घरफिचर्ससारांशप्रेमाची सुंदर गोष्ट- श्रीदेवी प्रसन्न

प्रेमाची सुंदर गोष्ट- श्रीदेवी प्रसन्न

Subscribe

उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच खिळवून ठेवतो. प्रेमाची उत्तम गोष्ट सांगणारा हा चित्रपट रंजक आहे. श्रीदेवी आणि प्रसन्नच्या लव्हस्टोरीची सुरुवात आणि त्याचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

– आशिष निनगुरकर

‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात पुन्हा एकदा गाव आणि शहर असं एक कथानक मिश्रण पाहायला मिळाले आहे. गावची ‘श्रीदेवी’ आणि मुंबईतला ‘प्रसन्न’ यांची ही कथा चित्रपटात पाहायला मिळाली आहे. चित्रपटातून कोकण आणि गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले. चित्रपटाचे नायक आणि नायिका दोघेही शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात चांगले नाव कमावत आहेत. आता त्यांची एकमेकांशी जमलेली जोडी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.

- Advertisement -

चित्रपटातून एक धमाल कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. लग्नाचं वय झालं की घरच्यांकडून, नातेवाईकांकडून लग्न कधी करणार? सर्रास याविषयी विचारलं जातं. फक्त एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर आपलं लग्न हाच चर्चेचा विषय बनतो, मात्र लग्न का करायचंय? जर तुम्हाला हा प्रश्न कुणी विचारला तर तुम्ही याचं उत्तर काय द्यालं? हे उत्तर सापडलं तर यातच तुमचा लग्नाबद्दलच्या विचारांचा गुंता सुटेल.

जर याचं उत्तर नाही सापडलं तरीही हा गुंता सुटू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिळवून ठेवतो. दिग्दर्शक विशाल मोढवेने दिग्दर्शनाच्या पदार्पणातच सिक्सर मारलाय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

- Advertisement -

गावात जन्मलेली, तिथेच शिक्षण घेतलेली आणि नोकरी करणारी तरुण पिढी आणि शहरातील तरुणाई यात असलेला फरक आता तसा फारसा जाणवत नाही, मात्र आजही शहरातील तरुण आणि ग्रामीण भागातील तरुण यांच्यातील पूर्वापार चालत आलेला समजुतीचा पायंडा आजही दिसून येतो. ‘श्रीदेवी प्रसन्न’ची नायिका श्रीदेवी हिचा जन्म वेंगुर्ल्यात झाला आहे. श्रीदेवीचे शिक्षणही वेंगुर्ल्यात झालं आहे.

कुटुंबासोबत तिथेच राहून कुडाळच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहे, तर प्रसन्न अगदी तिच्या विरुद्ध आहे. प्रसन्न हा मुंबईत जन्मलेला, इथेच वाढलेला आयटी क्षेत्रात काम करणारा मुलगा आहे. श्रीदेवी गावात वाढलेली असलेली तरी तिचं कुटुंब खूप मॉर्डन आहे. तिच्या घरातील सगळ्यांचे प्रेमविवाह झाले आहेत. त्यामुळे तिच्या कुटुंबाला पण वाटतं की श्रीदेवीनेही प्रेमविवाह करावा, मात्र प्रेमात पडावं असं कुणी तिला भेटलंच नाही, तर श्रीदेवीच्या अगदी विरुद्ध प्रसन्न आहे. प्रसन्नच्या आयुष्यात चार मुली येऊन गेल्या, मात्र त्याला लग्न करण्याची काही इच्छा नाही.

आता श्रीदेवी आणि प्रसन्न यांची एका ऑनलाईन मॅट्रीमोनियल साईटवरून भेट होते. अर्थात पहिल्या भेटीत प्रसन्न टिपिकल मुंबईतल्या तरुणाने एखाद्या गावातील मुलीला प्रश्न विचारावेत तसेच विचारतो. पहिल्याच भेटीत त्यांच्यात हा शाब्दिक दुरावा निर्माण होतो. पुढे ते एकमेकांच्या जवळ येऊनही एकमेकांपासून दूर राहतात. आता दोघांमध्ये नेमकं काय घडतं हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावंच लागेल.

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमाल जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी व प्रसन्न ही हटके पात्रे समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोढवेने केलंय, तर अदिती मोघेच्या लेखणीतून आलेली ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात. दोघांचं कुटुंब आणि त्यातील विविध पात्र रंजक वाटतात.

श्रीदेवी आणि प्रसन्नच्या लव्हस्टोरीची सुरुवात आणि त्याचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. चित्रपटानिमित्त दोघं पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकत आहेत. असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ एकत्र सुंदर दिसतात, शिवाय बर्‍याच काळाने एका वेगळ्या जोडीच्या माध्यमातून ही लव्ह स्टोरी पाहायला मजा येते. दोघंही एकत्र सीन, संवाद, गाणी यामध्ये लक्ष वेधून घेतात. चित्रपटात सईने तिची ही बाजू आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं.

श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होतं. सईच्या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मनं जिंकते. सध्या ‘झिम्मा २’, ‘ओले आले’ या चित्रपटांमधून मनं जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नच्या भूमिकेतूनही चित्रपटातून त्याच्या कामाचं वेगळेपण सिद्ध करतो. प्रसन्नच्या भूमिकेत फार विविधता नाही. आपण बर्‍याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील, हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यातच सिद्धार्थ यशस्वी ठरलाय. याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलंय असं जाणवतं. तिनेही त्याला पूर्णपणे न्याय दिलाय.

सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एण्ट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो. त्याच्या भूमिकेत एक चार्म आहे. हावभावांची सलगता आहे. सुलभा आर्या यांचं आजीचं पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केलंय. याशिवाय संजय मोने, समीर खांडेकर, आकांशा गाडे, शुभांगी गोखले, वंदना सरदेसाई, रमाकांत दयामा, राहुला पेठे या कलाकारांची पात्रेही फार मजेशीर आहेत आणि त्यांनी उत्तम साकारली आहेत. चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते. शिवाय या चित्रपटातील स्वाती हे महत्त्वाचं पात्र कथेत आणखी रंग भरतं असं म्हणू शकतो. चित्रपटातील विनोदी सीन्स आणि त्यातील संवाद खळखळून हसवतात.

भावूक सीन्सने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळी आलीत आणि तितकी प्रभावी वाटतात. मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणार्‍यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि तितकीच कनेक्ट होणारी आहे. चित्रपटातील गाणी कथेला न्याय देणारी आहेत, जी उत्तम लिहिली गेलीत आणि सादरही छान झालीत. अमीतराज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेली गाणी कथेला न्याय देणारी आहेत. दिल मे बजी गिटार… हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवतं, ज्यात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स, गाण्याचा रंगीबेरंगी फील, कलरफुल कपडे, लखलखाट मजा आणतो. तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल, शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारी ही स्टोरी अतिशय रंजक आहे.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -