घरफिचर्ससारांशजीवनाच्या गुणवत्तेचा प्रश्न !

जीवनाच्या गुणवत्तेचा प्रश्न !

Subscribe

शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे हे विधान शिक्षणाच्या गेल्या काही वर्षात सातत्याने नोंदवले गेले आहे. त्याप्रमाणे वर्तमानातही सातत्याने बोलले जाते आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण होते असे आजवर देशाच्या शैक्षणिक इतिहासात फारसे नोंदविले गेले नाही. शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे नेमके काय? हेदेखील आता निश्चित करण्याची वेळ आली आहे. मुलांना लिहिता, वाचता येणे आणि गणन करता येणे हिच केवळ गुणवत्ता असेल तर समाज स्वतःचीच फसवणूक करत आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेच्या संदर्भाने व्यापक विचार करण्याची वेळ आता आली आहे. शिक्षणातून जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असते.

शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असल्याचे सांगत मराठवाड्याचे महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पहिली ते दहावीच्या शाळांना शिकवणारे शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्वांचीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला आरंभी विरोधाचा सूर आळवला गेला असला तरी शिक्षक संघटना आणि प्रशासन यांच्यातील संवाद सुरू झाल्याने सकारात्मकतेचे पाऊल पडले आहे. त्याच वेळी प्रशासनानेदेखील परीक्षा ऐच्छिक ठेवत, नापास होणार्‍या कोणावरही कारवाई होणार नसल्याचे सूचित केले आहे. आज पडलेले हे पाऊल आज नाही तर उद्या पडणारच आहे. त्यामुळे उद्यासाठीचे हे पहिले पाऊल म्हणून त्याकडे पहायला हवे. आता अशा प्रक्रियेला सामोरे जाण्याची मानसिकता शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनीच ठेवायला हवी. या निमित्ताने गुणवत्ता का ढासळते आहे? यावरही चर्चा झाली. या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे हेही नसे थोडके.

शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे हे विधान शिक्षणाच्या गेल्या काही वर्षात सातत्याने नोंदवले गेले आहे. त्याप्रमाणे वर्तमानातही सातत्याने बोलले जाते आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण होते असे आजवर देशाच्या शैक्षणिक इतिहासात फारसे नोंदविले गेले नाही. शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे नेमके काय? हेदेखील आता निश्चित करण्याची वेळ आली आहे. मुलांना लिहिता, वाचता येणे आणि गणन करता येणे हिच केवळ गुणवत्ता असेल तर समाज स्वतःचीच फसवणूक करत आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेच्या संदर्भाने व्यापक विचार करण्याची वेळ आता आली आहे. शिक्षणातून जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असते. जे शिक्षण जीवनाचे प्रश्न निराकरण करण्याची शक्ती देत नाही ते शिक्षण गुणवत्तेचे नाही. विनोबा म्हणतात की,आपल्या हाती असलेली पदवी हे बीकॉम आहे की बेकाम आहे हे आता ठरविण्याची गरज आहे. मुळात आपल्याकडे कोणत्याही व्यवस्थेत शिक्षण हा अग्रक्रमाचा भाग नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही शिक्षण हा राजकीय जाहीरनाम्यात दिसत नाही आणि धोरणातही प्रभावीपणे प्रतिबिंबीत होताना दिसत नाही.

- Advertisement -

आपला विकासाच्या योजनांवर भर असला तरी, आपल्या देशात विकासाचे परिणाम जे स्पष्टपणे दिसत नाहीत, त्याचे कारण शिक्षणातून अपेक्षित असलेला विचार रूजविण्यात अपयश आले आहे. या अपयशाला केवळ शिक्षक जबाबदार धरून व्यवस्थेला पळ काढता येणार नाही. जबाबदारी सर्वांनी घेतली तरच आपल्याला सामोरे जाता येईल. मात्र यातील महत्वाचा घटक शिक्षक आहे. त्याने केलेली पेरणी अधिक परिणामकारक ठरते. त्या दृष्टीने शिक्षकांवर अधिक लक्ष देण्याचा हा प्रयत्न आहे. विनोबानी शिक्षकांचे अंगी कोणते गुण हवेत या अनुषंगाने म्हटले आहे की, शिक्षक निरंतर अध्ययनशील असायला हवा. शिक्षकांचा जगात सर्वाधिक कशावर विश्वास असायला हवा असेल तर तो केवळ ज्ञानावरती. जो ज्ञानार्थी असतो तो परीक्षार्थी म्हणून स्वत:ला कधीच समजत नाही. त्याच्या अखंड प्रवासात अशा अनेक परीक्षांना सामोरे जावे लागत असते. शिक्षक हा ज्ञानार्थी असण्याची गरज व्यवस्थेने सातत्याने व्यक्त केली आहे. तो ज्ञानार्थी असेल तर वर्गातील प्रक्रिया ही अधिक व्यापक व परिणामकारक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आपल्या इतिहासात अनेक शिक्षक होते. ज्यांनी इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्यामुळे आज परीक्षांचे पडलेले पाऊल हा आरंभ आहे..उद्या यासारख्या स्वत:ला सिध्द करणार्‍या अनेक गोष्टींना सामोरे जाण्याची तयारी करावी लागणार आहे.

या निमित्ताने गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षकांना सक्षम करण्यासाठी प्रभावी प्रशिक्षणाची मागणी केली. उपक्रमाची वाढलेली रेलचेल कमी करा. माहितीचे ओझे कमी करा, अशी मागणी पुढे आली. या तीनही मागण्यांचा गंभीरपणे विचार करण्यास हरकत नाही. ज्या व्यवस्थेला सोबत घेतल्याशिवाय आपल्याला गुणवत्ता आणता येणार नाही ती व्यवस्था काही उपाय सूचवत आहे ते समजावून घेण्याची गरज आहे. आपल्याकडे शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज आहे हे संघटनानी मान्य केले आहे. शिक्षण वेगाने बदलत आहे. जगभरातील शिक्षणाबद्दलच्या भूमिका बदलत असताना देशातील शिक्षणातही बदलाची गरज आहे. जगात शिक्षणांशी संबंधित असलेल्या अनेक क्षेत्रात वेगाने बदलत होत आहेत. नवनवीन संशोधने होत आहेत. त्याचे परिणाम शिक्षणाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष होताना दिसत आहेत. आपले शिक्षण अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि ध्येय साध्य करण्यात पुरेशा प्रमाणात यशस्वी होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

शिक्षणातील नवीन प्रवाह जाणून घेण्यासाठी शिक्षकांना तयार करण्याची गरज असते. जगाच्या पाठीवर होणारे बदल समाज मनात रूजवायचे असतील तर कार्यरत माणसांची मने प्रज्वलीत करण्याची निंतात गरज आहे. शिक्षक हे किती सक्षम आणि प्रेरित आहेत त्यावरच राष्ट्राचे भविष्य अवलबूंन असते. त्यामुळे शिक्षकांना सतत स्वत:ला काळाशी जोडून ठेवावे लागते. त्यासाठी शिक्षक ज्ञानपरायण राहण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर शिक्षण गुणवत्तापूर्ण आहे आणि आपल्याकडे नाही यामागे शिक्षक कारणीभूत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा इजिप्तमध्ये भाषण देणार होते. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी त्यांचे भाषण कैरो विद्यापीठात आयोजित केले. त्यांच्या त्या भाषणासाठी प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना परवानगी दिली.

मंत्री, तसेच इतर महत्वाचे अधिकारी यांना बाहेर ठेवले. त्यांना अनुमती नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की तुमचे काम अमेरिकन सरकारबरोबर चर्चा करणे हे आहे. आपल्या देशाचे भविष्य शिक्षणातून घडत असेल तर तेथे स्वप्न पेरणार्‍या माणसांना अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे नवदृष्टीचा विचार शिक्षणातून रूजवण्यासाठी तेथे शिक्षक हवे आहेत. आपल्याकडे शिक्षकांना इतका सन्मान कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे. आमचा प्राध्यापक, शिक्षक दारूच्या दुकानासमोर, रस्त्यावर सुरक्षेसाठी, किराणा मालाचे वितरण करणे, चौकीवर सुरक्षा पुरविणे, शौचालय मोजणे, उंदीर मोजणे, बांधकाम सर्वेक्षण करणे, मतदार नोंदणी करणे, रेशनच्या दुकानावर थांबणे अशा विविध कामाला त्याची बुध्दिमत्ता उपयोगात आणली जाणार असेल तर, त्यांच्या मनात स्वप्न तरी कसे निर्माण होणार? आपण त्या पेशातील माणसांचा आत्मसन्मान जपत नसू तर त्यांचे सरकारीकरण होणार आहे. शिक्षकांचे सरकारीकरण हे गुणवत्तेला मारक आहे हा इशारा शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.

आपण भविष्य घडविणार्‍या पेशातील माणसं ज्ञानाने किती सक्षम करतो आहोत, त्याच्या पेशाला किती प्रतिष्ठा देतो त्यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे. त्यांच्या मानसिकतेच्या जडणघडणीवर गुणवत्ता अवलंबून असते याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेत शिक्षणाचे आणि शिक्षकांचे स्थान उंचावत नाही तोवर आपल्याला समाजात फारसा बदल करता येणार नाही. त्यामुळे प्रथम शिक्षकांना सक्षम करताना त्यांना सन्मान देण्याचीदेखील अधिक गरज आहे. आपल्या देशातील शिक्षकांना सक्षम करणारी व्यवस्थादेखील अधिक सक्षम करण्याची गरज आहे. दुर्दैवाने ती व्यवस्था जितकी भक्कम हवी आहे तितकी ती भक्कम नाही. मुळात शिक्षण हे काही पुस्तके वाचून समजेल अशी प्रक्रिया नाही. त्याला पदवी मिळाली म्हणजे शिक्षण समजले असेही घडत नाही. त्याठी अनेकांनी जीवन व्यतीत केले. त्यात समर्पणाने काम करणार्‍या अनेकांनी जीवनभर शिक्षणात काम केले त्यांनी शिक्षण समजले आहे असे जगभरात काम करणारे लोकदेखील मान्य करत नाही. अखंड जीवनभर ज्या लोकांनी स्वत:ला गाढून घेतले आहे.

ज्यांनी आपले जीवन म्हणजे शिक्षण असा अनुभव मांडणी केली आहे अशा लोकांची शिक्षण व्यवस्थेत गरज आहे. शिक्षणात समर्पणाने काम करणारी माणसं शोधणे हेही मोठे आव्हान आहे. आपल्या राज्यात अशी प्रयोग करणारी अनेक प्रकाशाची बेटे वेगवेगळ्या ठिकाणी कामे करता आहेत. अशा बेटांचा शोध घेणे आणि त्यांना सोबत घेऊन काम केले तर बदलाची पाऊलवाट चालणे शक्य आहे. त्यातूनच सक्षमीकरणाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या निमित्ताने हे पाऊल स्वागतार्ह मानायला हवे. शिक्षकांच्या सक्षमीकरणाची भूमिका स्वीकारणे आणि कार्यवाहीची गरज आहे. या निमित्ताने होणार्‍या परीक्षेकडे केवळ पास, नापास या दृष्टीने न पाहता मूल्यमापनाचा मूळ हेतू समजावून घेऊन आपण त्याकडे पाहण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात काम करताना आपल्याकडे जी कौशल्य, क्षमता, ज्ञान हवे आहे ते जाणून घेणे घडणार आहे. एखादे कौशल्य हवे आहे आणि ते आपल्याकडे नाही हे आपल्याला या निमित्ताने जाणता आले तर ते प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करता येतील. आपण कोठे आहोत हे जाणून घेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे समजून आपला प्रवास सुरू ठेवण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -