घरफिचर्ससारांशफेसबुकवर व्हायरल होण्यासाठी हवे फक्त नशीब!

फेसबुकवर व्हायरल होण्यासाठी हवे फक्त नशीब!

Subscribe

व्हायरल हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. दिवसातून एकदा तरी आपल्या कानावर हा शब्द येतोच. आपण ही पोस्ट व्हायरल करू, असेही काहीजणांना सांगताना आपण ऐकलेच असेल. पण असं ठरवून काहीच व्हायरल होत नाही. स्वतःच उठून 100 ग्रुपवर अकारण पोस्ट शेअर करणे याला व्हायरल होणे म्हणत नाही. अनेक लोक अशा पोस्टला कंटाळूनच तो ग्रुप सोडून जातात. त्यातून मूळ उद्देश तर साध्य होतच नाही पण आपले युजर्सही आपल्यापासून दुरावतात. त्यामुळे तसे न करणे कधीही चांगले. फेसबुककडून दर तिमाहीला ट्रान्सपरन्सी रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. सध्या तरी अमेरिकेतील युजर्सच्या फेसबुकवरील वर्तणुकीवर आधारितच हा रिपोर्ट तयार केला जातो. पण तो समजून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे. कारण हा रिपोर्ट बघितल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात येते की, एखादी पोस्ट फेसबुकवर व्हायरल होण्यासाठी सर्वात महत्वाचे काय लागते तर ते म्हणजे नशीब. त्यामुळे तुम्ही एखादी छानशी पोस्ट तयार करून ती केवळ आपल्या हँडलवर अपलोड करू शकता. ती फेसबुकवर व्हायरल होणार की नाही हे फक्त आणि फक्त तुमचे नशीबच ठरवू शकते.

फेसबुकचे जवळपास 2 अब्ज अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. यापैकी प्रत्येक युजरला रोज इतरांच्या सरासरी 1000 पोस्ट दाखविल्या जातात. त्याला फेसबुकच ‘कँडिडेट पोस्ट’ म्हणते. या सगळ्यामधून एखादी पोस्ट व्हायरल होणे हे वाटते तितके सोप्पे नक्कीच नाही. पण नक्की कोणत्या प्रकारच्या पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाल्या आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्यातूनही आपल्याला बरेच काही शिकता येऊ शकते. फेसबुककडून दर तिमाहीनंतर ट्रान्सपरन्सी रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. या रिपोर्टमध्ये त्या तिमाहीमध्ये सर्वाधिक गाजलेल्या किंवा सर्वाधिक व्ह्यूज मिळालेल्या 20 पोस्टची यादीही असते. त्याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून कोणत्या वेबसाईटवर सर्वाधिक ट्रॅफिक गेले याची माहिती दिलेली असते. फेसबुकवरील सर्वाधिक बघितलेली गेलेली पेजेसची यादीही रिपोर्टमध्ये दिलेली असते.

- Advertisement -

जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीचा रिपोर्ट फेसबुकच्या ट्रान्सपरन्सी साईटवर प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टनुसार, अमेरिकेत फेसबुकचे व्ह्यूज हे प्रामुख्याने मित्र, नातेवाईकांच्या पोस्टला मिळतात. त्याची टक्केवारी 54 इतकी आहे. म्हणजे फेसबुकच्या एकूण व्ह्यूजपैकी निम्म्यापेक्षा जास्त व्ह्यूज हे केवळ मित्र आणि नातेवाईकांच्या पोस्टलाच मिळतात. यानंतर 18 टक्के व्ह्यूज हे ज्या ग्रुप्समध्ये आपण आहोत, तिथे प्रसिद्ध झालेल्या पोस्टला मिळतात. 15 टक्के व्ह्यूज जे पेजेस आपण लाईक केले आहेत. तिथे प्रसिद्ध झालेल्या पोस्टला मिळतात. आपण फेसबुकवर ज्या पद्धतीने अ‍ॅक्टिव्ह आहोत. त्यानुसार फेसबुकचे अल्गोरिदम आपल्याला काही पोस्ट दाखवत असते. या पद्धतीचे व्ह्यूज 12 टक्के इतके आहेत. हे प्रमाण बरेच आहे हे नीटपणे समजून घेतले पाहिजे. फेसबुक याला ‘अनकनेक्टेड पोस्ट’ म्हणते. इथे तुम्हाला काय दाखवायचे हे पूर्णपणे फेसबुक ठरवत असते. उर्वरित एक टक्का व्ह्यूज हे इव्हेंट्स किंवा प्रॉडक्टस प्रमोशनच्या पोस्टच्या माध्यमातून येतात, असे हा रिपोर्ट सांगतो.

फेसबुकच्या न्यूज फिडमध्ये कोणत्या स्वरुपाच्या पोस्टला सर्वाधिक व्ह्यूज मिळतात हे बघायचे झाल्यास त्याचे उत्तर एका वाक्यात देता येईल. ज्या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची लिंक दिलेली नसते, त्याला सर्वाधिक व्ह्यूज मिळतात. याच रिपोर्टनुसार, हे प्रमाण 86.5 टक्के इतके आहे. म्हणजे ज्या पोस्टमध्ये कोणतीही लिंक नाही त्याचे व्ह्यूज इतके आहेत. त्याचवेळी एखाद्या त्रयस्थ वेबसाईटची लिंक शेअर केलेल्या फेसबुक पोस्टला मिळणारे व्ह्यूज 13.5 टक्के इतके आहेत. या दोन्हीमधील अंतर खूपच बोलके आहे. आपल्याकडे अनेक न्यूज वेबसाईट फेसबुकवरील त्यांच्या पेजेसवर अगदी पाच पाच मिनिटाला एक एक लिंक शेअर करत असतात. ज्याचा खरंतर फारसा उपयोग नसतो. कारण लिंक असलेल्या पोस्ट शेअर केल्यावर त्याचे व्ह्यूज कमीच होतात. फेसबुकचे अल्गोरिदम अशा पोस्टचे वितरण मर्यादितच ठेवते. त्यापैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच पोस्टला चांगली एंगेजमेंट मिळते. हा रिपोर्ट बघितल्यावर तरी न्यूज वेबसाईट चालवणारे फेसबुकवरील पोस्ट कशा असल्या पाहिजेत याचा पुनर्विचार करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

- Advertisement -

आता ज्या पोस्ट जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत फेसबुकवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवून गेल्या त्या बघितल्यावर कोणत्या गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. त्याबद्दल बघूया. या प्रत्येक पोस्टमध्ये कोणते ना कोणते व्हिज्युअल आहे, हे नोंदवून घेण्यासारखे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यापैकी बहुतांश पोस्टमध्ये फेसबुकने दिलेल्या सुविधेचा वापर करून डिझाईन तयार करण्यात आली आहेत. कोणत्याही ग्राफिक डिझायनरने या पोस्ट तयार केलेल्या नाहीत. सध्या काही ग्राफिक डिझायनर्स वर्षाचे पैसे घेऊन ग्राहकांना सोशल मीडियासाठी डिझाईन्स तयार करून देतात. मग सणासुदीला, जयंतीदिनी, स्मृतीदिनी या पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्या जातात. पण त्याच्याही मर्यादा आहेत. अशा पद्धतीने छान ग्राफिक डिझाईन केले म्हणजे ती पोस्ट चांगली बघितली जाईल, असे ठामपणे सांगता येत नाही. कॅनव्हासच्या माध्यमातून घरच्या घरी फुकट तयार केलेल्या पोस्टही चालतात. त्यामुळे केवळ पोस्ट तयार करण्यावर किती खर्च करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे.

दुसरे म्हणजे युजर्सला प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करणार्‍या, त्यांना प्रतिसाद द्यायला लावणार्‍या पोस्टला चांगले व्ह्यूज मिळतात, असे या रिपोर्टमधून दिसते. केवळ एकतर्फी संवाद असलेल्या पोस्टला युजर्स फारसे बघत नाही. त्यासाठीच युजर्सला प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांना आठवणी सांगायला लावले पाहिजे ज्याचा उपयोग होऊ शकतो.

तिसरे म्हणजे तुम्ही फेसबुकवर दिवसाला 100 पोस्ट प्रसिद्ध करत असला तरी त्यापैकी एखादीच पोस्ट चालते. बाकी 99 पोस्टला फारशी एंगेजमेंट मिळत नाही. केवळ एकच पोस्ट खूप बघितली जाते. पण ही एक पोस्ट नेमकी कोणती हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आयडिया लढवून पोस्ट करत राहायला लागते.

फेसबुकचा जेवढा अवकाश आहे. त्यापैकी केवळ 0.1 टक्के इतक्याच पोस्ट सर्वाधिक व्ह्यूज मिळवून जातात. उर्वरित 99.9 टक्के पोस्ट या सर्वसाधारणच राहतात, असेही या रिपोर्टमध्ये लिहिले आहे. म्हणूनच मी म्हटलं की फेसबुकवर व्हायरल होण्यासाठी फक्त आणि फक्त नशीब हवे. बाकी कशाची फार मदत होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -