घरफिचर्ससारांशलक्षात ठेवा... 86 टक्के ‘फेल’ होतात!

लक्षात ठेवा… 86 टक्के ‘फेल’ होतात!

Subscribe

तरुणी पिढीला करिअर करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया. या माध्यमात छाप पाडण्यासाठी तरुण आणि तरुणी प्रयत्नशील असतात. काही जण इन्स्टाग्रामवर आपले फॅन फोलोईंग वाढविण्याच्या प्रयत्न करतात तर काहीजण शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्सवर आपल्यालाच कसे सर्वाधिक लाईक्स मिळतील या प्रयत्नात असतात. सहज म्हणून चिंगारी, रोपोसो, जोश, टकाटक या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्सवर जाऊन बघा. विविध भाषांमध्ये हजारो तरुण-तरुणी तिथे कशा पद्धतीने आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून युजर्सला खिळवून ठेवतात हे सहज लक्षात येईल. पूर्वी मुंबईमध्ये जाऊन हजारो तरुण-तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांना तिथे खूप स्ट्रगल करायला लागायचा मग त्यांना काम मिळायचे.

या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्समुळे मुंबईत जाऊन स्ट्रगल करायची गरजच उरलेली नाही. स्वतःच्या गावात राहून इंटरेस्टिंग व्हिडिओ करत राहिलात तर पुढील काळात बॉलिवूडमधून किंवा मराठी इंडस्ट्रीतून अभिनय साकारण्यासाठी बोलावणे येऊ शकते. कारण या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्सवर सध्या इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांचे लक्ष आहेच. शिवाय या वैयक्तिक फॅन फॉलोईंगचा सिनेनिर्मात्यांना फायदा होणार आहेच. मध्यंतरी एक अभिनेत्री सांगत होती की, आता इंडस्ट्रीमध्ये सोशल मीडिया प्रोफाईल बघून ऑडिशनसाठी बोलावायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच काही कलाकार आपले सोशल मीडिया प्रोफाईल कसे छान राहील, याचा सतत विचार करत असतात.

- Advertisement -

या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भाषेचे बंधन नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेत आशयाची निर्मिती करू शकता. त्या निर्मितीसाठी लागणारे विषय, संगीत यासाठी अ‍ॅप्स निर्माते तुम्हाला मदत करत असतात. दुसरीकडे तुमचे विषय हटके असले, अभिनय करणारे ताकदवान असले आणि व्हिडिओ निर्मिती भन्नाट असली तर तुमचे व्हिडिओ चालायला लागतात. एकदा व्हिडिओ चालायला लागले की तुम्हाला ब्रँड कोलॅबरेशनसाठी, पेड पार्टनरशीपसाठी, बार्टर पार्टनरशीपसाठी सोशल मीडिया मार्केटिंगवाल्यांकडून फोन यायला लागतात. देशातील दिग्गज ब्रँड कंपन्या सध्या अशा व्हिडिओ निर्मात्यांच्या शोधात आहेत. त्यांच्याकडून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरात करून घेण्यासाठी कंपनीच्या मार्केटिंग बजेटमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. सोशल मीडिया मार्केटिंग फर्म्सच्या माध्यमातून क्रिएटर्सला गाठून त्यांच्याकडून आपली जाहिरात करून घेतली जाते. त्यातही आता एक महत्वाचा बदल होतो आहे. तो असा की आधी तुमचे फॅन फॉलोईंग बघून तुमच्याकडे पार्टनरशीपसाठी कंपन्या येत होत्या. आता तुमचा आशय बघून, तुम्ही कोणत्या शहरात राहून आशयाची निर्मिती करत आहात हे बघून आणि तुमची संवादाची भाषा कोणती आहे हे बघूनही काही कंपन्या त्या त्या क्रिएटरला गाठतात. या पद्धतीमध्ये खूप सारे पैसे मिळत नाही हे नक्की. पण क्रिएटर्सला बळ मिळावे, त्याचा उत्साह वाढावा यासाठी मिळणारे पैसे निश्चितपणे उपयोगी ठरतात.

वर दिलेले हे सगळे वाचले की तुम्हाला वाटेल काय भारी आहे राव. कशाला नोकरी करायची, नवा व्यवसाय-धंदा सुरू करायचा, उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाऊन राहायचे, स्पर्धा परीक्षा द्यायच्या यापेक्षा आपणही सोशल मीडियात क्रिएटर म्हणून काम करायला सुरुवात करू. आपणही व्हिडिओ निर्मिती करू, आपणही मीम्स करू वगैरे वगैरे. पण हे सगळे दिसते तसे नाही. म्हणून मी शीर्षकात म्हटले आहे की 86 टक्के फेल होतात. हे 86 टक्के म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर क्रिएटर्स आहेत. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली छाप पाडता येत नाही. त्यांचे व्हिडिओ म्हणावे तसे चालत नाहीत, त्यांना या माध्यमातून पैसे कमावता येत नाहीत. त्यांना या माध्यमातील अपयशामुळे नैराश्य येते. एका अभ्यासातूनच ही 86 टक्क्यांची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे ती दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही.

- Advertisement -

सोशल मीडियात कधी काय चालेल हे कोणी म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. हा पूर्ण बेभरवशाचा प्रकार आहे. त्यामुळे यामध्ये केवळ मजा म्हणून आलेले अनेकवेळा यशस्वी होतात आणि यशस्वी होण्यासाठी आलेले तोंडावर वाईट प्रकारे आपटतात. इथे तुम्ही नुसते दिसायला सुंदर असून उपयोगी नाही तर तुम्ही क्रिएटिव्हही असला पाहिजे. इथे तुम्ही टुमदार घरात राहात नसला तरी चालेल पण माळरानावर कशी धम्माल करता आहात हे तुम्हाला दाखवता आले पाहिजे. तुमच्याकडे सुंदर स्क्रिप्ट नसली तरी चालेल पण विषय खणखणीत असला पाहिजे. सोशल मीडियाच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या कोणत्याही क्रिएटरला विचारा तो किंवा ती नक्की सांगेल की त्यांनी सहज म्हणून व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली होती. पण त्यांचे काही व्हिडिओ एकदम हिट झाले आणि त्यांचे चॅनेल/हँडल वाढू लागले. एकदा चॅनेल/हँडल झाल्यावर मात्र बर्‍याच गोष्टी नियोजनपूर्वक कराव्या लागतात. नंतर सहज म्हणून काहीही करून चालत नाही हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.

एका रात्रीत सोशल मीडियामध्ये यशस्वी होणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. इतरांना यश मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते. अनेक जण ही वाट पाहताना थकतात आणि काम करणे थांबवतात. काही जण 8-10 व्हिडिओनंतर पुढे काय करायचे हे ठरवूच शकत नाहीत. त्यातून मागे पडतात. काही जण पैसे मिळायचे इतर मार्ग सापडल्याने या क्षेत्रात काम करणे सोडून देतात. केवळ 14 टक्के क्रिएटर्सच या क्षेत्रात यशस्वी होतात. त्यांच्यासाठी यश टिकवून ठेवणे अजून अवघड असते, कारण या क्षेत्रातील तीव्र स्पर्धा. रोज नवे क्रिएटर्स वेगवेगळ्या आयडिया लढवून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्याशी रोजच्या रोज अप्रत्यक्षपणे लढा द्यायचा असतो.

सोशल मीडियाच्या क्षेत्रात यशस्वी क्रिएटर व्हायचे असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे 86 टक्के क्रिएटर इथे फेल होतात. उगाच दुसर्‍याचे बघून आपण व्हिडिओ तयार करून उपयोग नाही. महागडे हँडसेट घेऊन उपयोग नाही. खूप मेहनत घेऊनही उपयोग नाही. केवळ आणि केवळ मजा म्हणून करत राहायचे. यश मिळाले तर ठीक. नाहीतर लगेच दुसरे काम शोधायला लागायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -