Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश 'Live-In' काटेरी वाट !

‘Live-In’ काटेरी वाट !

Subscribe

सध्या देशभरात गाजत असलेलं आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची अमानुष हत्या केल्याचं प्रकरण आता त्या दोघांपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून लिव्ह इनमध्ये राहणार्‍या किंवा राहू इच्छिणार्‍या सर्वांना विचार करायला लावणारं आहे. कारण या प्रकरणाने अशा तात्पुरत्या नातेसंबंधाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आजच्या पिढीला जरी लिव्ह इन हे सगळ्यात सेफ वाटत असलं तरी त्यातील अनेक खाचखळगे न भरता येण्यासारखे आहेत, ती काटेरी वाट आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. न्यायालयानेही अशा जोडप्यांसाठी काही कायदे केले आहेत. यामुळे अशा नातेसंबंधात राहणार्‍यांनी फक्त जबाबदारी टाळण्यासाठी असे संबंध कोणाशीही ठेऊ नयेत, तर समोरील व्यक्तीच्या भावनांचाही आदर करायला हवा.

वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला असून याप्रकरणी आरोपी आणि तिचा लिव्ह इन पार्टनर असलेला आफताब अमीन पूनावला याला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. श्रद्धाने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने १८ मे रोजी रागात तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते मेहरोली जंगलात फेकल्याची कबुली आफताबने दिली आहे. मात्र तिचे मुंडके नक्की कुठे फेकले हे त्याला आठवत नसल्याने दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कारण या मुंडक्यावरूनच सापडलेले शरीराचे अवयव हे श्रद्धाचेच असल्याचा सबळ पुरावा दिल्ली पोलीस न्यायालयात सादर करू शकणार आहेत. या घटनेमुळे पालकांच्या छातीतही धडकी भरली आहे. कारण ही घटना लग्नाच्या बंधनापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपला पसंती देणार्‍या स्वतंत्र विचारसरणी बाळगणार्‍या, नकार पचवता न येणार्‍या, सोशल मीडियावर गुडी गुडी दिसणारा जोडीदार निवडणार्‍या, स्वत:च्या पायावर उभे असलेल्या, आर्थिक स्वातंत्र्यात जगणार्‍या तरुणांच्या बोथट, संवेदनाहिन होत जाणार्‍या मानसिकतेशी थेट संबंधित आहे.

यामुळे श्रद्धाची हत्या तिच्या शरीराचे ३५ तुकडे आणि तिचे गायब असलेले मुंडके ही केवळ एक भयंकर घटना नसून बदलत्या समाजाचा हा एक कधीही न दिसलेला अघोरी भेसूर चेहरा आहे. कारण ज्याच्याबरोबर जगण्या मरण्यासाठी श्रद्धाने धर्माची, कुटुंबाची बंधने झुगारली होती त्यानेच तिची संपूर्ण प्लान आखत थंड डोक्याने घरातच गळा दाबून हत्या केली. नंतर तिच्या शरीराचे घरच्या बाथरुममध्ये बसून ३५ तुकडेही केले. त्यातील रक्त वाहून जावे म्हणून त्याने ते पाण्याने धुतले. नंतर पॉलिथीनच्या बॅगमध्ये हे तुकडे भरून त्याने ते फ्रिजमध्ये ठेवले. भयानक म्हणजे त्याने श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्याच पैशाने तिच्याच शरीराचे तुकडे ठेवण्यासाठी ३०० लिटरचा फ्रिज, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारा धारदार चाकू , पॉलिथीनच्या पिशव्या विकत घेतल्या.

- Advertisement -

तसेच हत्येचा मागसूमही लागू नये म्हणून बाथरुम, किचन, फ्रिज त्याने केमिकलने साफ करुन संपूर्ण घर स्वच्छ केले. अगरबत्ती, धूप जाळत त्याने मांसाची दुर्गंधी येऊ नये याची काळजी घेतली आणि कहर म्हणजे हे सर्व करताना त्याने डेटिंग अ‍ॅपवरून दुसर्‍या मैत्रिणीला बोलवून त्याच घरात तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. किती भयानक आहे हा घटनाक्रम. विशेष म्हणजे हे सगळं सहा महिन्याभऱापूर्वीच घडून गेलंय. आफताबनेच ही स्टोरी सांगितली आहे. सहा महिन्याचा हा काळ आफताबला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. पण असं का व्हावं हाच प्रश्न आहे. सहा महिन्यांपासून श्रद्धाची तिच्या घरातल्यांनी काहीच का दखल घेतली नाही. किंवा आफताबचे हे भयंकर रुप श्रद्धाला का कधीच कळले नाही. तिने आधीच स्वत:ची सुटका का करुन घेतली नाही?

त्या दोघांचे पटत नव्हते, त्यांच्यात वाद मारामार्‍या होत होत्या. पण तरीही दोघांच्या कुटुंबाने त्यात मध्यस्थी केली नाही. वालकर कुटुंबाची पोटच्या लेकीप्रती इतकी बेफिकीरी कशी काय असू शकते, असे एक ना अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत. श्रद्धा आणि आफताबच्या नात्याला तिच्याच नाही तर त्याच्या घरातूनही विरोध होता. यामुळे श्रद्धाला तिच्या आई वडिलांनी अनेकवेळा त्याच्याशी संबंध तोडण्यास सांगितले, पण तिने ऐकले नाही आणि त्यानेही ऐकले नाही. दोघांचा धर्म हे या विरोधामागचे कारण होते. पण इंग्रजाळलेल्या वातावरणात सिगारेट आणि मद्याचे पेले रिचवत पाश्चिमात्य विचारांना फॉलो करणार्‍या आजच्या या पिढीला जातीपातीच्या भिंती मान्य नाहीत. त्यातच आपले आईवडील हे जुनाट विचारांचे असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यात काहीच अर्थ नाही, यामुळेच श्रद्धा आणि आफताबने कधीच यावर मोकळपणाने आपल्या कुटुंबाशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला नाही. तोही सनकी तर तीही हट्टी. तिने तर कुटुंबीयांशी संबंधच तोडले.

- Advertisement -

यामुळेच दोघांनी कुटुंबाची धर्माची पर्वा न करता लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसात दोघे आनंदात होते. मात्र नंतर सगळं फिस्कटत गेलं. आफताबचे खरे रुप, अनेक मुलींशी त्याचे असलेले संबंध श्रद्धाला कळले. त्यावरून त्यांच्यातील वाद चिघळत गेला. तिने लग्नाचा हट्ट धरला. तर लिव्ह इनमध्ये लग्नाचा काय संबंध असा त्याचा प्रश्न. यामुळे श्रद्धा पुरती फसली. तिचे त्याच्यावर जीवापाड प्रेम. आज ना उद्या तो आपल्याशीच लग्न करणार हा तिचा विश्वास. पण तो भ्रमच ठरला. कारण बंधन नको असलेले स्वतंत्र विचारांचे लोक लिव्ह इनचा मार्ग निवडतात. मग श्रद्धाने आफताबला घातलेली लग्नाची गळ चुकीची ठरली आणि श्रद्धाला आपला जीव गमवावा लागला. आफताब रंगेल तर होताच, पण हे कळूनही श्रद्धा त्याच्याबरोबर का राहिली हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

त्यांचे लग्नही झालेले नव्हते, मग असे असताना तिने एवढे अगतिक होण्याचे कारण काय. श्रद्धा ही हल्लीच्या स्वतंत्र विचारांच्या पिढीचं प्रतिनिधित्व करत होती. कारण आजच्या पिढीचा ओढा हा बंधनापेक्षा स्वतंत्र राहण्याकडे आहे. त्यातूनच लिव्ह इन प्रकार आपल्याकडेही बर्‍यापैकी फोफावू लागला आहे. पटलं तर एकत्र राहायचं नाहीतर तु तुझ्या मार्गाला मी माझ्या या अटीवरच हल्लीची कपल्स लिव्ह इनमध्ये राहत आहेत. यामुळे पालकांपुढे बर्‍याचवेळा अशा संबंधाना इच्छा असो वा नसो परवानगी देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यात पालकांना बर्‍याचवेळा मनावर दगड ठेऊन काही निर्णयही घ्यावे लागत आहेत, पण मुलांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांच्याशी संबध तोडल्यास काय होऊ शकते हे श्रद्धा आणि आफताब प्रकरणावरून समजण्यासारखे आहे. जर श्रद्धाच्या पालकांनी तिच्याशी संबंध तोडले नसते तर कदाचित श्रद्धाला आफताबविरोधात लढण्यास किंवा त्याच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची हिंमत मिळाली असती. पण तसे झाले नाही. उलट कोणाचाही पाठिंबा नसल्याने श्रद्धा एकटी पडली. आईचेही निधन झाल्याने आणि वडिलांशी पटत नसल्याने श्रद्धाला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कोणीही आश्वासक वाटले नाही.

म्हणूनच आफताबच्या लाथा बुक्क्यांचा मार खात ती त्याच्याकडेच पडून राहिली. श्रद्धाच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल जे काही वाचलं आणि ऐकलं त्यावरून ती स्ट्राँग असल्याचेच समोर येत आहे. मग असे असताना ती आफताबपुढे इतकी कशी हतबल झाली, हा प्रश्न आहे. ज्या डेटींग अ‍ॅपवरून तीची ओळख आफताबबरोबर झाली. त्या अ‍ॅपवर असे अनेक तरुण तरुणी स्वत:चे फेक पोर्टल बनवून एकमेकांना डेटिंग करत असतात. मग हे ठाऊक असूनही हुशार असलेल्या श्रद्धाने आफताबबरोबर थेट लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय कसा काय घेतला असावा. हे तिलाच ठाऊक. केवळ बाह्यसौंदर्यं, आकर्षक बोलणं याला भुलून आज अनेक तरुण-तरुणी अशा संबंधात फसत आहेत. अय्याश असलेल्या आफताबने आतापर्यंत अशाच डेटिंग अ‍ॅपवरून वीस मुलींबरोबर संबंध ठेवले होते. त्याआधीही त्याचे अनेक मुलींबरोबर संबध असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून डेटिंग अ‍ॅप म्हणा किंवा इतर सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तींशी मैत्री करताना किती सावधानता बाळगायला हवी, ह्याचे भान प्रत्येकाला असायला हवे. हे येथे आवर्जुन सांगावेसे वाटते.

दरम्यान, सध्या देशभरात गाजत असलेलं हे प्रकरण आता श्रद्धा-आफताब पुरतचं मर्यादित राहिलेलं नसून लिव्ह इनमध्ये राहणार्‍या किंवा राहू इच्छिणार्‍यांसाठी महत्वाचे आहे. कारण या प्रकरणाने अशा तात्पुरत्या नातेसंबंधावरील विश्वासाहर्तेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आजच्या पिढीला जरी लिव्ह इन हे सगळ्यात सेफ वाटत असले तरी त्यातील अनेक खाचखळगे न भरता येण्यासारखे आहेत. न्यायालयानेही अशा जोडप्यांसाठी काही कायदे केले आहेत. यामुळे अशा नातेसंबंधात राहणार्‍यांनी फक्त जबाबदारी टाळण्यासाठी असे संबंध कोणाशीही ठेऊ नयेत, तर समोरील व्यक्तीच्या भावनांचाही आदर करायला हवा. नातेसंबंध हे धर्माने घातलेल्या बंधनातून आलेले असो किंवा मनाने त्यात भावनिक आणि शारीरिक गुंतवणूक ही येतेच. भारतासारख्या सांस्कृतिक पारंपरिक देशात लिव्ह इनमध्ये राहणे हे आव्हानच आहे. कारण आपल्याकडे ते स्वीकारार्ह नाही. मग अशावेळी तरुण-तरुणींनी जोडीदाराची निवड करताना डोळे आणि मेंदू दोन्ही उघडे ठेवायला हवेत. केवळ प्रेमाच्या धुंदीत असे नातेसंबंध ठेऊ नयेत.

कारण तुम्ही ज्या जोडीदाराची निवड करता त्याची तुम्हाला असलेली ओळख ही फक्त आभासी असू शकते. बर्‍याचवेळा अशा संबंधात व्यक्ती प्रत्यक्षात जशी नसते तसेच त्याचे व्यक्तीमत्व रंगवून सांगितले जाते. त्यामुळे मुलांनी अशा नात्यांची निवड करताना सावध राहावे. कारण हल्लीच्या मुलांना पैसे कमावण्याची अक्कल आपल्यापेक्षा जास्त असू शकते, पण खरे उन्हाळे आणि पावसाळे हे पालकांनीच बघितलेले असतात. यामुळे मुलांनी असे नातेसंबध ठेवण्याची तयारी दर्शवल्यास त्याला सरळ विरोध न करता त्याची चाचपणी करावी. कारण तुमचं मुलं एका वेगळ्या व्यक्तीबरोबर आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहत आहे. यामुळे त्याची पडताळणी पालकांनी करावी. त्यात जर काही आढळले तर ते नक्कीच मुलांना समजावून सांगावे. कदाचित त्यामुळे वेळीच सावध होऊन मुलाचे भविष्य तुम्ही वाचवू शकता. नाहीतर उगाच मनात राग धरून त्यांना इतकेही दूर करू नये की, त्यांना कठीण काळात तुम्हाला आवाज देणेही शक्य होणार नाही.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -