घरफिचर्ससारांशएक असामान्य!

एक असामान्य!

Subscribe

राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर सामान्य माणसाने जायचं कुठे, असं म्हटलं जातं त्यातला तो सामान्य माणूस. एकदम सामान्य…म्हणजे नुसता सर्वसामान्यच नाही तर अतिसामान्य…ते व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट पर्सन असतात तसं म्हणावं तर तो अती अती सामान्य माणूस. गल्लीच्या टोकावरच्या काळ्या कुत्र्याने हातात फक्त काळी पिशवी असतानाच ओळख द्यावी इतकीच काय ती त्याची अतिसंक्षिप्त ओळख. पिक अवर्समध्ये त्याला लोकलमधून उतरायचंही स्वातंत्र्य नाही, कुणीतरी त्याला ढकलतं म्हणून तो लोकलमधून उतरतो. ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडेही गेल्यावर अपॉइंटमेंट घेतलेली असतानाही कुणी व्हीआयपी आला म्हणून रिसेप्शनिस्ट पाउण तास त्याला बाहेर बसवून ठेवते. कपड्याच्या दुकानातला सेल्समनही तो दुकानात आल्यावर आधी त्याच्या कपड्यांवर नजर टाकतो आणि त्याच्यासारखेच मातकट कपडे त्याच्यापुढे पसरतो. पण ते कपडे दाखवत असताना मध्येच तो त्याला साहेब म्हणतो तर मध्येच शेठ म्हणतो.

शेठ, साहेब म्हटल्यामुळे तो जरा सुखावतो. पण ते सुख तो झोपताना ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळताना मिळावं तितकंच माफक असतं. कुस वळून झाली की तेही सुख संपतं. पण अशा भुसभुशीत सुखातही तो खुशीत असतो. कित्येकदा दुकानदार, विक्रेते ‘गिर्‍हाईकाचे नुकसान हेच आमचे समाधान’ असं ब्रीदवाक्य मनात घोळवत वाणसामान, भाजीपाला देताना त्याला हातोहात फसवतात, पण त्यावर तो आपला सर्वसामान्य विरोध करतो.‘आम्हीच मिळालो का तुम्हाला फसवायला’ अशा छापाचं काही तरी पुटपुटतो. पण त्याच्या ह्या विरोधाला कोणतंच वर्तमानपत्र आपल्या वर्तमानपत्रातल्या कोणत्याही पृष्ठावर स्थान देत नाही की त्याला विरोधकांनी केलेलं प्रतिपादन म्हणत नाही.वर्तमानपत्र वाचताना तो काही नराधमांनी केलेल्या पाशवी बलात्काराच्या बातम्या नजरेखालून घालतो आणि त्या बातम्यांच्या बाजूलाच असलेल्या असामान्य लोकांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल केलेल्या हार्दिक सत्काराच्याही बातम्या पाहतो. असामान्य लोकांना कुणी लाखालाखाचा गौरवनिधी देत असतो, त्यांच्या डोक्यावर कुणी पुणेरी पगडी चढवत असतो, कुणी त्यांची दहा रुपयांच्या नाण्यांनी तुला करत असतो. ही सगळी छायाचित्रं तो त्या बातम्यांमध्ये कधी निरखून तर कधी ओझरती बघतो. ह्या सगळ्या बातम्या वाचताना तो मनातल्या मनात आपल्या सामान्य आयुष्यातल्या सुखद क्षणांचा पडताळा घेण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न करताना त्याला सासर्‍यांनी लग्नात रेमंडचा सुट घेण्यासाठी चार हिरव्या पत्त्या दिल्या होत्या तितकाच एक क्षण आठवतो.

- Advertisement -

नाही म्हणायला कधीतरी भिशी लागल्याचंही त्याला आठवतं. पण दुसर्‍याच दिवशी बाबा बाथरूममध्ये घसरून पडल्यावर त्यांच्या फ्रॅक्चरमध्ये ती भिशी वाहून गेल्यामुळे तो क्षण आता त्याला नकोसा वाटतो. मग आधारकार्ड पोस्टाने आलं तो क्षण त्याला आपल्या आयुष्यातला फारच असामान्य क्षण वाटतो. आधारकार्डाच्या नंबरची बेरीज केली तर तो शुभ आकडा आला तेव्हा तर तो ते आधारकार्ड घेऊन आपल्या अध्यात्मिक गुरूंकडे गेल्याचंही त्याला आठवतं, पण नंतर मतदान केंद्रावर जाण्यापलिकडे त्याचा फारसा उपयोग नसल्याचं त्याच्या लक्षात येतं आणि आधारकार्डासकट त्याच्यावरचा भाग्यवान नंबरही तो विसरून जातो. मग एटीएममध्ये गेल्यावर आपल्यापुढे कुणीच नसल्याचा आणि एसी आणि एटीएम, दोन्हीही कधी नव्हे ते एकाच वेळी चालू असल्याचा तो दैवदुर्मीळ क्षण त्याला आठवतो. पण त्यातही एटीएमच्या स्क्रीनवर पुरेशी रक्कम नसल्याचं त्याला दिसतं आणि नव्व्याण्णव रनवर एलबीडब्ल्यू झाल्यासारखं त्याला वाटतं.आपल्या आयुष्यात आठवण्यासारखा एकही असामान्य क्षण नाही? असं कसं होईल? असं कण्हत कण्हत गाणं म्हणत तो पुन्हा आपल्या आयुष्याचं उत्खनन सुरू करतो.

तो घरी येतो. घरात शिरल्या शिरल्या रंग उडालेल्या कपाटातले फोटोंचे जीर्णशीर्ण अल्बम काढतो. जिभेला बोट लावत अल्बमची पानं उलटतो. तिथे त्याला चाळीच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त झालेल्या चमचागोटी स्पर्धेचा फोटो दिसतो. त्यात त्याला वयाच्या बावन्नाव्या वर्षी बक्षीस म्हणून मिळालेली पिगी बॅग दिसते. स्वत:ची दोन बोटं व्ही फॉर व्हिक्टरीसारखी वर केल्याचा आपला तो फोटो पाहून त्याला क्षणभर तो आपल्या आयुष्यातला असामान्य क्षण वाटतो. पण चाळीतल्या चमचागोटीतली पिगी बॅग ही कसली व्ही फॉर व्हिक्टरी असं त्याला वाटतं आणि तो सगळे अल्बम पुन्हा आपल्या अर्धगंजल्या कपाटात नीट ठेवून देतो.

- Advertisement -

नाही, आपण कधीच असामान्य ठरलो नाही, आपल्या आयुष्यात असामान्य म्हणावा असा एकही क्षण आला नाही ह्याची त्याला सतत जाणीव होत राहते. त्याच्या चेहर्‍यावर निराशा दाटून येते. आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्याच्या निराशेचा दर्जाही इतका सामान्य असावा हा त्याला आपल्या आयुष्यातला काळा विनोद वाटतो. चाळीत पाण्याची लाइन टाकली आणि नळाची लाइन लावण्याची कटकट गेली हा आपल्या आयुष्यातला असामान्य क्षण असावा का? पण त्याबद्दल कोण आपला कशाला सत्कार करील? लाइन टाकणार्‍याचा सत्कार करील असा विचार त्याच्या मनात येतो…आणि आपल्या आयुष्यातला असामान्यत्वाचा अभाव त्याला पुढची बरीच मिनिटं डाचत राहतो. आपल्या आयुष्यात असामान्य क्षण नाहीत, आपल्या आयुष्यात असामान्यता नाही, आपण अर्धा सेकंदही असामान्य नाही हा विचार त्याच्या मनात घोंघावत राहतो. त्याचा पिच्छा सोडत नाही. आपण सामान्य म्हणून जन्म घेतला. आजन्म सामान्य राहिलो आणि आपण सामान्य म्हणूनच इहलोकीचा निरोप घेणार, तो देतानाही चारदोन सामान्यच आपल्याभोवती असणार आणि अखंड आयुष्य सामान्यपणे जगल्यामुळे चारदोन शब्दांतच आपल्याला श्रध्दांजली वाहिली जाणार ह्या विचाराने तो फारच काळवंडतो. अशा निराशाजनक विचारातच तो पॉज् घेतो. आपल्या आयुष्यात काहीतरी असामान्य असणार, शोध घेतला तर काहीतरी असामान्य निघणार, असा एक आशेचा किडा त्याच्या डोक्यात तरीही वळवळतो

इतक्यात राजकारणातलं की बॉलिवुडमधलं एक असामान्य व्यक्तिमत्व त्याच्यापासून काही हात दूर एका गिर्रेबाज गाडीतून खाली उतरतं. ते उतरताच त्याच्या मागेपुढे असलेला अनोळखी तांडा त्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या दिशेने धावत सुटतो. कुणी त्याच्याशी हात मिळवतं. कुणी त्याच्यासोबत सेल्फी काढतो. पण ह्या सगळ्या पळापळीत या अतीसामान्याला तो अतीसामान्य असल्यामुळेच त्या तांड्याचे दोन शक्तिशाली धक्के बसतात आणि तो तीनताड उडतो, पडतो, साफ कोसळतो. त्याला हात द्यायलाही कुणी थांबत नसतो. त्याचे गुडघे फुटतात ओठांतून रक्त येतं.
…पण पुढच्याच क्षणी तो स्वत:ला सावरत उभा राहतो. जिंकल्याच्या अविर्भावात तो हाताची दोन बोटं वर करतो.

…तो स्वत:शीच म्हणतो, इतक्या सगळ्या असामान्यांच्या कोंडाळ्यात मी सामान्यपणे जगतोय, जगून दाखवतोय हेच माझ्यासाठी असामान्य आहे. मी असामान्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -