घरफिचर्ससारांशलालपरीची अमृतमहोत्सवी शान !

लालपरीची अमृतमहोत्सवी शान !

Subscribe

1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 74 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच पुढील संपूर्ण वर्ष हे एसटीचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे. याच दिवशी एसटीची पहिली गाडी पुणे-नगर या मार्गावर धावली. याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून बरोबर 74 वर्षांनी महामंडळाची इलेक्ट्रिक बस याच पुणे-नगर मार्गावर १ जूनला धावणार आहे. हा दुग्धशर्करा योग महामंडळाने साधला आहे. आज एसटीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आरामदायी गाड्या आहेत. नवीन आलेल्या माइल्ड स्टीलच्या बांधणीच्या गाड्या आहेत. वातानुकूलित, बिगर वातानुकूलित अशाही काही गाड्या आहेत. खेड्यापासून शहरांपर्यंत जनसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त तिच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.

1950 रोजी प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण झालं आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली. लाल पिवळ्या रंगाची ओळख सांगणारी एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात राज्याची ध्येयधोरणे घेऊन ग्रामीण जनतेपर्यंत पोहचू लागली. केवळ एसटीमुळेच महाराष्ट्रातील गावं एकमेकांशी जोडली गेली. ग्रामीण भागात जी काही शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचली ती केवळ लोकवाहिनी एसटीमुळेच. एसटी ग्रामीण जनतेची रक्तवाहिनी झाली. चुल आणी मुल या चौकटीतून मुलींना शिक्षणाच्या दारापर्यंत एसटीने पोहचवले हे विसरता कामा नये. सुप्रसिद्ध नाट्य लेखक राजेश देशपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी लालपरीच्या 72 व्या वाढदिवसा निमित्ताने कवीतेतून शुभेच्छा दिल्या होत्या त्या खूप काही एसटीबाबत कृतज्ञता व्यक्त करणार्‍या आहेत. गंमत म्हणजे कवी एसटीला लाडीकपणे आज्जी असे संबोधित म्हणतो.

कवीतेतील काही निवडक ओळी. 72 वर्षांची झाली माझी आज्जी…पण कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला राजी ..अनवाणी तुडवले तीनं लयं उन्हाऴं ….डोईवर झेललं धोधो पावसाळं…थंडीमध्ये घातलं नाही कधी तीनं स्वेटर …रस्ता नाही चांगला तरी आडलं नाही खेटर …
पुढच्या ओळी एसटीची सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता दर्शवणार्‍या आहेत…राजेश देशपांडे सर कवीतेत पुढे म्हणतात, कव्हाच तीनं पाह्यला नाही धर्म जातपात…गरीब असो वा श्रीमंत.. घेतलं तीनं आत…
किती खरंय हे.. एसटीच्या प्रवासात विविध जाती धर्माची, असंख्य माणसं भेटतात…ओळखी होतात..चालक, वाहकाशी तर प्रवासात भावनिक नातं तयार होतं.
सहप्रवाशाबरोबर निर्माण झालेली नाती …एसटीच्या प्रवासात खिडकीतून दिसणारा निसर्ग, कंडक्टरशी सुट्ट्या पैशांवरून होणारी प्रेमळ भांडणं.. सकाळच्या प्रवासादरम्यान दिसणारी गुरढोरं.. हे सगळं एसटीच्या प्रवासातच शक्य होत़ं …एसटीच्या प्रवासात निसर्गाच्या अगदी जवळ जाता येतं हा प्रत्येकाचा अनुभव आहे. कवी पुढे लिहितात, समद्यांच्या सुरक्षेची चिंता तिला भारी. न चुकता असते तिची… गावोगावी वारी..
आज एसटीवर अनेक खासगी धनदांडग्या प्रवासी वाहतुकीची आक्रमण होत आहेत, पण तरीही एसटी आपली सामाजिक बांधिलकी जोपासून अविरतपणे धावते आहे. कवीच्या सद्य:स्थितीवर भाष्य करणार्‍या शेवटच्या ओळी खूप समर्पक आहेत.. आणि लाल डब्बा म्हणून लालपरीला हिणवणार्‍यांसाठी झणझणीत अंजन घालणार्‍या आहेत…आज लोकांकडे गाड्या आल्यात..तरीही कवी म्हणतात..
पैक्याच्या जोरावर कितीही गाड्या नटवा..शेवटी कामी येणार आपल्या एसटी आज्जीचाच बटवा..
एसटीचा संपूर्ण प्रवास अधोरेखित करणारी ही राजेश देशपांडे यांची कविता.

- Advertisement -

75 रीकडे झुकलेली ही एसटी आज्जी … महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरलेला एसटीचा पसारा. आज्जीला अगदी नातवंडे, पणतवंड ही वेगवेगळ्या अद्ययावत गाड्यांच्या रुपात मिळालेली आहेत, पण हे सहज शक्य झालेले नाही. 1 जून 1948 साली पहिली एसटी नगरहून तीस प्रवासी घेऊन पुण्याला निघाली. या पहिल्या ऐतिहासिक प्रवासी वाहनाचे चालक होते किसन राऊत व वाहक होते लक्ष्मण केवटे. वाहक केवटे यांनी पहिलं 9 पैशाचं तिकीट फाडून गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांना दिलं. केवटे यांनी गाडीला डबल बेल देताच महाराष्ट्राचा हा प्रगतीचा रथ पुण्याच्या दिशेने झेपावला आणि राज्याच्या प्रगतीची चाकं या सरकारी वाहनाच्या रूपानं धावू लागली.

पहिली गाडी पुण्यात येईपर्यंत ठिकठिकाणी लोकांनी हे प्रवासी वाहन बघण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या गावात हे सरकारी वाहन यावं यासाठी सगळा गाव अंगमेहनत करून रस्ता तयार करत असे व ज्या दिवशी हे वाहन पहिल्यांदाच गावात येणार तो दिवस गावकर्‍यांसाठी सणासारखा असे. वाहनाची महिलांकडून ओवाळणी केली जायची. गावागावात या वाहनांची मागणी वाढू लागली.

- Advertisement -

एसटी सेवा सुरू झाल्यावर अनेक वर्षं गावात एसटी स्टॅण्ड नव्हते, डेपो नव्हते. गावच्या एखाद्या नाक्यावर रात्रवस्तीची गाडी उभी करून ठेवायची. या गाडीत चालक वाहक झोपत असतं. आज शहरात घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत धावणारी माणसं आपण पाहतो, मात्र त्यावेळी ग्रामीण भागात एसटीच्या वेळेनुसार घड्याळाचे काटे फिरत असत. एसटी गेल्यानंतर किती वाजले असावेत हे समजत असे.

एसटीचा हा अमृतमहोत्सवी वर्षापर्यंतचा प्रवास सोपा नाहीय. खासगीकरणाचे संकट तर एसटीच्या पाचवीलाच पुजलेले आहे. या संकटांवर मात करत एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावते आहे. साधारण 18 हजार विविध प्रकारच्या बसेस, लाखांच्या आसपास कर्मचारी, 65 लाख किमी एसटीचा रोजचा प्रवास, 609 बस स्थानके, 250 स्वतंत्र डेपो, तीन प्रादेशिक कार्यशाळा, 3374 मार्गस्थ थांबे, 22 कोटींचे दररोजचे उत्पन्न हा एसटीचा एकूण कारभार थक्क व अचंबित करणारा आहे. आज एसटीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आरामदायी गाड्या आहेत. नवीन आलेल्या माइल्ड स्टीलच्या बांधणीच्या गाड्या आहेत. वातानुकूलित, बिगर वातानुकूलित अशा ही काही गाड्या आहेत. विठ्ठल भक्तांसाठी खास विठाई गाडी सुरू केलेली आहे.

एसटीने समाजातील ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सेनानी, अपंग, पत्रकार, आजारी व्यक्ती यांना तिकीट दरात सवलती दिलेल्या आहेत. बिरसामुंडा पुनर्वसन प्रकल्पात शरण आलेल्या नक्षलवादी तरुणांना नोकरी, बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत देशसेवा करताना शहीद झालेल्या वीरपत्नींना एसटीत नोकरी आदी उपक्रमांतून एसटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. 8 वी ते 12 वीच्या मुलींना गावापासून काही किलोमीटर दूर असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये जाता यावे म्हणून मानव विकास मिशन प्रकल्पाअंतर्गत निळ्या रंगाच्या गाड्या सुरू केल्या आहेत. या निळ्या बसेसचा दिवसभरात सुमारे 75 हजार विद्यार्थिनी विनामूल्य फायदा घेत आहेत.

मधली दोन वर्षे कोरोनाच्या गर्तेत संपूर्ण जग लढत असताना एसटीची चाकं थांबली होती. त्याचा ही प्रचंड परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झालेला आहेच, पण त्यातही ठाणे, मुंबईमध्ये कोरोनाच्या लढाईत एसटी सामाजिक बांधिलकी जोपासत रस्त्यावर आपत्कालीन व्यवस्था सांभाळत होती. कर्मचार्‍यांच्या पाच महिन्यांच्या चक्का जाम आंदोलनाची झळही उत्पन्नावर पडलेली आहे. आंदोलनाच्या कालावधीत तर खासगी गाड्यांची चांदी झालेली होती. लोकांनाही आता अनेक प्रवासाची साधनं उपलब्ध झालेली असल्यामुळे लालपरीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हे नाकारून चालणार नाही. हे जरी असलं तरी शहरांपेक्षा गावपाड्यावरील शेतकर्‍यांना, विद्यार्थ्यांना, नोकरदारांना एसटीची गरज आजही तितकीच आहे.

अनेक प्रतिभावंत साहित्यिक, गावगाड्यातून ..तांड्याच्या वस्तीतून केवळ एसटीच्या जीवावर मोठी झालेली माणसं आजही एसटीबद्दलची आत्मीयता, कृतज्ञता व्यक्त करत आपल्या आठवणी जागवतात. शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी असताना खेड्यातून आलेले जेवणाचे डबे, खुशालीची पत्रं. त्यातून चालक व वाहक काकांशी निर्माण झालेलं भावनिक नातं. आजही असे अनेक लोक भेटले की एसटीबद्दल भरभरून सांगतात. रात्र वस्तीच्या गाडीच्या चालक वाहकांची तर त्या त्या गावात खास बडदास्त असायची, अर्थात आजही ते नातं गावाकडे आहे. एसटीबद्दलची कृतज्ञता असणारी पिढी हळुहळू संपत चाललीय. शहरातील तरूण पिढीला एसटीबद्दल फारसं माहीत नाही.

आजच्या तरुण पिढीला एव्हढंच सांगणं आहे, भले तुमच्याकडे गाड्या आल्यात, तुम्ही विमानाने फिरत असाल, पण तुमच्या बापजाद्यांनी याच एसटीच्या जीवावर प्रगती केलेली आहे, हे एकदा समजून घ्या. आजही एक ग्रामीण महाराष्ट्र आहे, त्याला एसटीची गरज आहे. आणि याच शेवटच्या माणसाला घेऊन जाण्याचे काम एसटी निश्चितच करत राहील. एसटी टिकवणे ही ग्रामीण भागातील प्रत्येक शेवटच्या माणसाची जबाबदारी आहे. कर्मचार्‍यांच्या आंदोलनात्मक भूमिकेमुळे जेव्हा एसटीची चाकं थांबली होती..लालपरीविना रस्ते अगदी सुनेसुने वाटतं होते..एसटी सुरू झाल्यावर आता एसटी स्थानकं गजबजू लागलीत.. रस्त्यावर लाल परीच्या येण्याजाण्याने महाराष्ट्रातील रस्तेही सुखावले आहेत.

कधीतरी हेच रस्ते दगड मातीचे होते ..उनपाऊस, वादळाचे तडाखे सहन करत एसटीने लाल धुरळा उडवत प्रवास केलाय. अनेक चढउतार पाहिलेत. आज राज्य प्रगतीच्या दिशेने जाताना जी काही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रगती या महाराष्ट्र मुलुखाची झालीय त्यात माझ्या लोकवाहिनी एसटीचा वाटा महत्वाचा आहे हे नाकारून चालणार नाही.

एकंदरीतच एसटीरूपी आज्जीच्या अमृतमहोत्सवी प्रवासाच्या वाटा बिकट आहेत. या बिकट वाटा सुखकर कशा होतील यासाठी सर्व थरातील लोकांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. एसटी जगली पाहीजे. एसटी ही महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या काळजाची धडधड आहे.

–रत्नपाल जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -