घरफिचर्ससारांशकृषिप्रधान शोकांतिका

कृषिप्रधान शोकांतिका

Subscribe

दलाल, मध्यस्थ, व्यापारी यंत्रणा किंवा पूर्वीच्या काळी राजेशाही, या व्यवस्था शेतकर्‍याची लूट करत आल्या आहेत. हे सगळंच आपण ऐकत, वाचत आणि अनुभवतही आलो आहोत. शेती व्यवस्थेच्या संबंधानं काम करणार्‍या सर्वच विचारवंतांनी, नेत्यांनी हीच मांडणी पुन्हा पुन्हा केली आहे. यात मांडणी आणि शेतकरी या दोन्हीही गोष्टी त्याच एकसारख्याच आहेत. जो उपेक्षित आहे, शोषित आहे. तो हजारो, शेकडो वर्षे तसाच का? तो बदलत का नाही? त्याची स्थिती, त्याचं चित्र बदलत का नाही? ते कोण बदलणार आहे? हे शोषण, ही अडवणूक थांबणार तरी कधी?

उकल
शेती कुठून कुणीकडे?
खूप लिहून झालं
खूप बोलूनही झालं यंदा
पण आमच्या आतड्याचा पीळ
कुणी मोकळा केला नाही..

अशा आशयाची कवी प्रकाश होळकर यांची एक कविता आहे. गेले काही दिवस देशभर चर्चेत असलेली कृषि विधेयके व त्यावरुन सुरु असलेला गदारोळ थांबायला तयार नाही. मूळ शेती व्यवस्थेकडे किंवा शेतीच्या मूळ दुखण्याकडे कुणाचेच लक्ष जात नाही हे खरं दुर्दैव आहे. शेती करणार्‍या शेतकर्‍यासहीत सर्व घटकांचे याकडे लक्ष जाईल तेव्हाच हा पीळ मोकळा होण्यास खर्‍या अर्थाने सुरुवात होईल. त्यासाठी शेतीच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय वा सामाजिक दृष्टीने बघून भागणार नाही. जगाच्या शेतीतील बदल डोळसपणे टिपण्याबरोबरच याकडे शास्त्रज्ञाच्या नजरेतून संपूर्ण शास्त्रशुध्द दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे व तसा कृती कार्यक्रम ठरवला पाहिजे. या सदरातून आपण शेतीची याच अंगाने चर्चा करण्यावर भर देणार आहोत.

- Advertisement -

तोट्यातील शेतीची कारणे
आपली शेती तोट्यात आहे. सातत्याने तोट्यात आहे. हे आजच्या शेतीचं स्वरुप आहे. हे शेतकर्‍यापासून ते अर्थतज्ज्ञांपर्यंत सगळे मान्य करतात. मात्र हा तोटा होतो. म्हणजे नेमकं काय होतं? हा तोटा असा सतत का होतो? निसर्गाच्या नियमाप्रमाणे एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता जर शेतीत आहे. म्हणजे हजारपट व्हॅल्यूएशन किंवा मल्टिप्लिकेशन यात होतं, तर शेतीत तोटा होतोच कसा? हे सूत्र नेमकं काय आहे? हे समजून घ्यायला पाहिजे. तोटा होतो म्हणजे नेमकं काय होतं? शेतकर्‍याची लूट होते म्हणून तोटा होतो का? मग ही लूट कोण करतं? दलाल, मध्यस्थ, व्यापारी यंत्रणा किंवा पूर्वीच्या काळी राजेशाही, या व्यवस्था लूट करत आल्या आहेत. हे सगळंच आपण ऐकत, वाचत आणि अनुभवतही आलो आहोत. शेती व्यवस्थेच्या संबंधानं काम करणार्‍या सर्वच विचारवंतांनी, नेत्यांनी हीच मांडणी पुन्हा पुन्हा केली आहे. यात मांडणी आणि शेतकरी या दोन्हीही गोष्टी त्याच एकसारख्याच आहेत. जो उपेक्षित आहे, शोषित आहे. तो हजारो, शेकडो वर्षे तसाच का? तो बदलत का नाही? त्याची स्थिती, त्याचं चित्र बदलत का नाही? ते कोण बदलणार आहे? हे शोषण, ही अडवणूक थांबणार तरी कधी?

बाह्य आणि अंतर्गत कारणे
शेतकर्‍याच्या शोषणाची, पिळवणुकीची बाह्य कारणं जशी आहेत, तशी अंतर्गत कारणंही आहेत. आपले प्रश्न नेमके काय आहेत? आपलं शोषण नेमकं, कोण आणि कसं करतं. हे शेतकर्‍याला समजतच नाहीय. त्याच्या आतमध्ये जी मानसिकता आहे. त्याची जी मनोवृत्ती आहे. त्याचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा एक महत्वाचा भाग आहे. याबद्दल फारशी चर्चा होतानाच दिसत नाही.

- Advertisement -

मी शेती का करतो?
आज जर ही मानसिकता पाहिली तर काय दिसतय. मूळात पहिला प्रश्न असा की मी शेती का करतो? तर घरी पूर्वपरंपरांगत, वाडवडिलांपासून चालत आलेला व्यवसाय म्हणून?, दुसरा कुठलाच पर्याय नाही म्हणून? यालाही व्यवसाय म्हणण्यापेक्षा ही आपली संस्कृती आहे. जमीन आहे, पाऊस येतो, मग ती पेरलीच पाहिजे. मागची पिढी करीत आली आहे. हेच आपलं भागधेय आहे. दैव आहे. ही मांडणी केली जाते. किंवा पोटपाणी भरण्यासाठी दुसरं काहीच साधन नाही. म्हणून नाईलाज म्हणून हे करतोय. ही उत्तरे दिली जातात. या पारंपारिक विचाराच्या पलीकडे जाऊन आता विचार करण्याची गरज आहे. या उलट जी गोष्ट मला परवडतच नाही ती गोष्ट मी केलीच पाहिजे का? असा तर कोणत्याही सरकारने नियम केलेला नाही की अमूक व्यक्तीने शेतीच करायची. अमूक एका व्यक्तीनेच शिक्षक व्हायचे. अमूक एकानेच वकील व्हायचे. असा तर कुठलाच कायदाही नाही. आपल्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला व्यवसाय निवडण्याचं व त्याला जे योग्य वाटेल त्या प्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य आहे.

अर्थव्यवस्थेचा कणा
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपला देश कृषिप्रधान आहे. अशी गोंडस मांडणी करुन आपण आपली समजूत करुन पुन्हा स्वत:ला भासमय जगात झाकून घेतो. हे फक्त आपल्याकडेच आहे का? जगात असं दुसरीकडे कुठे नाहीय का? तर ही परिस्थिती सगळीकडेच आहे. आज प्रगत व विकसित म्हणविल्या जाणार्‍या देशात काही शतकांपूर्वी हेच चित्र होतं. चारशे वर्षापूर्वी सगळं जग हे पूर्णपणे कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेलं होतं.

जग बदलले. आपण का बदललो नाही?
कृषिक्रांतीचा काळ हा जगात सारखाच होता. तो भारतात वेगळा आणि युरोपात वेगळा असा काहीच नव्हता. त्यानंतर जगातील अनेक देशांनी काही बदल केले. काही बदल स्वीकारले. युरोप, अमेरिका खंडात शेती करणारे 80 टक्क्यांवरुन 3 ते 4 टक्क्यांवर का आणि कसे आले? बहुतांश लोक शेतीबाह्य इतर व्यवसायात कसे स्थिरावले, याबाबतही विचारमंथन होणं गरजेचं आहे. बाहेर विचारवंत त्यांच्या पध्दतीने हा विषय मांडत राहतात. मात्र हा विषय शेतकरी म्हणून आपण प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे. शेतीतील समस्यांची कारणे जितकी बाह्य स्वरुपाची आहेत. त्याहून जास्त ती अंतर्गत स्वरुपाची आहेत. हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोन हाच पर्याय
शेतीचे प्रश्न केवळ सामाजिक, राजकीय चष्मा घालून सुटणार नाहीत. त्यासाठी शास्त्रशुध्द विचारच लागणार आहेत. वैज्ञानिक ज्या प्रमाणे शिस्तबध्द प्रायोगिक मांडणी करुन प्रश्नाच्या मूळापर्यंत जातात. त्याच पध्दतीने शेतीतील समस्यांचे मूळ समजून घ्यावे लागणार आहे. जेव्हा मूळ सापडतं. नेमकं कारण सापडतं. तेव्हा जटिल प्रश्नही सोपा वाटायला लागतो. आज आपण पाहतो बर्‍याच शोधांनी जगाचं चित्र बदलण्याचं काम केलं आहे. असे काही शोध परिस्थितीचं चित्र आमुलाग्र बदलून टाकतात.

उदाहरणार्थ आपण थोडं दोनशे-अडीचशे वर्षे मागे जाऊ या. त्या काळात कुणीच टेलिव्हिजन ही कल्पनाही केलेली नसेल, किंवा भविष्यात असं काही घडू शकेल. असा विचारही केला नसेल. रेडीओ, स्वयंचलित वाहने या कल्पना त्याकाळी दैवी कल्पना वाटल्या असतील. नंतरच्या काळात टीव्हीपासून ते मोबाईलपर्यंत जगाचं चित्र अशा शोधांनी बदललं. असे कितीतरी मानवी बुध्दिमत्तेचे अफाट, अचाट प्रयोग येत्या काळात सबंध मानवी जीवन बदलणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान असं चारही बाजूनं आपल्या जगण्याचा भाग झालेलं असतानाही शेतीचे प्रश्न, शेतीच्या समस्या वर्षानुवर्षे त्याच त्याच का आहेत? या समस्यांच्या मुळाशी जाण्यासाठी हे विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला वापरता येणार नाही का?

अभिमन्यूप्रमाणे शेतकरी लुटीच्या शेती अर्थव्यवस्थेच्या चक्रव्युहात अडकत गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्याची स्थिती, त्याची कारणं या विषयीची मांडणी खूप झालीय. आज गरज आहे ती या चक्राव्युहातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा मांडणीची आणि त्याच बरोबर ठोस कृतीशील कार्यक्रमाची. अशा मांडणीतून आलेला कृतीकार्यक्रमच पुढील वाटचालीसाठी उपयोगाचा ठरणार आहे..

– ज्ञानेश उगले, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -