घरफिचर्ससारांशन शिकवणारी मीरांबिका शाळा

न शिकवणारी मीरांबिका शाळा

Subscribe

शिकणं आणि शिकवणं म्हणजे नक्की काय, या प्रश्नाचं एकमेव, ठाशीव उत्तर देता येत नाही. अनेक विचारवंतांनी या प्रश्नाच्या उत्तराचा व्यासंगपूर्ण वेध घेतलेला आहे. त्यातून विविध उत्तरं समोर येतात, मात्र ‘कुठलीच गोष्ट शिकवता येत नाही’ या तत्त्वावरच मीरांबिका शाळा नवी दिल्ली येथे गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. या शाळेत ना स्टेट बोर्ड आहे, ना सीबीएसई, ना कुठलं आंतरराष्ट्रीय बोर्ड. दहावीला विद्यार्थी ‘नॅशनल ओपन स्कूल’मधून बोर्डाची परीक्षा देतात. येथे कोणताही चौकटीतला अभ्यासक्रम नाही. मुलांना युनिफॉर्म नाही. स्ट्रक्चर असं कोणतंच नाही. शाळेच्या कोणत्याही व्याख्येत ही शाळा बसत नाही, पण तरीही जगातली एक उत्तम शाळा म्हणून ती नावाजली जाते.

– सचिन जोशी

मीरांबिका शाळेने चौकट नाकारली आहे. चौकट नाकारणं म्हणजे विस्कळीतपणा नव्हे तर नवीन आणि मोकळी व्यवस्था असणं. या शाळेचं मुख्य उगमस्थान श्री अरबिंदो आणि श्रीमाँ! त्यांच्याविषयी, पाँडिचेरीविषयी जगभर सगळ्यांना माहिती आहे. श्रीमाँचं मूळ नाव मीरा अल्फासा. फ्रान्समध्ये पॅरिस इथे 21 फेब्रुवारी 1878 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं. त्या प्रतिभावंत चित्रकार झाल्या. पुढे त्या पाँडिचेरीला आल्या. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्या श्री अरबिंदो यांच्या शिष्या पण अरबिंदो त्यांना ‘माता’ म्हणून संबोधत. श्रीमाँचे शिक्षणविषयक विचार कालातीत ठरणारे आहेत.

- Advertisement -

श्रीमाँ म्हणत, मुलांमध्ये मूलत: असलेल्या गोष्टींना घासून पुसून उजळवणं, विकसित करणं म्हणजे खरं शिक्षण देणं. फूल सूर्यप्रकाशात फुलतं, त्याप्रमाणे मुलं आनंदात उमलतात, फुलतात! म्हणूनच विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्मपरीक्षणावर त्यांच्या प्रगतीची पावलं अवलंबून असतात. या शाळेच्या धर्तीवर टीचर्स ट्रेनिंगही होत असतं. श्रीमाँ म्हणतात, मुलांच्या वेगवेगळ्या भौतिक गरजा पूर्ण करणं म्हणजे त्यांना वाढवणं नव्हे. मुलांना शाळेत घातलं, शिक्षकांच्या हाती सोपवलं म्हणजे आपलं काम संपलं असं समजून मोकळं होणं ही तर मोठी चूक आहे. मुलांना शिक्षण देण्याची योग्यता स्वत: प्राप्त करणं हे इथे प्रथम कर्तव्य ठरतं. आपल्या विवेकी वर्तणुकीवर इथे भर द्यावा लागतो.

एखादं आख्यान, एखादी गोष्ट मुलांवर नकळत संस्कार करून जाते. त्यातून खूप चांगलं शिक्षण त्यांना मिळत असतं. मुलांना ओरडू, मारू नका; पुन्हा पुन्हा एखादी चूक मुलं करणार नाहीत, त्यासाठी योग्य शब्दांत त्यांना समजवा. चूक कबूल करायला लावा. मग त्यांना क्षमा करा. चांगलं शिक्षण प्राप्त होण्यासाठी पाल्याचा तुमच्याप्रति विश्वास निर्माण व्हायला हवा. सर्व शाळांमध्ये आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली जावी. त्यामुळे शिक्षण अस्सलतेशी जोडलं जाईल. ही गोष्ट आहे 1955 सालातली. भारतात नवीन शैक्षणिक धोरण लागू होतंय 2023-24 च्या दरम्यान. या धोरणानुसार आता पुढे भारतविषयक ज्ञान हा शंभर मार्कांचा पेपर शालेय स्तरावर अनिवार्य असणार आहे. श्रीमाँचे विचार आजच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जेव्हा समाविष्ट झालेले दिसतात तेव्हा श्रीमाँच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय येतो. अरबिंदो म्हणत, ‘शाळेत कोणतीही गोष्ट शिकवता येत नाही. मनाचा विकास मनाच्या सल्ल्यानेच करायचा असतो. कुठलीच गोष्ट लादायची नसते, ती फक्त समोर ठेवायची असते.’

- Advertisement -

कुठलंही बोर्ड इथे अस्तित्वात नाही हे कळल्यावर मी मीरांबिकाचे तत्कालीन मुख्य रमेश बिजलानी यांना विचारलं, ‘मोठ्या वर्गासाठी कोणी पालक पाल्याच्या अ‍ॅडमिशनसाठी येतात का?’ ते म्हणाले, ‘प्रवेश आम्ही फक्त नर्सरीला देतो. पुढे ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत प्रवेश दिला जात नाही. दरवर्षी फक्त 20 नवीन प्रवेश दिले जातात. या 20 प्रवेशांसाठी किमान 200 अर्ज येतात. पालकांची गांभीर्याने मुलाखत घेतली जाते. 10 पानी प्रश्नावली देण्यात येते. त्यात शिक्षणाबद्दल त्यांचा दृष्टिकोन त्यांनी लिहायचा असतो. यामध्ये कुठेही त्यांच्या मुलाबद्दल माहिती नसते. त्यांच्या स्वत:च्या विचारावर आणि दृष्टिकोनावर प्रश्नावली आधारित असते. त्यावरून त्यांच्यावर कसे संस्कार झाले आहेत हे तपासता येतं.’

‘जे उत्तीर्ण होतात त्यांना पुढचा आठवडा रोज शाळेत निरीक्षणासाठी बोलावलं जातं; मग त्यांच्या पाल्याला शाळेत प्रवेश मिळेल की नाही हे ठरवलं जातं.’ 200 विद्यार्थी असलेल्या या शाळेला 10 एकराचा कॅम्पस असून इथे शारीरिक खेळाला खूप महत्त्व दिलं जातं. या शाळेची मुख्य संकल्पना म्हणजे ‘मुक्त विकास’. श्रीमाँच्या मते ‘मुक्त विकास म्हणजे आत्म्याने दाखवलेल्या दिशेने केलेला विकास, तसंच सवयी, परंपरा किंवा पूर्वग्रहविरहित विकास.’

मोकळेपणाची सुरुवात शाळेच्या दिसण्यापासूनच होते. शाळेची इमारत देखणी आहे. सर्व वर्ग षटकोनात असून दरवाजे नाहीत. चार भिंतींपैकी एक भिंत फक्त सहा फुटी बाकी सर्व मोकळं; एक भिंत काचेची. बाहेरचा सर्व निसर्ग कोणताही अडथळा न येता विद्यार्थी पाहू शकतात. थोडक्यात वर्गाला फक्त दोनच भिंती आहेत. आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळी झाडं, पक्षी, मोर आहेत. प्रत्येक वर्गाचं रंगरूप वेगळं आहे. एका वर्गात झाड, तर दुसर्‍या वर्गात तळं. तिसर्‍या वर्गात पहिल्या मजल्यावरून येणारी घसरगुंडी, तर एकात माती-वाळूने भरलेला खड्डा आहे. दिसणं आणि असण्याच्या बाबतीत आगळीवेगळी ठरणारी ही शाळा. मग या शाळेबद्दल शासनाची नेमकी भूमिका काय? ‘राईट टू एज्युकेशन अ‍ॅक्ट’नुसार तिची गणना शाळेतच होणार नाही, पण तरीही पालक मुलांना इथे पाठवतात ते का? शासनाने ‘न्यू ओपन बोर्ड’-‘मुक्त बोर्ड’ ही संकल्पना स्वीकारलेली आहे. या बोर्डाची तिसरी, पाचवी आणि आठवीची परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात. टिपिकल शाळेत मुलांना घालून त्यांनी विशिष्ट बोर्डाची परीक्षा द्यावी असं शासनाचं कुठेही म्हणणं नाही. एनआयओएस-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या अखत्यारित विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. अकरावी, बारावीच्या परीक्षाही त्यांना देता येतात.

शाळा बदलाच्या वेळी लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, पण ही शाळा ते देत नाही. राईट टू एज्युकेशन अ‍ॅक्टप्रमाणे वयानुसार शाळा प्रवेश द्यावा एवढंच सरकारने सांगितलेलं आहे. अर्थात एलसीशिवाय इतर शाळेत प्रवेश मिळू शकतो. मीरांबिकासारख्या प्रोग्रेसिव्ह शाळा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या असतात. त्यांना शासन वेगळ्या पद्धतीने मान्यता देत असतं. या प्रयोगांमधूनच शिक्षणशास्त्राचे विविध नियम निर्माण होतात. व्यवस्था मानवनिर्मित असते. सगळे नियमही एका अर्थी मूलत: प्रयोगांशीच बांधलेले असतात. हेच नियम सर्वसाधारण व्यवस्थांना उपयोगी पडत जातात. अर्थातच ‘प्रयोगशीलता’ मीरांबिका शाळेचा गाभा आहे.

इथली शिक्षणप्रणाली ‘प्रकल्पातून शिक्षण’ या माध्यमातून आखलेली आहे. या शाळेतलं शिकवण्याचं, विचार करण्याचं भाषा माध्यम फक्त इंग्रजी. पहिल्या वर्गापासून विद्यार्थी वेगवेगळे प्रकल्प तयार करतात. घोकंपट्टीला फाटा दिल्याने विद्यार्थ्यांच्या निर्मितीक्षमतेला भरपूर वाव असतो. त्यामुळे प्रयोग यशस्वी होण्याचीच शक्यता अधिक असते. इथे पहिल्या वर्गापासूनच विद्यार्थी शिक्षकांशी चर्चा करून त्या चर्चेमधून माहिती गोळा करून वेगवेगळे प्रकल्प तयार करतात. त्यासाठी लागणारं ज्ञानकौशल्य विकसित करतात. प्रकल्पासाठी मानवी शरीर, प्राणी, शाळेसाठी निर्देशपुस्तिका बनवणं, शाळेची इमारत डिझाईन करणं यांसारखे विषय असतात. इथे विद्यार्थ्यांना मुक्त स्वातंत्र्य आहे. एखाद्याला वर्गात बसण्याऐवजी मैदानावर सायकल चालवायची असेल तर त्याला तशी मुभा आहे. इथे शिक्षकांना ‘दीदी’, ‘भय्या’ म्हणतात किंवा दीदीतलं पहिलं अक्षर ‘दी’ आणि भय्यामधलं शेवटचं अक्षर ‘य्या’ घेऊन ‘दिया’ म्हटलं जातं. दिया म्हणजे प्रकाश देणारी पणती. ते दिया मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करतात. मुलांना शाळा सुटताना, भरताना संगीत ऐकवतात. शिक्षकांना ‘भय्या’, ‘दीदी’ म्हणण्याची ही पद्धत मला आवडल्याने माझ्या शाळेतसुद्धा मी ती अमलात आणली आहे.

कुंभारकाम, सुतारकाम हे विषयही इथे महत्त्वाचे मानले जातात. गणिताच्या संकल्पना नाटकातून समजावतात. विद्यार्थ्यांना शाळेतूनच जेवण दिलं जातं. जेवल्यावर विद्यार्थी स्वत:चं ताट-वाटी स्वच्छ धुवून-पुसून ठेवतात. मी शाळेतल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांना शाळेत कसं वाटतं याविषयी विचारलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘आम्हाला कोणत्याही दडपणाशिवाय इथे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्हाला गणिताच्या तासाला बसायचं नसेल तर वर्गात बसायची सक्ती नसते. त्याऐवजी ‘दिया’ आम्हाला वेगळं मार्गदर्शन करतात.’ दुसरा विद्यार्थी म्हणाला, ‘आमच्या इथे इतर शाळांसारखी एकमेकांशी तुलना केली जात नाही. प्रोत्साहन दिलं जातं. कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही.’

खरंच मुलांचं बालपण न हरवता त्यांच्या मनाचा विकास करणारी ‘मीरांबिक शाळा’ आज जगभरात प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. शासकीय परिभाषेत न बसणारी आणि व्यवस्था नाकारणारी ही शाळा म्हणूनच वैशिष्ठ्यपूर्ण ठरते.

मीरांबिका शाळा आगळीवेगळी का?

 1. कुठल्याही शैक्षणिक बोर्डाशी संलग्नता नाही.
 2. ‘मुक्त विकास’ या संकल्पनेवर आधारित शाळा.
 3. लर्निंग विथ प्रोजेक्ट्स या माध्यमातून शिक्षण.
 4. ‘कोणतीही गोष्ट शिकवता येत नाही,’ या अरबिंदोंच्या तत्त्वावर आधारित शाळा.
 5. पालकांचं मानसशास्त्र आणि संस्कार तपासून पाल्याला प्रवेश दिला जातो.
 6. शाळेच्या परिसरात अनेक झाडं, बदकं, मोर, चिमण्या, कोंबड्या यांचा मुक्त वावर.
 7. हिंदी, इंग्रजी तासांनंतर दररोज गोष्ट सांगितली जाते.
 8. पहिल्या मजल्यावरून खाली यायला घसरगुंडी.
 9. प्रत्येक वर्ग खुला.
 10. वर्गांना फक्त सहा फुटांच्या भिंती.
 11. मुलांना युनिफॉर्म नाही.
 12. संपूर्ण शाळेचा परिसर निसर्गरम्य.

(लेखक शिक्षण अभ्यासक आणि इस्पॅलिअर स्कूलचे संचालक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -