Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशनृत्यातून विज्ञान शिकवणारी शाळा

नृत्यातून विज्ञान शिकवणारी शाळा

Subscribe

महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आय. बी. अभ्यासक्रम असतो असं कुठं ऐकलं आहे का? नाही ना? परंतु गुजरातमधल्या अहमदाबादच्या महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो आहे. अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने काही वर्षांपूर्वी बंद पडलेली शाळा पास्कल चाझोर आणि त्यांच्या पत्नी अंजू मुसाफीर यांना भाडेतत्त्वावर चालवायला दिली. इथले ५० टक्के विद्यार्थी गरीब कुटुंबातले आहेत. आज या शाळेतले विद्यार्थी बारावीचं शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी कॅनडा, फ्रान्स, जर्मनी इथे शिष्यवृत्ती मिळवून गेले आहेत, तर काही विद्यार्थी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहेत, मात्र या शाळेचा प्रवास इतका सोपा नव्हता. 

– सचिन जोशी
जर्मनीतले शिक्षणतज्ज्ञ पास्कल गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाले आणि त्यांनी अहमदाबादमध्ये महापालिकेची शाळा चालवण्यासाठी परवानगी मागितली, पण अहमदाबादेत याचे संमिश्र पडसाद उमटले. भारतभर प्रसारमाध्यमांनी हा विषय ‘फ्रंट पेज’वर आणला. गोर्‍या लोकांनी, परदेशी लोकांनी भारतीय शाळा शिक्षण देण्यासाठी काबीज केल्या इत्यादी. अहमदाबादमध्ये या विषयामुळे दंगलीही झाल्या, मात्र सुप्रीम कोर्टात पास्कल आणि अंजू मुसाफीर केस जिंकल्या आणि ही शाळा सुरू झाली. गुजरातमधली हे पहिले इंटरनॅशनल स्कूल.
मी जेव्हा या शाळेत गेलो तेव्हा मला फुलपाखराच्या बागेत आल्यासारखं वाटलं. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा ड्रेस वेगळा होता. या शाळेत गणवेश नाही. रोजची तासिका संपल्यावर वाजवली जाणारी बेल, परीक्षा यांचंही दडपण इथे नाही. या सगळ्याचं कारण मी अंजू मुसाफीर यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, शाळेचा उगमच जेल, तुरुंग या संकल्पनेतून झाला आहे.
इंग्रजांनी शाळा आणल्या, पण तुरुंगासाठी असलेलं व्यवस्थापन शाळेत आणलं. सगळ्यांना सारखा ड्रेस, खोल्या, कैद्यांवर लक्ष ठेवायला जेलर. यापेक्षा खरं शिक्षण मुक्त वातावरणात असतं. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याची इतरांबरोबर तुलनाच होऊ शकत नाही. मग सारखे कपडे घालून प्रत्येकाचं वेगळेपण आपण का नष्ट करावं? म्हणून या शाळेत युनिफॉर्म नाही.
या शाळेतल्या पाचवीच्या वर्गात फिरताना लक्षात आलं की सर्व विद्यार्थ्यांना एक प्रकल्प (प्रोजेक्ट) दिला होता. खेळणी डिस्मेंटल करणं. जगभरातल्या विविध खेळण्यांचा अभ्यास एका महिन्यापासून सुरू होता. खेळण्यांच्या माध्यमातून इतिहास, भूगोल, गणित विद्यार्थी शिकत होते. प्रत्येक मुलाने त्या विषयावर स्वतःचं असं पुस्तक तयार केलं होतं. त्याचं उत्तम पुस्तक शाळेने छापून प्रसिद्ध केलं होतं.
प्रत्येक वर्गातल्या मुलाचं पुस्तक छापण्यात आलं. या शाळेत पूर्ण शिक्षण ‘प्रोजेक्ट बेस्ड’ असतं. विद्यार्थी कृतीतून, अनुभवातून शिकतात. उदा पिरॅडिक टेबल्स (इलेक्ट्रॉन, प्रोट्रॉन, न्यूट्रॉन) हे डान्स, ड्रामामधून शिकवतात. इथे विद्यार्थ्यांना जीवनातल्या खर्‍या अनुभवांना प्रत्यक्ष सामोरं जायला मिळतं. विद्यार्थी फरशांवर नकाशे काढतात आणि शिकवतात. फोटोग्राफी आणि शूटिंग करून शॉर्टफिल्म तयार करतात. दरवर्षी कॅलेंडर तयार करतात.
सातवी-आठवीचे विद्यार्थी पत्रकारिता शिकतात. लोकांच्या मुलाखती घेतात. गणिताच्या सगळ्या संकल्पना कृतीतून शिकवल्या जातात. शाळेत एखादी नवीन वस्तू आणायची झाली तर विचार केला जातो की ती वस्तू विद्यार्थी स्वत: तयार करू शकतील का? शाळेतले बेंचेस, स्टूल्स विद्यार्थ्यांनीच बनवले आहेत. ‘राईट टू एज्युकेशन’ सांगतो २५ टक्के गरीब मुलांना शिक्षण खासगी शाळेत, श्रीमंत विद्यार्थ्यांच्या शाळेत द्यायला पाहिजे. या शाळेने मात्र अनेक वर्षांपूर्वी ही संकल्पना अमलात आणली. विविध जाती, धर्म, संस्कृती, आर्थिक स्तरातली मुलं इथे एकत्र शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या इ.क्यू, आय.क्यू.वर या शाळेत भर दिला जातो. कोणताच विद्यार्थी खासगी शिकवणीला जात नाही. संपूर्ण विकासाची जबाबदारी शाळा घेते. मी काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक मुलात बोलताना उत्साह होता आणि प्रत्येक जण मला प्रश्न विचारत होता. अंजू मुसाफीर म्हणाल्या की, मी भारतातल्या सगळ्यात टॉप असणार्‍या शाळेत शिक्षण घेतलं. माझा अनुभव फार वाईट होता. म्हणून मी शाळा काढायचं ठरवलं. आम्ही काही शिकवत नाही पण विद्यार्थी शिकतात. या वाक्यात शाळेचं तत्त्वज्ञान लपलेलं आहे.
आमच्या इस्पॅलिअर शाळेचं त्यामुळेच या शाळेशी बरंच साम्य आहे. कारण माझ्या बाबतीतही असंच घडलं. लहानपणी माझ्या एकूण तीन शाळा बदलल्या, पण माझा अनुभव फार वाईट होता. मला सातत्याने वर्गात शिक्षक मारायचे. मी कधीही कोणत्याही मुलाची खोडी काढली नाही. कुणाला त्रास दिला नाही. तरीसुद्धा शिक्षक इतर मुलांचा राग माझ्यावर काढायचे. कळत-नकळत मी शैक्षणिक वातावरण कसं नसावं याचा अनुभव घेत गेलो. आज जेव्हा लोक मला विचारतात, ‘इस्पॅलिअर स्कूल ही वेगळी शाळा का आहे?’ तेव्हा या प्रश्नाचं प्रदीर्घ उत्तर मला माझ्या लहानपणाच्या अनुभवात सापडतं.
शिक्षणासंदर्भात प्रत्येक मुलाचे शाळेबाबत वेगळे अनुभव असू शकतात. मी नेहमी असा विचार केला की हे जरी खरं असलं तरी आपल्याला शाळेतल्या सगळ्या मुलांना आनंदाचा अनुभव सारखा देता येऊ शकतो. त्यांना मिळत असलेल्या आनंदाची जातकुळी एक असू शकते का? अंजूदीदींच्या शाळेत मला हा आनंद अनुभवायला मिळाला. तो मला भावला, कारण माझ्या मनातल्या कप्प्यात दडलेल्या आनंदाशी तो मिळताजुळता आहे. तिथले अनेक प्रयोग मला आकर्षून घेणारे आहेत.
आताचं शासन शाळा दत्तक योजना राबवत आहे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप). सरकारी शाळा इतर खासगी शैक्षणिक संस्थांना दत्तक देऊन मोठं परिवर्तन घडवून आणण्याचा विचार त्यामागे आहे, पण या शाळेने २०-२५ वर्षांपूर्वीच हा प्रयोग करायला घेतला. खासगी आणि सरकारी शाळांतले ५०-५० टक्के विद्यार्थी घेऊन हा प्रयोग केला. हा प्रयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन दाखवला.
अंजू मुसाफीर आता विविध शाळांना मार्गदर्शन करण्याचं आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता ही कौशल्ये नजरेसमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या अंगी ती कशी बाणवता येतील, त्यासाठी शिक्षकांनी नेमकं काय करायला पाहिजे यासाठी दिशादर्शन करतात. आता जागतिक पातळीवर ही शाळा एक लँडमार्क ठरली आहे. सहकार्यातून काय काय घडू शकतं याचा ही शाळा म्हणजे उत्तम नमुना आहे.
MGIS आता NCERT आणि CBSE सह विविध बोर्डांसाठी अभ्यासाचं ठिकाण बनलं आहे. गुजरात आणि परदेशातील बीएड् महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या नावीन्यपूर्ण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी इथे येतात. जनरेटेड रिसोर्सेस लर्निंगच्या तत्त्वांनुसार शिक्षकांना दिलेलं प्रशिक्षण भारत आणि युरोपमधल्या अनेक शाळांमध्ये विस्तारत आहे. शाळेने सलग तीन वेळा ब्रिटिश काऊन्सिल इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅवॉर्ड मिळवला आहे. तिला यूके-इंडिया एज्युकेशन अँड रिसर्च इनिशिएटिव्ह ग्रँटद्वारे दोनदा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शाळेमध्ये सेंटर फॉर अ‍ॅक्शन रिसर्च इन एज्युकेशन (CARE) आहे, जे शिक्षण क्षेत्रातलं कृती संशोधन प्रकल्पांसाठी उपयुक्त केंद्र आहे, जे  MGIS मधलं शिक्षक प्रशिक्षण केंद्र आणि वर्ग अध्यापनशास्त्र चालवतं.
अहमदाबादमध्ये स्थित असलेली महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल ही K-१२ शाळा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था (IBO), केंब्रिज विद्यापीठ, मिशन लाइक फ्रँकेस (फ्रान्स) आणि BTEC Edexcel, (UK) द्वारे अधिकृत आहे. MGIS चा आंतरराष्ट्रीय विनिमय कार्यक्रम शिक्षणाद्वारे भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी प्रेरक ठरत आहे.
२००० पासून MGIS दरवर्षी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी Student Exchange Program आयोजित करीत आहे. लडाख, अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अशा ठिकाणचे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी इथे येतात. त्यामुळे खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि वैचारिक देवाणघेवाण होते. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची बाब आहे.
अ‍ॅपल टेक्नॉलॉजी वापरणारी ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय शाळा आहे. National civil award मिळालेली ही भारतातली एकमेव शाळा आहे. केवळ बक्षिसं, पारितोषिकं आणि पुरस्कार मिळवण्याचा उद्देश कधीच नसल्यामुळे आणि नावीन्याची कास धरत विद्यार्थ्यांना अनुभवांच्या बळावर पुढे नेण्याचं उद्दिष्ट कायम समोर ठेवल्यामुळे या शाळेतल्या शिक्षकांना मुलांसाठी स्वतंत्रपणे आणि चौकटीबाहेरचं असं बरंच काही करता येतं. अगदी शाळा सुरू होण्याच्या आधीपासून सगळ्या नवीन कल्पनांची आणि संकल्पनांची पद्धतशीर आखणी होते. त्यात कुठेही ढिसाळपणा नसतो. नवीन आलेल्या शिक्षकांना शाळेच्या अध्यापनशास्त्राची ओळख करून दिली जाते. त्याविषयी अर्थातच प्रशिक्षण दिलं जातं.
इथल्या शिक्षकांचाही शाळा सुरू होण्यापूर्वीचा आठवडा उत्साह, मनोरंजनाने परिपूर्ण असतो. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सगळ्यांचं स्वागत केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी असतात तसे विविध खेळ शिक्षकांसाठीही आयोजित केले जातात. क्रीडा क्षेत्र कायम एक नवीन स्फूर्ती आणि चैतन्य माणसाला प्रदान करीत असतं. याचं प्रत्यंतर इथे येतं. सुरुवातच अशी दमदार आणि उत्साहपूर्ण झाल्यावर पुढचं सारं वर्ष त्याच मार्गाने पुढं जाणारच. कायम आल्हाददायक वातावरण विद्यार्थ्यांना प्रदान करणारी ही शाळा म्हणूनच त्यांच्या सगळ्या यशस्वी प्रयत्नांसाठी आगळीवेगळी ठरते.
त्यांची वेबसाईट- https://www.mgis.in/
ही शाळा आगळीवेगळी का?
IB बोर्ड असलेली अहमदाबादमधली महापालिकेची शाळा
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-दत्तक योजना
गणवेश, बेल, परीक्षा यांपासून मुक्त
स्टूडंट एक्स्चेंज प्रोग्रॅमसारखे उपक्रम
आंतरराष्ट्रीय दर्जा
कमालीचं मोकळं वातावरण
शाळेचं स्वत:चं अध्यापनशास्त्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -