Homeफिचर्ससारांशAlexander Duma : अलेक्झांडर दयुमा

Alexander Duma : अलेक्झांडर दयुमा

Subscribe

अलेक्झांडर दयुमा हे जागतिक वाङ्मयातील एक अचाट आणि अफाट व्यक्तिमत्व. त्याच्या 68 वर्षांच्या आयुष्यात दयुमाने प्रचंड लेखन केले. एका अभ्यासकाने असे सिद्ध केले आहे की त्याच्या लिखाणाची पृष्ठसंख्या जवळजवळ 1,00,000 एवढी भरते. दयुमाचे लेखनही चतुरस्त्र होते. कथा, कादंबर्‍या, राजकीय विश्लेषण, नाटके, ललित लेखन, प्रवास वर्णने, निबंध इत्यादी. उमराव घराण्यात जन्म झाला असूनही दयुमा हा मिश्र वंशाचा असल्यामुळे त्याला आयुष्यभर भेदभावाचा सामना करावा लागला आणि हे शल्य तो कधीच विसरू शकला नाही.

-राजीव श्रीखंडे

अलेक्झांडर दयुमा हा विश्वविख्यात फ्रेंच लेखक. अपार वाचकवर्ग लाभलेल्या प्रख्यात फ्रेंच लेखकांमध्ये दयुमाचे स्थान फार वरच्या क्रमांकावर आहे. अलेक्झांडर दयुमाचा जन्म 1802 साली पॅरिसपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात झाला. त्याला दोन मोठ्या बहिणी होत्या, मारी अलेक्झांडरीन (जन्म 1794) आणि लुईस अलेक्झांडरीन (जन्म 1797).

त्याच्या आईचे नाव मारी लुईस एलिझाबेथ लॅबोरे असं होतं आणि एका पथिकाश्रमाच्या मालकाची ती कन्या होती. अलेक्झांडरच्या वडिलांचं नाव थॉमस अलेक्झांडर दयुमा असं होतं. थॉमस अलेक्झांडर यांचा जन्म फ्रेंच वसाहत असलेल्या हैरी इथं झाला होता. त्याचे वडील एक उमराव होते, पण आई मारी ही एक आफ्रिकन वंशाची गुलाम होती. त्याचे वडील थॉमसला पुढे फ्रान्सला घेऊन आले. त्याचे वडील नेपोलियनच्या लष्करात फार मोठ्या हुद्यावर कार्यरत होते.

अशा खानदानी घराण्यात जन्म झाल्यामुळे दयुमाला त्याचा चांगलाच फायदा मिळाला. लुई फिलिप म्हणजेच ड्यूक ऑफ ऑर्लिन्स याच्याकडे तरुण दयुमाला लेखक म्हणून काम करायची संधी मिळाली. तिथे काम करताना दयुमाने काही नियतकालिकांसाठी लेखन करण्यास सुरुवात केली. दयुमा हे खरे तर दयुमाच्या आजीचे माहेरचे आडनाव आणि तेच नाव त्याने लेखन करताना धारण केले. दयुमाची आजी ही हैटीयन वंशाची होती.

पुढे दयुमाने नाटक लिहिण्यास सुरुवात केली. त्याचे पहिले नाटक हेनरी तिसरा आणि त्याचे कोर्ट हे 1829 साली रंगभूमीवर आले आणि त्याला प्रचंड यश मिळाले. त्याचे आणखी एक नाटक ख्रिश्चिन पुढच्याच वर्षी रंगभूमीवर आले आणि त्यालाही उत्तम यश मिळाले. त्यामुळेच मग दयुमाने पूर्ण वेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला. 1930 च्या फ्रेंच राज्यक्रांतीत दयुमाने सक्रिय भाग घेतला. या राज्यक्रांतीमुळे दयुमाचा पूर्वीचा आश्रयदाता लुई फिलिप हा राजा बनला.

1930 पर्यंतचा काळ हा फ्रान्सच्या राजकीय जीवनात अस्थिरतेचा काळ होता. मग जेव्हा हळूहळू स्थैर्य प्रस्थापित झालं तेव्हा उद्योगीकरणाला सुरुवात झाली आणि त्याने वेग घेतला. फ्रान्सची आर्थिक स्थिती सुधारायला लागली आणि तेव्हाच वृत्तपत्रांवरचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे हा काळ नियतकालिके आणि वृत्तपत्रांसाठी सुगीचा ठरला. त्यावेळी कादंबर्‍या क्रमश: प्रसिद्ध व्हायच्या.

त्यामुळे त्यांचीही मागणी वाढली आणि म्हणून दयुमा कादंबरी लेखनाकडे वळला. त्याची पहिली कादंबरी ही ल कॉम्पतेस सॅलिसबरी ही जुलै 1836 ते सप्टेंबर 1836 या काळात क्रमश: प्रसिद्ध झाली. 1838 मध्ये दयुमानं त्याच्याच एका यशस्वी नाटकाचं क्रमश: प्रसिद्ध होणार्‍या कादंबरीत रुपांतर केले. या कादंबरीचे नाव होते कॅप्टन पॉल. दयुमाच्या बहुतेक कादंबर्‍या या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या साहसकथा होत्या.

आपली राजकीय मते दयुमा अतिशय आक्रमकपणे मांडायचा. 1850 च्या सुमारास जेव्हा लुई नेपोलियन हा फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष झाला. दयुमाचं त्याच्याशी कधीच जमले नाही. त्यातच त्याच्या कर्जदात्यांचा त्याच्या मागे तगादा लागला होता. या दोन्ही कारणांमुळे दयुमाने फ्रान्स सोडला आणि बरीच वर्षे मग तो फ्रान्सच्या बाहेरच होता. तेव्हा त्याने भरपूर प्रवास केला. बेल्जियम, इटली, जर्मनी, रशिया ते अगदी इंग्लंडपर्यंत.

दयुमाचा स्वभाव तसा स्वस्थ बसणार्‍यांतला नव्हता. त्यामुळेच त्याने इटलीच्या एकीकरणाच्या लढाईत सक्रिय भाग घेतला. त्यावेळेला त्याची प्रसिद्ध इटालियन नेता गॅरिबाल्डीशी मैत्री झाली. तिथे त्याने इंडिपेन्डन्ट या वृत्तपत्राची स्थापना केली आणि काही काळ त्याचे संपादनही केले. जवळजवळ 13 वर्षांनी म्हणजेच 1864 साली दयुमा फ्रान्सला परतला. फ्रान्सला परतल्यावर त्याने इटलीबद्दल प्रवासवर्णने प्रकाशित केली.

अलेक्झांडर दयुमाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी थोडेसे! 1 फेब्रुवारी 1840 रोजी दयुमाने इडा फेरीअर या तरुणीशी लग्न केले. तिच्या मृत्यूपर्यंत ते एकत्रच होते, पण त्यांना मुलबाळ नव्हते. असे असले तरीही दयुमाचे इतर अनेक स्त्रियांशी संबंध होते. ही संख्या 40 च्या घरात आहे. अशा स्त्रियांपासून त्याला चार मुलेही झाली. त्यातला अलेक्झांडर हा पुढे कादंबरीकार आणि नाटककार म्हणून नावारूपाला आला.

1866 च्या सुमारास दयुमाचे ऍडा मेनकेन या सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्रीबरोबरचे प्रेमप्रकरण अतिशय गाजले. ती त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान होती. अलेक्झांडर दयुमाचा 5 डिसेंबर 1870 रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याचे त्याच्या जन्मस्थळी दफन केले गेले. आज दयुमाचे पॅरिसच्या बाहेर असलेले घर त्याचेच म्युझियम म्हणून प्रसिद्ध आहे.

पॅरिस मेट्रो स्टेशनला दयुमाचे नाव देण्यात आले आहे. 2002 साली दयुमाच्या जन्माच्या द्विशताब्दी वर्षाच्या मुहूर्तावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष जॅक्वेल शिरास यांच्या अध्यक्षतेखाली दयुमाच्या पार्थिव देहाच्या रक्षेला पँथिऑन या दफनभूमीत परत दफन करण्यात आले. फ्रान्सचा इतिहास बदलण्यात ज्या काही लोकांनी मोलाचे योगदान दिलेले आहे, अशा मान्यवर लोकांची दफनभूमी म्हणून ही दफनभूमी अतिशय प्रसिद्ध आहे.

अलेक्झांडर दयुमा हे जागतिक वाङ्मयातील एक अचाट आणि अफाट व्यक्तिमत्व. त्याच्या 68 वर्षाच्या आयुष्यात दयुमाने प्रचंड लेखन केले. एका अभ्यासकाने असे सिद्ध केले आहे की त्याच्या लिखाणाची पृष्ठसंख्या जवळजवळ 1,00,000 एवढी भरते. दयुमाचे लेखनही चतुरस्त्र होते. कथा, कादंबर्‍या, राजकीय विश्लेषण, नाटके, ललित लेखन, प्रवास वर्णने, निबंध इत्यादी. उमराव घराण्यात जन्म झाला असूनही दयुमा हा मिश्र वंशाचा असल्यामुळे त्याला आयुष्यभर भेदभावाचा सामना करावा लागला आणि हे शल्य तो कधीच विसरू शकला नाही.

दयुमाचा चाहतावर्ग नेहमीच मोठ्या संख्येचा होता आणि आहे. वेगवेगळ्या स्तरातील अनेक लोकं त्याचे चाहते होते आणि आहेत. यात मोठमोठे लेखक, नाटककार, टीकाकार, विचारवंत, तत्वज्ञानी, राजकीय पुढारी यांचा समावेश होतो. प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ याने असं म्हटलं आहे की, दयुमा म्हणजेच कलेचं शिखर! दयुमाच्या रोमान्स पठडीतल्या कादंबर्‍या आणि त्याची नाटकं यांची कोणीच बरोबरी करू शकणार नाही.

जगप्रसिद्ध फ्रेंच लेखक व्हिक्टर हयुगोनं असं म्हटलं आहे की, अलेक्झांडर दयुमा हा केवळ फ्रेंच किंवा युरोपियन नव्हता तर तो वैश्विकच होता. इतक्या वर्षांनंतरही दयुमाच्या अनेक प्रसिद्ध कादंबर्‍या आजही आवडीने वाचल्या जातात. द थ्री मस्केटीयर्स, ट्वेंटी यीअर्स आफ्टर, टेन यीअर्स लेटर (ज्यात द मॅन इन दी आयरन मास्कचा समावेश होतो), द ब्लॅक टुलिप, द वुमेन्स वॉर, जॉर्जेस या दयुमाच्या काही जगप्रसिद्ध कादंबर्‍या आणि अर्थातच दयुमाची सर्वात लोकप्रिय आणि जगविख्यात असलेली कादंबरी म्हणजेच द काऊंट ऑफ मॉन्टी क्रिस्टो. या कादंबर्‍यांच्या नवनव्या आवृत्त्या अजूनही सतत निघतात आणि हातोहात खपतात. जागतिक वाङ्मयामध्ये जे काही थोडे अलौकिक लेखक होऊन गेले त्यात दयुमाला मानाचे स्थान मिळालेले आहे.