घरफिचर्ससारांशशेतमाल वाहतुकीच्या समस्या

शेतमाल वाहतुकीच्या समस्या

Subscribe

शेती क्षेत्रात उत्पादित झालेला शेतमाल हा किरकोळ विक्री तसेच होलसेल विक्री किंवा प्रक्रिया उद्योग यासाठी विविध बाजारपेठांमध्ये किंवा इतर ठिकाणी पाठवावा लागतो. तसेच शेती मशागतीसाठी अनेक वस्तू आणताना त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आणाव्या लागतात. यावेळी शेतीच्या विकासात वाहतुकीची किंवा वाहतुकीच्या साधनांची भूमिका महत्त्वाची ठरते, परंतु आज भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील वाहतुकीच्या संदर्भात येणार्‍या अनेक अडचणी या कृषी विकासात अडसर ठरू पाहत आहेत.

-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

शेतीत विविध पिके घेताना सुरुवातीचा टप्पा म्हणजे बी-बियाणांची खरेदी करणे होय. खरेदी केलेले बी-बियाणे मोठ्या प्रमाणावर असेल तर हे बियाणे शेतीपर्यंत आणणे तसेच खतांच्या गोण्या खरेदी करून शेतीपर्यंत आणणे यासाठी वाहतुकीच्या चांगल्या सुविधांची आवश्यकता असते तसेच उत्पादित झालेला शेतमाल हा विविध बाजारपेठांमध्ये पोहचवणे आवश्यक असतो.

- Advertisement -

तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत तसेच अनेक प्रसंगी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतदेखील शेतीचा माल पाठवणे आवश्यक असते. राज्यात किंवा देशात अनेक ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग केंद्र अस्तित्वात आहेत. त्या ठिकाणी शेतीमाल पोहचवणे आवश्यक असतो. तसेच विशिष्ट पिकांसाठी विशिष्ट बाजारपेठ प्रसिद्ध असते. त्या बाजारापर्यंत शेतमालाची वाहतूक करणे आवश्यक आणि महत्त्वाचे असते. यासाठी वाहतुकीच्या चांगल्या आणि प्रगतशील सोयी असणे महत्त्वाचे आहे.

मोठ्या किंवा सधन शेतकर्‍याकडे शेतीसाठी उपयोगी पडणार्‍या वाहतुकीसाठी विविध वाहनांची उपलब्धता असते. त्यामुळे त्यांना येणार्‍या अडचणी त्या मानाने कमी किंवा मर्यादित असतात. शेती क्षेत्रात उत्पादित शेतमाल विविध बाजारपेठांपर्यंत पोहचवणे यासाठी वाहतुकीच्या चांगल्या सुविधांची आवश्यकता निर्माण होते. आज उत्पादित शेतमाल विविध शेतकरी दूरवरील अंतरापर्यंत पोहचवतात. त्यासाठी अंतरानुसार बैलगाडी, जीप, लहान गाड्या, ट्रॅक्टर, रेल्वेच्या मालवाहू गाड्या, खासगी वॅगन, जहाजे, विमाने इत्यादींच्या माध्यमातून शेतमाल एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवला जातो.

- Advertisement -

सर्वसाधारणपणे राज्यातल्या राज्यात किंवा आंतरराज्य पातळीवर शेतमालाची वाहतूक होत असताना वाहतुकीच्या साधनांमधील ट्रक, ट्रॅक्टर, रेल्वे यांचा वापर केला जातो. वाहतुकीची मोठी साधने आणि रेल्वे यांचा वापर भाडोत्री तत्त्वावर केला जातो तसेच जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये माल पोहचवत असताना लहान वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जातो. तसेच जीप, तीन चाकी किंवा पाच चाकी वाहने इत्यादी आवश्यक असतात.

शेतकर्‍यांकडे ही साधने नसतात. अशावेळी या पातळीवरदेखील ही वाहने भाडोत्री तत्त्वावर वापरावी लागतात. या वाहनांच्या भाड्यावरील खर्च बरेचदा मोठ्या प्रमाणावर येतो. अनेकदा भाड्यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक केली जाते. शेतकर्‍याला उत्पादित माल बाजारपेठेत घेऊन गेल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे वाढीव भाड्याचा विचार न करता त्यांना माल बाजारापर्यंत पोहचवावा लागतो. अशा प्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक केली जाते.

भारतातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा हा आजही अत्यंत सुमार आहे म्हणजेच खडकाळ खड्डे असणार्‍या रस्त्यांची ग्रामीण भागाला जणू देणगीच मिळाली आहे काय, असा प्रश्न पडतो. अशा रस्त्यावरून मालाची वाहतूक केल्यामुळे मालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. वाहतुकीचा वेळ वाढतो. नाशवंत माल त्वरित बाजारपेठेत न पोहचल्यास मालाचा दर्जा घसरतो. त्याचे मूल्य कमी होते. शेतकर्‍यांना नफा कमी होतो. अनेकदा त्यांचा उत्पादन खर्चही भरून येणे दुरापास्त होते. अशावेळी शेतमालाचे उत्पादन चांगले येऊन त्यांचे आर्थिक फायद्यात रूपांतर होताना दिसत नाही.

उदा. टोमॅटो, स्ट्रॉबेरी, विविध भाजीपाला पिके इत्यादी अशा नाशवंत शेतमालाच्या बाबतीत कालावधीनुसार शेतमालाचा दर्जा बदलतो. ही गोष्ट वाहतुकीमध्ये खास सांभाळावी लागते. रस्त्याच्या हीन दर्जाचा त्रास होतो तो पावसाळ्यात. खडकाळ आणि खड्डे असलेल्या रस्त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही. अनेक अपघात घडतात. वाहनांचा दर्जाही चांगला नसतो. त्यामुळे वाहन पंचर होणे, फेल होणे, अनेक कारणांनी बंद पडणे असे प्रकार होतात. वाहन अपघातग्रस्त झाल्यामुळे शेतीमाल रस्त्यावर सांडतो. वाहतुकीत माल अडकल्याने मालाचा दर्जा ढासळतो. लांब अंतरावरील वाहतुकीला वेळ खूपच महत्त्वाची ठरते. त्यामुळे शेतमालाचा दर्जा कमी होऊन नुकसान होते.

आजचे चांगले रस्ते टोलमुळे विशेष चर्चेत येतात. या टोल असणार्‍या रस्त्यांवरील शेतमालाची वाहतूक होताना या शेतमालासाठी शासनाने टोलमाफी द्यावी. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांना हा थोडाफार दिलासा निर्माण होईल. शेतमालाच्या राष्ट्रीय पातळीवरील वाहतुकीसाठी अनेकदा रेल्वेच्या खास वॅगन सरकारने भारतात सुरू केल्या. त्या काही दिवस चालल्या, परंतु शेतकर्‍यांचा या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने कालांतराने सरकारला बंद कराव्या लागल्या.

शासनाने फक्त शेतीमालाच्या वाहतुकीच्या उद्देशाने काही खास वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता ग्रामीण भागात करून देणे आवश्यक आहे. गावपातळीपर्यंत रस्त्याचा दर्जा सुधारणे महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांनी शासकीय प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे तसेच शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेतील अतिमहत्त्वाचा भाग आहे हे राज्यकर्त्यांच्या वागणुकीतून दिसून येणे महत्त्वाचे आहे.

-(लेखक कृषितज्ज्ञ आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -