घरफिचर्ससारांशमानवी हव्यासाचा शेतीला फटका!

मानवी हव्यासाचा शेतीला फटका!

Subscribe

यापूर्वीही अनेक वेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक परिस्थितीमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमान वाढ ही पूर्णत: मानवनिर्मित असून (भौतिक सुखाच्या हव्यासापोटी) मुख्यत्वे हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे. त्याचा फटका मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेल्या शेतीला बसत आहे.

–सुनील मालुसरे

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ झालेली आहे. नेहमी सरासरी असलेल्या तापमानात म्हणजे १९ व्या शतकाच्या तुलनेत आज जगभरातील तापमान १.२ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. ही वाढ २१ व्या शतकापर्यंत १.५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ नये याची खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे.

- Advertisement -

जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून सतत वातावरणात होणार्‍या बदलांच्या परिणामस्वरूप हवामानातील चढउतार आणि अनिश्चित व अवेळी होणारे पर्जन्यमान यामुळे भारतीय शेती अस्थिर होत असून त्यामुळे आपली अन्न सुरक्षाही धोक्यात आली आहे. आता एका शाश्वत विकासाच्या दृष्टीने धोरणे आखली गेली असली तरीही त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव दिसण्यास दीर्घ काळ जाईल. मधल्या काळात पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी शेतकर्‍यांना लहरी वरुणराजाबरोबर (अवकाळी पाऊस) दोन हात करीत गरिबी, कुपोषण, कर्ज आणि अशिक्षितपणा यांसह इतर आव्हानांनाही सामोरे जावे लागेल.

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या (आयआयटी बॉम्बे) संशोधकांनी आपल्या एका नवीन अभ्यास प्रकल्पामध्ये सामाजिक व पायाभूत अडथळ्यांसह शेतकरी हवामानातील बदलाशी कसे जुळवून घेतात या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. हवामान बदलामुळे होणार्‍या संभाव्य धूसर भविष्यापासून भारतीय शेती सुरक्षित राहण्यासाठी त्यांची निरीक्षणे कृषीविषयक सरकारी धोरणनिश्चितीसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.

- Advertisement -

अभ्यासकांनी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेती करणार्‍या कुटुंबांचे सर्वेक्षण करून पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याकरिता त्यांनी वापरलेल्या निरनिराळ्या पर्यायांचा आढावा घेतला. गेल्या काही वर्षांत राज्यातील या भागांना खराब हवामानाचा सर्वाधिक फटका बसला असून जोडीला ढासळत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे या भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

असे जरी असले तरी दुसर्‍या बाजूला भारतीय शेती ही सर्व प्रकारच्या बदलत्या हवामानामध्ये तग धरून राहू शकते अशी भौगोलिक परिस्थिती व वातावरणाची विविधता आहे. त्यामुळे विविध प्रकारची पिके घेण्यास आपण सक्षम आहोत. त्यामुळेच आपला देश मसाले, कडधान्ये, चहा, काजू आणि ताग पिकांमध्ये अव्वल, तर तांदूळ, गहू, तेलबिया, फळे आणि हिरव्या भाज्या, ऊस आणि कापूस यामध्ये दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. एवढे सर्व असतानाही इतर देशांच्या तुलनेत देशातील अनेक पिकांची सरासरी उत्पादकता खूपच कमी का, हा प्रश्न आहे.

येणार्‍या काळात देशाची लोकसंख्या जगातील नंबर एकवर येण्याची चिन्हे आहेत. या सर्व लोकसंख्येला अन्नधान्य पुरवणे ही एक मोठी समस्या असणार आहे. या भविष्यकालीन समस्यांचा विचार करता भारतीय शेतकरी सन्मानजनक आर्थिक उत्पन्न मिळवेल अशा स्थितीत असायला हवा होता, मात्र अलीकडे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात आणि शेतमालाच्या उत्पादनात घसरण होताना दिसून येते. स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत कृषी क्षेत्रात धोरणात्मक वाटचाल आणि नियोजन केल्यानंतरही बहुसंख्य शेतकरी वर्ग विविध अडथळे आणि समस्यांनी ग्रासलेला आहे. अद्यापही शेतकरी वर्ग शाश्वत शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न मिळण्याच्या धोरणाची वाट पाहत आहेत.

भारतीय शेतीमधील प्रमुख काही अडथळे-समस्या नोंदवायच्या झाल्यास कोणत्या? प्रामुख्याने ६ अडथळे दिसून येतात.
१) कृषी जणगणनेनुसार एकूण शेतकर्‍यांपैकी ८५ टक्के शेतकरी हे २ हेक्टरपेक्षा कमी जमीनधारणा असलेले शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांना आपण अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतो.
२) बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असतानाही त्यांचा शेती हाच उदरनिर्वाहाचा प्राथमिक स्त्रोत बनलेला आहे. त्यामुळे हेच अल्पभूधारक शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बनले आहेत.
३) शेतकरी वर्ग हा असंघटित असणे. शिवाय उत्पन्न अगदीच काठावरील असल्याने कृषी खत खरेदीच्या अनेक पातळ्यांवर मर्यादा येत आहेत.
४) कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा कमी वापर, यांत्रिकीकरण आणि खराब उत्पादकता यामुळे शेतकरी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न वाढीवर मर्यादा येऊ लागल्या आहेत.
५) विकसित देशाच्या तुलनेत आपल्याकडे अत्यंत कमी मूल्यवर्धन आणि शेतमाल प्रकिया उद्योग नगण्य आहेत.
६) शेतीच्या खराब पायाभूत सुविधा आहेतच. शिवाय शेतमाल विक्री व्यवस्था ही मागणी आणि पुरवठा साखळीवर अवलंबून आहे.

या मूलभूत समस्यांना भारतीय शेतकरी सामोरे जात आहे. ह्या समस्या-अडथळे जर पार करावयाचे असतील, तर अल्पभूधारक शेतकर्‍यांना संस्थात्मक आणि संघटनात्मक (सहकार तत्त्वावरील कंपन्या) उत्पादन प्रकिया-उद्योग आणि विक्री मूल्यसाखळी व्यवस्थेत स्थान द्यावे लागेल. तसेच प्राथमिक आणि दुय्यम प्रकिया उद्योग, पुरवठा साखळी, संसाधने, कृषी पायाभूत सुविधा, जोडव्यवसाय या प्रकियेत स्थान देऊन सर्व पातळ्यांवर पारदर्शकता आणावी लागेल. याशिवाय विक्री व्यवस्थेतील मध्यस्थी, व्यापारी हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. तेव्हा ते कमी करावे लागतील. बदलत्या हवामानात नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरण संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.

याबरोबरच शेतीचे एक पर्यावरण असते ते पण व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे. जमीन, हवा, पाणी, तिथल्या वनस्पती, किटक अशा अनेक गोष्टींचा संबंध शेती आणि त्यातून उत्पादित होणार्‍या उत्पन्न आणि दीर्घकालीन शेतजमिनीशी येत असतो. पर्यावरण राखले तर त्याचा दीर्घकालीन फायदा दिसून येतो.

जमिनीच्या पर्यावरणाविषयी…
आपल्याकडे साधारणपणे शेतीच्या जमिनीचे तीन प्रकार पडतात. त्यात हलकी, मध्यम, भारी, ढोबळमानाने तसे जमिनीचे आठ प्रकार काळी माती, लाल माती, रेताड/वाळू मिश्रित माती, पांढरी माती व खडकाळ माती असे आणखी प्रकार आहेत. कोणते पीक घ्यायचे हे जमिनीचा पोत म्हणजेच प्रकार पाहून त्याचबरोबर जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश या घटकांचे प्रमाण तपासून कोणती मात्रा दिली पाहिजे, मातीचे परीक्षण करून कोणतं खत वापरावे हे ठरवायला पाहिजे, मात्र अजूनही आपल्या देशात फक्त ५ टक्के शेतकरी माती परीक्षण करतात. वास्तविक एकदा परीक्षण करून चालत नाही. दोन-तीन वर्षांतून एकदा परीक्षण करून खते वापरली पाहिजेत. रासायनिक खतांचा वापर कमी करावा व सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते वापरली जातात. सेंद्रिय खते ही नैसर्गिक खते असतात. ती जैवविनाशी घटकांपासून तयार झालेली असतात. परंपरागत शेती पद्धतीत सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. हल्ली शेतमालाच्या उत्पादन वाढीसाठी सर्रास रसायनांचा वापर असलेल्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. आधुनिक शेतीत या खतांचा भरपूर प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होत आहेत. पिकांसाठी वापरलेल्या एकूण खतांपैकी ६० टक्के भाग रोपांकडून शोषला जातो. उरलेला ४० टक्के जमिनीत तसाच राहतो. नंतर तो आजूबाजूला असलेल्या डबकी, तळी, नद्या यांच्या पाण्यात मिसळतो. पाण्यात मिसळलेल्या रासायनिक खतांमुळे शेवाळ्याची वाढ वेगाने होते. त्या शेवाळ्यामुळे उत्पादित झालेल्या विषारी द्रव्यांमुळे मासे मरतात व माणसांनादेखील आजार होतात. काही भागातील जमिनीखालील पाण्यात या खतांची विषारी द्रव्ये मिसळतात. असे प्रदूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्यास धोका संभवतो. या खतांमुळे नायट्रोजन वायू बाहेर पडतो. त्यामुळे धातूजन्य विषारी द्रव्यांचा हवेत फैलाव होतो. जमिनीत साचलेली खते हवेत पसरतात व हवा प्रदूषित होऊ शकते.

शेतातील पिकांवर पडणार्‍या काही घातक किडी व कीटकांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात. काही वेळा शेतातील कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबर वाहून झरे व तळ्यांच्या पाण्यात मिसळतात. अशा प्रदूषित पाण्याचा वापर केल्यास ते लोकांना घातक ठरू शकते. कीटकनाशके माणसांच्या त्वचेतून, डोळ्यांतून किंवा नाकातोंडातून शरीरात प्रवेश करू शकतात. त्यांच्यामुळे डोळ्यांची जळजळ व इतर दृष्टिविकार होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ त्यांच्या सान्निध्यात राहणार्‍या लोकांना थकवा येणे, वेदना होणे व चक्कर येणे असे विकार होऊ शकतात. ती इतर प्राणी व सजीवांसाठीदेखील धोकादायक ठरतात. ती तळ्याच्या व नदीच्या पाण्यात मिसळल्यास त्यातील मासे मरतात. शेतीला उपयुक्त असलेली गांडुळेदेखील त्यांच्यामुळे मरतात. पर्यावरण मग ते नागरी विभागाचे असो अथवा ग्रामीण भागाचे दोन्ही विभागांत याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, अन्यथा आपण विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत याचे भान ठेवून सर्व माध्यमांतून जनजागरण मोहीम राबविण्यात आली पाहिजे.

–(लेखक कृषी अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -