Homeफिचर्ससारांशAmerican : अमेरिकेतील आफ्रिकन -अमेरिकन समाजाचे लढे

American : अमेरिकेतील आफ्रिकन -अमेरिकन समाजाचे लढे

Subscribe

अलीकडेच मुंबईत आफ्रिकन-अमेरिकन अभ्यासक डॉ. एरॉन ब्रँट यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. हे व्याख्यान भायखळ्याचे भाऊ दाजी लाड म्युझियम आणि मुंबईतील अमेरिकन सरकारची वकिलात यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. व्याख्यानाचा विषय होता ‘City of Hope: Gandhi, King, and the 1968 Poor People’s Campaign’. अमेरिकेत आणि युरोपातील अनेक देशांत गांधीवाद बराच लोकप्रिय आहे. अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन चळवळीचे नेते डॉ. किंग तर गांधीवादी होते. अमेरिकेतील गुलामी जास्त भयानक की भारतातील जातीव्यवस्था याबद्दल काही अभ्यासक निष्कारण वाद घालतात. माझ्या मते दोन्ही व्यवस्था सारख्याच निषेधार्ह आहेत.

-प्रा. अविनाश कोल्हे

आपल्या देशातील दलित समाज आणि अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समाज यांच्या स्थितीबद्दल, प्रगतीबद्दल नेहमी चर्चा होत असतात. या दोन्ही समाजघटकांना त्यांच्या समाजातील राजकीय-धार्मिक-सांस्कृतिक सत्ताधार्‍यांनी अनेक शतकं लुटलं, लुबाडलं. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून या दोन्ही घटकांच्या प्रगतीबद्दल चर्चा सुरू झाल्या.

या संदर्भात आपल्याकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समाजाचे नेते डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांचे नाव आदराने घेतले जाते. भारत सरकारने 1990 साली डॉ. बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ दिले. अमेरिकेने 1986 साली कायदा करून दरवर्षी ‘20 जानेवारी’ हा दिवस डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करायला सुरूवात केली.

या संदर्भात अलीकडेच मुंबईत आफ्रिकन-अमेरिकन अभ्यासक डॉ. एरॉन ब्रँट यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. हे व्याख्यान भायखळ्याचे भाऊ दाजी लाड म्युझियम आणि मुंबईतील अमेरिकन सरकारची वकिलात यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. व्याख्यानाचा विषय होता ‘City of Hope: Gandhi, King, and

the 1968 Poor People’s Campaign’. अमेरिकेत आणि युरोपातील अनेक देशांत गांधीवाद बराच लोकप्रिय आहे. अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन चळवळीचे नेते डॉ. किंग तर गांधीवादी होते. अमेरिकेतील गुलामी जास्त भयानक की भारतातील जातीव्यवस्था, याबद्दल काही अभ्यासक निष्कारण वाद घालत असतात. माझ्या मते दोन्ही व्यवस्था सारख्याच निषेधार्ह आहेत. 20 मार्च 1852 रोजी अमेरिकेत श्रीमती हॅरिएत बीचर स्टो या आफ्रिकन-अमेरिकन लेखिकेची ‘अंकल टॉम्स केबिन’ कादंबरी प्रसिद्ध झाली आणि अमेरिकेत खळबळ उडाली.

या कादंबरीत आफ्रिकन-अमेरिकन समाज किती हलाखीत जगतो, याचे चित्रण होते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 1855 साली कुमारी मुक्ता साळवे या शाळेत शिकत असलेल्या दलित मुलीचा ‘महार मांगांच्या दुःखाविषयी’ हा निबंध ‘ज्ञानोदय’मध्ये प्रसिद्ध झाला होता. असे अनेक तपशील दाखवता येतात ज्यातून या दोन भिन्न देशांत भिन्न संस्कृतीत जगत असलेल्या समाजघटकांना सारख्याच अन्याय-अत्याचारांना सामोरं जावं लागलं. मात्र आज या लेखात विसाव्या शतकातील अमेरिकेतल्या आफ्रिकन-अमेरिकन समाजाने आत्मसन्मानासाठी, आर्थिक उन्नतीसाठी, समान संधींसाठी दिलेल्या लढ्यांचा विचार करायचा आहे.

अमेरिकेत आजही आफ्रिकन-अमेरिकन समाजाच्या संदर्भात पुराणमतवादी विचारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. 1864 साली जरी अब्राहम लिंकन यांच्यामुळे गुलामी संपली खरी तरी प्रत्यक्षात ती अनेक प्रकारे वावरत होती, आजही आहे. 1896 साली आलेल्या अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिगामी निर्णयाचा उल्लेख करावा लागतो. ‘प्लेसी वि. फर्ग्युसन’ या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की आफ्रिकन-अमेरिकन समाजासाठी समान अभ्यासक्रम असलेल्या शाळा वगैरे योग्य जरी असले तरी ‘त्यांची मूलं’ आणि ‘आपली मूलं’ एकाच शाळेत शिकणार नाहीत.

1896 सालच्या या निर्णयामुळे अमेरिकेत आधीपासून असलेल्या दोन अमेरिकांना (एक अमेरिका आफ्रिकन-अमेरिकन समाजाची तर दुसरी अमेरिका गोर्‍या कातडींच्या समाजाची) कायदेशीर मान्यता मिळाली. यामुळे वेगळ्या शाळा, बसमध्ये वेगळ्या जागा, हॉटेल्समध्ये वेगळ्या कपबशा वगैरेंना मान्यता मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला seperate but equal असे गोंडस नाव दिले.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एका बाजूला आणि समाजातील स्थिती दुसरीकडे असे वास्तव अमेरिकेत दिसायला लागले. न्यायपालिकेचा निर्णय जरी अमान्य केला नाही तरी समाजाची मानसिकता बदलली नव्हती. या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणजे श्रीमती रोझा पार्क आणि बस बॉयकॉट. १ डिसेंबर 1955 रोजी श्रीमती रोझा पार्क नावाची चाळीशीची एक आफ्रिकन-अमेरिकन महिला बसमध्ये चढली. अमेरिकेतील बससेवा खासगी असते.

बस ड्रायव्हरने बसमध्ये तिला वेगळ्या जागेवर बसायला सांगितले. ड्रायव्हरला तिची सिट एका गोर्‍या प्रवाशाला द्यायची होती. तसं पाहिलं तर हे दृश्य नेहमीचंच होतं. पण त्या दिवशी रोझा पार्कच्या अंगात वेगळंच वारं संचारलं आणि तिने उठण्यास नकार दिला. ड्रायव्हरने बस सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेली. रोझा पार्कला अटक झाली, खटला झाला आणि नियमभंग केल्याबद्दल दहा डॉलर दंड आणि कोर्टाचा खर्च चार डॉलर असे चौदा डॉलर भरायला सांगितले. यानंतर रोझा पार्कच्या गावातल्या म्हणजे माँटगोमेरी गावातल्या आफ्रिकन- अमेरिकन समाजाने बसवर बहिष्कार टाकला.

सर्व समाज शाळेत नोकरी व्यवसायासाठी बसने जाणे येणे बंद करायला लागला. बघताबघता हे बहिष्काराचे गांधीवादी शस्त्र अमेरिकेतल्या इतर गावांतील आफ्रिकन -अमेरिकन समाजाने स्वीकारले. माँटगोमेरीतील बसचा बहिष्कार तब्बल 381 दिवस सुरू होता. शिवाय आफ्रिकन-अमेरिकन समाजाच्या स्थानिक संघटनेने बसच्या नियमांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने असे नियम ‘घटनाबाह्य आहेत’ असा निर्णय दिला. शेवटी बसकंपनीने नियम मागे घेतला.

या बहिष्कारातून डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर (1929-1968) यांचे नेतृत्व जगासमोर आले. डॉ. किंग ख्रिश्चन धर्मगुरू होते. त्यांच्यावर गांधीविचारांचा खोलवर प्रभाव होता. ते जेव्हा 1959 साली भारताच्या दौर्‍यावर आले होतेे तेव्हा मुंबईतल्या मणीभवनला आवर्जून भेट दिली होती. मणीभवन म्हणजे महात्माजींचं मुंबईतलं राहण्याचं स्थान. माँटगोमेरी बस बहिष्काराला मिळालेले यश बघून डॉ. किंग यांनी लढ्याची व्याप्ती वाढवत नेली. याचा पुढचा टप्पा म्हणजे 28 एप्रिल 1963 रोजी त्यांनी आयोजित केलेला March on Washington हा मोर्चा आणि या मोर्चासमोर त्यांनी दिलेलं I have a dream हे भाषण. या भाषणातल्या ओळी बघा ः

I have a dream that one day on the red hills of Georgia, the sons of former
slaves and the sons of former slave owners will be able to sit down together
at the table of brotherhood&.I have a dream that my four little children will
one day live in a nation where they will not be judged by the color of their
skin but by the content of their character. I have a dream today.

विसाव्या शतकातल्या महत्वाच्या भाषणांपैकी हे एक भाषण समजले जाते.

अमेरिकेतील प्रतिगामी शक्तींना हे बदल मान्य नव्हते. 4 एप्रिल 1968 रोजी त्यांनी डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांचा खून घडवून आणला. 30 जानेवारी 1948 रोजी महात्माजींचा झाला होता तसा. डॉ. ब्रँट यांचे व्याख्यान ऐकताना मला हे सर्व आठवत होते.