घरफिचर्ससारांशखान्देशातली आखाजी

खान्देशातली आखाजी

Subscribe

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा सण म्हणजे खान्देशातील आखाजी. चैत्राची चाहूल लागताच आखाजीची म्हणजेच माहेरची आठवण सासरी असलेल्या लेकींना येते. कधी एकदाचा भाऊ आपल्याला मूळ लावायला येतो याचीच वाट बहिणी बघत असतात. उन्हाळा लागताच घरातील वाळवणाचे पदार्थ कुरडई, पापड करुन घरात सर्व आवराआवर केली जाते. घरातल्या गोधड्या, चादरी धुतल्या जातात. दिवाळीसारखी घरातली साफसफाई करुन महिला आखाजीसाठी आपल्या माहेरी जातात. माहेरी आलेल्या महिलांना एकप्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं. या दिवसात गावा-गावात झाडाला, घराच्या चिरीवर (ओट्यावर), शेतात झोका बांधलेला असतो. त्या झोक्याच्या दोन्ही पदरावर दोन माहेरवशीनी बसून उंचच उंच झोके घेत गाणे म्हणतात.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा काही भाग सोडला तर उर्वरित उत्तर महाराष्ट्र खान्देश म्हणून ओळखला जातो. या खान्देशानेदेखील आपलं वेगळेपण आपली अहिराणी बोली, चालीरीती यामाध्यमातून जपलं आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा सण म्हणजे खान्देशातील आखाजी. या दिवसापासून खान्देशातील नवीन वर्षाला प्रारंभ होतो. आखाजी हा दिवाळी इतकाच मोठा सण खान्देशात साजरा केला जातो. एकप्रकारचा लोकोत्सव यावेळी बघायला मिळतो. लग्न झालेल्या लेकी माहेरी येतात. आखजीचा आनंद लुटतात आणि पुन्हा सासरी जातात. शेतमजूर, सालदार याच दिवसापासून आपल्या वर्षभराच्या कामाचा हिशोब करुन पुन्हा नवीन साल धरतात किंवा दुसर्‍या मालकाकडे जाऊन काम पकडतात. त्याचबरोबर स्वर्गवासी झालेल्या वाडवडिलांना (पित्र) ‘आगारी’ म्हणजेच घास टाकला जातो. जेवणासाठी गोडधोड पुरणपोळी आणि रस केला जातो. खान्देशात याच दिवसापासून आंबे खायला सुरुवात होते.

विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊन शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. या सुट्ट्यांना खान्देशात आखाजीच्या सुट्ट्या म्हटल्या जातात. माहेरवाशीनींना दिवाळी आणि आखाजी या वर्षातून सहा महिन्यांच्या अंतराने येणार्‍या दोन सुट्ट्याच असतात. चैत्राची चाहूल लागताच आखाजीची म्हणजेच माहेरची आठवण सासरी असलेल्या लेकींना येते. कधी एकदाचा भाऊ आपल्याला मूळ लावायला येतो याचीच वाट बहिणी बघत असतात. उन्हाळा लागताच घरातील वाळवणाचे पदार्थ कुरडई, पापड करुन घरात सर्व आवराआवर केली जाते. घरातल्या गोधड्या, जादरी धुतल्या जातात.

- Advertisement -

दिवाळीसारखी घरातली साफसफाई करुन महिला आखाजीसाठी आपल्या माहेरी जातात. माहेरी आलेल्या महिलांना एकप्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं. या दिवसात गावा-गावात झाडाला, घराच्या चिरीवर (ओट्यावर), शेतात झोका बांधलेला असतो. त्या झोक्याच्या दोन्ही पदरावर दोन माहेरवशींनी बसून उंचच उंच झोके घेत गाणे म्हणतात. सोबत झिम्मा, फुगडी खेळली जाते. लहान मूल, तरुण आणि ज्येष्ठ या दिवशी मनमुराद जुगार (पत्त्यांचा डाव) खेळतात. या दिवशी सर्वांना जुगार खेळायला मुभा असते. यामुळे गल्ली बोळात, ओट्यावर पत्त्यांचे डाव रंगलेले दिसतात.

आखाजीच्या दिवशी मातीची घागर पुजली जाते. मातीची घागर पाण्याने भरुन तिला पाटावर टाकलेल्या गव्हावर ठेवले जाते. तिच्यावर मातीचंच छोटंस बोळकं ठेवलं जातं. या बोळक्याला सुताचे पाच धागे बांधले जातात. त्यावर मग खरबूज, पुरणाची पोळी आणि आंबा ठेऊन घागरीची पूजा करुन तिला पुजले जाते. यावेळी घराघरात गौर म्हणजेच गौराई बसवली जाते. तिची पूजा केली जाते. गौराईला अंघोळ घालण्यासाठी पाणी आणायला मुली आणि गावातील महिला एकत्र जमून डोक्यावर कळशी घेत नदीवर जातात. नदीला लागूनच आमराई असते.

- Advertisement -

तेथे जात गाणी गात मौज मजा करतात. यावेळी गावातून मिरवणूक काढली जाते. यावेळी एका मुलीला पॅन्ट, शर्ट, गॉगल, टोपी असा पुरुष वेष परिधान केला जातो. याला ‘मोगल’ असे म्हटले जाते. नदीवरून पाणी भरुन आणल्यावर घरी पुन्हा सर्व मैत्रिणी जमून झोका खेळत गाणी गातात यात सासरची सुखं दुःखं म्हटली जातात. सोबतीला सर्वजण गाणी गात झोका, झिम्मा, फुगडी खेळण्यात दंग होतात. आखाजीच्या दुसर्‍या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते. घरापासून नदीपर्यंत मिरवणूक काढून गौराई नदीकाठी नेल्या जातात. यावेळी नदी, नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या महिला आपल्या आपल्या किनार्‍यावर थांबून गौराईचे विसर्जन करतात.

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं.
कैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वं.

झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बजार वं.
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बजार वं.
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो.
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो.
बन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना.

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं.
कैरी तुटनी खडक ़फुटना झुयझुय पानी व्हायं वं.

मुलगी माहेर आणि सासर अशा दोन्ही घरातली असते. यामुळे ती सासर, माहेर या दोहोंच्या मध्ये हिंदोळा घेत असते. लग्न होऊन ती सासरी जाते म्हणजे ती माहेरपासून लांब होते. यावेळी खडका सारखं हृदय असलेला बापाच्या डोळ्यातून झुळझुळ पाणी वाहतं. अशा प्रकारची लेकीच्या सासर-माहेरमधील अंतर सांगणारी गाणी म्हटली जातात.

गौराईचे विसर्जन झाल्यावर ‘बार’ खेळण्याची प्रथा अनेक गावांत आहे. नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या गावातील मुली, महिला आपल्या आपल्या नदी किनारी एकत्र येत एकमेकींना खूप शिव्या देतात. एकमेकींच्या नकला करतात. एकमेकांवर दगड फेकतात. यावेळी गावातील सर्व आबालवृद्ध मंडळी नदीवर हा बार बघण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले असतात. संध्याकाळपर्यंत बार खेळून सर्वजण घराकडे निघतात. काही गावात या रात्री तमाशाचे आयोजन केलेले असते. लावणी, वग, गण-गौळण, नकला सादर करत लोकनाट्य तमाशा पहाटेपर्यंत रंगत जातो. नोकरी निमित्त बाहेरगावी असलेली मंडळी आखाजीला गावी येतात.

गौराई नारय तोडी लयनी
वं माय तोडी लयनी.
इकाले गयी तं देड पैसा
वं माय देड पैसा.
सासुनी सांग्या मीठ मिरच्या
वं माय मीठ मिरच्या.
सासरानी सांगी तंबाखु
वं माय तंबाखु.
देरनी सांगा झिंगी भवरा
वं माय झिंगी भवरा.
ननिन्दनी सांगा ऐन दोरा
वं माय ऐन दोरा.
पतीनी सांगा पान पुडा
वं माय पान पुडा.
या संसारले हात जोडा
वं माय हात जोडा.

यासारखी गाणी खान्देशच्या संस्कृतीच दर्शन घडवतात.

आखजीचा हा दिवस पितरांचा म्हणूनदेखील ओळखला जातो. ज्या घरात आखाजीच्या चालू वर्षी वडीलधार्‍या मंडळीचं निधन झालेलं असेल तर ते ‘डेरग’ भरतात. आणि वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला असेल तर ते ‘घागर’ पूजन करतात. सकाळी पहिल्यांदा घराचा उंबरठा सारवला जातो. त्याची हळद-कुंकवाने पूजा करुन आरती दाखवली जाते. यावेळी पितरांचे स्मरण करुन त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले जाते. यानंतर दुपारच्या जेवणाआधी चुलीवर पितरांना घास टाकला जातो. देवांना नैवेद्य दाखवून सर्वजण रस, पुरणपोळी, रशी, भात, भजी, कुरडई, पापड अशा भरगच्च ताटावर ताव मारतात. बर्‍याच ठिकाणी यादिवशी जावयाला जेवण सांगितले जाते. गौराई म्हणजेच पार्वती माहेरी येणार्‍या महिलेला गौराई तर, जावयाला शंकर म्हणून संबोधले जाते. आखाजी संपताच माहेरी आलेल्या लेकी पुन्हा सासरी निघतात. यावेळी तिचे डोळे पाणावलेले असतात. कारण पुन्हा ही भेट सहा महिन्यात येणार्‍या दिवाळीला होणार असते.

वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय.

वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय.

जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय.

जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय.

गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय.

एकंदरीतच सासुरवाशीनींच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण. खान्देशात मोठ्या उत्साहात साजरा होतो. आता आधुनिकतेच्या युगात अनेक चालीरीती प्रथा बंद पडल्या तरी मात्र, त्याची ओढ ही कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -