‘बाबासाहेब मोहिले’ हा गांधी टोपी घालून चेहर्‍याला लंपटपणा बहाल करणारा अशोक सराफच असतो. डाव्या गालावर वरच्या बाजूला चामखीळ डकवून साधारण सोज्ज्वळ चेहर्‍याला बेरकी करणारा अशोक सराफच असतो. पडद्यावर अशोक सराफ बरंच काही असतो. हिंदीत शर्टाची वरची दोन बटणं खुली ठेवून आपला मॅनली लूक पडद्यावर साकारणारा विनोद मेहरा आणि मराठीत अशोक सराफ ही दोनच नावं असावीत. ऐंशीच्या दशकात नाट्यमंदिरातल्या पाट्यांवर नाटकातल्या कलावंतांच्या नावात सर्वात शेवटी ‘आणि अशोक सराफ’ अशी अक्षरं असल्यावर त्या बाजूलाच हाऊस फुल्लची पाटी हे समीकरण पक्कं झालं होतं. अशोक सराफ यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा घेतलेला आढावा.

–संजय सोनवणे

दादा कोंडकेंच्या पांडू हवालदारमध्ये हवालदार सखाराम झालेल्या अशोक सराफांनी पोल्ट्रीची गाडी अडवून लाचेतून मिळवलेल्या कोंबड्या निळ्या पोलिसी युनिफॉर्मवर शौर्य जागवलेल्या मेडलसारख्या अंगाखांद्यावर खेळवत आणल्या होत्या. हिंदी पडद्यावर बहादूर हे चौकीदाराचं नाव अजरामर झालंय, तसंच हवालदार म्हटला की, त्याचं नाव सखारामच असावं, पांडू हवालदारमध्ये घड्याळ्यांची स्मगलिंग चुकून पकडणार्‍या हवालदार पांडूविषयी सखारामला ईर्ष्या वाटून येते, त्यावेळी मेनहोल साफ करणार्‍या कामगाराला स्मगलर म्हणून पोलीस ठाण्यात नेणार्‍या या ‘सखाराम’ हवालदारानं पुढं पाच दशकं मराठीचा सिनेपडदा ताब्यात घेतला. पांडू हवालदारचा प्रिमियर शो दादरच्या त्यावेळच्या कोहिनूर टॉकिजमध्ये झाला. या चित्रपटाच्या तीन तासांमध्ये ‘अतिसामान्य’ चेहरा घेऊन आलेल्या अशोक सराफांना नाटकाच्या खडूनं रेखाटलेल्या पोस्टरवरचं…आणि अशोक सराफ बनवलं, अर्थात मराठीचा पडदा इंग्रजी सिनेमांचा असता तर हेच नाव थलायवा रजनीकांतसारखं ‘द अशोक सराफ’ असं लिहावं लागलं असतं.

- Advertisement -

अशोक सराफ हे नाव ऐंशीच्या दशकात ‘शेजारी शेजारी, हल्ला गुल्ला, चंगूमंगू, माझा पती करोडपती, सगळीकडे बोंबाबोंब’ अशा यमकीय चित्रपटांपुरतं मर्यादित नाही. हे असं मर्यादित झाल्यानं मराठी हिंदी सिनेपडद्याचं केवळ नुकसान झालंय, अशोक हे पडद्यावरच्या मानवी संवेदनापटाच्या सम्राटाचं नाव आहे. ‘सुशीला’ आठवतोय, ‘जीवन इसका नाम है प्यारे…तुझको आगे चलना रे,’ म्हणत हात नसलेला हा ‘रस्त्यावरचा राजा’ नवर्‍यानं टाकलेल्या ‘सुशीले’ला (रंजना) आसरा देतो. ‘भस्म’मधला घंटा वाजवत गावोगावच्या दारात भाकरी मागत फिरणारा मसनजोग्या हा फिरस्ता दोन तीन लेकरांचा ‘बापाडू’ असतो, तर चारुशीला साबळे या लेकरांची माय, ‘बापाडू’नं मनसातल्या ‘मुडद्याच्या निवदा’तल्या दोन भाकर्‍या पालावरच्या उपाशीतापाशी लेकरांसाठी शिदोरीत बांधून घेतल्यात, त्याआधी पोटातल्या रखरखीत उन्हात दारोदारी देवाचा घंटा बडवूनही देव दारिद्य्र दूर करायला आलेला नाही, त्यामुळे दिवसभर गावात हिंडूनही पदरात ‘घंटा’ काहीच पडलेलं नाही.

जाळायला आलेल्या मुडद्याच्या निवदातले दोन घास मसनातचं पोटात ढकलन्याच्या विचारात तोंडाशी नेलेला घास पालातल्या लेकराच्या आठवणीनं पुन्हा कापडात बांधून घेणारा अशोक सराफ ‘भस्म’मध्ये केवळ ‘डोळ्यांनी बोलणारा मसनजोग्या‘ आहे. हा मसनजोग्या साकारताना अशोकच्या डोळ्यांतून बाहेर पडणारी लेकरावाच्या पोटातली भूक अशोकच्या डोळ्यातून आग बनून कमालीची अंगावर येते. अशोकचा ‘आपली माणसं’ आठवतोय, ‘बापाच्या जागेवरची अनुकंपा तत्वावरची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जिवंत ‘बापाला मारणार्‍या’ मुलगा सचिन खेडेकरचा हताश हतबल असा ‘मेलेला बाप’ अशोकनं पडद्यावर गोठलेल्या थंड डोळ्यातूनच साकारला होता, हव्यासातून हतबलतेतून आलेल्या परिस्थितीनं माणसांचे जिवंत मुडदे केल्यावर त्यांचे गारठलेले डोळे अशोकने त्याच्या अभिनयातून या चित्रपटात ‘जिवंत’ केलेले आहेत. असं आक्रंदन अशोक सराफच करू शकतो.’

- Advertisement -

चरित्र अभिनेता, नायक, खलनायक, विनोद अशा सर्वच अभिनय प्रकारात अशोक सराफ हे एका अमिट अशा ठशाचं नाव आहे. ठेंगडींच्या ‘वजीर’मधला ‘बाबासाहेब मोहिले’ हा गांधी टोपी घालून चेहर्‍याला लंपटपणा बहाल करणारा अशोक सराफच असतो. डाव्या गालावर वरच्या बाजूला चामखीळ डकवून साधारण सोज्ज्वळ चेहर्‍याला बेरकी करणारा अशोक सराफच असतो. पडद्यावर अशोक सराफ बरंच काही असतो, हिंदीत शर्टाची वरची दोन बटणं खुली ठेवून आपला मॅनली लूक पडद्यावर साकारणारा विनोद मेहरा आणि मराठीत अशोक सराफ ही दोनच नावं असावीत. ऐंशीच्या दशकात नाट्यमंदिरातल्या पाट्यांवर नाटकातल्या कलावंतांच्या नावात सर्वात शेवटी…‘आणि अशोक सराफ’ अशी अक्षरं असल्यावर त्या बाजूलाच हाऊस फुल्लची पाटी, हे समीकरण पक्क झालं होतं.

दादा कोंडके-अशोक सराफ त्याआधी निळू फुले-अशोक सराफ, त्यानंतर सचिन-अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ या जोड्यांनी मराठी पडदा गाजवला, यात इतर नावं काळानुसार बदलली तरी अशोक सराफ हे नाव पाच सहा दशकांच्या काळावर कायम कोरलं गेलं होतं. ‘दीड शहाणे’ आणि ‘बिनकामाचा नवरा’ या चित्रपटात निळूभाऊंची अशोक सराफांनी पडद्यावर सोबत केली. निळू फुलेंची पडद्यावरची जागा चंदू पारखीच घेऊ शकतो, असं म्हटलं गेलं, अशोक सराफ या नावाला मात्र अद्याप पर्याय सापडलेला नाही. अशोक सराफने ‘घनचक्कर’ चित्रपटात सायकल दुरुस्त करणारा मानकू साकारला होता.

मेकॅनिक म्हणण्यापेक्षा पंक्चर काढणारा ‘मानकू’ इतकं माणसाचं साधारण, अतिसामान्यपण अशोकनं या चित्रपटात ओतलं होतं. अतिसामान्य माणसावरून ‘धुमधडाका’ आठवतो, चित्रपटात सुटाबुटात दाढी लावून बसलेला अशोक म्हणजेच यदुनाथ जवळकर तळवळकरांना चहाची बशीची हेटाळणी करून ‘अती सामान्य’ ठरवतो. असलं काही अशोकच करू शकतो, प्रसंग लक्षात ठेवण्यास भाग पाडणार्‍या या मधल्या जागा अशोकनंच रंगवलेल्या असल्याचं स्पष्ट व्हावं, हे दिग्दर्शकानं खचितच सांगितलेलं नसावं, ‘एक डाव भुताचा’ मध्ये दिलीप प्रभावळकरांना मास्तुरे…म्हटल्यावर चहाच्या बशीतल्यासारखा ओठांतून उच्चारला जाणारा भ्रू….ही अशोकचीच कमाल होती. पडद्यावर मिळालेल्या कॅरेक्टरच्या संधीचं अशोक नावाच्या या सराफानं सोनं केलं.

‘एक डाव भुताचा’ मधल्या मालोजी या अशोकनं साकारलेल्या पडद्यावरच्या भुताचं कौतुक खुद्द हिंदीतल्या एका मोठ्या दिग्गज ‘अशोक’नं केलं होतं, अशोक कुमार हे या दुसर्‍या अशोकचं नाव, मुंबईतल्या कुठल्याशा स्टुडिओत अशोक सराफांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, जवळच अशोक कुमारांच्या चित्रपटाचं शूटिंगही सुरू होतं. सराफांचा अशोक चुकून कुमारांच्या अशोकच्या सेटवरच्या खोलीत शिरला, त्यावेळी कुमारांच्या दिग्गज अशोकनं हे…हे..थांब थांब, म्हटलं, अशोक कुमारांना तिथं पाहून आपण घाईगडबडीत चुकून दुसर्‍याच सेटवर तेही अशोक कुमारांच्या सेटवर त्यांच्या खोलीवजा बंगल्यात शिरल्याचं सराफांच्या अशोकच्या ध्यानात आलं. तू…तू…एक डाव भुताचा…हसत हसत कुमारांच्या अशोकनं म्हटल्यावर अशोकनं होकारार्थी मान हलवली. ही पावती होती, हिंदी पडद्यावरच्या दिग्गज्ज अशोकनं केलेल्या सराफ अशोकच्या अभिनय कौतुकासाठी देऊ केलेली.

रस्त्यावर सार्वजनिक कार्यक्रमात पांडू हवालदार लहानपणी पाहिला होता, त्यात फुल बनियन, पट्टेरी लेंग्यातल्या कायम हसवणार्‍या अशोकला एन चंद्रांच्या‘प्रतिघात’ मध्ये पाहिल्यावर उगाच वाईट वाटलं होतं. दूरदर्शनवर रविवारी किंवा शनिवारी दाखवल्या जाणार्‍या आठवडी चित्रपटात अशोक सराफ असल्याचं समजल्यावर ब्लॅक अँड व्हाईटच्या टीव्हीसमोर गर्दी होत असे. जवळपास वीस नाटकं, दोनशेहून अधिक मराठी चित्रपट, पन्नासहून जास्त हिंदी सिनेमे, दहा सिरियल्स इतकं मोठं काम करून ठेवलेल्या अशोक हा अभिनयाचा सम्राटच असावा.

हिंदीत दिलीप कुमार, अमिताभ, दक्षिणेकडे कमल हासन तर मराठी पडद्यावर अशोक सराफ हेच नाव समोर यावं. विनोदाचा अचूक टायमिंग, पंच एवढीच ओळख अशोक सराफची नाही, अशोक सराफांच्या मानवी जाणिवा, संवेदनांचे अनेक पदर अद्याप उलगडलेले नाहीत. अशोक सराफ नावात अभिनयाचे अजूनही कित्येक बावनकशी सुवर्णकण उरलेले आहेत, जे अद्याप पुरेसे समोर आलेले नाहीत, अभिनयाची चार पाच दशकंही त्यासाठी कमी पडली आहेत. स्वच्छ, सुंदर सहज अभिनयाच्या सुवर्णसराफाचा आज वाढदिवस, अशोक हे नाव सोन्याचे किंवा कलेचे पैलू साकारणार्‍या सराफाचं नाही, तर अभिनयाच्या परिसाचं आहे, अशोक सराफ या अभिनयाच्या सुवर्णपेढीत अजून बरंच काही उजळणारं आहे, जे पडद्यावर यायचं राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -