Homeफिचर्ससारांशRajmata Jijau Jayanti : कणा ताठच असावा

Rajmata Jijau Jayanti : कणा ताठच असावा

Subscribe

राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची आज जयंती. एकूणच महाराष्ट्राची वाटचाल सुसंस्कृत, प्रगल्भ, प्रगत आणि सदाचारी दिशेने व्हावी असे आर्त मनात कल्लोळत असलेल्या वर्तमानात त्यांची पदोपदी आठव होणे अपरिहार्य आहे. लेकीबाळींची सुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, राजकीय वतनदारांच्या साठमार्‍या, रोजगाराच्या शोधात असलेले तरुण हे आजचे वर्तमान बदलावे आणि महाराष्ट्र एक स्वाभिमानी, आदर्श आणि प्रगतीशील राज्य म्हणून नावारूपाला यावे, अशी आस आज कित्येकांच्या मनात असेल. महाराष्ट्र हा महाराष्ट्रच व्हावा... असावा... त्याचा कणा ताठच राहावा आणि पावले मागे नाही... पुढे पडणारीच असावी.

-प्रतिमा जोशी

आज राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती. महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला ललामभूत असलेल्या रयतेच्या राजाची ही माता. तिने शिवबांना घडवले. बर्‍यावाईटाचा विवेक दिला. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य कसे करावे याचे धडे दिले. राज्य रयतेच्या सुखकल्याणाचे की दांडग्या वतनदार / सुभेदारांचे हा प्रश्न स्वराज्याच्या केंद्रबिंदूवर ठेवत राजा हा सत्तेचा उपभोगशून्य स्वामी असतो, या सद्सद्विवेकाची परणी कायम टोचती ठेवली.

त्याचमुळे स्वराज्यात भव्य आरसेमहाल, काचमहाल, जलमहाल, विलासमंदिरे, राजवाडे नाही उभे राहिले. तर लढल्याची साक्ष देणारे अभेद्य गडकिल्ले ठाकले. राजांची लढाई रयतेला लूटणार्‍या, आपल्या दाबात ठेवू पाहणार्‍या सर्व प्रकारच्या अनिर्बंध सत्ताकारणाशी होती… मातृत्व केवळ जन्म देण्यापुरते नसते तर आपल्या अपत्याला सारासार विचाराची देणगी देणारे, दुबळ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची प्रेरणा देणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतही हुशारीने मात देण्याचे डावपेच शिकविणारे असते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६३० सालचा. त्यांच्या जन्मावेळी महाराष्ट्र कसा होता? बहामनी वंशाच्या तीन राजवटींची चाकरी करत देशमुखी आणि वतनदारी महाराष्ट्रात रूढ झालेली होती. वतनदारांनी फौजा ठेवायच्या, त्यांनी शेतकर्‍यांची लूट करायची आणि लुटीचा एक भाग हा ज्या सरदाराची वतनदारी त्या भागात असेल त्याला द्यायचा. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत होता. अन्नधान्याचे उत्पादन रोडावले होते. शाही फौजांच्या लुटीमुळे रयतेकडे धान्याचा साठा उरला नव्हता. १६३० ते १६५३ या काळात दक्षिणेतून बादशहाच्या खजिन्यात एक पैही जमा झाली नव्हती.

स्थानिक प्रशासन चालवण्यासाठीसुद्धा महसूल जमा होत नव्हता. माणसे रंजली गांजली होती. महाराष्ट्रात नेमका अंमल कोणाचाच नव्हता आणि बेदिली नि वसुली यांचेच राज्य चालू होते. वि. का. राजवाडे यांनी राधा माधव विलास चंपू या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले की, एका हंदक्यास म्हणजे लहान होनास २०० दाणे झाले. अखेर करवसुली शक्य नसल्याने मूर्तझाची म्हणजे निजामाची आधीच खंगलेली तिजोरी पूर्णपणे शुष्क होऊन गेली. इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्डमध्ये एका समकालीन व्यापार्‍याने म्हटले की, लोकांची एकच मागणी, खायला द्या नाही तर मरण द्या।

या परिस्थितीतही वतनदारांची वागणूक कशी होती? याही काळात त्यांचे वसुली अधिकारी महसूल वसूल करण्यासाठी थैमान घालत. वसुलीसाठी गावे बेचिराख केल्याची उदाहरणे आहेत. सैनिक उभ्या पिकाचा फडशा पाडत. रोख रक्कम न मिळाल्याने जनतेच्या घरात जे असेल ते किडुक मिडुक उचलले जाई. हे सर्व करणारे वतनदार, सुभेदार इथलेच या मातीतलेच मराठी होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा सुपे आणि पुणे परगणा हा प्रांतसुद्धा वतनदारांच्या लुटीतून सुटला नव्हता. आदिलशहाचे रायाराव आणि मुरारपंत या दोन सरदारांनी पुण्यात फौजा घुसवल्या. शहाजीराजांचे वाडे पेटवले. गरिबांचे तर हालच आरंभले. रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी पाडून टाकली. वेशी उद्ध्वस्त केल्या. या दोघांनी खरोखरच गाढवे आणून त्यांचा नांगर पुण्यावरून फिरवला. लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकली.

फुटकी कवडी आणि तुटकी वहाण टांगून ठेवली. दहशत बसवावी असाच निव्वळ हेतू. या अनागोंदीत मराठी सरदार आपसात झगडण्यातही मग्न होते. वतनाच्या सनदीवरून परस्परांची खांडोळी करायला मागेपुढे पाहत नव्हते. याचे जे तपशील आहेत ते विषण्ण करणारे आहेत. वतनाच्या तुकड्यांसाठी माणसांचे तुकडे पाडायलाही महाराष्ट्र सज्ज झाला होता. अगदी जिजाऊंचे माहेर जाधव आणि सासर भोसले यांच्यातही तुंबळ हाणामार्‍या होऊन आप्त मारले गेले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिता बोलताना हिंदवी स्वराज्याला धर्माचा रंग देऊन आपल्याच मातीतले हे संदर्भ मात्र नजरेआड केले जातात. इतिहास असा सोयीने मांडायचा नसतो. इतिहासच काय, वर्तमानसुद्धा सखोल जाणून घेऊन पारखून उमजून कसे व्यक्त व्हावे याचेही जिजाऊ आईसाहेबांनी राजांना मार्गदर्शन केलेले दिसते. स्वराज्याची शपथ घेताना राजांनी परगण्यातील सर्व थरांतील, सर्व जातीपातींच्या तरुणांना एकत्र केले आणि थोडेफार बळ कमावल्यानंतर पहिले काम कोणते केले असेल तर रयतेवर टाच आणणार्‍या वतनदार्‍या, देशमुख्या, पाटिलक्या संपुष्टात आणल्या.

राजांचे हे पहिले पाऊल अतिशय महत्वाचे होते. स्वराज्यात घराणी, खानदाने यांचे नव्हे तर प्रामाणिक, जिवावर उदार होऊन रयतेला आधार देणार्‍यांना स्थान असेल हे त्यांनी पहिल्या फटक्यात आपल्या कृतीद्वारे स्पष्ट करून टाकले होते. उर्मट, अरेरावी करणार्‍यांस जेरबंद करायलाही राजांनी मागेपुढे पाहिले नाही. मायबहिणींच्या अब्रूला, इभ्रतीला हात घालणारा कितीही तालेवार असो, त्याची गय केली नाही.

रांझ्याच्या पाटलाला अशा उन्मत्तपणाची काय सजा मिळाली ते आपल्याला ठावूक आहेच. बळाच्या आधारे अनाचार करण्यास प्रतिबंध करून रयतेच्या गवताच्या काडीलासुद्धा हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद आपल्या सैनिकांना देणारा हा लोककल्याणकारी राजा. या आदर्श राजाच्या अशा अतुलनीय व्यक्तिमत्वाची जडणघडण करणार्‍या जिजाऊंचे ऋण कसे आणि कोणत्या शब्दात फेडावे!

आज केवळ या महामाऊलीच्या जयंतीनिमित्तानेच नव्हे, तर एकूणच महाराष्ट्राची वाटचाल सुसंस्कृत, प्रगल्भ, प्रगत आणि सदाचारी दिशेने व्हावी असे आर्त मनात कल्लोळत असलेल्या वर्तमानात त्यांचा पदोपदी आठव होणे अपरिहार्य आहे. लेकीबाळींची सुरक्षितता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, राजकीय वतनदारांच्या साठमार्‍या, रोजगाराच्या शोधात असलेले तरुण हे आजचे वर्तमान बदलावे आणि महाराष्ट्र एक स्वाभिमानी, आदर्श आणि प्रगतीशील राज्य म्हणून नावारूपाला यावे अशी आस आज कित्येकांच्या मनात असेल.

शिवाजी जन्माला यावा, पण दुसर्‍याच्या घरात अशा मनोवृत्तीने ती कशी पूर्ण होणार? त्यासाठी केवळ महाराजांचा जयजयकार करत झेंडे नाचवणे पुरेसे नाही, तर जिजाऊ आईसाहेबांच्या विवेकी आणि न्यायी, करारी आणि प्रसंगी मोल देण्याची तयारी असलेल्या वृत्तीचे थोडे तरी अनुसरण आपल्याला करता येईल का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारावा.

महाराष्ट्र हा महाराष्ट्रच व्हावा… असावा… त्याचा कणा ताठच राहावा आणि पावले मागे नाही… पुढे पडणारीच असावी.

-(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)