देवमाणूस

Subscribe

एखादा हाडामासाचा माणूस प्रचंड स्थितप्रज्ञ अवस्थेत राहून तुमच्या आमच्यासारखा मोहमयी दुनियेला भुलत नाही, याचे मला कायम अप्रूप वाटत आले आहे. मी या माणसाला ३५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा बघितला. आजही आहे तसाच आहे. देव कधी आपले रूप बदलतो का? सुपारीच्या खांडाचं व्यसन तर नाहीच, पण दुसर्‍याविषयी मत्सर नाही, मागून कोणाची टवाळकी नाही. अपेक्षा, आशा आकांक्षा याच्या पलीकडे जाऊन पोहचलेल्या या माणसाच्या आयुष्याने खूप परीक्षा घेतल्या. देवाने कदाचित या देवमाणसाला आपल्या पंक्तीत बसवण्यासाठी हा सारा खेळ केला असावा. तो देवाच्या परीक्षेत कधीच नापास झाला नाही. देवानेही आता त्याची परीक्षा घेणे बंद केले आहे. प्रभाकर पेडणेकर त्याचे नाव.

देव कोणी बघितला आहे की नाही मला माहीत नाही. पण जे सुंदर, सत्य आणि पवित्र आहे तेथे देव आहे. अदृश्य रूपात. आपल्या संतांनीही तेच सांगितलंय. आकाश, पाऊस, नदी, समुद्र, झाडे, फुले यात तो वसला आहे. चराचरात तो दिसतोय. त्यासाठी त्याला भेटायला देऊळ, मशीद आणि चर्चमध्ये ठरवून जाण्याची गरज नाही. विशेष म्हणजे तो माणसातही आहे. निर्मळ झर्‍यासारख्या वाहणार्‍या एखाद्या मनुष्यात देव वसलेला दिसतो. असा देवमाणूस मी बघितलाय. त्याची ही सत्यकथा. बर्‍याच वर्षांनी गेल्या आठवड्यात तो माझ्यासमोर आला आणि मी नतमस्तक झालो. त्याच्या पायाला वाकून नमस्कार केला. प्रभाकर पेडणेकर त्याचे नाव. तुमच्या आमच्यासारखा माणूस. पण, कधी मोठ्याने बोलणे नाही की हसणे नाही. अपार वेदना झाल्या तरी डोळ्यात पाणी नाही.

एखादा हाडामासाचा माणूस प्रचंड स्थितप्रज्ञ अवस्थेत राहून तुमच्या आमच्यासारखा मोहमयी दुनियेला भुलत नाही, याचे मला कायम अप्रूप वाटत आले आहे. मी या माणसाला ३५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा बघितला. आजही आहे तसाच आहे. देव कधी आपले रूप बदलतो का? सुपारीच्या खांडाचं व्यसन तर नाहीच, पण दुसर्‍याविषयी मत्सर नाही, मागून कोणाची टवाळकी नाही. अपेक्षा, आशा आकांक्षा याच्या पलीकडे जाऊन पोहचलेल्या या माणसाच्या आयुष्याने खूप परीक्षा घेतल्या. देवाने कदाचित या देवमाणसाला आपल्या पंक्तीत बसवण्यासाठी हा सारा खेळ केला असावा. तो देवाच्या परीक्षेत कधीच नापास झाला नाही. देवानेही आता त्याची परीक्षा घेणे बंद केले आहे.

- Advertisement -

कोकणातून मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मुंबईत पोट भरण्यासाठी आलेल्या प्रभाकर यांना खरेतर सरकारी किंवा महापालिकेत सहज नोकरी मिळायला हवी होती. पण, अथक प्रयत्न करूनही त्यांचे काही काम झाले नाही आणि त्यांनी खासगी कंपनीची वाट धरली. प्रभाकर आमचे गाववाले. गावाला आई, बाबा आणि एक भाऊ. हे आपल्या दोन भावांसोबत मुंबईला. प्रभाकरांचे मोठे भाऊ मुंबईत असून नसल्यासारखे. मुंबई महापालिकेत मोठे अधिकारी असूनही भावंडांना त्याचा फायदा नाही. पण, आपल्याशी, छोट्या भावांशी तो चांगला वागला नाही म्हणून कधी तक्रार नाही. मोठा भाऊ स्वतःचा संसार थाटून स्वतंत्र झाल्यानंतर प्रभाकर यांनी लहान भावांना घेऊन आधी त्यांना आधार देत स्वतःच्या पायावर उभे केले आणि नंतर लग्न झाल्यानंतर काही वर्षे आपल्याकडे ठेवून त्यांना त्यांची घरे मिळवून देण्यासाठी हात दिला. सगळे काही सरळ रेषेत चालले होते, मग देवालाच प्रश्न पडला. अरे, असे कसे होऊन चालेल. आपण आपला माणूस, देव माणूस म्हणून ज्याला मर्त्य माणसांच्या दुनियेत पाठवले आहे तो खरंच देवमाणूस आहे की, नाही हे कसे कळणार? मग सुरू झाली परीक्षा. शिवणकाम, साड्या विक्री करून संसाराला हातभार लावणारी बायको, दोन मुले आणि खाऊन पिऊन बरा असा प्रभाकर यांचा छान संसार सुरू होता.

पण, पेडणेकरनीला अचानक खूप पैसे मिळवण्याची घाई झाली. तिला आपल्या नवर्‍याचा ठरविक पगार अपुरा पडायला लागला. ती दहा तारखेला आपल्या नवर्‍याचे पगाराचे पाकीट गायब करायला लागली. खिशातले पैसे अचानक गायब व्हायला लागले. मुले छोटी होती आणि शेजारी प्रामाणिक होते. तुमचे पाकीट मारले, तुम्हाला शुद्ध कुठे असते? पैसे खिशात आहेत की बाहेर पडले. मला काय माहिती अशी उडवाउडवीची उत्तरे बायकोकडून मिळूनही कधीच त्यांनी चिडचिड केली नाही. मग घर चालवण्यासाठी कंपनीकडून तसेच मित्रपरिवाराकडून पैसे घेऊन वेळ मारून नेत देवमाणूस संसार टिकवत होता. पण, त्यांच्या बायकोला आणखी पैसे हवे होते. आता ती भिशी तसेच सावकारांकडून डबल व्याजाने पैसे काढू लागली. ती या पैशाचे काय करत होती, माहीत नाही, पण प्रभाकर यांचा संसार उलटापालटा झाला. घरात कधी नव्हे ती भांडणे सुरू झाली. दिरांनी समजावून सांगितले. पण, उपयोग झाला नाही. पैसा कुठे जात होता, हे सांगायला ती तयार नव्हती. तिच्या माहेरच्या माणसांना सांगितले, पण त्यांनी कानावर हात धरले. आता प्रभाकर यांचे काय होणार असे वाटत असताना त्यांच्या बायकोने दोन्ही मुलांना घेऊन माहेरचा रस्ता धरला. देवमाणसाचा संसार मोडला होता. पण देवच तो… हलला नाही.

- Advertisement -

काही दिवसांनी त्यांचा मुलगा एकटाच आईची साथ सोडून बाबाकडे आला. प्रभाकर यांचा चेहरा समाधानाने भरून आला. पण, आता खरी परीक्षा सुरू झाली होती. त्यांच्या सासरच्या माणसांनी आधी त्यांना महिला अत्याचाराच्या नावाखाली पोलीस चौकीची पायरी चढवायला लावली, मग जेलमध्येही टाकले. हे ऐकून माझी आई प्रचंड संतापली. ‘अरे प्रभाकर आमचो देवमाणूस. एका गालात मारली तर दुसरो पुढे करीत. काय ह्या त्याच्या नशिबात ईला. शिरा पडो त्याच्या बायलेवर ती. रे झिला, काययेक झाला तरी आपल्याक प्रभाकराक वाचवक व्हयो’. कोर्टात मी आणि आमचा एक गाववाला यांनी जामीन देऊन प्रभाकर यांना जेलमधून बाहेर काढले. पण, एवढे होऊनही या माणसाने काडीमोड घेतला नाही की कधीच बायकोच्या नावाने शिमगा केला नाही. काही वर्षे एक भाऊ आणि त्याची बायको यांनी येऊन प्रभाकर यांना आधार दिला. नंतर गावाहून आई आली. आता त्यांचा मुलगा पदवीधर होऊन कामाला लागला होता. तो आता घर हातात घेऊन सुखाने संसार चालवेल, अशी त्यांच्या मनीची इच्छा पूर्ण होईल, असे वाटत असताना मुलाने प्रेमविवाह केला. तो केला म्हणून प्रभाकर यांना काहीच अडचण नव्हती.

पण, आपल्या बायकोमुळे भोगावा लागला नसेल एवढा त्रास त्यांना सून सांभाळताना झाला. मुलगाही आंधळे प्रेम करून पस्तावला आहे, हे त्यांना दिसत होते. पण त्याला आणखी त्रास नको म्हणून घरातल्या रोजच्या कटकटी ते सांगत नव्हते. सून महाराणी होऊन सासर्‍याकडून घरातील सर्व कामे करून घेत होती. नोकरी, घरकाम करून प्रभाकर कधी नाही ते थकलेले दिसत होते. आपल्या नशिबी जे भोग आले ते पुन्हा आपल्या मुलाच्या नशिबी येऊ नयेत, म्हणून ते धडपडत होते. पण, दुर्दैवाचे दशावतार त्यांना बघायचे होते. मुलगा आणि सुनेची घरातील भांडणे आता वाढू लागली. तिलाही श्रीमंती थाटात राहायचे असल्याने तिने नवर्‍याला आणि सासर्‍याला त्रास द्यायला सुरुवात केली. सुनेच्या माहेरच्या लोकांची दादागिरी, पोलीस चौकी आणि कोर्ट असे प्रसंग त्यांच्या मुलाच्याही आयुष्यात आले. काळाची परीक्षा दोनदा प्रभाकर यांना सहन करावी लागली. आई आणि मी त्यांना भेटायला गेलो. आई म्हणालीही, ‘देव, गरीब सरळ माणसाचीच बरी परीक्षा बघता. आधी बायलेच्या तोंडार शिरा पडली आणि आता सुनेच्या. पण, तुमका सांगतंय पेडणेकरानू तुमचे भोग आता संपत ईले. झाली, संपली तुमची परीक्षा’.

माझ्या आईच्या तोंडातून देव बोलला की, नाही माहीत नाही, पण तिने पुन्हा एकदा मला पुढे करत पेडणेकरांच्या मुलाच्या मदतीला पाठवले. फॅमिली कोर्टामध्ये त्याला मी शक्य तेवढी मदत केली. पोटगी देऊन शेवटी यातून सुटका करत प्रभाकरच्या मुलाने दुसरे लग्न केले. दरम्यानच्या काळात प्रभाकर यांना हार्ट अटॅक येऊन गेला. ते वाचतील की, नाही असे वाटत असताना ते मरणाच्या दारातून परत आले आणि त्यांना बघायचे निमित्त करून बर्‍याच वर्षांनी त्यांना भेटायला गावाहून बायको आली. पण, एका शब्दाने ते काही बोलले नाहीत. गावाला माहेरी राहणार्‍या पेडणेकरनीने आता स्वतंत्र घर बांधले होते. मुलगीही चांगली शिकून नोकरीला लागलेली. पुढे तिचेही लग्न झाले. त्यांच्या मुलाला मुलगी झाली म्हणून सारे कुटुंब एकत्र आले होते. मला निमंत्रण होते.

बरेच महिने पेडणेकर यांना मी भेटलो नव्हतो. मी ठरवून गेलो आणि त्यांना सर्वांना एकत्र बघून मला खूप आनंद झाला. मला आईचे बोल आठवले. संपली होती देवमाणसाची परीक्षा. पेडणेकर नेहमीप्रमाणे शांत होते. आनंदाच्या या क्षणी ते भारावून गेले आहेत, असे मला दिसले नाही. ‘संजू बरा आहेस ना.आई कशी आहे. गावाला असते ना. गावाला गेलो की भेटेन’. ते एका खुर्चीत बसले होते. मी तासभर होतो. मुलगा खूप बोलत होता आणि माझ्या डोळ्यासमोरून पस्तीस वर्षांचा काळ भराभर पुढे सरकत होता. प्रभाकर यांनी आपल्या नाहीच, पण आजूबाजूच्या, गावच्या, कामावरच्या लोकांनाही खूप मदत केली होती. आपल्या घराकडे, गावाकडे लक्ष दिले. आपल्या हातून जे काही चांगले होईल तितके केले. पण, या हाताचे त्या हाताला माहिती होऊ दिले नाही. विशेष म्हणजे एवढे सर्व भोग भोगून कधीच जीवनाबद्दल तक्रार केली नाही. येतो म्हणून त्यांचा निरोप घेताना आपसूक माझे हात त्यांच्या पायाला लागले. मला देवमाणूस पुन्हा भेटला होता…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -