Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश समतेसाठी सम्यक आंदोलनाची हाक

समतेसाठी सम्यक आंदोलनाची हाक

Subscribe

कवी अनिल यशवंत भालेराव यांचा ‘घोषणा’ हा पहिलाच काव्यसंग्रह असून त्यांची कविता सम्यक आंदोलनाची भाषा बोलते. माणसांचं माणसाशी असलेले माणुसकीचं नातं अधोरेखित करून सर्व समाजाला माणुसकीच्या एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करते. आपल्या अंतर्मनाची वेदना जेव्हा समाजाची वेदना होते तेव्हा ते आंदोलन यशस्वी होत असतं. कवी कवितेच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी मानवमुक्त लढ्याची सम्यक हाक देत आहेत. समाजाच्या वेदना, चळवळीच्या व्यथा आणि जाणिवा बोथट झालेल्या चैनीत सुखवस्तू कौटुंबिक जीवनात रमणार्‍या पर्यायाने समाजाकडे मागे वळून न बघणार्‍या कृतघ्नांची प्रचंड चीड ‘घोषणा’ या काव्यसंग्रहात कवीने व्यक्त केली आहे.

–प्रदीप जाधव

घोषणा आणि आश्वासनं हे दोन शब्द सार्वजनिक जीवनामध्ये नेहमी कानावर येत असतात. आश्वासनं देणे, घोषणा करणे हा राजकीय विचारसरणीतून मतदारांना आणि समस्त समाजाला आकर्षित करण्याचा सोपा उपाय समजला जातो. घोषणा आणि आश्वासनांची पूर्तता करायची की नाही, केवळ घोषणा करून त्याची पूर्तता करण्यास विलंब लावून अंमलबजावणी कैक वर्षे प्रलंबित ठेवून समाजाला वेठीस धरणे हा राजकारणाचा भाग आहे. घोषणेनंतर अंमलबजावणीसाठी मग लोक धरणे, आंदोलन, मोर्चे, उपोषण या सनदशीर मार्गाने सत्याग्रहाचा अवलंब करतात. केलेली घोषणा आणि दिलेली आश्वासनं पाळायची नसतात असा अलिखित नियम राजकारण्यांनी ठरवून घेतलेला असतो. त्यामुळे रोज एक नवी घोषणा करायची हा राजकीय डावपेचांचा एक भाग मानला जातो.

- Advertisement -

घोषणा केल्यानंतर ती लगेचच अस्तित्वात आणली तर उत्सुकता कमी होईल आणि समाजमाध्यमांवर विषय राहणार नाहीत. कोकणातील रिफायनरीची घोषणा, त्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही एकमेकांच्या उभे ठाकले असून सभा, संमेलनं, धरणे, मोर्चे, निदर्शने केली जात आहेत. अगदी याउलट सामाजिक समतेच्या सम्यक आंदोलनासाठी केलेली घोषणा हजारो पटीने राजकारण्यांच्या घोषणेपेक्षा वेगळी असून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असते. अशा घोषणांच्या त्वरित अंमलबजावणीकरिता सर्वजण झटत असतात. सामाजिक आंदोलनाची घोषणा दिशा ठरवण्यासाठी तळमळीने, पोटतिडकीने समाजाच्या उत्थानासाठी आणि मानवी जीवन सुखकर होण्यासाठी केलेली असते. या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी कोणी शहीद होतात, बलिदान करतात, तर काही लोक आत्मदहनही करताना आपण पाहत आहोत.

कवितेच्या व्याख्या वेगळ्या असल्या तरी ‘पोटातून ओठावर जे शब्द उमटतात त्याला कविता म्हणतात’. कविता, गाणी, शाहिरी जलसा ज्वलंत प्रश्नावर आंदोलन उभं करतात. सामाजमन तयार करून समाज एकसंध करण्याचे काम करतात. कवी अनिल यशवंत भालेराव यांचा ‘घोषणा’ हा पहिलाच काव्यसंग्रह असून त्यांची कविता सम्यक आंदोलनाशी भाषा बोलते. माणसांचं माणसाशी असलेले माणुसकीचं नातं अधोरेखित करून सर्व समाजाला माणुसकीच्या एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करते. आपल्या अंतर्मनाची वेदना जेव्हा समाजाची वेदना होते तेव्हा ते आंदोलन यशस्वी होत असतं. कवी कवितेच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी मानवमुक्त लढ्याची सम्यक हाक देत आहेत. नाशिक ही ऐतिहासिक क्रांतिभूमी मानली जाते. याच क्रांतिभूमीत अनेक सामाजिक परिवर्तनाची आंदोलने झाली आहेत.

- Advertisement -

नाशिक सामाजिक, सांस्कृतिक केंद्र असून समृद्ध साहित्य नगरी आहे. साहित्यातील अनमोल हिरा, ज्ञानपीठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांची जन्मभूमी. कुसुमाग्रजांचा आशीर्वाद लाभलेले नाशिकचे कवी अनिल यशवंत भालेराव सामाजिक वेदनांची झळ भोगलेला चळवळीतला कार्यकर्ता. १९७२ च्या दशकात दलित पँथर ही लढाऊ संघटना उदयास आली. या संघटनेने असंख्य कार्यकर्ते, नेते समाजाला दिले. त्याचबरोबर अनेक दिग्गज साहित्यिकही दिले. पँथरच्या काळात बहुसंख्य नेते हस्तलिखितं, नियतकालिकं चालवत असत. ही नियतकालिकं वाचून काही कवी उदयास आले, तेही त्याच नियतकालिकांत लिहू लागले. याच काळात साहित्य आणि साहित्यिक जोमाने वाढले. पँथर ही चळवळ जवळून पाहणारा नंतर पँथरमध्येच सक्रिय काम करणारा कवी अनिल यशवंत भालेराव. सुरेशजी सावंत यांचे पाक्षिक ‘ठिणगी’ वाचून आपल्यातल्या कवीचा जन्म झाला आणि काव्यनिर्मिती करू लागलो, असं ते सांगतात.

भालेराव यांचं मनोगत वाचताना संपूर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहतो. ते आपल्या मनोगतात लिहितात, सन १९८२ साली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भारतीय दलित पँथर व मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीने जेलभरो आंदोलन केले. सदर आंदोलनात मी ठाणे कारागृहात १५ दिवसांकरिता सहभागी झालो. आमच्या नाशिक जिल्ह्याच्या तुकडीचे नेतृत्व शंकरराव काकळीज व प्रियकिर्ती त्रिभूवन यांनी केले होते. कारागृहात आमच्यासोबत डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. अरुण कांबळे, कॉ. शरद पाटील, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, लक्ष्मण माने, हरि नरके, अ‍ॅड. अंकुश भालेकर, बाळकृष्ण रेणके यांचाही सहभाग होता. कारागृहात आम्हा सत्याग्रहींना एक हॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या हॉलमध्येच सकाळ, दुपार विविध विषयांवर उपरोक्त मंडळी आपले विचार मांडत असत. माझ्यासाठी ते एक विद्यापीठच होतं. तेथे मला विविध चळवळींबद्दल सखोल माहिती मिळाली.

दलित पँथरचा १०वा वर्धापन दिन आम्ही त्या कारागृहातच साजरा केला. कवी अनिल भालेराव हे कार्यकर्ता आणि कवी दोन्ही भूमिका निभावतात. कविता ही खर्‍या अर्थाने रोगावरचं औषध नसतं. ते एक्स-रे किंवा ब्लड रिपोर्टसारखं सावधानतेचा इशारा देत असते. त्याप्रमाणे अनिल भालेरावांच्या कविता सामाजिक वेदनांचा फुत्कार मारून सावधानतेसाठी इशारा देत आहेत. आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्य करणारे विद्यार्थी युवकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनाच विषमतावादी समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले. समाज परिवर्तनाच्या लढ्यात आंदोलने, तुरुंगवासही भोगावा लागला. त्यातूनच संघर्षमय जीवनाच्या कथा, कविता, स्वकथन, कादंबर्‍या आणि अन्य साहित्याची निर्मिती झाली. व्यवस्थेने मनुष्यत्व नाकारलेल्यांचे साहित्य जगभर पोहचले आणि भारतीय समाज व्यवस्थेतील दुःख जगासमोर आले.

समाजाच्या वेदना, चळवळीच्या व्यथा आणि जाणिवा बोथट झालेल्या चैनीत सुखवस्तू कौटुंबिक जीवनात रमणार्‍या पर्यायाने समाजाकडे मागे वळून न बघणार्‍या कृतघ्नांची प्रचंड चीड ‘घोषणा’ या काव्यसंग्रहात कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः झिजून, रक्ताचं पाणी करून समाजाच्या जीवनाचं सोनं केलं असताना आजचा काही आंबेडकरी समाज मात्र कृतघ्नासारखा वागत आहे. आपल्याच बापाला विसरून नको त्या बुवा, बाबा, दादांचे पाय चाटत आहे. ही अस्वस्थता या कविता संग्रहाचा गाभा आहे. समाजव्यवस्थेविरुद्ध लढणारे किंवा लिहिणारे अनिल यशवंत भालेराव हे पहिलेच कवी नाहीत. आंबेडकरी साहित्य मुळातच विद्रोही असल्याने व्यवस्थेविरुद्ध कायमच लढणारे.

गावकुसाबाहेरील जनावरांहूनही हीन जीवन जगणार्‍या माणसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मानाने माणूसपण बहाल केले आहे. झोपलेल्या, मेलेल्या माणसांमध्ये जीव आणला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. घोषणा ह्या पहिल्याच कवितेत कवी म्हणतो, क्रांतिसूर्याने उणेपण ओळखले. हजारो वर्षांची झोप उडविली. माणसं आता शहाणी झालीत. त्यांना संविधानाने हक्क, अधिकार दिले आहेत. आता आम्ही गुलामगिरी सहन करणार नाही, अन्यायावर तुटून पडणार.आतापर्यंतची लुळी, पांगळी, आंधळी, बहिरी, मुकी बोलू लागली. तीच माणसं निघालीत लेखण्यांच्या तलवारी पाजरत मानवी स्वातंत्र्याची मशाल हाती घेऊन घोषणा करायला, माणसांना माणसांसारखच जगू द्या!

‘घोषणा’ कविता संग्रहात एकूण ४२ कविता असून सर्वच कविता सामाजिक आशयाच्या, समाज जीवनावर भाष्य करणार्‍या आहेत. कवितेची भाषा सहजसोपी समजणारी आहे. मलपृष्ठावर कवी कुसुमाग्रजांचा अभिप्राय आहे, तर संजय उन्हवने यांनी साकारलेले मुखपृष्ठ आकर्षित करून घेते. अरविंद सुरवाडे यांची सूचक प्रस्तावना कविता संग्रहाची उंची वाढवते. या काव्यसंग्रहाचं स्वागतच होईल.

- Advertisment -