घरफिचर्ससारांशसाहित्याच्या मांडवातील शेतीप्रश्नांचे कीर्तन

साहित्याच्या मांडवातील शेतीप्रश्नांचे कीर्तन

Subscribe

संपादक साहेब, तुम्ही ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’तील ‘शेतकर्‍यांच्या दुस्थिती‘वरच्या परिसंवादात आमचे प्रश्न भारी मांडलेत ओ! तुमची तळमळ तुमच्या खणखणाटी भाषणातून शैलीदार भाषेतून दिसून आली. ‘गाथा सप्तशती, शेतकर्‍यांचा आसूड, डॉ. आंबेडकरांचे ‘स्मॉल होल्डींग्ज‘ वैगरे ग्रंथांतील संदर्भांचा तुम्ही घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा ऐकून तर पार डोळे दिपून गेलेत राव! प्रश्नांचे कीर्तन झाले पण पुढे काय? यावर उपाय काय? उत्तरे काय? यावरही तुम्ही काही बोलाल असं वाटलं होतं. खूप मोठ्या आशेने आलो होतो पण तुम्ही नाराज केलंत राव!

माणसाचा ज्ञात इतिहास 70 हजार वर्षांचा आहे. त्यातील 12 हजार वर्षांचा शेतीचा इतिहास आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे स्वरुप इतके व्यापक आहे की या प्रश्नांचे मूळ शोधायला 12 हजार वर्षे मागे जावे लागेल की काय अशी भीतीही तुम्ही व्यक्त केली. चक्रधरांच्या कथेतील ‘एक हत्ती आणि 7 आंधळे’ याप्रमाणे आपण प्रत्येक जण शेतीच्या प्रश्नांकडे पाहत आहोत. त्याकडे एकात्मिक आणि त्यात आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिले पाहिजे. असं तुम्ही म्हणालात.

शेती करणार्‍याचं जग वेगळं आणि इतर नोकरी, व्यवसाय, उद्योग करणार्‍यांचं जग वेगळं आहे. त्यांच्यात परस्परांत दरी आणि विसंवाद, गैरसमज असं बरंच काही झालं आहे. त्यातून शेतकर्‍यांविषयी दुस्वास करणाराही एक वर्ग आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं जग थांबलं होतं, तेव्हा शेतकर्‍यांनी या काळातही न थांबता अन्नधान्याचे, भाजीपाल्याचे उत्पादन सुरू ठेवले व जीवावर उदार होवून बांधापलीकडील नागरिकांना पुरवले. यावरुन तरी आपण ‘शेतीचे आणि शेतकर्‍यांचे महत्व लक्षात घेतले पाहिजे.

- Advertisement -

अशी कळकळीची सादही मध्यमवर्गीय शहरी नागरिकांना घातली. शेतीतील उत्पादन ताजे, स्वच्छ व शुध्द मिळाले पाहिजे. ते स्वस्तातही मिळाले पाहिजे. ते उत्पादन घेत असताना शेतकरी ज्या अस्मानी सुलतानी संकटांना सामोरा जातो. त्याच्या जगण्याचा जो संघर्ष तयार झालेला असतो. मूलभूत सुविधाही त्याला मिळत नाही. बहुतांश वेळा त्याचे शोषण होते. त्याच्यावर अन्याय होतो. त्या अन्यायाविरुध्द तो कधी मोर्चा काढतो. कधी संप करतो. अशावेळी माध्यमे म्हणून, साहित्यिक म्हणून किंवा सेलिब्रिटी म्हणून आपण भूमिका घेत नाही. आपण मौन बाळगतो. या दुटप्पीपणावरही तुम्ही बोट ठेवले.

मुख्य प्रवाहातील दैनिके, त्यांची व्यावसायिक गणिते, त्यांच्या मालकांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक हितसंबंध, वाचकांच्या उथळ आवडी निवडीला प्राधान्य देणारी अनुनयता, अलीकडच्या काळातील माध्यमांचं अर्बनायजेशन किंवा अर्णबायजेशन यामुळे माध्यमेही सर्वसामान्यांचे त्यातही शेतकर्‍यांचा आवाज बनत नाहीत. ते समाजाला भूल (अ‍ॅनेस्थेशिया) देण्याचेही काम करतात. अशा मुख्य प्रवाहातील दैनिकांची आम्हाला गरज नाही. ते आमची बाजू मांडत नाही म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात मोहीम सुरू करीत आहोत. अशी मोहीमही महाराष्ट्रात 2004 मध्ये निघाली होती असे परिसंवादातील एका ज्येष्ठ माजी संपादकाने सांगितले. आपण आता राजकारणी आणि सेलिब्रिटींना जागा देण्यापेक्षा शेतीत भरीव काम करणार्‍या लोकांना शोधून त्यांना जागा दिली पाहिजे, कारण तेच खरेखुरे सेलिब्रिटी आहेत. अशी स्पष्टोक्तीही या संपादकांनी केली. हे ऐकून लईच भारी वाटलं. आपण जरी बदललो नाही तरी हे लोक मात्र बदलत आहेत. हे तरी आपण ओळखले पाहिजे.

- Advertisement -

ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के
अब अंधियारा जीत लेंगे लोग मेरे गांव के

अशा कवितेच्या ओळी पेरीत संपादक म्हणाले की, आता लोक मशाल घेऊन चालले आहेत. दुर्दैवाने ही मशाल माध्यमे, साहित्यिक आणि सेलिब्रिटींच्या हातात नाहीय.

हे ऐकून भरुन आले. परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार होते. त्यांनी शेतकरी आंदोलनातही भाग घेतला होता. ‘शेतकरी साहित्य हे सतत दु:ख मांडणारं रडगाणं गाणारेच साहित्य बनले आहे. शेतकरी जीवनाचा व्यापक पट फारच थोड्यांनी साहित्यात मांडला आहे असे त्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी अध्यक्षीय मनोगतात संपादकांचाच सूर आळवित शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी व्यवस्था, शासन, माध्यमे, साहित्यिक व सेलिब्रिटींचे मौन या बाबींना जबाबदार धरले.

प्रश्नं…प्रश्नं आणि फक्त प्रश्नंच?.मग उत्तरांचे काय?
सर्वांनी प्रश्नांवरच खूप ऊहापोह केला. म्हणजे यांनीही रडगाण्याचाच कार्यक्रम सादर केला. जखमांवरील खपल्या पुन्हा पुन्हा काढताना माध्यमे म्हणून आपण दोषी आहोत ही कबुलीही यांनी दिली. एवढी सगळी समज असताना संपादक साहेब, आपण आपल्या माध्यमामध्ये शेतीतील घडामोडींना किती आणि कशी जागा देत आहात? तुम्ही तसे ठरवून काही प्रयत्न का केले नाहीत? कधी कधी केवळ कांदा कडाडला. भाजीपाला महागला. कोथिंबिरीची जुडीने गाठली शंभरी, पेट्रोलपेक्षा शेवगा महाग. असे मथळे असणार्‍या बातम्या नेमके कुणाचे भले वाहतात? यातून शेतकरी, ग्राहक, वाचक याचे तरी हित साधले जाते का? याचा विचार का करीत नाही आपण. प्रश्न अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडावेत. वर्षानुवर्षाचे तेच प्रश्न सुटावेत? सतत तोट्यात जाणार्‍या आणि नानाविध अडथळ्यांतील शेती करणार्‍यांचा आवाज तुम्ही का बनत नाहीत? वास्तव मांडणारी मांडणी तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आमचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत. अगदी तोंडपाठ झाले आहेत. तेच तेच पुन्हा आम्हाला ऐकवू नका. आमच्याच रडण्यात तुम्ही तुमचेही रडणे मिसळू नका. तुम्ही आमचे वकील बना. वकील हा अशीलाची बाजू मांडतांना रडत बसत नाही. तो सर्व प्रकारचे योग्य युक्तिवाद करुन न्याय देण्याची भूमिका घेतो. शेतकरी म्हणून आम्हालाही तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -