बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है…

amir khusro gulzar gulami movie amitabh bachchan smita patil
amir khusro gulzar gulami movie amitabh bachchan smita patil

छोटासा लम्हा है…

‘जिहाल-ए-मिस्कीन मुकून ब-रंजिश, बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है…सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है…’ हे ‘गुलामी’तलं गाणं. अतिशय अर्थपूर्ण आणि श्रवणीय. गेल्या 36 वर्षांपासून हे गाणं श्रोते ऐकताहेत. पण या गाण्याची खुमारी इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाहीये. वस्तुत: महान कवी अमीर खुस्त्रो यांच्या एका कवितेच्या प्रारंभीच्या ओळी गुलजारने या गाण्यासाठी वापरल्या आहेत.

जिहाल-ए- मिस्कीन मुकून बरंजीश, बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है… ए.जी.नडियादवाला निर्मित आणि जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘गुलामी’ हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा मी इयत्ता आठवीत शिकत होतो. दत्ता यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. यातली स्टारकास्ट अत्यंत तगडी होती. स्मिता पाटील-नसीरुद्दीन शाह-कुलभूषण खरबंदा-रझा मुराद-धर्मेंद्र-मिथुन चक्रवर्ती-रीना रॉय-अनिता राज अशा एकाहून एक सरस कलावंतांचा मेळा यात होता. महानायक अमिताभ बच्चनने सिनेमाचं निवेदन केलं होतं. राजस्थानमधलं ‘जातवास्तव आणी सरंजामी व्यवस्था’ हा या चित्रपटाच्या कथानकाचा मुख्य बिंदू. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि गीतकार गुलजार या जोडीचा हा दुसराच चित्रपट. या आधी त्यांनी 1977 मधल्या ‘पलकोंकी छांव में’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा सोबत काम केलं. गुलजारच्या ‘मीरा’ या चित्रपटाला आधी लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीत देणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली. मग पंडित रविशंकर यांनी संगीत दिलं.

‘जिहाल-ए-मिस्कीन मुकून ब-रंजिश, बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है…सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है…’ हे ‘गुलामी’तलं गाणं. अतिशय अर्थपूर्ण आणि श्रवणीय. गेल्या 36 वर्षांपासून हे गाणं श्रोते ऐकताहेत. पण या गाण्याची खुमारी इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाहीये. वस्तुत: महान कवी अमीर खुस्त्रो यांच्या एका कवितेच्या प्रारंभीच्या ओळी गुलजारने या गाण्यासाठी वापरल्या आहेत. फारसी आणि ब्रज या दोन भाषेत खुस्रोने ही कविता लिहिलीये. त्या ओळी अशा-

‘जिहाल-ए-मिस्कीन मकुन तगाफुल,
दुराये नैना बनाए बतिया,
के- ताब-ए-हिजरा न दरम ए जाना,
न लेहो काहे लगाए छतिया’.

या संपूर्ण कवितेत पहिली ओळ पारशी तर दुसरी ब्रज भाषेतली आहे. नयनबाणांचे शर मारुन, नजरेने घायाळ करून तू मला अगदी लाचार, गरीब करून टाकलेयस प्रिये…आता माझ्या अशा अवस्थेकडे का दुर्लक्ष करत्येस? तू मला खरं म्हणजे हृदयाशी घट्ट लावून घ्यायला हवं…असा या ओळींचा अर्थ. ही रचना भरदार नि पहाडी आवाजाचा पाकिस्तानी गायक उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनीदेखील आपल्या खास शैलीत गायली आहे. यू ट्यूबवर या गाण्याचा व्हिडीओदेखील उपलब्ध आहे. जिज्ञासू आणि रसिक वाचकांनी तो अवश्य पाहावा. त्याचप्रमाणे खुस्त्रोची ही रचना चक्क पार्श्वगायक मुकेश आणि गायिका सुधा मल्होत्रा यांच्या युगल स्वरांत देखील ध्वनिमुद्रित झाली आहे. मुरली मनोहर स्वरूप नामक एका संगीतकाराने ‘अमीर खुस्त्रो’ या नावाचा अल्बम 1960 मध्ये संगीतबद्ध केला होता. या अल्बममध्ये खुस्रो यांच्या काही कविता त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या तत्कालीन आघाडीच्या गायक कलावंतांकडून गाऊन घेतल्या. याच अल्बममधलं हे युगल गीतदेखील वैशिष्ठ्यपूर्ण आणि श्रवणीय झालं आहे. मुजफ्फर अली (अभिनेत्री रेखाचा ‘उमरावजान’ फेम) यांनी 2006 मध्ये ‘हुस्न-ए-जाना’ नावाचा अल्बम काढला. यातही छाया गांगुली ( रातभर आप की याद आती रही…या ‘गमन’ मधील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका) यांनी हे गाणं गायलं आहे. एकूण काय अनेक गायकांनी खुस्त्रोसाहेबांची ही रचना गाऊन अजरामर केलेली आहे !

अमीर खुस्रोच्या या कवितेवरून प्रेरणा घेऊन गुलजारने एका बहारदार द्वंद्व गीताला जन्म दिलाय. लता मंगेशकर आणि शब्बीरकुमार यांच्या युगल स्वरांतलं हे गाणं म्हणजे ‘गुलजार-लक्ष्मी-प्यारे’ यांचं एक अफलातून नि अनवट कॉम्बिनेशन होय. लताने गुलजारची अनेक आशयघन गाणी गायली आहेत. पण शब्बीरकुमार या रफीच्या आवाजाची नक्कल करणार्‍या (आणि समीक्षकांच्या मते भसाड्या आवाजात गाणार्‍या !) गायकाला गुलजारचे अल्फाज (शब्द) गायला मिळालेत यासाठी त्याने स्वत:ला धन्य समजलं पाहिजे! गुलामी प्रदर्शित झाला त्या काळात गुलजार गीतकार म्हणून फार सक्रिय होते. पण ‘गीतकार आनंद बक्षी’ हा लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडगोळीचा हुकुमी एक्का असल्याने त्यांनी इतर गीतकारांसोबत फार कमी काम केलं. साहजिकच ‘गुलजार-लक्ष्मीकांत प्यारेलाल’ अपवादानेच एकत्र आलेत. तसंही ‘गुलजार-राहुलदेव बर्मन’ या दुकलीने एव्हाना रसिक श्रोत्यांवर गारुड केलेलं होतं. श्रोत्यांचं नशीब थोरच म्हणावं लागेल की गुलामीच्या निर्मात्यांनी गुलजारची गीतकार म्हणून निवड करून एक हटके कॉम्बिनेशन आकारास आणलं. या अनवट गाण्याच्या शब्दांचा आस्वाद घेऊ या…

जिहाल-ए-मिस्कीन मुकून ब-रंजिश, बेहाल-ए-हिजरा बेचारा दिल है…
सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है…

वो आके पहलू में ऐसे बैठे, के शाम रंगीन हो गई है…
जरा जरासी खिली तबीयत, जरासी गमगीन हो गई है…

अजीब है दिल के दर्द यारो, न हो तो मुश्कील है जीना इसका…
जो हो तो हर दर्द एक हिरा, हर एक गम है नगीना इसका…

कभी कभी शाम ऐसे ढलती है, के जैसे घुंघट उतर रहा है…
तुम्हारे सीने से उठता धुआँ, हमारे दिल से गुजर रहा है…

ये शर्म है या हया है, क्या है ?
नजर उठाते ही झुक गयी है…
तुम्हारी पलको से गिरके शबनम,
हमारी आंखो में रुक गयी है…

( मी तुझा शत्रू असल्याच्या अविर्भावात नको ना पाहूस माझ्याकडे… आधीच माझं मन तुझ्या विरहाने लाचार नि कमकुवत झालंय… माझ्या मनातली स्पंदने तुला ऐकायला येताहेत ना… हे मन आता तुझंच झालंय… तो आला नि सारा माहोलच बदलून गेलाय…त्याच्या येण्यानं ही संध्याकाळ रंगीत झालीये… तर माझं मन थोडं प्रफुल्लीत तर थोडंसं उदासही झालं आहे…आपल्या मनाला लागलेली बिमारी असते विचित्रच…एकाचवेळी हवीशी आणि नकोशीही वाटणारी… असली तरी अडचण आणि नसली तर जगण्यात काही तरी कमतरता असल्याची जाणीव करून देणारी… या दु:खाची जातकुळीच न्यारी…ही दुखणी म्हणजे जणू काही जडजवाहीर नि हिरे-मोतीच…एखाद्या देखण्या ललनेचा पदर वार्‍याने हळूवार सरकत जावा तशी संध्याकाळ लयास जातेय… तुझ्या छातीतून निघणारा धूर माझ्या मनाला स्पर्श करून जातोय… याला काय बरं म्हणावं? लज्जा की विनयशीलता ? तुझा चेहरा जरासा वर झाला नि निमिषार्धात खाली…तुझ्या पापण्यांतून ओघळलेले तुषार माझ्या डोळ्यांमध्ये विसावले आहेत…असा काहीसा या गाण्याचा भावार्थ सांगता येईल. )
सार्वकालिक नि अभिजात प्रतिभावंत अमीर खुस्त्रोच्या कवितेवरून चिरंतन गाणं साकारणार्‍या गुलजारच्या प्रतिभेचा हा तरल आविष्कार ! गुलामीमध्ये मिथुनदा म्हणतो त्याप्रमाणे कोई शक ?

(लेखक डॉ. प्रवीण घोडेस्वार  हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कार्यरत आहेत)