जैसे मन में नाचे मोर …!

श्रावण आणि पाऊस यांचे नाते तर अद्वैत असेच. सर्व ऋतूत आणि सर्व महिन्यात सर्वात सुंदर आणि दिमाखदार मास म्हणजे श्रावण. पावसाच्या सरी बरोबरच याच महिन्यात भाव भक्तीच्या सरी बरसू लागतात. आता कालौघात यात बदल झालेलेही दिसतात. ते अपरिहार्य असेच. माणसांच्या जगण्यावर तंत्रज्ञानाच्या पडलेल्या प्रभावातून हा महिनाही सुटला नाही. मला आठवते माझ्या शालेय वयात या महिन्यात मंदिरात पंडित कवी श्रीधर यांचे भक्ती, पुराणग्रंथ वाचले जायचे. हरिविजय, पांडवप्रताप, रामविजय या ग्रंथाने तेव्हा रामायण, महाभारताची पहिली ओळख करून दिली. श्रावण आला की, मनाचा मोर नाचू लागतो.

माणसाचे आयुष्य म्हणजे एक भरजरी वस्त्रच जणू. अगणित धाग्यांनी ते विणले जाते. सुख, दु:खाचे, योग-वियोगाचे, हर्ष-खेदाचे, आशा-निराशेचे असे कितीतरी रंग या वस्त्रात बेमालूमपणे एकरूप झालेले असतात. आयुष्याच्या या रंगात मिसळून जाणे, त्याचा आनंद घेणे ज्याला जमते ती व्यक्ती जीवनात नेहमीच समाधानी असते. पण समाधानी, माणसाच्या आयुष्यातही काही तरी हरवल्याची आठवण असतेच. त्याचे दु:ख नसले तरी ते गेलेले क्षण, ते दिवस पुन्हा परत येत नाहीत. अशा वेळी अस्वस्थेतेच्या पानात हरवून जाण्याशिवाय माणूस काय करू शकतो? ते प्रत्येकाचे भागध्येय असते.

जेव्हा आपण कोणीच नसतो. आपली कोणतीही ओळख नसते. तेव्हा साध्या,साध्या गोष्टीतही खूप आनंद असतो. प्रौढत्वाची झूल नसलेले ते निरागस, निखळ मन किती समरसून जीवनाचा आनंद घेत होते हे मोठे झाल्यावर कळते. किती बारीक गोष्टी होत्या त्या? आता आपण मोठे झालेलो. घर, गाडी, नोकरी, पगार अशा सर्व भौतिक सुखाच्या परिघात आपण वावरत असूनही ती मौज, तो आनंद आता लाभत नाही. दुपारच्या सुट्टीत मित्राच्या घरी जाऊन केलेली अंगत-पंगत असो की, एखाद्या बाजाराच्या दिवशी, यात्रेत-जत्रेत केलेली मौज असो. याची सर आजच्या कोणत्याच बाबीत नसते. माणसाच्या परिस्थितीनुरूप त्याच्या सुखाच्या कल्पना बदलत जातात.

तरी काही सुखाचे प्रसंग मात्र त्याच्या मनात कायमचे कोरलेले असतात. एखाद्या ताम्रपटासारखेच. मनातल्या या पानातून कधी काय समोर येईल ते सांगता येत नाही. रूप, रस, गंध, नाद, स्पर्श अशा पंचविध अनुभवांचा कोश आपल्या मनात विणलेला असतो. म्हणून तर एखादा गंध आपणास दिवाळीत घेऊन जातो तर कधी श्रावणातील अंगभर फुललेल्या प्राजक्ताच्या झाडाखाली. कधी शाळेची वाट साद घालू लागते तर कधी नदीचा काठ. श्रावण महिना सुरू झाला की माझ्याही मनात श्रावणाच्या सरी बरसू लागतात. तो झडीचा पाऊस, उनपावसाचा श्रावणझिम्मा. क्षितिजावरचे इंद्रधनु. नदीचा खळखळ प्रवाह, ओल्याचिंब रानवाटा, निथळलेली झाडे, पंख फडफडून गिरकी मारणारे पक्षी आणि हिरवे शिवार. समृद्धीचे हिरवे लेणे घेऊन हा महिना साक्षात पाचूच्या आरस्पानी उजेडात मूर्तिमंत होतो.

श्रावण आणि पाऊस यांचे नाते तर अद्वैत असेच. सर्व ऋतूत आणि सर्व महिन्यात सर्वात सुंदर आणि दिमाखदार मास म्हणजे श्रावण. पावसाच्या सरी बरोबरच याच महिन्यात भाव भक्तीच्या सरी बरसू लागतात. आता कालौघात यात बदल झालेलेही दिसतात. ते अपरिहार्य असेच. माणसांच्या जगण्यावर तंत्रज्ञानाच्या पडलेल्या प्रभावातून हा महिनाही सुटला नाही. मला आठवते माझ्या शालेय वयात या महिन्यात मंदिरात पंडित कवी श्रीधर यांचे भक्ती, पुराणग्रंथ वाचले जायचे. हरिविजय, पांडवप्रताप, रामविजय या ग्रंथाने तेव्हा रामायण, महाभारताची पहिली ओळख करून दिली.

महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात पोहचलेला हा एकमेव असा पंडित कवी. त्याच्या रसाळ कथेने महाराष्ट्राचे मन तृप्त झाले. रंजन आणि भक्ती या दोन्ही गोष्टी या कथेने पूर्ण केल्या. आता क्वचितच असे चित्र दिसते. आजच्या प्रचलित माध्यमाने या पारंपरिक श्रवण भक्तीला क्षीण केले. आता कुठे तरी चार-पाच माणसे एकत्र येऊन कथेचा आस्वाद घेताना दिसतात, परंतु त्यात रंजनापेक्षा भक्तीभाव अधिक असतो. त्याकाळी शेतातली कामे उरकून, जेवणे आटोपून माणसे मारुतीच्या पारावर एकत्र यायची. श्रावण महिन्याची सकाळ आणि रात्र मंदिराच्या ओट्यावर, पारावर अशी गजबजलेली असायची. मोठ्या माणसाप्रमाणेच तेव्हाच्या आम्हा शालेय मुलांनाही ही आनंदाची पर्वणीच असे.

श्रावणाचे सर्वात विशेष महत्व म्हणजे कृषीसंस्कृतीतील अनेक सण या महिन्यात येतात. नागपंचमी, बैलपोळा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सण आणि त्यांतरचा गणेश उत्सव ग्रामीण भागात अगदी आनंदाने तेव्हा साजरे केले जात. आताशा ग्रामीण भागातही या सणांचा केवळ उपचार उरलेला दिसतो. तेव्हाचा उत्साह आणि उत्सवप्रधानता आजच्या गतिशील जीवनाने, तंत्र युगाने संपुष्टात आणलीय. सगळेच जीवन यंत्रवत, यांत्रिक झालेय. आताच्या पिढीला हे सांगूनही पटणार नाही. तेव्हा पोळ्याची तयारी महिनाभर आधीच सुरू होत असे. शेतात हिरवागार चारा उपलब्ध असे. गायी-गुरांची चंगळ, नदी नाले तुडुंब भरलेले, त्यामुळे शिवारभर हिरव्या समृद्धीचे तेज बहरलेले दिसे. शेतात, बाजरी, मुग, कपासी यासारखी पिके डोलू लागत. त्याबरोबरच शेतकर्‍यांच्या मनातही सुगीचे गाणे सुरू होई.

ज्या गायी -गुरांच्या जीवावर शेती चालते त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून या दिवसात त्यांच्या निगराणीची तयारी सुरू होई. भल्या पहाटेच बैलांना चारायला नेले जाई. त्यांना सुशोभित करण्यासाठी, त्यांना साज चढवण्यासाठी सुत कताई सुरू होई. गावात तेव्हा अनेकांच्या हातात पांढर्‍या सुताचे बंडल आणि त्यावर सुत कातणी सुरू, असे चित्र हमखास दिसे. या सुतापासून गायी-बैलांना वेसन, सर, म्होरक्या, कासरे तयार केले जात. ही कामे शेतकरी अगदी खुशीने करत, गावभर पडलेले सुताचे दोरे गोळ्या करण्यात लहान मंडळी गढून जात. कारण मुख्य पोळा झाल्यावर, मातीच्या बैलांचा लहान मुलांचा पोळा भरे. गावातून वेस्टेज म्हणून पडलेल्या सुतातून लहान मुलेही आपल्या मातीच्या बैलाला साज तयार करत. असे हे तेव्हाचे लहान मुलांचे भाबडे विश्व होते. असेच पारंपरिक खेळ तेव्हा असत. यात व्यावहारिकतेचा लवलेशही नव्हता. निरागस मनाने घेतलेला हा निखळ आनंद आताच्या पिढीला सांगूनही कळणार नाही. त्यांना हे सारे हास्यास्पद वाटेल.

नव्वद नंतर माणसाच्या जगण्यात पडलेले हे सांस्कृतिक अंतर आता सांधणारे नाहीय. बदललेल्या कालचक्राने तेव्हाचे हे सारे सांस्कृतिक आनंद लेपेटून घेतले. आताच्या खाउजा संस्कृतीने तर त्या पुढे पाऊल टाकलेय. अस्वस्थता, अगतिकता, अपरिहार्यता हा आजच्या काळाचा जीवनधर्म झालाय. त्यामुळे काही गोष्टीचा स्वीकार अथवा नकार हा आपल्या हातात राहिलेला नाहीय. या काळाच्या हातचे आपण बाहुले झालोय. त्याच्या गतीशी जुळवून घेऊन चालणे अपरिहार्य झालेय. त्यामुळे माणूस अस्वस्थ आहे. हताश आहे. निराश आहे. चार दिवस सुखाचे निरपेक्ष, आनंदी जगणे जे आधीच्या पिढीच्या वाट्याला आले, चटणी-भाकरी खाऊन त्यांनी जे उपभोगले ते आता लाभणार नाही. त्यामुळे या दिवसात घालवलेले ते नितांत हिरवे क्षण कधीच भूतकाळाच्या पानात झाकून गेल्याचे आपण पाहातो आहोत.

अलिकडे भर श्रावणात गावाकडे जेव्हा जाणे होते तेव्हा मागल्या कोणत्याच खुणा दिसत नाहीत. मागे एकदा पंचमीच्या दिवशी गावी जाणे झाले. बघतो तर काय कुठेच पंचमीचा झोका नाही. झाडे तर ती तशीच उभी होती. काही नव्याने आलेली मोठी झालेली. त्या झाडाखाली केवळ एक दोन म्हातारी डोके. बाकी कुणीच नाही. आमच्या वेळी गावभर पंचमीचे झोके असायचे. मोठाल्या झाडांना भल्या पहाटेच पंचमीचे झोके बांधले जायचे. दिवसभर उंचच उंच गेलेल्या झोक्यांचे हिंदोळ सुसुच्या नादात सुरू असत. संध्याकाळच्या वेळी सर्व गावातील झोके खेळण्यासाठी सार्वत्रिक फेरी निघे.

तेव्हाचा आनंद काय सांगावा. तीस-चाळीस फुटाहून अधिक उंच चढलेले झोके आणि ते खाली येताना पोटात येणारा गोळा, मिटलेले डोळे अजूनही आठवतात. आठवांच्या डोळ्याने मी हे पहातोय. आता पंचमीला माहेरवासिनी माहेरी येत नाहीत. त्या आता हे गाणे म्हणत नाहीत ‘फांदीवर पोरीने, बांधले ग डोळे, पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले, या गाण्यातील भाव आणि अर्थ आजच्या कोणत्या माहेरवासिनीला कळणार? काळाच्या प्रवाहात बरेच काही वाहून जाते. यालाच तर जीवन म्हणतात. नित्यनूतनता हाच प्रवाही जीवनाचा गुणधर्म. ते स्वीकारणे, नाकारणे आपल्या हातात नसतेच मुळी…! असे असले तरी श्रावण आला की माझ्या मनात अजूनही मनभावन श्रावणाच्या आठवणींचे मनमोर नाचू लागतात ते असे. ..!

–डॉ.अशोक लिंबेकर