अमोल पालेकर, आक्रीत आणि बरंच काही…

माणूस मुदलात हिंसक आणि कमालीचा हलकट असतो. हे चांगलं वाईट त्याच्यातच असतं. कायदा आणि समाज बंधनामुळे माणसातलं जनावर नियंत्रणात राहतं, असं तेंडुलकर म्हणतात. मिळतं तेव्हढं सुख ओरबाडणं माणसाच्या स्वभावातचं असावं, मग ते शरीर किंवा इतर पातळीवरचं का असेना. अशा थाटात जगण्याच्या नावानं स्वतःला फसवणार्‍या माणसांमुळे आक्रीत घडतं. गोलमालमध्ये रामप्रसाद दशरथप्रसाद शर्माचे करूण डोळे आक्रीतमध्ये कमालीचे भेसूर गोठलेले असतात. ही अमोलच्या थंड डोळ्यांची कमाल असते.

पिकासोच्या चित्रातली वेडीवाकडी माणसं ‘आक्रित’च्या पडद्यावर अमोलने 1981 मध्ये उतरवली. मंटो, नामदेव ढसाळ आणि प्रेमचंद यांची स्त्री पात्र वरवंट्यावर निर्दयपणे चिरडून टाकल्यावर जो लाल तांबडा, काळसर बाई नावाचा गोळा उरतो त्याला तेंडुलकरांनी लिहिलेली आक्रितमधली हातभट्टी दारू गळणारी रुही म्हणता येईल. हा गोळा पाहून हिरव्या पडत चाललेल्या देठाच्या पानाची लालसर जीभ तोंडातल्या तोंडात फिरवणार्‍या मुगूटरावाला अमोल पालेकर म्हणा किंवा अमोलला मुगूटराव म्हणावं. हे दोन वेगळे असल्याबाबत शंका यावी इतका घुसमट करणारा भीषण अनुभव आक्रितमध्ये अमोलने पडद्यावर दिलेला असतो.

हा नीच हलकटपणा इतका बेमालूमपणे त्याने साकारलेला असतो की त्याचा ‘गोलमाल’मधला रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा आवडल्याची लाज वाटावी… मानवत हत्याकांड प्रकरणावर विजय तेंडुलकरांनी आक्रीतची कथा लिहिलेली असते. त्यातला डार्क ग्रे शेडमधला मुगूटराव मध्यम वयाचा हिरवट निस्तेज चेहर्‍याचा असावा. गालावरच्या हाडामागे दारूमुळे किंचित सूज असावी, त्यावर डोळ्याच्या कोपर्‍यापर्यंत जाणारे भेसूर वांग डागाचे पट्टे असावेत…हा चेहरा माणूस नाव दिलेल्या नामदेवच्या कोवळ्या कलेजीची शिकार करून शेवटच्या बसची वाट पाहणार्‍यांचा म्होरक्या ठरावा, अशा मुगूटरावचा असावा. त्याच्या आक्रीतमधल्या पडद्यावरच्या ‘निच्चड’पणाला मर्यादा नाही. पाच पन्नास बेंबीच्या टोकापासून दिलेल्या शिव्या पायथ्याशीच दम तोडाव्यात इतक्या निगरगठ्ठ विक्राळ डोंगराचं नाव मुगूटराव असावं. ‘भाडखाव’, ‘भडव्या’ आणि ‘भडवेचू’ या शिव्यांना सोबत करणारी सिगारेट मुगुटरावाच्या तोंडात कायम…सरपंच मुगूटरावात दानत कमालीची आहे.

पोलीस, गावकरी सरकारी कारकुंडे कम अधिकार्‍यांना तो कायम लाचेची सिगारेट ऑफर करतो. अशा कित्येक बाया त्यांनं फुकून मोजडीखाली चिरडल्या असून सिगारेट्सच्या बंद पाकिटात विकत घेतलेली माणसं भरून सदर्‍याच्या खिशात ठेवली आहेत. आपल्या प्रतिष्ठा पदाच्या बळावर बाई वापरणं हा त्याचा पुरुषदत्त अधिकार आहे आणि त्यासाठी अडली नडली ‘बाई ठेवणं’ हे सोशलवर्क असल्याचा मुगूटरावचा विश्वास आहे. ठेवलेल्या काळ्या सावळ्या रुही (चित्रा पालेकर) ला उतार वयात सांभाळायला ‘पोटाला पॉर’ हवंय …‘म्हातारपनात लाथ घाललं, पन भाकरतुकडा बि घालंल’, असं तिचं जगणं ओढण्याचं तत्वज्ञान आहे. मुगुटरावाकडून तिला लेकरू हवंय, त्यासाठी त्यानं तिला ‘ठेवणं’ इतकीच तिची गरज आहे. ही हतबलताचं तिच्या जगण्याचा नाईलाजी धागा आहे…त्यासाठी तिनं पारावरच्या देव मुंजाला कोवळ्या पोरीच्या नरबळीचा वायदा केलाय. तर मुगूटरावाला गुप्तधनासाठी बळी विधी पार पाडायला पारध्यांची गरज आहे. आक्रीतचा पडदा जिवंत माणसांची नावं असलेल्या भेसूर, हतबल ‘मुडद्यां’नी भरलेला असतो.

माणूस मुदलात हिंसक आणि कमालीचा हलकट असतो. हे चांगलं वाईट त्याच्यातच असतं. कायदा आणि समाज बंधनामुळे माणसातलं जनावर नियंत्रणात राहतं, असं तेंडुलकर म्हणतात. मिळतं तेव्हढं सुख ओरबाडणं माणसाच्या स्वभावातचं असावं, मग ते शरीर किंवा इतर पातळीवरचं का असेना. अशा थाटात जगण्याच्या नावानं स्वतःला फसवणार्‍या माणसांमुळे आक्रीत घडतं. गोलमालमध्ये रामप्रसाद दशरथप्रसाद शर्माचे करूण डोळे आक्रीतमध्ये कमालीचे भेसूर गोठलेले असतात. ही अमोलच्या थंड डोळ्यांची कमाल असते. निळू फुलेंचा सखाराम बाईंडर न पाहिल्याची खंत अमोल पालेकरांचा आक्रीत पाहिल्यावर निकालात निघाली. अशोक कुमार, दिलीप कुमार, अमिताभ, राजकुमार, प्राणसाहेब यांच्याकडे संवाद लेखकाने खास लिहिलेली जबराट शब्दरचना डायलॉग्जची फेक असते. अमोलने हे काम त्याच्या डोळ्यांनीचं बरेचदा ‘पडद्यावरच्या मौना’तून किंवा हिरॉईनच्या बापाच्या आदेशावर केवळ होकारार्थी मान हलवून केलेलं असतं.

‘मैने कहा और तुम चली गयी’….घरोंदामधल्या जरीना वहाब सोबतच्या या संवादात अमोलचे केवळ डोळेच पाहावेत…किंवा ‘एक अकेला इस शहर में…’ गाण्यात त्याचं सगळ एकाकीपण त्याच्या डोळ्यात तुडुंब काठोकाठ भरून यावं….

घरोन्दामध्ये छाया (जरीना वहाब)ला मिस्टर मोदी (डॉक्टर लागू)च्या ताब्यात देऊन स्वतःच ओझं या ‘एक अकेल्या’नं स्वतःच्या जड झालेल्या पायावर उचललेलं असतं. स्टेशनवर ट्रेनकडे निघालेला सुदीप नावाचा अमोल सिनेमात ‘दुसरी’ चूक करत नाही, हे नितळ मनाच्या पश्चातापदग्ध सामान्य सुदीपचं खरं जगणं असावं. पंकज कपूर, बलराज साहनी, अशोक कुमार आणि अमोल पालेकर हे संवाद फेकीची गरज नसलेले डोळ्यातून बोलणारे अभिनेते असावेत.

ऐंशीच्या दशकात गिरगाव, दादर, बोरिवलीत राहणार्‍या साध्या माणसाला अमोलने पडद्यावरचा हिरो बनवलं. आजच्या काळात न मिळालेल्या विंडो सीटकडे आशाळभूत नजर टाकून चौथ्या सीटवरून किंवा लोकलच्या दारात मधल्या खांबाला टेकून खांद्याला लटकलेली बॅग सावरत स्वतःमधल्या अमोल पालेकरला तुम्ही आता थेट नालासोपारा विरार, कल्याण डोंबिवलीपर्यंत नेऊ शकता. मुंबईतल्या डबल डेकर बसमध्ये असाल आणि बाजूला खिडकीतून बाहेर पाहणारी तुमची ‘विद्या सिन्हा’ सोबत असेल तर तिचं तिकीट काढू शकता…हे सगळं तुम्हाला रोजचं अतिसामान्य जगणं वाटतं असलं तरी तुम्ही हिरो असू शकता. हा विश्वास अमोलच्या सिनेमांनी तिकीट बारीवर कधीचाच सिद्ध केलेला असतो.

शाळेत असताना पालेकरांची मृगनयनी दूरदर्शनच्या नॅशनल नेटवर्कवर पहिली होती. ‘आ बैल मुझे मार’ शनिवारी दुपारी चार वाजता राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित व्हायचं, यात पैशांचा लोभ नाही, पण थोडे जादा पैसे मिळवून किरकोळ इच्छांचं थोडं जादा सुख पदरात पाडण्याच्या प्रयत्नात आपल्या साधेसरळपणामुळे अंगावर ओढवून घेतलेल्या ‘आमिषाच्या बैलाला’ थोपवताना सामान्य माणसाची उडालेली त्रेधातिरपीट होती. अमोल पालेकर नावाचा हा माणूस अजूनही पडद्यावर पुरेसा उलगडलेला नाही. बरंच काही उरलं आहे त्याच्या डोळ्यात जे अजून समोर आलेलं नाही.

अमोल पालेकर यांच्याविषयी…

अमोल पालेकर यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यामागे एक खास व्यक्ती होती. ती दुसरी कोणी नसून त्याची मैत्रीण चित्रा होती. चित्रा थिएटरमध्ये आर्टिस्ट होत्या. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी ते थिएटरमध्ये आले. मग, अशी वेळदेखील आली जेव्हा दोघांनाही वाटले की, आपण आपले नाते आता पुढे नेले पाहिजे. अमोल पालेकर आणि चित्रा यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमामागे दोघांची आवड ही एकच होती. अमोल हे खूप चांगले चित्रकारही आहेत. चित्रा यांनादेखील कलेची आवड होती. दोघांनीही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अमोल पालकर पुन्हा चित्रा यांच्यासोबत थिएटर रिहर्सलला जाऊ लागले. येथेच एके दिवशी अमोल पालेकर यांची सत्यदेव दुबे यांच्याशी भेट झाली, ज्यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा दिली.

दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांना अमोल पालेकर यांना एका चित्रपटासाठी कास्ट करायचे होते, ज्यात जया बच्चन त्यांच्यासोबत असणार होत्या. पण, अमोल यांनी नकार दिला. यानंतर बासू चॅटर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. अखेर बरीच समजूत काढल्यानंतर अमोल पालेकर यांनी चित्रपट साईन केला. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि अमोल पालेकर यांच्या करिअरला सुरुवात झाली. 1974 मध्ये बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एक अभिनेता म्हणून त्यांनी ‘चितचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवी की शादी’, ‘बातों-बातों में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान-श्रीमती’ असे अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. ते बहुतेक चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय समाजातील व्यक्ती त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसत असे.

अमोल पालेकर यांनी हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही खूप काम केले. काही चित्रपटांतून स्वतः अभिनय करण्याबरोबरच मराठीतील अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. विनोदी चित्रपटांबरोबरच अनेक चित्रपटांतून त्यांनी गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या. अमोल पालेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल पालेकर हे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क होते. ते चांगले चित्रकारही आहेत.