AI Technology : एआय!

Subscribe

नवलकरांना एआयची चिंता आहे. ते मात्र पश्चिमेकडून आलंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हळूहळू सगळीकडे घुसतय. कोणतीही नवी गोष्ट फायदे आणि तोटे घेऊनच येते. चहात टॅनिन नावाचे (लेनिन, स्टॅलिन, इ. सारखं वाटलं तरी ते रशियन नाही बरं) विष असते, असं सांगितलं जात असे. नवलकर परवा पेपर घेऊन मला दाखवायला आले, हे बघा, आता तरी माझं म्हणणं पटेल तुम्हाला! पेपरात लेख होता, एआयपासून मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका.

-अरविंद खानोलकर

दादा कोंडके त्यांच्या चित्रपटांत एआयला घाबरायचे. तिचा पदर बोटाभोवती गुंडाळत तिला मस्का मारायचे. आमचे नवलकर सध्या एआयलाच घाबरलेत, पण आय म्हणजे आई नव्हे. आईला ते मदर म्हणतात. अगदी ब्रिटिश राज्य करत होते तेव्हापासून त्यांचे पूर्वज आईला मदर आणि बापाला फादर म्हणत आलेत. कोणाला कधी त्यात चूक पण वाटली नाही.

कारण मदर आणि फादरचा अर्थ समजण्याएवढं इंग्रजी सर्वांना येत होतं. आतातरी आईला आई किंवा आय फार थोडीच मराठी माणसं बोलतात. मॅाम, मम्मी, मम्मा किंवा चक्क माली, नली अशी हाक मारतात. जणू आईच्या बारशाच्या घुगर्‍या खाल्ल्या मुलाने. आमच्या सोसायटीतले प्राध्यापक हवालदार नवलकरांना म्हणतात, तुम्ही आईबाबांना खुश्शाल मदर, फादर बोला.

कोणी जर तुम्हाला म्हणाला की हे इंग्रजी आहे तर त्याला ठासून सांगा की इंग्रजी असले तरी ते मूळ संस्कृतमधूनच त्यांनी घेतलंय. मातृचं मदर केलंय आणि पितृचं फादर केलंय. म्हणजे बहुदा मॅाम, मम्मा, मम्मी, ह्या शब्दाचं मूळदेखील ‘मा’ मध्येच आहे. ‘मा’ हे हिंदीत संस्कृतमधूनचं आलं. तेव्हा मुलांनी आईची मॅाम केली आणि बापाचा पप्पा केला तर काही हरकत नाही. अगदी डॅड, डॅडी, हेसुध्दा दादा, दद्दावरूनच आलेत.

नवलकरांना एआयची चिंता आहे. ते मात्र पश्चिमेकडून आलंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हळूहळू सगळीकडे घुसतय. कोणतीही नवी गोष्ट फायदे आणि तोटे घेऊनच येते. चहात टॅनिन नावाचे (लेनिन, स्टॅलिन, इ. सारखं वाटलं तरी ते रशियन नाही बरं) विष असते, असं सांगितलं जात असे. नवलकर परवा पेपर घेऊन मला दाखवायला आले, हे बघा, आता तरी माझं म्हणणं पटेल तुम्हाला! पेपरात लेख होता, एआयपासून मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका.

मी तो लेख वाचला होता. पर्यावरणाचा मानवाकडून होणारा र्‍हास आणि त्यामुळे पृथ्वीवर सजीवांना असणारा धोका, ह्यावर उपाय म्हणून एआय मानवालाच नष्ट करण्याचा निर्णय घेईल, अशी भीती त्या लेखात कोणी तरी प्रकट केली होती. नवलकर म्हणाले, हा माणसासारखाच पण माणसाहून लाखो पटीने बुद्धिमान आणि जलद काम करणारा असणार तो. नवा भस्मासूर आहे हा. नवलकरांचा नातू बरोबर होता. तो म्हणाला, तुम्हाला माहीत नाही ना भस्मासुराची गोष्ट. मी सांगतो. पण त्याला आजोबांनीच गप्प केला.

मी म्हणालो, भस्मासूर स्वत:च्या करणीनेच भस्म झाला, तसा हाही जाईल. मी उगीचच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो पण नवलकरांनी ते वाक्य सोडलं नाही. म्हणाले, हा आधी माणसाला भस्म करेल. मी मनातल्या मनात अज्ञान मान्य करत विचारलं, ते कसं! नवलकर म्हणाले, ह्यांचा कामाचा वेग आणि उरक दांडगा असणार. काल ते आपले इंग्रजीचे प्रोफेसर पाटील, त्यांनी एका मराठी पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर मागितले आणि काय चमत्कार पाच मिनिटात त्यांना संपूर्ण पुस्तकाचे भाषांतर मिळाले म्हणे.

म्हणजे सगळे भाषांतरकार मेले ना! संगणक आले आणि स्टेनोग्राफर गेले. किती छान मुली असायच्या, माझ्या ऑफिसातल्या गोन्साल्विस, डीसोझा, अजून आठवतात हो! मी डोळ्यांनी खूण करत होतो पण नवलकरांचं लक्षच नव्हतं. ते पंचवीस-तीस वर्षे मागे गेले होते, पण नातवाने गोन्साल्विस आणि डीसोझा ही नावं बरोबर लक्षात ठेवली होती. बहुदा संध्याकाळी नवलकरांना सक्तीचं डाएटिंग करावं लागणार. मी त्यांना परत ट्रॅकवर आणायला म्हणालो, हा एआय तर काम करतोय चांगली मग!

नवलकरांनी मनातल्या मनात माझा आय. क्यू. कमी असल्याची नोंद एक गाठ देऊन पक्की केली आणि म्हणाले, बेरोजगारी बेसुमार वाढणार नाही का? कचेरीतल्या नोकर्‍या संपल्याच समजा. कॉम्प्युटरमुळे दहातले सहा सात घरी बसले. आता शंभरात एकाची गरज राहील आणि नव्याण्णव बेकार होतील. एवढ्यात बाबलीबाईंनी सांगितलेल्या कामाची आठवण झाली आणि ते घरी गेले. मी एक सुस्कारा सोडला. एआयसाठी रात्रीचीच काय दुपारची झोप पण मला घालवायची नव्हती.

झोपता झोपता माझ्या मनात विचार आला, एआय आल्यावर झोप काढायला भरपूर वेळ मिळणार सर्वांना! जरा डोळा लागला. एवढ्यात दारावर कुरिअर पार्सल आलं. मी तर काही मागवलं नव्हतं. पाहिलं तर ते एका एआय कंपनीकडून आलेलं पार्सल होतं. त्यात एक चपाती मेकर होता. तो पाच मिनिटात पंचवीस चपात्या करून देई. अगदी गोल, गरगरीत फुगलेल्या, एकसारख्या, हव्या तितक्याच गरम. तर दुसर्‍यात होता हाऊस क्लिनर. बटण ऑन केलं की तो साफसफाई स्वत: फिरून करायचा आणि सफाई झाली की आपोआप बंद व्हायचा.

पूर्वीच्या उत्पादनांचे एआय अवतार होते ते. तिसरा होता मसाज करणारा. त्याच्या सेवेबद्दल कुतूहल वाटून मी तो सुरू केला. मला आडवा पाडून त्याने असं कांही जोरात अंग दाबायला सुरूवात केली की माझी झोप उडाली आणि मी जागा झालो. पहातो तर आजोबा-नातवाची जोडी मला हलवून हलवून उठवत होती. माझ्या हातात एक कागद कोंबत आजोबा नवलकर म्हणाले. मी म्हटलं तर तुम्ही मला उगीच घाबरता म्हणता, आता हे वाचा. वर्तमानपत्राचा तुकडा होता तो. पाश्चात्य जगातील काही मोठ्या लोकांनी खुल्या पत्राद्वारे मागणी केली होती की एआयवरील पुढील संशोधनावर तात्काळ बंदी घालण्यात यावी.

माझ्या मनात आले जेव्हा ह्यांच्या संशोधनाने आणि उत्पादनांनी पूर्वीची उत्पादने धोक्यात आली, नोकर्‍या कमी झाल्या, तेव्हा ही सुबुध्दी कुठे गेली होती ह्यांची? नवलकरांना हे सांगून फायदा नव्हता. त्यांना मी म्हणालो, नवलकर, पूर्वी क्रिकेट मॅच टीव्हीवर बघायला तुम्ही रजा घेत होता ना! नवलकर म्हणाले, क्रिकेट विक पॅाईंट आहे. घेत होतो रजा. मी म्हणालो, समजा, तुम्हाला एआयमुळे दोन दिवस काम, पाच दिवस आराम आणि व्यवस्थित पगार मिळाला असता तर तुम्ही ‘मला हे नको’ म्हणाला असता का?

नवलकर विचारात पडले, मी हसत हसत पुढे म्हणालो, एक दिवस काम, ते सुद्धा वर्क फ्रॅाम होम आणि तेवढाच पगार. दोन्ही वेळा बाबलीबाईंच्या हातचा गरम गरम रस्सा! नवलकरांच्या चेहर्‍यावर रस्सा प्यायल्यानंतर येणारा आनंद दिसला. पगाराचे तेवढे नक्की असेल तर. नवलकर पुटपुटले आणि मग मोठ्याने बोलले, पण आपल्याकडे तर आठवड्याला सत्तर तास की नव्वद तास, इथेच अजून गाडी अडली आहे.