Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशAmerica Sent Illegal Indians : मानहानीचा डंका!

America Sent Illegal Indians : मानहानीचा डंका!

Subscribe

कोणतेही यादवी युद्ध किंवा शत्रूराष्ट्राशी दीर्घ युद्ध किंवा हिंसायुक्त वांशिक दंगे अधिकृतपणे घोषित झालेले नाहीत. सततचे जीवावरचे हल्ले होत असल्याची स्थिती असल्याची सरकारी श्वेतपत्रिका नाही. तुलनेने मोजक्याच का होईना पण भारतीयांनी डंकी रूट कशासाठी निवडला असेल. दुसरे म्हणजे सर्व जगाशी उत्तम आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. चांगला जीडीपी असलेली नि उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाणारी अर्थव्यवस्था आहे. असे असताना भारतीय लोकांना बेड्या, हातकड्या अशा अपमानास्पद रीतीने परत का पाठवले गेले असेल?

– प्रतिमा जोशी

सध्या तरी जगाची महासत्ता असलेल्या अमेरिका नावाच्या देशाने विश्वगुरू होण्याची आस बाळगणार्‍या आपल्या भारत नावाच्या देशाच्या अमेरिकास्थित अवैध नागरिकांना परत पाठविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत दोनशेहून अधिक भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या लष्करी विमानांनी भारतात परत आणून सोडले आहे. एकंदर १८ हजार व्यक्ती डिपोर्ट होणार म्हणजे परत पाठवल्या जाणार आहेत. त्यांची यादी तयार आहे. मात्र वैध कागदपत्रे नसलेल्या, वास्तव्याचा मंजूर कालावधी संपूनही अमेरिकेतच राहत असलेल्या भारतीय लोकांची संख्या इतकीच नाही, ती कितीतरी अधिक आहे, मात्र ती किती आहे याबाबत अमेरिकेतीलच विविध यंत्रणा आणि संस्था यांची माहिती एकमेकांशी मेळ खाणारी नाही.

प्यु रिसर्च सेंटर आणि सेंटर फॉर मायग्रेशन स्टडीज ऑफ न्यू यॉर्क या दोन संस्थांच्या अंदाजानुसार अमेरिकेत बेकायदा राहत असलेल्या भारतीयांची संख्या सुमारे ७ लाख इतकी आहे. अशा प्रकारे राहणार्‍या लोकांत मेक्सिको आणि एल साल्वादोर या देशांनंतर आपल्या भारतीयांचा तिसरा क्रमांक आहे, तर मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट या संस्थेच्या आकडेवारीनुसार ही संख्या ३ लाख ७५ हजार इतकी असून अवैध भारतीय पाचव्या क्रमांकावर आहेत, मात्र अमेरिकन सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या म्हणण्यानुसार अवैध भारतीयांची संख्या २ लाख २० हजार आहे. अर्थात सरकारी आकडा २०२२ सालचा आहे, तर अन्य संस्थांची आकडेवारी तुलनेने अलीकडची आहे. प्यु रिसर्चचे असेही निरीक्षण आहे की अमेरिकेत स्थायिक होणार्‍या भारतीयांची संख्या वाढती आहे. १९९० साली ही संख्या ६ लाख होती, ती आता ३२ लाखांवर गेली आहे. संख्येबाबतचे दावे निरनिराळे असले तरी दरवर्षी वैध अवैध अशा दोन्ही मार्गांनी भारत सोडून अमेरिकेत जाणार्‍या लोकांची संख्या काही लाखांत आहे हे निश्चित. आपल्याकडच्या आकडेवारीनुसारच २०२३-२४ यादरम्यान अडीच लाख लोकांनी देश सोडला आहे.

मायदेशातून दुसर्‍या देशात स्थलांतर करणे आणि आपल्या देशात कोणत्याही आवश्यक अधिकृत कागदपत्रांची पूर्तता न करता अवैध राहणार्‍या लोकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवणे या दोन्ही बाबी म्हटले तर तशा सामान्य आहेत. त्या जगभर सर्व देशांसाठी सामान्य आहेत. त्यात विशेष असे काही नाही. स्थलांतराची कारणेही सर्वसाधारणपणे सारखीच दिसतात. पहिले कारण म्हणजे अधिक पैसा मिळवण्यासाठी अधिक संपन्न प्रदेशात जाणे ही सर्वसाधारण माणसांची सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. छोट्या खेड्यातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा ठिकाणाहून विभागीय मुख्य शहरांत आणि शहरांतून महानगरात असे स्थलांतर आपण सगळेच गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहोत. त्याच्या पुढची पायरी गरीब किंवा सर्वसाधारण स्थितीतील देशातून संपन्न, श्रीमंत देशात स्थलांतर करणे. अधिक पैसा, अधिक सुखसोयी, अधिक आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा यासाठी लोक मायदेश सोडतात आणि मोठ्या देशांत स्थलांतर करून जीवनशैली आणि आयुष्याचा दर्जा उंचावण्याला प्राधान्य देतात.

दुसरे कारण मायदेशात अस्थिरता असणे, जगणेच धोक्यात येणे, हिंसेच्या छायेत राहावे लागणे हे आहे. युद्धग्रस्त वातावरण, सततच्या वांशिक दंगली, सरकारची मुजोरी या काारणांमुळे ज्या देशात जगणे मुश्कील होते तेथील लोक तुलनेेने शांत असलेल्या आणि पोटापाण्याची सोय लावू शकणार्‍या देशात जाण्यासाठी धडपडत असतात. या प्रकारची असंख्य स्थलांतरे जगभर झाली आहेत आणि होतही आहेत. बव्हंशी अशा संकटग्रस्त लोकांना जीविताच्या रक्षणासाठी राजकीय आश्रय म्हणजे असायलम बहाल केला जातो. अर्थात त्याचीही विहीत प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पार न करताच कोणी राहत असेल तर ते अवैध नागरिक ठरतात.

तिसरे कारण अधिक चांगल्या, दर्जेदार उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे. त्याचबरोबर व्यक्तीपाशी असलेली पात्रता, अर्हता आणि ज्ञान यांना संधी देणार्‍या देशात जाण्याची प्रवृत्ती बौद्धिक क्षेत्रात आढळते. म्हणजे मायदेशात चांगले उच्च शिक्षण मिळाले तरी त्या शिक्षणाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने संधी आणि वाव तसेच अनुकूल वातावरण लाभतेच असे नाही. मग अशा व्यक्ती आपले पंख पसरून परदेशाचा रस्ता धरतात. विशेषकरून सर्व ज्ञानशाखांमधील मूलभूत संशोधन क्षेत्रात हे अधिक घडताना दिसते.

या सर्व प्रकारच्या स्थलांतरांसाठी सर्व देशांची काही मूलभूत धोरणे ठरलेली असतात. आंतरराष्ट्रीय संबंधांचा यात खूप मोठा वाटा असतो. स्थलांतरितांना आपल्या देशात प्रवेश देण्याचे, राहू फिरू देण्याचे आणि स्थायिक होऊ देण्याचे विविध नियम आणि निकष असतात. त्या नियमांनुसार स्थलांतरितांची वर्गवारी करण्यात येते. व्हिसा हा त्यातील मुख्य भाग. अमेरिका आणि आपल्यासह बहुतेक सर्वच देशांत विविध प्रकारचे व्हिसा असतात. तुम्ही कोणत्या कारणासाठी दुसर्‍या देशात जाऊ मागत आहात त्यानुसार मंजुरी मिळते आणि ते कारण पूर्ण झाले की तुम्हाला परतावे लागते किंवा शक्य असेल तर व्हिसा वाढवून घ्यावा लागतो, मात्र मुदत संपल्यानंतर परदेशात राहणे सर्वच देशांत बेकायदा ठरवले जाते. या सर्व नियमांनुसार जगभर माणसे तात्पुरते किंवा कायमचे स्थलांतर करीत राहतात. तेव्हा स्थलांतर ही काही जगावेगळी आणि अभूतपूर्व अशी बाब नाही.

अवैध नागरिक परत पाठवणे हीही असामान्य बाब नाही. मग सध्या होत असलेल्या डिपोर्टेशनमध्ये वेगळे आणि असामान्य काय आहे? तर दोन गोष्टी वेगळ्या आणि असामान्य आहेत. पहिली असामान्य गोष्ट म्हणजे परदेशात जाण्याचे वैध, कायदेशीर असे विविध मार्ग उपलब्ध असताना त्या मार्गांचा अवलंब न करता अवैध मार्गांनी विविध देशांच्या सीमा पार करीत इच्छित देशात घुसखोरी केल्यासारखा प्रवेश करणे. कित्येकदा हा मार्ग जीवावर बेतणारा ठरतो. कारण त्याचे जे रूट म्हणजे प्रवासाचे मार्ग असतात ते सीमा सुरक्षेच्या तावडीत न सापडणारे, समुद्र, जंगल, वाळवंट अशा धोकादायक टापूंतून जाणारे असतात. प्रवेश मिळवून देणारी माणसे किंवा यंत्रणा बरेचदा बेकायदेशीर, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असतात. अशा मार्गांना डंकी रूट म्हणतात. ज्या लोकांना जीवाच्या भीतीने स्थलांतराची तातडी असते आणि वैध कागदपत्रे बनवण्याइतपत सवड आणि शक्यता नसते ते मुख्यत: अशा डंकी रूटचा वापर करताना आढळतात. अमेरिका सध्या परत पाठवत असलेल्या भारतीयांमध्ये डंकी रूटने आलेल्या बर्‍याच नागरिकांचा समावेश आहे.

दुसरी असामान्य गोष्ट म्हणजे अवैध व्यक्तींना परत पाठवणे इतपत व्यवहार सामान्य आहे, पण त्यांना हातकड्या आणि पायात साखळदंड घालून लष्कराच्या विमानाने गुन्हेगार किंवा शत्रूराष्ट्राच्या राजकीय कैद्यांसारखे पाठवणे हे असामान्य आहे. यातून दोन प्रश्न उभे राहतात. पहिले म्हणजे कोणतेही यादवी युद्ध किंवा शत्रूराष्ट्राशी दीर्घ युद्ध किंवा हिंसायुक्त वांशिक दंगे अधिकृतपणे घोषित झालेले नाहीत. सततचे जीवावरचे हल्ले होत असल्याची स्थिती असल्याची सरकारी श्वेतपत्रिका नाही. तुलनेने मोजक्याच का होईना पण भारतीयांनी डंकी रूट कशासाठी निवडला असेल. दुसरे म्हणजे सर्व जगाशी उत्तम आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. चांगला जीडीपी असलेली नि उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाणारी अर्थव्यवस्था आहे. असे असताना भारतीय लोकांना बेड्या, हातकड्या अशा अपमानास्पद रीतीने परत का पाठवले गेले असेल? या दोन्ही प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळणे अवघड दिसते. ती उत्तरे सुजाण आणि संवेदनशील अभ्यासू व्यक्तींना स्वतःच शोधून काढावी लागतील.

अमेरिकेने परत पाठवलेल्या लोकांपैकी काहींच्या छोट्या मुलाखती प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील अनेकांनी एजंटला लाखोंनी पैसे देऊन मेक्सिको किंवा कॅनडामार्गे डंकी रूटने अमेरिकेत प्रवेश मिळवल्याचे स्पष्ट होते. कित्येकांनी तर 50-60 लाख रुपये दिले आहेत. गावच्या जमिनी विकल्या आहेत. घरातले दागदागिने विकले आहेत. घरे गहाण ठेवली आहेत. आज ते सर्वार्थाने खंक झालेले आहेत. यातली बहुसंख्य माणसे सर्वसाधारण घरातील आहेत. जेमतेम जगणारी आहेत. त्यांनी जितके पैसे एजंटला दिले तितक्या पैशांत त्यांनी सरासरी किमान पुढील 10 वर्षे तरी आपले कुटुंब जेवून खाऊन चालवले असते असे दिसते. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका सर्व्हेनुसार भारतात सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदाराचे महिन्याचे उत्पन्न ३२ ते ३५ हजार रुपये महिना इतके आहे. यात चार जणांचे कुटुंब घरभाडे, वीज, शिक्षण आणि महिन्याचे रेशन भागवून किमान जगू शकते. एजंटला दिलेल्या ५० लाखांत हे होऊ शकले असते, पण मग 10 वर्षांनी पुढचे काय, असाही प्रश्न असू शकतो. परदेशात अधिक पैसे मिळतील. हळूहळू कर्ज फिटून चार पैसे गाठीला लावू, जे आपल्या मायदेशात शक्य नाही, असा हिशेब असू शकेल.

या सगळ्याच्या मुळाशी जात राहिले तर अनेक चित्रे डोळ्यांसमोर येत राहतात. व्यक्तीचे शिक्षण, त्याची अर्हता आणि त्याला मिळणारे वेतन किंवा शेती अथवा उद्योगात घातलेले भांडवल, उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळणारा परतावा यात उणेपणाकडे जाणारी तफावत हे आपल्याकडील सहज दिसणारे चित्र आहे. बँकेतील कारकुनाच्या, पालिकेतील सफाई कर्मचार्‍याच्या किंवा तत्सम कोणत्या तरी पदांच्या काही शे किंवा हजार दीड हजार जागांसाठी येणारे अर्ज लाखांनी असतात आणि त्यात उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचेही अर्ज असतात. नोकर्‍या अर्थातच एक दोन टक्के व्यक्तींनाच मिळणार असतात. उरलेले महिना दहा-पंधरा किंवा वीस-पंचवीस हजारांवर नोकरी करतात. व्यक्तीची अर्हता, ती व्यक्ती करीत असलेले काम आणि त्याला मिळणारे वेतन यात काहीच मेळ दिसत नाही.

शेती किंवा लघु-मध्यम उद्योगांतही हेच चित्र लाखांचे भांडवल आणि हजारांचे उत्पन्न असा उफराटा व्यवहार. अशा स्थितीत परदेशात साधे मजुराचे किंवा दुसर्‍या दर्जाचे काम मिळाले तरी भारतातील मासिक उत्पन्नापेक्षा ते अधिक असते हे वास्तव माणसांना काहीही करून परदेशात जाण्यास उद्युक्त करते. सरळ मार्गाने वेळ लागतो अशी समजूत करून घेऊन डंकी रूट पत्करला जातो. जे सरळ मार्गाने गेलेले असतात त्यांचा व्हिसा संपला तरी त्यांना परत यायचे नसते. त्याचीही हीच कारणे असतात. आपल्या देशात आपल्याला पुरेशी संधी, वाव, उत्पन्न मिळेल याची खात्री नसल्यानेच माणसे धोका पत्करून परदेशात बेकायदा राहणे पसंत करीत असावीत. उरला प्रश्न हातकड्या आणि साखळदंडांचा, अवैध नागरिकांना परत पाठवणे समजू शकते, पण ते अशा स्थितीत. हा प्रश्न आपल्या सरकारने आणि खरंतर सच्चे भारतीय म्हणून आपण सगळ्यांनीच विचारला पाहिजे. ज्या देशाचा विश्वगुरू म्हणून जगात डंका वाजतो, त्या देशाने हे प्रश्न विचारायला हवेत. तुम्हाला काय वाटतं?