घरफिचर्ससारांश...म्हणून लोकशाही महत्वाची आहे

…म्हणून लोकशाही महत्वाची आहे

Subscribe

परिस्थिती बदलली की जगण्याचे सगळे संदर्भ बदलतात. इतर देशातील अराजकता पाहून आपण किती सुरक्षित आहोत याची जाणीव होते. आपल्या सुरक्षिततेची मुळे भूतकाळात दडलेली आहेत याचा प्रत्येकांना अभिमान वाटतो. आज अफगाणिस्तानकडे पाहून सर्वच लोकशाहीवादी देशांना स्वतःचा अभिमान वाटत असेल. तालिबान्यांनी एक एक प्रांत ताब्यात घेऊन संपूर्ण अफगाणिस्तानावर आपले वर्चस्व स्थापित केले. सर्वसामान्य लोकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली. नुकतीच घडी बसवलेले संसार उध्वस्त झाले. उद्योगपती, राजकीय पुढारी ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. त्यांनी इतर देशांमध्ये राहण्याचा पर्याय शोधला. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची अवस्था न सांगितलेली बरी...

बंदुकीच्या जोरावर हातात मिळवलेली सत्ता किती दिवस टिकेल माहीत नाही. पुन्हा उद्या नव्याने जनता बंड करू शकते ही जाणीव त्यांना असेलही. पण सद्य:परिस्थितीत त्या ठिकाणच्या महिलांची अवस्था काय आहे. हे वेगवेगळ्या बातम्यामधून दिसून येत आहे. तालिबानी जरी म्हणत असले की महिलांना आम्ही सत्तेत वाटा देऊ. पण फक्त नावापुरता वाटा महिलांना नको आहे. तिथल्या धर्मांध कायद्याच्या अंतर्गत राहूनच त्यांना जीवन व्यतीत करावं लागेल हेही तितकेच खरे….तिथल्या युवकांनी धमक्यांना बळी पडून बंदुकी हातात घेतल्या खर्‍या, पण भविष्य काय हे त्यांनाही माहीत नाही. हातात बंदूक घेऊन सत्ता चालवता येत नाही हे शहाणपण कोण आणि कुणाला सांगणार…? पण राज्य बंदुकीच्या जोरावर चालत नाही. उद्या त्यांच्यावरही कुणी बंदूक रोखू शकतो. एकूणच जगाच्या एका कोपर्‍यात अराजकता सुरू आहे….

अफगाणिस्तानच्या सद्य:स्थितीवर भाष्य करणारी कवयित्री नम्रता फलके यांची कविता सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

- Advertisement -

कैसी लगती होगी वे सड़कें
जहां औरतें बिल्कुल न दिखती हो..!
न रिक्शा के भीतर औरत
ना बाजार मैं औरतें !
न कुछ बेचती हुई
न कुछ खरीदती हुई
ना दुकान के काउंटर पे
ना बाजार भर किए इश्तेहार में
न भीड़ का हिस्सा
ना भीड़ में गुम हुई
ऐसी औरत जिसका अचानक से कुछ अता पता नहीं..
बस आदमी ही आदमी..!
घूमते हुए, चलते हुए, बेचते हुए
खरीदते हुए..
और कसबे.?
गतिहीन, अचेतन, असभ्य,
बेजान, बेसहारा..
रंगहीन, अनाकर्षक, हार्मोनलेस..
क्या सोचती होगी वह सड़कें
जिस पर चलने वाले पुरुष
अपना वजूद ही खो चुके हो..!
– नम्रता

या कवितेचा अर्थ तितकाच खोलवर दडलेला आहे. जितकी भीषण तिथली परिस्थिती…. चेतन अचेतन कुठल्याच भावना तिथे जिवंत नाहीत. फक्त क्रूरता जिथे चेहरा आहे फक्त हिंसेचा. भारतात ती अवस्था नाही म्हणून मूलभूत स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. लोकशाही किती मजबूत असावी याचे उदाहरण सध्यातरी भारत आहे. त्याच्या आडून जर कोणी काही गोष्टी करत असेल तर कायद्याचा धाकही आहे. त्या अनुषंगाने का होईना अफगाणिस्तानातील जे युवक तालिबान्यांना विरोध करत असतील त्यांची अवस्था काय असेल यावर चर्चा होत आहे.

- Advertisement -

आपण ज्या राज्यात राहतो. त्या राज्यातील सत्ता आणि त्या पदावर असणार्‍या व्यक्तीपेक्षा पदाची प्रतिष्ठा महत्त्वाची समजतो. अर्थात काहींना नेतृत्व आवडत नाही म्हणून टीका करतात. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता राजकारण एका वेगळ्याच दिशेने जात आहे असे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शाब्दिक शरसंधान साधले. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. ज्या भागात त्यांचा दौरा होता त्या ठिकाणी त्यांना घेराव घालण्यात आला. नंतर अटकही झाली. आणि सुटका झाल्यानंतर रीतसर पत्रकार परिषदही घेतली गेली. त्यांच्या पक्षातील लोकांनी तर विधानाचे समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस दाखवले. अर्थात तो राजकारणाचा भाग झाला.

पण मूळ मुद्दा हा आहे की, कार्यकर्ता म्हणून युवक ज्यावेळी रस्त्यावर उतरतो. त्यावेळी आमच्या नेत्याच्या विरोधात बोलणाराला आम्ही धडा शिकवणार म्हणून आंदोलन करतो. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे राहून घोषणाबाजी करतात. सय्यम सुटल्यावर हाणामारी होते. पोलीस कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना समजावून सांगतात. प्रसंगी कार्यकर्त्यावर लाठीहल्ला होतो. काहींना अटक होते, पण कार्यकर्त्यांना समजत नाही की, एकमेकांमध्ये मारामारी करून पोलिसांचा मार खाऊन आपण स्वतः मागे ओढले जात आहोत. सोशल मीडियावरच्या पोस्ट आणि स्टेटस पाहून अनेक गोष्टी समोर येतात की, एसीमध्ये बसून नेते हा सगळा प्रकार पाहतात. युवा कार्यकर्ते मात्र यात होरपळताना दिसतात. नेत्यांच्या पाठीमागे जाणारी भक्ती स्वतःच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी मारक आहे. आजच्या युवकांना हे जरी कळले तरी पुरे….

एकीकडे कोविडची परिस्थिती, येणारी तिसरी लाट, तसेच यातून सावरण्यासाठी प्रयत्न करणारे युवक पाहायला मिळतात. कोविडमुळे अनेकांना कळून चुकले की काहीही कायम राहत नाही. अनेकांचा रोजगार गेला, उद्योग बंद पडले. आणि जो ऑक्सिजन फुकट मिळत होता त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागले. हे सगळं भयावह आहे. जागतिक स्तरावर होणारा पर्यावरणाचा र्‍हास, अमेझॉन असेल किंवा वेगवेगळ्या देशात जंगलाला लागणारी आग, पशु, पक्षी, प्राणी, कीटक यांच्या पृथ्वीवरील संपुष्टात येणार्‍या प्रजाती, ही चिंता सध्या जगाला भेडसावत आहे. एकूणच आज पर्यावरण रक्षणासाठी आपण काही केले नाही तर उद्याची पिढी पृथ्वीवर मोकळा श्वास घेऊ शकणार नाही हे सत्य आहे. एकीकडे सोशल मीडियावर व्यस्त राहून जगाची चिंता व्यक्त करणारा युवक पाहायला मिळतो.

तर दुसरीकडे वास्तवाचे भान जपून पर्यावरण रक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट या छोट्याशा खेडेगावातून प्रणाली चिकटे नावाची तेवीस वर्षाची तरुणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात जाऊन पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती घडवून आणण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे 2020 च्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाकाळात देखील तिने आजपर्यंत दहा हजार किलोमीटरचा प्रवास फक्त सायकलवर आणि एकटीने केला. सायकल खराब झाली तर स्वतः दुरुस्त करून समोरचा प्रवास करणारी आणि लोकांना फक्त आणि फक्त पर्यावरण वाचवण्यासाठी सांगणारी ही तरुणी आजच्या सोशल मीडियावरील युवकांसाठी प्रेरणादायी आहे. ती सांगते आज असणारी परिस्थिती उद्या असेल माहीत नाही, पण पर्यावरण मात्र जिवंत ठेवलं पाहिजे. कारण उद्याच्या पिढीने पर्यावरणाचा र्‍हास होत असताना तुम्ही काय करत होतात…? हा प्रश्न केला तर उत्तर देता आले पाहिजे. अन्यथा निरुत्तरित व्यक्ती स्वतःला माफ करू शकत नाही. प्रणालीच्या कार्याला यानिमित्ताने सलाम.

आजूबाजूला सगळी नकारात्मकता असताना सकारात्मक दृष्टिकोनही असतो. त्यातून मार्ग सापडतो. आपण फक्त सकारात्मक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. पाया जवळचा विचार करून आजचा दिवस आनंदाने जगता येतो. पण भविष्याचा वेध असणार्‍यांना तसे जगता येत नाही….

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -