गृहपाठाचा कायापालट !

गृहपाठ म्हणून आपण जो विचार करतो तो सारा लेखन कौशल्याशी निगडित आहे. प्राथमिक स्तरावर देखील मुलांना आशयाच्या संदर्भाने सातत्याने प्रश्नोत्तरे लिहिण्यासाठी सक्ती केली जाते. त्यामुळे रोज तेच तेच काम करून विद्यार्थी एकतर कंटाळतात. त्यामुळे त्यांना ते काम नित्याचे होते त्यातून ते नकोसे होत जाते. या स्तरावर प्रत्येकवेळी नवे नवे करण्यासाठी ते प्रेरित असतात. त्यांना आव्हान हवे असते. मात्र आपले स्वाध्याय सारे पुस्तकाभोवती असल्याने काही दिवसांनी पुस्तक म्हणजे अभ्यास आणि शिक्षण म्हणजे अभ्यास ही धारणा पक्की होण्यास मदत होत जाते.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यानी निम्म प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याबाबत सूतोवाच केले आहे. त्यांनी त्या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे नमूद केले होते. मात्र गृहपाठ नाही म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता ढासळणार, विद्यार्थी अभ्यास कसे करणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय होणार? असे प्रश्नच उपस्थित करण्यात आले. खरेतर यापूर्वीच केंद्र सरकारने माजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील पहिली, दुसरीच्या वर्गासाठी गृहपाठ नाही असे सूतोवाच केले होते. प्राथमिक स्तरावर शिकणे महत्वाचे आहे. मात्र मुलाच्या शिकण्यापेक्षा परीक्षेतील मार्कांना अधिक महत्व आल्याने घोकंपट्टीवर अधिक भर दिला जातो.

परीक्षेच्या मार्कांवर शिक्षणाची गुणवत्ता मोजली जाते आहे. त्यामुळे शिक्षणाची घोकंपट्टीतून सुटका होत नाही. त्याचबरोबर गृहपाठाचे मोलही वाढताना दिसते आहे. शिक्षणाची प्रक्रिया गृहपाठ आणि परीक्षा केंद्रित होताना दिसते आहे. खरेतर तेच तेच काम करणे हा गृहपाठ असेल तर ते बंद करण्यास काय हरकत आहे? केवळ आणि केवळ पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे लिहिणे हाच गृहपाठ असणार असेल तर तो बंद करणे आणि त्याऐवजी कृतीयुक्त, आनंददायी आणि जीवनाभिमुख गृहपाठाचा विचार रूजविण्यासाठी तयारी दाखविण्याची गरज आहे.

शिक्षण हे आनंददायी असायला हवे असे सातत्याने बोलले जाते. खरेतर शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकण्याच्या प्रक्रियेलाच अनन्यसाधारण महत्व असायला हवे. मात्र आपले सारे शिक्षण हे परीक्षा केंद्रित झाले आहे. त्यामुळे शिकणे म्हणजे मुलांच्या आत जे काही सुप्तगुण दडले आहेत ते बाहेर काढणे आहे. त्यासाठी शिक्षणाच्या प्रक्रियेत सातत्याने विविध प्रकारच्या अध्ययन अनुभवाच्या रचना केल्या जात असतात. मात्र विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विचार न करता केवळ परीक्षेसाठी शिकणे घडत आहे. परीक्षा केंद्रित शिक्षण झाले की, अधिक मार्कांसाठी जे जे म्हणून काही करावे लागेल त्या वाटा निर्माण करण्यात येतात. जे काही करायचे ते परीक्षेतील मार्कासाठीच. शिकण्याचे मोल आपोआप हरवले जाते. गृहपाठाचे स्वरूपही परीक्षेच्या दृष्टीने निर्धारित करण्याकडे कल वाढत जातो. पालकांना आपल्या पाल्यांसाठी मार्क हवे आहेत. शाळांना चांगले निकाल हवे आहेत. त्यामुळे मुलांच्या सुप्तगुणांच्या विकासापेक्षाही परीक्षेच्या दृष्टीने घडविण्याचा विचार करण्यास प्राधान्य दिले जाते. गृहपाठ सर्वांना हवेच आहेत. गृहपाठ हे शिकण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असतात, मात्र गृहपाठाच्या प्राथमिक स्तरावरील स्वरूपात बदल करण्याची निंतात गरज आहे.

गृहपाठ म्हणून आपण जो विचार करतो तो सारा लेखन कौशल्याशी निगडित आहे. प्राथमिक स्तरावर देखील मुलांना आशयाच्या संदर्भाने सातत्याने प्रश्नोत्तरे लिहिण्यासाठी सक्ती केली जाते. त्यामुळे रोज तेच तेच काम करून विद्यार्थी एकतर कंटाळतात.त्यामुळे त्यांना ते काम नित्याचे होते त्यातून ते नकोसे होत जाते. या स्तरावर प्रत्येकवेळी नवे नवे करण्यासाठी ते प्रेरित असतात. त्यांना आव्हान हवे असते. मात्र आपले स्वाध्याय सारे पुस्तकाभोवती असल्याने काही दिवसांनी पुस्तक म्हणजे अभ्यास आणि शिक्षण म्हणजे अभ्यास ही धारणा पक्की होण्यास मदत होत जाते. जगण्यातील प्रत्येक अनुभव हे शिकणे असते या जाणिवेपासून विद्यार्थी दूर जातात. शिकणे आणि जगणे यातील फारकतीचे अंतर अधिक ठळक होत जाते. ही फारकतच अधिक धोकेदायक असते. मात्र आपल्याकडे ती स्पष्टपणे अधोरेखित होताना दिसते आहे. शिक्षण जीवनापासून तुटले की शिक्षणाचा रस हळूहळू कमी होत जातो.

निम्म प्राथमिक स्तरावर श्रवण, भाषण, वाचन, लेखन कौशल्यांचा विचार महत्वाचा आहे. या कौशल्यांच्या विकासाची जबाबदारी प्राथमिक स्तरावर पूर्ण झाली तर भविष्याच्या शिक्षणाची वाट अधिक सुलभ होते. त्यामुळे गृहपाठ अधिक कृतीशील आणि जीवनाभिमुख असण्याची गरज सातत्याने अधोरेखित करण्यात आली आहे. गृहपाठ करताना तणाव येणार नाही याची काळजी घेणे. त्याच बरोबर त्या करताना अधिक आनंद मिळेल याचा विचार करणे आवश्यक ठरतो. या स्तरावर विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्याचे आव्हान असते. त्यामुळे या स्तरावर पुस्तकातील आशय केंद्रित गृहपाठापेक्षा कृतीयुक्त गृहपाठाची गरज असते. जगण्याचे अनुभव शिक्षणात आले तर शिक्षण आणि जगणे अधिक समृध्द होण्यास मदत होईल. प्राथमिक स्तरावरील मुले घरातील आई, बाबा, आजी, आजोबा यांच्याशी त्यांचे अधिक घट्ट नाते असते.

घर हेच त्याचे विश्व असते. त्यामुळे आजी आजोबांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा. अर्थात या गप्पा अनौपचारिकच असायला हव्या असतात. त्यांचे बालपण, त्यांच्या काळातील शाळा, शेतीचे अनुभव असं बरच काही घडायला हवे असते. घरातील सुरू असणारा संवाद हाही गृहपाठ आहे. अगदी घरातील भाजी निवडणे, धान्य निवडणे, घरात झाडून घेणे, साफसफाई करणे, स्वयंपाक घरातील आई स्वयंपाक कशी करते त्याचे निरीक्षण करणे, ते निरीक्षण वर्गात तोंडी सांगणे. आजीने सांगितलेल्या गोष्टी, गाणी वर्गात सांगणे. भाज्यांची, धान्यांची नावे सांगणे. नाते ओळखणे आणि सागंणे, प्राणी, पक्षी यांचे निरीक्षण करणे. फळे, फुले, परिसरातील विविध वनस्पती पाहणे आणि त्यासंदर्भात गप्पा मारणे. विविध स्वरूपाच्या नकला करणे, अभिनय करणे. गावातील विविध स्थळांना भेटी, शेती, गोठा, वाचनालय, ग्रांमपंचायत, बँक, दूधसंस्था यांना भेटी हाही गृहपाठच आहे.

वर्तमानपत्र वाचने, आईच्या स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्यातील मसाल्यांच्या पदार्थांची नावे, त्यांचे रंग, त्यांची चव, त्यांचा स्पर्श, आकार, स्वरूप असे बरेच निरीक्षणाचे गृहपाठ करता येतील. बांधकाम कसे करतात, त्यासाठी कोणते साहित्य लागते ते सांगणे, मैदानावर खेळणे, खेळाचे नियम सांगता येणे, नवे खेळ शोधणे, त्यांचे नियम तयार करणे, मैदानावर गप्पा मारणे, चित्र काढणे, शाळेतील अनुभव घरी सांगणे आणि घरचे अनुभव शाळेत कथन करणे. आजीच्या बटव्यातील वस्तू व तिचे उपयोग सांगता येणे हे सारे गृहपाठच आहेत. आता या सार्‍या कृती करताना विद्यार्थ्यी प्रत्येकवेळी नवे काही शिकत असतो. विद्यार्थ्यांने रोज काय केले त्याची दैनंदिनी लिहिणे, स्वतःचे मत अभिव्यक्त करणे ते लिहिणे, सांगणे हाही गृहपाठच आहेत.

हे सारे करताना मुलांना ना कंटाळा येईल ना त्यांना अभ्यास केल्याचा भास होईल. या माध्यमातून अभ्यासाविषयीची असलेली मनातील भीती दूर होण्यास मदत होईल. राष्ट्रीय सर्वेक्षणात ८१ टक्के विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी भीती असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ५० टक्के विद्यार्थी अभ्यासाच्या तणावाखाली आहे हे विशेष. खरंतर प्राथमिक स्तरावर गृहपाठाच्या स्वरूपात बदल केले तर त्याचा ताण विद्यार्थ्यांवर येणार नाही. गृहपाठ म्हणजे अभ्यास ही धारणा कमी होऊन ती आनंदाने करण्याची कृती आहे हा विचार पेरण्यास मदत होईल. त्यामुळे गृहपाठ करणे हे अधिक आनंददायी होण्यास मदत होईल.आपल्या भोवतालमध्ये जे जे घडते आहे ते सारे शिक्षण असते हा विचार पेरला जाईल. त्यामुळे शिक्षण आणि जीवन यांचे हरवलेले नाते अधिक घट्ट होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या जीवन व्यवहारातील प्रत्येक गोष्ट म्हणजे शिक्षण आहे, हा विनोबांचा विचार या निमित्ताने दृढ झाल्यास परिवर्तनाची वाट चालण्यास मदत होईल.

आपल्या शिक्षणातील गुणवत्तेबद्दल सातत्याने बोलले जाते. त्यासाठीच्या बदलांकरता वेगवेगळ्या प्रयत्नाची गरज आहेच. बदल करावेच लागतील. त्या बदलाबद्दल फक्त अधिक गंभीरतेने बोलणे आणि पावले टाकणे महत्वाचे आहे. शेवटी मुलांच्या शिकण्यातील ताण आणि तणाव कमी केल्याशिवाय शिकणे आनंददायी होणार नाही. त्यादृष्टीने पारंपरिक गृहपाठ बंद करण्याच्या भूमिकेकडे पाहायला हवे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हाही परीक्षा नाही असाच सूर आळवला गेला होता. मात्र दहा बारा वर्षांनंतर काही प्रमाणात का होईना त्यामागील दृष्टिकोन आणि भूमिका काही प्रमाणात स्वीकारली गेली असल्याचे चित्र आहे.अर्थात शंभर टक्के यश त्यात आलेले नाही हे लक्षात घ्यायला हवे.

नवा विचार येताना शेकडो वर्षाच्या पंरपरेतील धारणेला धक्का बसणार आहेत. त्यातून विरोधी सूर आळवला जाणे शक्य आहे. त्यामुळे गृहपाठ बंद असे नाही तर गृहपाठाचे स्वरूप अधिक जीवनाभिमुख करणे आहे. गृहपाठाला जीवनाशी जोडणे आहे. विद्यार्थ्यांच्या मस्तकावरील ताण हटविणे असून शिक्षणाची प्रक्रिया अधिक आनंददायी करणे आहे. आपल्याला राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार येत्या २०२६ पर्यंत इयत्ता पहिली ते तिसरीतील प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत भाषिक संकल्पना आणि अंकिय साक्षरतेचा विचार रूजविण्याची भूमिका घेतली आहे. त्या साध्यतेकरता निश्चित काही पावले उचलावी लागतील. त्यादृष्टीने शिकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि परीक्षा केंद्रीत शिक्षण व्यवस्थेला अधिक जीवन अनुभवाशी जोडण्याचा विचार महत्वाचा आहे. त्यासाठी या बदलाकडे पाहण्याची गरज आहे.