घरफिचर्ससारांशअखंड हरिनाम सप्ताह

अखंड हरिनाम सप्ताह

Subscribe

महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पार पडतात. यावेळी गावातील सर्वच ग्रामस्थ, विविध संस्था सप्ताहाचा नियोजन करतात. आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाच आमंत्रण दिलं जातं. यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात. जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं सप्ताहाच स्वरुप देखील बदलत गेले. आता याला मोठ्याप्रमाणावर आधुनिक टच मिळाला आहे. डेकोरेशन असलेला मोठा मंडप, साउंड सिस्टीम, भव्य व्यासपीठ, गावागावात मोठे मोठे बॅनर, कार्यक्रम पत्रिका, सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक यांची मांदियाळी अस भव्य आणि आधुनिक स्वरुप आता अखंड हरिनाम सप्ताहाला लाभलं आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया॥
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत॥
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश॥

- Advertisement -

संत बहिणाबाई आपल्या या अभंगात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ कशा पद्धतीने रोवली गेली याची माहिती देतात. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या भूमीत वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि तुकोबारायांनी त्यावर कळस चढवायच काम केलं.

नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग॥

- Advertisement -

पहिले कीर्तनकार म्हणून संत नामदेव महाराज यांनी या परंपरेला सुरुवात केली. यावेळी ज्ञानोबाराय टाळकरी म्हणून तर गोरोबा काका पखवाज वाजवून नामदेवरायांना साथ द्यायचे. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात ही कीर्तनं पार पडायची. इथूनच खर्‍या अर्थाने वारकरी कीर्तन परंपरेला प्रारंभ झाला आणि ही परंपरा आजतागायत सुरू आहे. याचवेळी ज्ञानेश्वरांनी संत साहित्यातील वाङ्मय लिहायला सुरुवात केली. यातूनच मग ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचे पारायण करायला सुरुवात झाली. सुरुवातीला व्यक्तिगत स्वरुपात पारायण केली जाऊ लागली. कालांतराने विष्णुबुवा जोग महाराज, मामासाहेब दांडेकर यांनी या पारायनांना सामुदायिक स्वरुप दिलं. आणि सात दिवसाचे पारायण सामूहिकरित्या सर्वांनी एकत्र येऊन पार पडू लागले. यातूनच सात दिवसाचा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ खर्‍या अर्थाने सुरू झाला. सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदायाची उपासना आहे. या सात दिवसात संतांचे अखंड नामचिंतन करायचे.

अवघे होती लाभ एका या चिंतने ।
नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥

पहाटे काकडा आरती. त्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा गाथ्याचे सामुदायिक पारायण. दुपारी प्रवचन होते. संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिजागरण म्हणजेच कीर्तन केले जाते. असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम असतो. महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आजतागायत चालू आहेत. उदाहरण द्यायचे झालेच तर वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत शंकरस्वामी संस्थान फडाचा 275 वर्षांचा सप्ताह, सद्गुरु गंगागिरी महाराजांचा 173 वा सप्ताह याचसोबत देहूकरांचा फड, वासकर फड, देगलूरकर फड यांसारख्या फडांच्या देखील पिढ्यांपिढ्यांच्या परंपरा हा सप्ताह साजरा करत आहेत. सप्ताह करतांना असा आघात आहे की, पहिल्या दिवसाचे कीर्तन हे नामपर म्हणजे नाम महात्म्य सांगून देवाच्या स्वरुपाच वर्णन करणार असावं. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसाचे संत महात्म्य म्हणजेच संतांच चरित्र सांगितलं पाहिजे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी भक्तीपर. सहाव्या दिवशी वेदांताचे अभंग यावर तर सातव्या दिवसाचे मागणीपर आणि आठव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन केले जाते.

महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पार पडतात. यावेळी गावातील सर्वच ग्रामस्थ, विविध संस्था सप्ताहाचा नियोजन करतात. आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाच आमंत्रण दिलं जातं. यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात. जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं सप्ताहाच स्वरुप देखील बदलत गेले. आता याला मोठ्याप्रमाणावर आधुनिक टच मिळाला आहे. डेकोरेशन असलेला मोठा मंडप, साउंड सिस्टीम, भव्य व्यासपीठ, गावागावात मोठे मोठे बॅनर, कार्यक्रम पत्रिका, सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक यांची मांदियाळी अस भव्य आणि आधुनिक स्वरुप आता अखंड हरिनाम सप्ताहाला लाभलं आहे. या सप्ताहाची कार्यक्रम पत्रिका वैशिष्ठ्यपूर्ण असते. पत्रिकेच्या सुरुवातीला भाजनाच्या ओळी. त्यानंतर ज्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने हा सप्ताह चालतो अशा सर्वांचे फोटो आणि नाव असतात.

यानंतर सप्ताहाची तारीख, वेळ आणि ठिकाण नमूद केलेले असत. यानंतर सात दिवसात सप्ताहात येणार्‍या कीर्तनकार महाराजांची नावे असतात. त्यांच्यापुढे ज्यांनी कीर्तनसेवा दिली आहे त्यांचे नाव व ज्यांच्याकडून त्यादिवसाच्या भोजनाची व्यवस्था असते अशा लोकांची नाव टाकलेली असतात. खाली त्यानंतर गायक, वादक यांची माहिती असते. परिसरातील भजनी मंडळांची नाव आणि गावांची नाव असतात. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाच्या मंडप, साउंड, बॅनर, शूटिंग याची जबाबदारी घेतलेली असते त्यांची नाव असतात. शेवटी गावातील सर्व संस्था, भजनी मंडळ, आयोजक, संयोजक यांची नाव असतात.

रोजच्या कीर्तनाला टाळकरी, पखवाज वादक, पेटी वादक, गायक, विनाधारी असे सर्वजण पांढर्‍या शुभ्र कपड्यात हजर असतात. डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का असा एकंदरीत पेहराव असतो. कीर्तनाची वेळ साधारण रोज रात्री नऊ ते अकरा अशी असते. निमंत्रित महाराज पांढरा शुभ्र फेटा बांधून हजर होतात. त्यांच्या बाजूला चोपदार उभा असतो. विनाधारी महाराजांकडे विना देतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. गायक ‘राम कृष्ण हरी’ भजनाने सुरुवात करतो. हे भजन संपल्यावर

रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥

तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥

बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥

सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥

हा अभंग घेतला जातो. उपस्थित सर्वजण गायकाच्या मागून मोठ्या उत्साहाने आपल्या मुखातून हा अभंग म्हणत असतात. त्याला पखवाज वादत आणि टाळकरी साथ देतात. यानंतर पुन्हा ‘राम कृष्ण हरी’ भजन सुरू होते. निमंत्रित महाराज कीर्तनासाठी घेतलेला अभंग म्हणतात. याला चाल असे म्हटले जाते. हा अभंग झाल्यावर विठोबा रखुमाई भजन सुरु होते. महाराज विणेकर्‍याच्या हातात विना देतात. विणेकरी नाचत नाचत ती विना घेऊन जातो आणि आपल्या जागेवर जाऊन उभा असतो. विणेकर्‍याचा मान सप्ताहात एकाच व्यक्तीला दिला जातो. हे झाल्यावर प्रत्यक्ष निरुपणाला सुरुवात होते. शक्यतोवर निरुपणासाठी घेतलेला हा अभंग संत तुकाराम महाराजांचा असतो. विठोबा रखुमाईच्या गजरात महाराज खांद्यावरील उपरणे काढून त्याची चुंभळ करुन ते कमरेभोवती गुंडाळतात. आणि कीर्तनाला सुरुवात करतात. अभंगाचे निरुपण करताना अनेक चाली म्हटल्या जातात यावेळी गायक आणि पखवाज वादक यांच्यात जुगलबंदी बघायला मिळते. कीर्तनाच्या उत्तरार्धात महाराज अभंगाच शेवटचं चरण घेऊन विठोबा रखुमाईचा गजर करतात. यावेळी संयोजकांपैकी एकजण महाराजांना बुक्का लाऊन हार घालतो. महाराज आपले निरुपण पूर्ण करतात.

शेवटी ‘जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ भजन होऊन कीर्तनाची सांगता होते. महाराज खाली बसतात उपस्थित महाराजांचे आशीर्वाद घेतात. यावेळी संयोजक दुसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमसंदर्भात माहिती देऊन दुसर्‍या दिवसाच्या कीर्तनकारांचे नाव सांगतात. सर्वजण महाराजांच्या अवतीभोवती बसून चहा घेतात आणि आपल्या घराकडे निघतात. अशा पद्धतीने सात दिवसाच्या सप्ताहात विविध महाराजांची कीर्तन होतात. सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने होतो. श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांची माहिती यावेळी सांगितली जाते. साधारण शेवटच्याच दिवसाचे कीर्तनकार मुक्कामी थांबून दुसर्‍या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन करतात. हे कीर्तन सकाळी साधारण दहाला सुरू होते. या कीर्तनात कृष्णाच्या विविध लीला सांगणार्‍या गौळणी म्हटल्या जातात. शेवटी दह्याच्या प्रसादाचं मडकं फोडून काला साजरा केला जातो. दुपारी सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद दिला जातो. यावेळी सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा मंडळींचे आयोजकांच्या वतीने आभार मानून सप्ताहाची सांगता होते.

कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देईल भेटी ॥

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -