घरफिचर्ससारांशअनुशेष भरण्याचा संकल्प

अनुशेष भरण्याचा संकल्प

Subscribe

गेल्या वर्षातल्या कोरोनामय कटु आठवणींना मागे सारत आपण सारेजण एकविसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात पदार्पण करत आहोत. ‘नमन नटवरा’ या सदरामार्फत सर्वप्रथम मी समस्त रंगकर्मींना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. तसंच, नव्या वर्षात हे सदर लिहिण्याची संधी पुन्हा एकदा दिल्याबद्दल ‘दैनिक महानगर’च्या संपादक मंडळाचेही आभार व्यक्त करतो. गेल्या वर्षातील सगळा अनुशेष भरून काढत नवे नाट्यप्रकल्प हाताळण्याची ऊर्जा या नवीन वर्षात आपणा सर्वांना लाभो, या शुभेच्छांसोबत हे वर्ष अधिकाधिक सृजनशीलतेने आणि सर्जनशक्तीने भारलेले राहो ही रंगदेवतेचरणी प्रार्थना !

मित्रांनो, महाराष्ट्राच्या रंगभूमीचा एक वैभवशाली इतिहास आहे, हे सर्वविदीत आहेच. या इतिहासात डोकावून पाहिलं असता दिसून येतं की, मराठी रंगभूमीची गेल्या दीडशेहून अधिक वर्षांची वाटचाल समृद्ध करण्यात अनेक रंगकर्मींचा आणि नाट्यसंस्थांचा मोलाचा वाटा आहे. अगदी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटक मंडळींपासून ते अलीकडच्या ‘आसक्त’, पुणे, ‘मिती चार’, कल्याण या आणि महाराष्ट्रभर विखुरलेल्या अशा अनेक नाट्यसंस्थांचा उल्लेख करता येईल. मधले, ज्याला आपण आधुनिक मराठी रंगभूमीची पायाभरणी आणि विकास साधणारे टप्पे म्हणूया, ते म्हणजे ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘ललितकलादर्श’, अत्रेंची ‘अत्रे थिएटर्स’, मो. ग. रांगणेकरांची ‘नाट्यनिकेतन’, पणशीकरांची ‘नाट्यसंपदा’, मोहन वाघांची ‘चंद्रलेखा’, सुधीर भटांची ‘सुयोग’, तोंडवळकरांची ‘कलावैभव’, मच्छिंद्र कांबळींची ‘भद्रकाली’ तसंच, वेगळ्या वाटा चोखाळणारे ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’, ‘थिएटर युनिट’, ‘रंगायन’,‘आविष्कार’ आणि रत्नाकर मतकरींची ‘बालनाट्य’ आणि ‘सूत्रधार’. प्रत्यक्ष रंगभूमीवर आपल्या कामाचा ठसा उमटवणार्‍या संस्थांचे हे काही महत्वाचे उल्लेख आहेत.

असे असले तरी पडद्याआड राहून तिच्या संवर्धनाचं तितकंच किंबहुना काकणभर सरस कर्तव्य करणार्‍या अनेक नाट्यसंस्थांचाही रंगभूमीच्या वाटचालीत महत्वाचा वाटा आहे. अशाच संस्थांपैकी एक म्हणजे मुंबईस्थित ‘अस्तित्व’, होय. आपले पडद्यामागचे रंगकर्म निष्ठेने आणि नेटाने पार पडत ‘अस्तित्व’ पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे, ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. कौतुक अशासाठी की, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले होते की, व्यावसायिक धारेच्या पलीकडे सक्रिय रंगकार्य करणार्‍या कुठल्याही संस्थेचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त दहा वर्षांचा असतो. पुढे संस्थेतील कार्यकर्ते आपापल्या प्रपंचात गुंततात किंवा आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी संस्थेच्या सांघिक उद्दीष्टांपासून आपसुकच दूर जातात आणि एक दिवस ती संस्था फक्त कागदावर उरते. या पार्श्वभूमीवर रवी मिश्रा, कीर्तीकुमार नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे करावे तितके अभिनंदन थोडेच आहे! एखादी नाट्यसंस्था सलग पंचवीस वर्षे अव्याहतपणे सक्रिय असणं ही सद्यकाळातील अपवादात्मक अशी घटना आहे.

- Advertisement -

1996 साली पथनाट्य स्पर्धेच्या प्रायोजकत्वाच्या निमित्ताने ‘अस्तित्व’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. यथावकाश, नाट्यविषयक कार्यशाळा, परिसंवाद, दृकश्राव्य कला सादर करणारे महोत्सव तसंच मराठी आणि हिंदी भाषेतील एकांकिकांची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यापर्यंत तिचा विस्तार होत गेला. हे अनेकविध उपक्रम राबवण्यामागील हेतू मात्र एक आहे. महाराष्ट्रभर पसरलेल्या गुणी कलावंतांना त्यांची प्रतिभा आणि कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. शिवाय, त्यांनी हे व्यासपीठ एका ठराविक वर्गासाठी मर्यादित न ठेवता बालरंगभूमी ते प्रौढ रंगभूमी, या दोन टोकांसहित मधल्या स्तरातील हौशी तसंच व्यावसायिक नाट्यकर्मींसाठी खुले ठेवले. कुठल्याही एका कौशल्याधारित कलेत प्रभुत्व साध्य करणं हा मर्यादित दृष्टीकोन न ठेवता, अनेक नाटक आणि नाट्यविषयक पुरक उपक्रमांचे कौशल्याने व्यवस्थापन करणं, हा ‘अस्तित्व’च्या वाटचालीचा मूळ गाभा आणि स्त्रोत आहे. या पंचवीस वर्षात ‘अस्तित्व’ने अनेक रंगभूमीविषयक उपक्रम आयोजित केले जे आजही सुरू आहेत. त्यातले काही महत्वाचे उपक्रम असे,

1. ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या सुत्रानूसार दरवर्षी होणारी एकांकिका स्पर्धा.
2. अस्तित्व विनोदी एकांकिका स्पर्धा.
3. अस्तित्व नाट्यलेखन शिबिर.
4. अस्तित्व हिंदी एकांकिका स्पर्धा.

- Advertisement -

वरील उपक्रमांपैकी पहिल्या म्हणजे ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. मी स्वत: या स्पर्धेत एक दोनदा स्पर्धक म्हणून सहभागी झालो आहे. त्यामुळे, स्पर्धेच्या सुत्रानूसार एका कल्पनेचे अनेक आविष्कार एका स्पर्धेंतर्गत करायला आणि पाहायला मिळणं म्हणजे काय, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. गेल्या महिन्यात याच सदरातून एकांकिका या नाट्यप्रकाराला जागतं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांची आवश्यकता आणि त्यांच्या अंमलबजावणीतलं सातत्य कसं आवश्यक आहे, हे अधोरेखित केलं होतं. ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही अशीच एक आगळी कल्पना आहे. एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘अस्तित्व’ आयोजित कै. श्री. मु.ब.यंदे पुरस्कृत ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचे यंदाचे विषय सूचक आहेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि त्यांनी दिलेला विषय आहे ‘हसू आणि आसू’. यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष 34 वे असून खुल्या गटासाठी होणार्‍या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.

‘या उपक्रमांसोबतच ‘अस्तित्व’च्या आजवरच्या वाटचालीतील ज्याला मानाचं पान समजता येईल ते म्हणजे, पु.शि.रेगे यांच्या ‘सावित्री’ या प्रयोगशील कादंबरीच्या एकपात्री रंगमंचीय आविष्काराचे प्रस्तुतीकरण होय. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक रवींद्र लाखेंनी लिहिलेल्या तसंच दिग्दर्शित केलेल्या या नाट्यसंहितेचा प्रिया जामकर अभिनित देखणा आणि उत्तम सुश्राव्य प्रयोग ‘अस्तित्व’ने प्रस्तुत केला होता. त्याशिवाय, स्वप्निल चव्हाण लिखित ‘लोकोमोशन’ हे दोन अंकी नाटक आणि तेंडुलकरांच्या ‘चौर्‍याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च’ या कथेवर आधारित दीर्घांकाच्या गिरीश पत्के अभिनित प्रयोगाचे प्रस्तुतीकरणही तितकेच महत्वाचे. पैकी ‘लोकोमोशन’ या नाटकावर या सदरामधूनही मी लिहीले होते. ‘अस्तित्व’ आणि ‘मिती चार’, कल्याणच्या सहयोगाने हे नाटक इथल्या समांतर रंगभूमीवर सादर केले गेले.

या नाटकाच्या लिखाणाचा बाज लक्षात घेता मराठी समांतर रंगभूमीवर बर्‍याच कालावधीनंतर माणसांच्या भूत तसेच वर्तमानकाळाचे चिकित्सक विश्लेषण करणारी आणि आगामी भवितव्याचे सूचन म्हणता येईल, अशा आशयाची एक संहिता ऐकायला मिळाली आणि तिचा नटांनी तितक्याच समजूतदारपणे केलेला प्रयोग पाहायला मिळाला. किंबहुना, नाटककाराला ही संहिता लिहिताना आणि त्याच्या प्रयोगासाठी जो पैसा हवा होता, तो इथल्या समांतर रंगभूमीवरच मिळाला असता. महाराष्ट्राच्या समांतर (प्रायोगिक म्हणू हवं तर. पण तो शब्द फार क्लिष्ट होईल) रंगमंचावर खेळले जाणारे हे अलीकडील अत्यंत महत्वाचे नाटक आहे. अशा प्रकारच्या नाटकांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासकट त्यांचे नाट्य व्यवस्थापन उत्तमरित्या सांभाळणं हीच ‘अस्तित्व’च्या आजवरच्या यशाची किल्ली आहे. पंचविशीत पदार्पण केल्यानिमित्ताने ‘अस्तित्व’चे ‘नमन नटवरा’ या सदरातून मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यासारख्या सक्रिय रंगकार्याची आज मराठी रंगभूमीला नितांत गरज आहे. त्यांच्याकडून हे कार्य यापुढेही अथकपणे घडत राहील, याची खात्री त्यांचा आजवरचा प्रवास देतोच आहे.

पुन्हा एकदा समस्त वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -