Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश अजीब दास्तांस

अजीब दास्तांस

Subscribe

करण जोहरच्या ओटीटी प्रोडक्शनसाठी असलेल्या धर्माटिक प्रोडक्शन अंतर्गत बनलेला ‘अजीब दास्तांस’ हा सिनेमा अनेक गोष्टींसाठी वेगळा आहे, यातल्या कथा आणि प्रत्येक दिग्दर्शकाने केलेली मेहनत हे या सिनेमाचे वैशिष्ठ्य आहे. अँथॉलॉजी सिनेमा पाहताना एक गोष्ट मला नेहमीच आवडते ती म्हणजे यात 3/4 कथा असल्याने किमान एखादी तरी कथा पाहण्यालायक असते, दुसरी म्हणजे एखादी कथा रटाळ असली तरी वेळ कमी असल्याने तिच्यापासून लवकर मुक्तता होते. अजिब दास्तांसच्या बाबतीतसुद्धा असंच काही घडत, इथं 2 कथा उत्तम तर 2 ठीकठाक आहेत. मजनू, खिलौना, गिली पुच्ची आणि अनकहीं या चार वेगवेगळ्या कथा प्रेम आणि सूड या भावनांनी एकमेकांना जोडलेल्या आहेत.

नवीन प्रयोगांचा स्वीकार करणे हा आपल्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा स्वभाव बनत चालला आहे. जे काही नवीन ट्रेंड्स येतात ते इंडस्ट्रीमध्ये गाजतात आणि प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय ठरतात. गेल्या काही काळात अँथॉलॉजी हा जॉनर हिंदी सिनेमात दिसू लागलाय, जगभरात या जॉनरचे अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद देखील मिळालाय. ब्लॅक मिरर, फार्गो, पल्प फिक्शन आणि यांसारखी अनेक नावं आहेत, ज्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, भारतात हिंदी सिनेमांपेक्षा दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये हा जॉनर जास्त लोकप्रिय आहे, पावा कधाईगल सारखा उत्तम सिनेमा त्या इंडस्ट्रीत बनला आणि लोकांना आवडलासुद्धा, हिंदी सिनेमांमध्ये या जॉनरला कुणी आधी हाताळलं नव्हतं असं नाही, पण त्यावेळी त्या सिनेमांना तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. अँथॉलॉजी फिल्म्स म्हणजे काय ? तर अशा प्रकारच्या सिनेमात एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा अधिक उपकथा असतात, साध्या भाषेत अडीच तासात 3 ते 4 वेगवेगळे छोटे सिनेमे इथं पाहायला मिळतात. अशा शॉर्टफिल्म्स ज्यांचा दिग्दर्शक वेगळा असतो, कथा वेगळी असते, नट-नट्या वेगवेगळ्या असतात, फक्त एक थीम, उद्देश, लिंक किंवा स्थान या सगळ्या कथांना परस्परांशी जोडत असते.

भारतात ओटीटीच्या आगमनानंतर अँथॉलॉजी फिल्म्सच्या संख्येत वाढ झाली, प्राईमवर आलेला अनपॉज्ड आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या लस्ट स्टोरीज, घोस्ट स्टोरीज या फिल्म्सना संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मागच्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर अजून एक सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याची बरीच चर्चा सध्या सुरु आहे. करण जोहरच्या ओटीटी प्रोडक्शनसाठी असलेल्या धर्माटिक प्रोडक्शन अंतर्गत बनलेला ‘अजीब दास्तांस’ हा सिनेमा अनेक गोष्टींसाठी वेगळा आहे, यातल्या कथा आणि प्रत्येक दिग्दर्शकाने केलेली मेहनत हे या सिनेमाचे वैशिष्ठ्य आहे. अँथॉलॉजी सिनेमा पाहताना एक गोष्ट मला नेहमीच आवडते ती म्हणजे यात 3/4 कथा असल्याने किमान एखादी तरी कथा पाहण्यालायक असते, दुसरी म्हणजे एखादी कथा रटाळ असली तरी वेळ कमी असल्याने तिच्यापासून लवकर मुक्तता होते. अजिब दास्तांसच्या बाबतीतसुद्धा असंच काही घडत, इथं 2 कथा उत्तम तर 2 ठीकठाक आहेत. मजनू, खिलौना, गिली पुच्ची आणि अनकहीं या चार वेगवेगळ्या कथा प्रेम आणि सूड या भावनांनी एकमेकांना जोडलेल्या आहेत.

- Advertisement -

मजनू :- सिनेमातील पहिली कथा आहे लिपाक्षी, बबलू भैय्या आणि राजकुमार यांची, शशांक खेतानने दिग्दर्शित केलेल्या या कथेत टिपिकल करण जोहर दिसतो. जयदीप अहलावत (बबलू ) आणि फातिमा सना शेख (लिपाक्षी ) यांच अरेंज मॅरेज झालंय, ज्याला बबलूने गठबंधन कि शादी असं नाव दिलंय. इच्छा नसताना राजकीय संबंध जोपासण्यासाठी बबलूने लिपाक्षी सोबत विवाह केलाय, जो स्वतः लग्नाआधी कुणावर तरी प्रेम करायचा. पतीचे प्रेम न मिळालेली लिपाक्षी मग हवेलीतील प्रत्येक दुसर्‍या पुरुषाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तिथून कथा पुढे सरकते. अभिनय तर दोघांनीही चांगला केलाय पण अनावश्यक येणारे सेक्ससीन्स कथेला भरकटवतात, गरज नसताना अनेक ट्विस्ट आणले जातात, ज्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहतो. इथं भव्यता आहे पण कथेच्या बाबतीत गफलत झालीये, पटकथा आणि संवादसुद्धा तितकेसे प्रभावी नाहीयेत.

जयदीपसारख्या नटाच्या तोंडी हमने भी उन्हे कभी दादाजी बनने कि ख़ुशी नसीब होने नहीं दी सारखे संवाद साधारण वाटतात आणि या कथेचा शेवटसुद्धा निष्प्रभ ठरतो. खिलौना:- गुड न्यूज सारखा सिनेमा दिग्दर्शित करणार्‍या राज मेहताने खिलौनाचे दिग्दर्शन केले आहे. मजनू प्रमाणेच ही कथा सुद्धा थोडी बोअरिंग आहे, विषय वेगळा असला तरी हाताळताना झालेल्या चुका कथा अधिक संथ करतात. गरीब श्रीमंत दरी दाखविताना जो सेट या ठिकाणी उभा केलाय तो मात्र उत्तम आहे, हायक्लास सोसायटी आणि दुसरीकडे एका कन्स्ट्रक्शन साईटवर राहणारी अवैध वीज घेऊन राहणारी मीनल ( नुसरत भरूचा )ची ही कथा आहे. बिन्नी (इनायत वर्मा ) तिची लहान बहीण आणि सुशील (अभिषेक बॅनर्जी ) हा सोसायटीत इस्त्रीचे दुकान चालवणारा तिचा प्रियकर आहे. सोसायटीचा नवीन सेक्रेटरी अग्रवाल (मनीष वर्मा ) ने तिचं अवैध वीज कनेक्शन काढून टाकलंय आणि मीनलला ते पुन्हा हवं आहे. पुढे कथेत ट्विस्ट येतात आणि एका निराशाजनक क्लायमॅक्सकडे येऊन कथा संपते.

- Advertisement -

गीली पुच्ची :- अजीब दास्तांसबद्दल लिहिताना अनेक मराठीतील समीक्षकांनी या कथेचं नाव घेणं टाळलं आहे किंवा चुकीच्या प्रकारे नाव लिहिलं आहे, बंगालीत गिली पुच्चीचा अर्थ लाळ असलेले चुंबन किंवा ओले चुंबन असा होतो. सर्व कथांमध्ये सर्वाधिक आवडलेली ही कथा नीरज घेवानने दिग्दर्शित केलीये. आदिती राव हैदरीच्या करियरमधील सर्वोत्कृष्ट अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो. कोंकणा सेन शर्माने नेहमीप्रमाणेच दमदार अभिनय केलाय. एका फॅक्टरीत मशीनवर काम करणारी एकमेव महिला म्हणजे भारती मंडल (कोंकणा सेन शर्मा )जी दलित आणि लेस्बियन आहे. ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करण्याची इच्छा असलेल्या भारतीला ती संधी मिळत नाही आणि तिच्या जागी प्रिया शर्माला (अदिती राव हैदरी) ती नोकरी दिली जाते. प्रिया उच्चवर्णीय महिला आहे जीच नुकतंच लग्न झालंय, शर्माजी कि बहू असलेल्या प्रिया सोबत भारतीची मैत्री होते. प्रियासुद्धा आपल्या सेक्स्युअलिटीबद्दल कन्फ्युज आहे, पुढे कथेत ट्विस्ट येतात आणि कधी दलित सवर्णवाद दिसतो तर कधी एका स्त्रीचा संघर्ष.. पण सर्वात सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे या कथेचा शेवट, सर्व कथांमध्ये याचा शेवट सर्वाधिक सुंदर आहे.

अनकहीं :- बोमन इरानींचा मुलगा केयोज इराणी याने दिग्दर्शित केलेली ही या सिनेमातील शेवटची कथा आहे, यात शेफाली शाह आणि मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत. नताशा (शेफाली शाह ) एक हाऊसवाईफ आहे, जिची लहान मुलगी येत्या काही दिवसात ऐकू शकणार नाहीये, म्हणून ती तिच्यासोबत साइन लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते आहे, वडील मात्र आपल्या मुलीपासून दूर जातायत आणि त्यांना जवळ आणण्याच्या प्रयत्नात घरात तणाव निर्माण होतोय, त्यातच एक दिवस नताशाची भेट होते, कबीर (मानव कौल) सोबत ज्याला ही तिच्या मुलासारखं ऐकायला येत नाही आणि बोलता ही येत नाही. पुढे काय होतं? हे कथा पाहिल्यावर लक्षात येईल. पण यात सर्वाधिक जमेची बाजू कलाकारांचा अभिनय आहे, शेफाली शाहने नेहमीप्रमाणे चांगलं काम केलंय. मानव कौलकडे तर एकही संवाद नव्हता तरीही त्याने अतिशय उत्तम प्रकारे आपलं पात्र निभावलं आहे.

अजीब दास्तांसचा एकंदरीत अनुभव थोडा कडू आणि थोडा गोड अशा प्रकारचा राहिलाय, याचा इंट्रो आणि बॅकग्राउंड स्कोअर उत्तम आहे. तसेच गिली पुच्चीमध्ये असलेलं गाणं देखील सुंदर आहे. अनावश्यक सेक्स सीन्स टाळले असते तर एकूण अँथॉलॉजी म्हणून हा सिनेमा चांगला बनला असता, करण जोहर फ्लेवर म्हणून असलेले सेट्स आणि लोकेशन्स हे देखील या चारही कथांमध्ये असलेला एक चांगला कॉमन पॉईंट आहे. पहिल्या दोन कथा तितक्या प्रभावी नसल्या तरी शेवटच्या दोन कथांसाठी का होईना हा सिनेमा एकदा नक्की पाहावा असा आहे.

- Advertisment -