घरफिचर्ससारांशकृषी पर्यटन आणि बांधावरील झाडे

कृषी पर्यटन आणि बांधावरील झाडे

Subscribe

पर्यटकांना कोणती शेती पाहायला आवडेल बरे? शहरातून पाच दहा किलोमीटर अंतर बाहेर आल्यानंतर शेती सुरू होते. मात्र त्या शेतीत पाहण्यासारखं काय असतं. पर्यटनात अशीच शेती पाहिली जाते, ज्यात काहीतरी नावीन्यपूर्ण आहे. तुमची शेती ही सेंद्रिय शेती असेल किंवा शेतीमध्ये पाणी वापरण्याची नावीन्यपूर्ण पद्धती वापरली असेल. तुमच्या शेतीत पिकांची, झाडांची निवड आणि रचना विशेष प्रकारे असेल तर तुमची शेती पाहण्यास प्राधान्य दिले जाते. कृषीपर्यटन वाढवायचे असेल तर ही नावीन्यपूर्णता असणे आवश्यक असते.

अलीकडे शहरातून शेती पाहायला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. शहरी लोक स्वतः व आपल्या मुलांना घेऊन शेतशिवार दाखविण्यासाठी, मोकळ्या निसर्गात वेळ घालविण्यासाठी खेडेगावात जातात. शेतीमधील पीक, शेती औजारे, शेती करण्याची पद्धती या गोष्टी आता पर्यटनाचे विषय बनत आहेत. मात्र कृषी पर्यटनाच्या नावाखाली सुरू झालेली सेंटर्स, ठिकाणे ही निव्वळ विरंगुळा केंद्र बनत आहेत. ही केंद्रे चमचमीत खायला मिळणारी हॉटेल्स यापेक्षा फारशा वेगळ्या भूमिका करीत नाहीत. तिथे म्हणायला एखादी बैलगाडी, एखादी बैल जोडी प्रदर्शनात मांडलेली असते. यामागील मूलभूत करणेही तसेच आहेत. शेतीला दुय्यमत्व देणारी देशाची धोरणे आणि त्यातून विस्कटलेली शेतीसंस्कृती. शेती ही संस्कृती म्हणून कधीच मोडकळीस आली आहे. व्यवसाय म्हणूनही ती आता तोट्याचे बनत आहे. मग कृषी पर्यटनात लोकांना दाखवायचं तरी काय?

पर्यटकांना कोणती शेती पाहायला आवडेल बरे? शहरातून पाच दहा किलोमीटर अंतर बाहेर आल्यानंतर शेती सुरु होते. मात्र त्या शेतीत पाहण्यासारखं काय असतं. पर्यटनात अशीच शेती पाहिली जाते, ज्यात काहीतरी नावीन्यपूर्ण आहे. तुमची शेती ही सेंद्रिय शेती असेल किंवा शेतीमध्ये पाणी वापरण्याची नावीन्यपूर्ण पद्धती वापरली असेल. तुमच्या शेतीत पिकांची, झाडांची निवड आणि रचना विशेष प्रकारे असेल तर तुमची शेती पाहण्यास प्राधान्य दिले जाते. कृषीपर्यटन वाढवायचे असेल तर ही नावीन्यपूर्णता असणे आवश्यक असते. मग शेती सेंद्रिय करायची असेल तर रासायनिक खते व किटकनाशके यांना पर्याय तर द्यायला हव्यात. नाही तर सेंद्रिय शेतीचा आग्रह हा निव्वळ पोकळ राहतो. सेंद्रिय शेती व शेती आधारित पर्यटनात वेगवेगळ्या झाडांचे महत्व खूप असते. हीच झाडे पर्यटनाची संधीदेखील वाढवतात.

- Advertisement -

झाडं आणि शेती यांचे नाते अतूट आहे. मानवाने जंगल काढून तिथे शेतीयोग्य जमीन बनवली. घनदाट जंगल परिसरात जंगली जनावरे यापासून शेतीला व माणसाला मोठा धोका होता. हा धोका पत्करून त्यांनी शेतीयोग्य जमीन तयार केली. मात्र शेतीमध्ये असलेले झाडाचे महत्व ओळखून शेतीत, बांधावर काही झाडे टिकवून ठेवणे, काही आवर्जून नव्याने लावणे हेही त्यांनी सुरू ठेवले. अलीकडे शेतीचे जसे वाटे होऊ लागले, तसे तसे शेती छोटी होऊ लागली. मोठे बांध, धुरे ही अधिकाधिक आकसू लागली. बांधावरील झाडे अनेकदा भांडणाचे कारण बनून तुटू लागली. भावकीत असलेली फळझाडे तर सर्वात आधी कटकटीचे विषय ठरून तोडली गेली. झाडाखाली पीक उठाव धरत नाही. झाडाखालची जमीन वाया जाते अशा कारणांनी काही झाडे गेली. मात्र झाडे तोडताना त्या झाडांच्या शेतीमधील वेगवेगळ्या भूमिका काय होत्या या गोष्टी आपण साफ विसरलो.

शेती बांधावरील झाडाशिवाय पूर्ण होतच नाही. अशी शेती क्वचितच आढळेल जिच्या बांधावर झाडे नाहीत. शेतीत गेल्यानंतर शेतकरी पहिल्यांदा शेतीत असलेल्या झाडाखाली जातो. सोबत नेलेलं भाकर, पाणी व इतर साहित्य झाडाखाली ठेऊन मगच शेतीतल्या पिकाकडे वळतो. शेतीच्या बांधावरील झाडे केवळ भाकर पाणी ठेवण्याचे ठिकाण इतकेच नसते तर शेती त्याच्या बांधावरील झाडं असतील तरच पूर्ण होते. वीस-तीस वर्षापूर्वीची शेतीमध्ये व शेतीच्या बांधावर कोणती झाडे होती? याचा नीट अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात येईल की ती शेतीमधील पीक पाणी यांच्याशी जवळीक साधणारी होती. अलीकडे शेतीमध्ये किंवा बांधावर लावलेली झाडे ही केंद्रीकृत पद्धतीने सामाजिक वनीकरण विभागाने निवडलेली असतात. त्यामध्ये शेतशिवार व शेतकरी कुटुंब यांचा विचार फारसा दिसत नाही.

- Advertisement -

शेतीच्या बांधावर एखादे काटेसावरीचे झाड असेल तर शेतीमध्ये पिकावरील किडीवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते. शेतीमधील किडी आणि काटेसावरीचे झाड याचा काय संबंध असेल बरे? काटेसावरीचे झाड हे एक खूप सुंदर फुलझाड आहे. जेव्हा फुलांचा बहर येतो तेव्हा खूप आकर्षक दिसतो. जवळपास वीसहून अधिक प्रकारचे पक्षी या झाडाकडे आकर्षित होतात. जेव्हा फुलांचा बहर नसतो तेव्हाही हे झाड पक्ष्यांसाठी एक आकर्षणाचे विषय असते. लवदार पाने, पसरट फांद्या हे पक्ष्यांना बसण्यासाठी व घरटी बांधण्यासाठी खूप उपयुक्त असतात. शेतशिवारातील पक्ष्यांकडे अनेकदा उपद्रव म्हणून पहिले गेले. मात्र शेतीतील कीड नियंत्रणासाठी पक्षी हे कोणत्याही किटकनाशकापेक्षा सरस ठरेल असेच असतात. जेव्हा पक्ष्यांची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात तेव्हा त्यांना त्यांची आई दिवसातून जवळपास पन्नासहून अधिक अळ्या भरवते. हे प्रमाण वेगवेगळ्या पक्ष्यात वेगवेगळे असते. मुद्दा असा आहे की, शेतशिवारात पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडे नसतील तर शेतीमधील किडींचे प्रमाण अधिक असेल. कृषीपर्यटनात रासायनिक शेती पाहण्यास कोणी उत्सुक नसते. त्यामुळे शिवारात, बांधावर, शेतीत पक्ष्यांना आकर्षित करतील अशी झाडे लावावीत. यामध्ये पळस, पांगारा, बहावा, काटेसावर, बोरी, बाभळी, हिवर अशी अनेक झाडे लावता येतील.

मधाचे पोळे आपल्या शिवारात किती आहेत त्यावरही आपल्या शेतीमधील पिकाचे उत्पन्न किती वाढेल हे अवलंबून असते. ज्या शिवारात मधमाश्यांची पोळी अधिक असतात, त्या शिवारातील शेतीचे उत्पन्न इतरांच्या तुलनेत अधिक असते. पाऊसपाणी, माती, हवामान हे सर्व घटक सारखेच पण एका शिवारात मधाची पोळी आहेत व एका शिवारात नाहीत. यामुळे पिकांच्या उत्पन्नात 20 टक्के ते 50 टक्के फरक पडू शकतो. अर्थात हे प्रत्येक पिकानुसार वेगवेगळे असते. माधमाश्या परागीभवनाचे काम खूप चांगल्या पद्धतीने करतात. ज्या पिकांमध्ये स्त्रीकेसर व पुंकेसर हे वेगवेगळ्या फुलामध्ये असते त्या पिकांना मधमाश्यांसारख्या बाह्य घटकांची परागीभवनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. यांचे परागीभवन वार्‍यामार्फत सहजपणे होऊ शकत नाही. यासाठी मधमाशी व त्यासारखे छोटे किटक, भुंगे यांची आवशकता असते. मधमाशाचे पोळे आपल्या शेतशिवारात हवे असल्यास कडुलिंब, ऐन किंवा सादडा, अर्जुन, आंबा, बेहडा किंवा घोटफळ, पळस, पांगारा, रिठा ही झाडे आवर्जून लावली पाहिजेत. मात्र अलीकडे वाढलेल्या मोठ्या प्रमाणातील किटकनाशकामुळे मधमाश्यांचे प्रमाण खूप घटले आहे. त्यामुळे झाडे लावण्याबरोबर यावरही नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

नत्र किंवा नायट्रोजन या मूलद्रव्याची कमतरता हा पिकांच्या वाढीतील एक महत्वपूर्ण अडथळा असतो. नायट्रोजनची कमतरता असेल तर पीक छोटे येते, पिकातील फळ, फूल धारणा कमी होते. त्यातून उत्पन्न कमी होते. यासाठी पीकपद्धतीमध्ये बदल किंवा मिश्र पिके घेण्याचा सल्ला दिला जातो. शेतीच्या बांधावर द्विदल प्रकारची झाडे असतील तर शेतीला आवश्यक असणारा नायट्रोजन सहज मिळू शकतो. आपटा, शिरीष, किनई, शमी किंवा सौदड, हिवर, खैर अशी झाडे जर बांधावर असतील तर या झाडांच्या मुळावरील गाठीमुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण स्थिर राहण्यात मदत होते.

या शिवाय ज्या झाडांना मोठ्या प्रमाणात पालवी फुटते, भरभर वाढतात, मोठ्याप्रमाणात पानगळ होते अशीही झाडे आपल्या शेतीच्या बांधावर असणे आवश्यक आहे. गुळभेंडी, बेहडा, ऐन, इत्यादी. ज्यातून हिरवळीचे खत बनवता येते.

शेतीतील उत्पन्न वाढविण्यासोबतच शेती हा पर्यटनाचा विषय बनवायचे असेल तर तामण, कदंब, काही आकर्षक बांबू प्रकार अशी झाडे शेतीत आवर्जून लावावीत. पर्यटकांना झाडाखाली विसावण्यासाठी काही डौलदार वाढणारी झाडे लावावीत. काही झाडे अशीही असावीत ज्यावर लहान मुलांना सहज चढता येईल. काही झाडे खाऊ देणारी पण असायला हवीत. या सगळ्या बाबींचा विचार करून शेतीत व बांधावर झाडे लावली तर शेती पर्यटनाला उपयुक्त ठरेल.

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -