घरफिचर्ससारांशचौकाचौकात घडणारी गोष्ट- चौक

चौकाचौकात घडणारी गोष्ट- चौक

Subscribe

चौक... चौक म्हटलं की आठवतो तो चौकातल्या मंडळींचा गलका, येणार्‍या-जाणार्‍यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि असं बरंच काही. अशाच एका चौकाची गोष्ट आपल्यासमोर घेऊन येत आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया. ‘मुळशी पॅटर्न’सारख्या दमदार कलाकारांची फौज असलेला हा सिनेमा जबराट अनुभव देणारा आहे.

— आशिष निनगुरकर

‘चौक’ चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट मांडण्यात आली आहे. अनुराधा प्रॉडक्शन आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांची निर्मिती असलेल्या ‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात याची उत्सुकता होती, परंतु त्यांनी आपला सर्व अनुभव पणाला लावून या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे हा सिनेमा उत्तमरित्या तयार झाला आहे.

- Advertisement -

ही गोष्ट घडते पुण्याजवळील एका शहरात. तर घटना अशी आहे की सार्वजनिक गणेशोत्सवात विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीत कोणाचा बाप्पा पुढे जाणार यावरून भांडण, राडा, मोठा तंटा सुरू होतो. एका गटातील तरुण दुसर्‍या गटातील तरुणाच्या श्रीमुखात भडकावतो. ज्याच्या कानशिलात पडते तो स्थानिक पुढारी नगरसेवकाचा भाऊ बाल्या (अक्षय टंकसाळे) असतो. अपमानित झालेला किंबहुना अहंकार दुखावलेल्या नगरसेवकाच्या भावाला आता काहीही करून या अपमानाचा सूड घ्यायचा असतो. तसा तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असतो.

कमरेला पिस्तूल आणि गळ्यात भरगच्च सोनसाखळ्या. पोलिसांवर दबाव टाकून बाल्या त्या तरुणाला बेदम तुडवतो. त्यातच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढल्याचं क्षुल्लक निमित्त होतं आणि बाल्याचा जीव जातो आणि सुरू होतो सर्व काही उद्ध्वस्त करणारा खेळ. गुन्हेगारी आणि राजकारणात दिसणारी पुसटशी रेष सिनेमात ठळक होताना दिसते. अत्यंत क्षुल्लक कारणांमुळे एकमेकांचा जीव घेणं, त्याचं पुढारी मंडळींकडून होणारं राजकारण, गुन्हेगारी मार्गाला लागलेली तरुण पिढी आणि उद्ध्वस्त होणारी कुटुंबं… या चौकटीचा पर्दाफाश करणारा असा हा ‘चौक’ सिनेमा आहे.

- Advertisement -

याअगोदर गुन्हेगारी विषयावर अनेक सिनेमे आले आहेत, पण दिग्दर्शकाला यातून जे नेमके म्हणायचे आहे ते त्याने उत्तमरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमा पाहिला असेल. ‘चौक’सुद्धा त्याच ‘पॅटर्न’मधला आहे. कमी-अधिक फरकानं याही गोष्टीचा जीव आणि त्यातील मर्म ‘मुळशी पॅटर्न’सारखंच आहे. गुन्ह्यामागचा कर्ता-करविता आणि त्यात निष्पाप बळी जाणार्‍यांची ही गोष्ट आहे. ही गोष्ट वाचायला, बघायला, ऐकायला जितकी क्षुल्लक, तर्कहीन वाटू शकते तितकीच ती खरीखुरीदेखील आहे, किंबहुना असू शकते. या सगळ्यात जीव गेलेल्या व्यक्तीचं कुटुंब उद्ध्वस्त होतं.

हीच सत्य-असत्याच्या चौकटीतील परिस्थिती लेखक दिग्दर्शक देवेंद्र गायकवाडनं ‘चौक’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. देवेंद्र अर्थात ‘मुळशी पॅटर्न’मधील दया. लेखक-दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलावहिला सिनेमा आहे. पदार्पण असलं तरी त्याच्यासाठी सिनेमातंत्र नवं नाही. त्यामुळे त्यानं केलेलं प्रामाणिक काम पडद्यावर दिसतं. कथानकातील बारकावे त्यानं शिताफीनं अचूक मांडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी काही मुद्यांवर जाणीवपूर्वक पडदाही टाकलेला जाणवतो, परंतु सिनेमातून प्रेक्षकांना नेमकं जे दाखवायचं आहे त्यामध्ये दिग्दर्शक यशस्वी ठरतो.

उत्तम कलाकारांची फौज असलेला हा सिनेमा भारदस्त आणि तितकाच चकाचक बनला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे नगरसेवक टायगरचा (उपेंद्र लिमये) भाऊ बाल्या आणि गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष (शुभंकर एकबोटे), त्याचा मित्र सनी (किरण गायकवाड) यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. क्षुल्लक कारणांमुळे सुरू झालेलं भांडण जीवघेणं होतं. या भांडणाचा फायदा पुढारी मंडळी घेतात. अर्थात नगरसेवक टायगर आणि निवडणुकीत हरलेला, नगरसेवक होऊ पाहणारा अण्णा (प्रवीण तरडे) यांच्यात राजकीय खेळ सुरू होतो. मंडळाचा अध्यक्ष आणि सनी हे त्या खेळाचे प्यादे असतात. सुरुवातीला भांडणात बाल्याचा जीव जातो. नंतर वार-प्रतिवार होतात. आणखी दोन-एक जीव जातात.

या सगळ्यात हे सर्व कोण घडवतं? का घडवतं? राजकारणी मंडळी स्वार्थासाठी तरुणांचा फायदा कसा करून घेतात? तरुण पिढी गुन्हेगारीचा मार्ग का निवडते? स्थानिक पातळीवरदेखील सत्तेचं राजकारण कोणत्या थराला जाऊ शकतं? पोलीस यंत्रणा या सगळ्यात कशी बघ्याची भूमिका घेते? आदी सर्व प्रश्नांची उकल सिनेमा करतो, पण ही उकल करताना लेखक-दिग्दर्शकानं काही ठिकाणी हातचं राखून लिहिलं आणि दाखवलं आहे. अधिक वस्तुनिष्ठ आणि पारदर्शी चित्र दाखवण्यात तो कमी पडतो. काही प्रसंग लांबलेले आहेत असे दिसते, तर काही प्रसंग अर्धवट सोडलेले वाटतात. त्यामुळे सिनेमाचा उत्तरार्ध काहीसा विस्कळीत झाला आहे. सिनेमाचा पूर्वार्ध जितका गच्च आणि रंजक बांधला गेलाय ती रंजकता उत्तरार्धात काहीशी कमी दिसते.

प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांच्या अभिनयात त्यांचा अनुभव झळकतो. त्यांच्या अभिनयाने सिनेमाला एक वेगळी उंची मिळते. त्यातही उपेंद्र लिमये सरस वाटतो. मालिकांमध्ये झळकलेला किरण गायकवाड, बाल्याच्या भूमिकेतील अक्षय टंकसाळे, अध्यक्ष शुभंकर एकबोटे याचं काम दखल घेण्याजोगं आहे. त्यांनी त्यांना मिळालेलं काम चोख बजावलं आहे. इन्स्पेक्टर मुळे (रमेश परदेशी) ही व्यक्तिरेखा लेखकानं खुलवायला हवी होती. संस्कृती बालगुडेनं तिच्या वाट्याला आलेलं काम उत्तमरित्या केलं आहे. अध्यक्षाची बायको (स्नेहल तरडे) या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखवण्यात लेखक-दिग्दर्शक कमी पडतो. कथानकातील भावनिक बाजू पडद्यावर तितक्या ठळकपणे उमटलेली नाही. ती अपेक्षित होती, जेणेकरून घडलेल्या घटनांचे परिणाम किती दाहक आहेत हे प्रेक्षकांपर्यंत अधिक स्पष्टपणे पोहचलं असतं.

सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’. या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकार मंडळी आणि जोडीला नवीन पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप बघायला मिळेल. वास्तववादी चित्रण आणि अगदी रोज आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी आणि कानावर पडणारे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे.

यासोबतच संगीतकार साई-पियुष यांचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला आणखी वास्तववादी बनवत आहे. एकूणच ‘चौक’ सिनेमा सर्व चौकटीत बसून मनोरंजनाचा उत्तम मसालापट आहे. तांत्रिक बाजूंनी सिनेमा नीटनेटका झाला आहे. त्या-त्या भूमिकांनुसार संवाद लिहिले गेले आहेत. सिनेमॅटोग्राफर मयूर हरदासनं चोख काम केलं आहे. देवेंद्र गायकवाडनं पदार्पणात कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सर्व काही उत्तम केलं आहे. ‘चौक’ हा प्रत्येक तरुण कार्यकर्त्यानं (जो मारतो आणि मार खातो) बघण्या आणि समजून घेण्यासारखा आहे. त्यामुळे उत्तम भट्टी जमलेला

हा सिनेमा नक्की सिनेमागृहात जाऊन बघा व आपल्या आजूबाजूला असणार्‍या ‘चौक’चा खरा अर्थ समजून घ्या.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -