नंदाकाकी

आजूबाजूच्या सगळ्यांनी तोपर्यंत मला एक शिकवलं होतं. तात्या दिसले की, त्यांना विचारायचं. तात्या तुझी बायको कशी दिसता? तात्या काय म्हणायचे हे आता आठवत नाही. पण माझी नंदाकाकीची पहिली ओळख म्हणजे तात्याची बायको. मग मला कडेवर घेऊन घरभर फिरवून मला भरवायला सुरुवात केली. मला जेवण भरवायचे म्हणजे दिव्यच! मला घर पुरत नसे. पाटल्यादारी नेऊन बैल दाखवत किंवा वाड्याकडे नेऊन गायी वासरं दाखवत भरवावे लागे. ती माझी नंदाकाकीबद्दलची ठळक आठवण मनात कोरली गेली ती कायमची.

तेव्हा मी असेन साधारण तीन चार वर्षाचा. आता विजयचे म्हणजे माझ्या चुलत्यांचे लग्न करायला हवे. मी चार महिन्याचा असताना माझ्या आजीचे निधन झाले. तिच्या पाठोपाठ माझ्या आजोबांचेदेखील पुढील दोन वर्षात निधन झाले. आई आणि मी गावी होतो, बाबा नोकरीच्या निमित्ताने मुंबईला होते. मला आता शाळेत घालायला हवं तर आई आणि मला बाबांकडे मुंबईला येणं भाग होतं. आता घरात कोणीतरी कर्तसवरत हवं. यादृष्टीने आता विजय तात्याचे लग्न व्हायला हवे होते. माझी मोठी आत्या कुडाळ तालुक्यातल्या कुपवडे गावात दिली होती. तिच्या यजमानांनी एक मुलगी तात्यासाठी बघितली.

तात्या साधारण चोवीस वर्षाचा. मुलगी असेल एकोणीस-वीस वर्षाची. बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत पडली. साखरपुडा ठरला. गंमत म्हणजे तात्या साखरपुड्याला गेलेच नाहीत. नेमस्त मुलगा साखरपुड्याला न जाता साखरपुडा झाला. 15 मे 1981 या दिवशी तात्याचं लग्न त्या मुलीबरोबर झालं, मुलीला सगळेजण नंदा म्हणायचे आणि मी नंदाकाकी म्हणायचो.

आजूबाजूच्या सगळ्यांनी तोपर्यंत मला एक शिकवलं होतं. तात्या दिसले की, त्यांना विचारायचं. तात्या तुझी बायको कशी दिसता? तात्या काय म्हणायचे हे आता आठवत नाही. पण माझी नंदाकाकीची पहिली ओळख म्हणजे तात्याची बायको. मग मला कडेवर घेऊन घरभर फिरवून मला भरवायला सुरुवात केली. मला जेवण भरवायचे म्हणजे दिव्यच! मला घर पुरत नसे. पाटल्यादारी नेऊन बैल दाखवत किंवा वाड्याकडे नेऊन गायी वासरं दाखवत भरवावे लागे. ती माझी नंदाकाकीबद्दलची ठळक आठवण मनात कोरली गेली ती कायमची.

मी मुंबईला आलो. शाळेत जाऊ लागलो. 1986 ला जुनं घर उतरवून त्याजागी नवीन घर बांधायचे ठरले. ते दिवस म्हणजे विचारता सोय नाही. दरम्यान काकीच्या पदरात तीन मुलगे होते. मोठा सचिन असेल चार वर्षाचा, त्यामागचा सुबोध तीन वर्षाचा आणि लहान समीर फार तर सहा महिन्यांचा. आम्ही सगळे मुंबईला. गावी फक्त तात्या, काकी आणि तीन लहान मुलगे.

तात्यांचा शेतीबरोबर पिठाच्या गिरणीचा व्यवसाय होता. फक्त पिठाची गिरणी नाही तर भाताची गिरण, त्यात भुईमुगाच्या शेंगाचे तेल काढण्यासाठी तेलाचा घाणा सुरू केला होता. वाड्यात चार बैल, दोन म्हशी त्यांची रेडकं असा तो काळ.

रात्री घराच्या समोर नवीन घरासाठी कौलांचा ट्रक उभा रहायचा. एव्हाना लोकांच्या साखरझोपेची बोंब वाजलेली असायची. तात्या ट्रकचा आवाज ऐकून वडाकडे जायचे. वाडीतल्या दहा झिलग्यांना बोलावून कौलं उतरून घ्यायचे. इकडे झिलगे कौलं उतरवत आहेत तर तिकडे नंदाकाकीने ट्रकसोबत आलेल्या माणसांच्या जेवणासाठी आधण ठेवलेलं असायचं. रात्री दोन वाजता जेवणाची पंगत बसायची तीन वाजता जेवणं आटोपली की, पुन्हा पाच वाजता विहिरीवर वावर सुरू व्हायचा.

हे केवळ घराच्यावेळीच असं नाही पण मे महिन्याच्या सुट्टीत मी गावी असताना रात्रभर चक्कीवर गर्दी असायची. दुपारी घाण्यावर शेंगा मळायला आलेला माणूस संध्याकाळी परत जाता येईल या हिशोबाने चक्कीवर आलेला असायचा, पण मध्येच लाईट गेली की, खोळंबा व्हायचा मग अशी गिर्‍हाईके चक्कीवर बसून रहात… आयनल सारख्या खेड्यात कसल्या हॉटेलची सोय नाही.

मग तात्या घरी आले की, कोणाची शेंग मळायची आहे हे विचारून, लांबची म्हणजे चाफेड, माईण या गावातली माणसं आली असतील तर तात्यांना आयकलास. त्या माणसांका जेवक पाटवा, असा निरोप धाडत असे. मला आठवत आमच्याकडे कोल्हापूरचा एक वायरमन होता. तात्यांसारख्या माणसाला या वायरमनची सतत गरज पडे. आमच्या चक्कीची लाईट तरी अचानक जायची किंवा कसली ना कसली समस्या निर्माण व्हायची. हे वायरमन आले की, त्यांना आवडते म्हणून नंदाकाकी कुळदाची पिठी आणि भात हमखास बनवायची. असं कधी झालं नाही की, वायरमन आले आणि तिच्या हाताची पिठी-भात जेवून नाही गेले.

मार्च एप्रिल मे महिना म्हणजे काजीचा महिना. सकाळी तात्या आणि इतर कोण बाहेर पडायचे. त्यांच्या पाठोपाठ भाकरी भाजून, थोड्या भाकर्‍या बांधून घेऊन काकी काजीत निघायची. लोकांच्या नदरेक पडाच्या आधी काजी निवडूक व्हयो.असं म्हणत एकदा सकाळी काजीत गेली की, दुपारी घरी यायची. पुन्हा दुपारी काजीत गेली की, मग संध्याकाळी घरी यायची.
या दरम्यान मी किंवा कोणी मुंबईहून अजून कोण गावी गेलेलं असलं की, तिन्हीसांजा झाल्या की, घरात धूप घालत असत. काकी किंवा तात्या घरात आले की, काजीचा विशिष्ट दर्प नाकात जायचा. काकीचा चेहरा रापलेला असायचा, केस विस्कटलेले असायचे. अशाही अवस्थेत मला बाबू. आज काजीचा कालान करतंय. मला काजीची आमटी आवडते हे तिला माहीत असायचं. माझ्या वाटीत जास्तीचे काजू तिने टाकलेले असायचे.

एकदा काजू वाढून झाले की, मग माझ्या पत्नीला किंवा मुलीला बाबुक, न्हानपणापासून काजी आवाडतत. न्हानपनी तात्यांच्या पुढ्यातले काजी खायचो. माझं लहानपण तिला लक्षात होतं. मी किंवा माझे मित्र माझ्या गावी गेलो की, मांसाहारी असतील तर वडे-सागोती आणि शाकाहारी असतील तर घावने नाहीतर शेवया हे नक्कीच व्हायचे. कोणाचे कोण पाहुणे घरात आले की, त्याची बडदास्त कशी राहीलं याच्याकडे तिचं भारी लक्ष असायचं.

हल्ली काही वर्ष नंदाकाकीला बिपीचा त्रास होत होता, रक्तातली साखर वाढली होती. पण आराम कुठे होता. म्हणजे कोणी सांगत नव्हत काम कर. पण ती कुठे घरात शांत बसत होती. आज काजीत, उद्या कुणग्यात भजावळ, कुठेतरी कुनग्यातली भाजी काढते आहे. एका बाजूला गायींच्या पुढ्यात गवत टाकते आहे. पडवीतली लाकडं नीट ठेवते आहे. हे सगळं क्रमाक्रमाने चालू आहे. तब्येतीची कुरबुर चालू आहे

तरव्याचे दिवस. सोमवार दिनांक 6 जुलै 2020. सकाळी नंदाकाकी भाट्येत गेली..आता एवढी फाळी झाली की, लावणी झाली. संध्याकाळचे साडे सहा वाजले तरी काकी भाट्येत आहे. आजूबाजूला सतरा अठरा माणसं आमच्या कुणग्यात तरवा लावत आहेत. समीर भाट्येत गेला आये. या माणसांका कायतरी खावक कर. घरी येऊन काकीने सगळ्यांसाठी कांदेपोहे केले.सगळ्यांनी पोहे खाल्ले. सगळे घरी गेले. काकी घरी आली. सगळ्यांचे जेवण बनवले.

इकडून मुंबईवरून बाबांनी फोन केला. तात्यांना सांगितले कि मी 1 ऑगस्टला गावी येतो. चौदा दिवस बाहेर राहावं लागेल म्हणून वरच्या घराची साफसफाई करून ठेवतो असं तात्या बाबांना म्हणाले. तिकडे काकीने तोंडाची टकळी सुरु केली. आता मोटेबाब, बाई येतली. माझा शेयग्या ( माझी मुलगी श्रेया ) येताला. वरचा घर साफ करुक व्हया. असं म्हणत काकी झोपी गेली.

7 जुलै 2020 ची पहाट, मोबाईलवर बाळादादाचा फोन, फोन उचलला. बाळा म्हणाला, नंदाकाकी गेली. रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि खेळ संपला. बातमीवर कसा विश्वास ठेवायचा? काकीचं वय ते किती! अवघं अठ्ठावन. मुंबईला आम्ही सगळे अडकून पडलेलो. कुणालाही गावी जाता येणार नव्हतं. जिने अंगाखांद्यावर खेळवलं त्या नंदाकाकीचं अंतिमदर्शनदेखील घेता आलं नाही.

नंदाकाकी गेली म्हणजे नक्की काय गेलं? दोन पिढ्यांना जोडणारा मोठा दुवा नाहीसा झाला. मर्यादा सांभाळून समाजजीवनाशी कसं जोडून घेता येतं हे शिकवणारं चालतबोलतं माणूस गेलं. काकीने आमच्या पिढीला एकत्र ठेवलं. आपलं आणि परकं असा भेद न करता सगळ्यांसाठी सगळं करायची शिकवण दिली. आजीच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंब जवळपास एकोणचाळीस वर्षे एका छत्राखाली ठेवलं. आजही आपलेपणाने गावी जावेसे वाटते यात तिचा मोठा हात होता. गावची नाळ कायम जोडली गेली ती तिच्यामुळे.

मळणेत्सून सांचेक
घराक येताना
चुलतेच्या पावलाक
लागलेले
भाताचे गोटे
वळयपासून पाटल्यादारापर्यात
पसरायचे.

तीनसांजेक येणारी लक्ष्मी
अशीच असता
फुडल्यादारात्सून येवन
घरादारात
धन पेरणारी

ही कविता अशीच तिच्यासाठी लिहिली होती…..मंगळवारी काकी गेली. घरची लक्ष्मी गेली. राहून राहून दरवर्षी मे महिन्यात आमची सगळ्यांची वाट बघणारी गृहलक्ष्मी क्षणात नाहीशी झाली ती कायमची.