घर फिचर्स सारांश आजच्या गीतकारांचा अमिताभ

आजच्या गीतकारांचा अमिताभ

Subscribe

अमिताभ भट्टाचार्य हा एक गीतकार आहे, ज्याला गायला आवडायचं खरं, पण त्याने ते सोडून आपली हीच कला पुढे जोपासण्याचा निर्णय घेतला, त्याला ज्यावेळी याबद्दल विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो की, मी कवी नाही, मी माझ्या आयुष्यात कधीच डायरीवर कविता लिहिली नाही, माझं काम खूप विशेष आहे, मला केवळ एक परिस्थिती आणि धून सांगा मी त्यावर गीत लिहून देतो. आपल्या कामाबद्दल अतिशय स्पेसिफिक असणं अमिताभ भट्टाचार्य याला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. त्याची खासियत त्याचं शब्दांच्या बाबतीत साधं राहणं आणि प्रचलित शब्दांचा वापर गाण्यांमध्ये करणं ही आहे.

–अनिकेत म्हस्के

भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक गीतकार होऊन गेलेत, ज्यांनी काही दशकं इथल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तुम्ही हजार एक गाणी लिहिली की त्यातली पन्नास एक गाणी तर हिट होतातच, म्हणून जेव्हा एखादा गीतकार दशकभर काम करतो तेव्हा त्याचे गाणे लोकप्रिय असतातच. पण मोजकेच असे गीतकार या इंडस्ट्रीत होऊन गेलेत किंवा सध्या अस्तित्वात आहेत, ज्यांनी मोजकीच गाणी लिहूनही लोकप्रियता मिळवली आहे. एक बंगाली माणूस ज्याचा मूळचा जन्म लखनऊचा, गायक बनायचं म्हणून स्वप्नांच्या शहरात येतो आणि अपघाताने गीत लिहितो. त्याचं ते गीत दिग्दर्शकाला आवडतं आणि ते गीत गाजल्यानंतर लोकप्रिय गीतकार जन्माला येतो. १९९९ साली मुंबईत आल्यानंतर पहिला ब्रेक मिळायला या व्यक्तीला तब्बल १० वर्षे वाट पाहावी लागली, प्रोडक्शन हाऊस आणि रेकॉर्डिंग स्टुडिओजच्या अनेक चकरा मारल्यानंतर त्याला २००८ साली पहिला ब्रेक मिळाला. तत्पूर्वी कुणीतरी मित्राने त्याची ओळख म्युजिक डायरेक्टर अमित त्रिवेदी सोबत करून दिली होती.

- Advertisement -

त्यावेळी अमित त्रिवेदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कार्यरत होता आणि त्याच्याकडे अमीर नावाच्या एका सिनेमाचं काम आलं होतं. राजकुमार गुप्ताच्या या सिनेमात त्याला पहिला ब्रेक मिळाला आणि त्यातली ६ गाणी त्याने लिहिली, पण हवी तेवढी प्रसिद्धी त्याला तेव्हा मिळाली नाही. अमित त्रिवेदी मात्र त्याच्या लिखाणावर खूश होता आणि त्याला त्याच्या पुढच्या सिनेमात त्याने पुन्हा संधी दिली, यावेळी दिग्दर्शक होता अनुराग कश्यप ज्याला या गीतकाराची भाषा आवडली होती. या व्यक्तीने अनुरागसाठी गाणी लिहिली आणि त्यातलं एक गाणं सुपरहीट झालं, तो सिनेमा होता अभय देओलचा देव डी आणि गाणं होतं, इमोशनल अत्याचार या एका ब्रेकनंतर गीतकाराला मागं वळून पाहण्याची गरज पडली नाही आणि इंडस्ट्रीला मिळाला एक असा गीतकार जो सोपं लिहून सुपरहिट गाणी देतो. असा गीतकार ज्याची गाणी आजच्या पिढीसाठी बनलीत, अशी गाणी जी तरुणाईला नाचवण्यासाठी, प्रेमात पाडण्यासाठी, दुःखातून बाहेर पाडण्यासाठी मदत करतात. तरुणाईच्या मनातील शब्द कागदावर उतरवणारा,या पिढीचा गीतकार आहे अमिताभ भट्टाचार्य.

सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये काम करणार्‍या प्रत्येक गीतकाराची आपली एक वेगळी ओळख आहे. स्वानंद किरकिरे असा गीतकार आहे जो अभिनय करतो, गातो आणि गाणी लिहितो, इर्शाद कामिल असा गीतकार आहे ज्याच्या गितामध्ये कविता दडलेली असते तर कौसर मुनीर अशी गीतकार आहे जी गीतांसोबत पटकथा किंवा संवाद देखील लिहिते. पण अमिताभ हा केवळ एक गीतकार आहे, ज्याला गायला आवडायचं खरं पण त्याने ते सोडून आपली हीच कला पुढे जोपासण्याचा निर्णय घेतला, त्याला ज्यावेळी याबद्दल विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो की, मी कवी नाही, मी माझ्या आयुष्यात कधीच डायरीवर कविता लिहिली नाही, माझं काम खूप विशेष आहे, मला केवळ एक परिस्थिती आणि धून सांगा मी त्यावर गीत लिहून देतो. आपल्या कामाबद्दल अतिशय स्पेसिफिक असणं अमिताभ भट्टाचार्य याला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. अमिताभ भट्टाचार्यची खासियत त्याचं शब्दांच्या बाबतीत साधं राहणं आणि प्रचलित शब्दांचा वापर गाण्यांत करणं ही आहे.

- Advertisement -

उदाहरणादाखल त्याने लिहिलेलं एक ‘दंगल’ सिनेमातलं गाणं आहे, बापू सेहत के लिए हानिकारक है, आता या गाण्याच्या वेळी आमिर खानने अमिताभ आणि प्रीतम दोघांनाही त्याच्या पंचगनीच्या फार्म हाऊसवर नेलं होतं. गाण्याची पार्श्वभूमी होती, ती म्हणजे गावातील दोन मुली आहेत जी आपल्या वडिलांच्या अत्याचारांबद्दल बोलताय, तो अत्याचार म्हणजे त्यांची शिस्त, आता या गाण्यासाठी त्यांनी फस गये रे बापू, हिटलर बापू, हंटरवाला बापू आणि मोगॅम्बो बापू यांसारख्या अनेक संकल्पना वापरल्या. पण तरीही त्या लिरीक्समध्ये तितकी मजा येत नव्हती, तेव्हा एकदा दुपारच्या जेवणानंतर बागेत फिरताना आणि सिगरेट ओढताना त्यांचं लक्ष त्या सिगरेटच्या पाकिटावर गेलं, जिथं लिहिलं होतं, धूम्रपान सेहत के लिए हानिकारक है, आता ही एक ओळ सामान्य माणसांच्या मनावर फिट बसलेली असल्याने त्यात त्यांनी धूम्रपान शब्द काढून बापू शब्द टाकला आणि पुढचं गाणं बनलं. याच दंगल सिनेमात त्यांनी धाकड नावाचं एक गाणं लिहिलं होतं, आता यातला धाकड हा शब्द देखील हरियाणा सारख्या भागात प्रचंड लोकप्रिय आहे.

अमिताभने केवळ साधंच लिहिलंय असं नाही, तर त्याच्यातसुद्धा कधीकधी गुलजारची छबीदेखील दिसते. तू सफर मेरा है तू ही मेरी मंज़िल तेरे बिना गुज़ारा ऐ दिल है मुश्किल, आता या गाण्याचे संपूर्ण लिरिक्स पाहिले की, यातसुद्धा गुलजार टाईप कविता अवतरते आणि ते गाणं देखील लोकांना भावतं. अमिताभ भट्टाचार्यच्या आयुष्यातील सर्वात अवघड काम त्याचं व्यावसायिकदृष्ठ्या सर्वाधिक अपयशी असलेलं काम होतं, बॉम्बे वेलवेट नावाच्या सिनेमात अमित त्रिवेदीसोबत अमिताभ भट्टाचार्याने तब्ब्ल १५ गाणी लिहिली होती, त्यावेळी जॅझ हा प्रकार हिंदी प्रेक्षकांना तितका कळत नव्हता आणि तो सिनेमा आपटला.

काही मोजकेच असे गीतकार असतात ज्यांचे बहुतांश गाणी हिट होतात किंवा सर्व अलबमच गाजतात. अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य ही अशी एक जोडी आहे ज्यांचे बहुतांश गाणे हे हिट झालेत. आमिर नंतर देव डी सिनेमातलं ते इमोशनल अत्याचार नावाचं गाणं आजही तितकच गाजतंय, त्यानंतर विक्रमादित्य मोटवानेच्या उडाण सिनेमासाठी त्याने गाणी लिहिली, ती सगळीच गाणी उत्तम होती पण विशेष म्हणजे आझादीया नावाचं ते गाणं अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल. यावर्षी त्याने हाऊसफुल, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, बॅण्ड बाजा बारात, अंजाना अंजानी सारख्या सिनेमातही गाणी लिहिली. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०११ साली दिल्ली बेली सिनेमातल त्याच भाग भाग डिके बॉस हे गाणं सुपरहिट झालं. आता अशा असंख्य गाण्यांची मोठी यादी देता येईल, पण तरीही काही अशी गाणी आहेत, जी यानेच लिहिली असतील यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही.

एकीकडे हा गीतकार डिके बॉस, रे मम रीती पम क्रिटिकल कंडिशनम, कॅरॅक्टर ढिलासारखी गाणी लिहितो तर त्याचवेळी दुसरीकडे अभी मुझ में कहीं सारखं गीत लिहितो. त्याने लिहिलेल्या काही सर्वोत्तम अल्बमपैकी माझे फेव्हरेट अल्बम म्हणजे ये जवानी है दिवानी, लुटेरा, ए दिल है मुश्किल, दंगल, जग्गा जासूस, केदारनाथ, कलंक, लाल सिंग चड्ढा, भूल भुलैय्या, ब्रम्हास्त्र, तू झूठी मै मक्कार आता हीच यादी इतकी मोठी बनलीय , यावरून त्याच्या कामाचा अंदाज येईल. म्हणूनच अमिताभ भट्टाचार्य हा सध्याच्या घडीचा एकमेव असा फुलटाईम गीतकार आहे, ज्याला प्रेक्षकांची नस गवसलीये आणि त्यामुळेच त्याचा हिट्सचा आकडा वाढत जातोय. प्रेक्षकांची गरज ओळखून त्यांना हवं ते डिलिव्हर करणारा गीतकार म्हणजे अमिताभ आणि म्हणूनच अमिताभ भट्टाचार्य हा आजच्या गीतकारांचा अमिताभ आहे.

- Advertisment -