Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश गुरु-शिष्याच्या कार्यप्रणालीवर दृष्टिक्षेप

गुरु-शिष्याच्या कार्यप्रणालीवर दृष्टिक्षेप

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्या महाविद्यालयात शिकले तिथेच शिकलेले डॉ. गौतम बेंगाळे यांनी ‘यशवंतरावांचे व्हिजन आणि शरदरावांचे मिशन’, पुस्तक लिहून एक मोठा इतिहास सामान्य जनतेपुढे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या पुस्तकात यशवंतरावांचे सन १९६० साली म्हणजेच महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस काय व्हिजन होते, त्यांनी कशाप्रकारे नियोजन केले होते. यशवंतराव चव्हाण यांचे व्हिजन त्यांच्यानंतर शरद पवारांनी मिशनद्वारे कसे पूर्ण केले, याची सविस्तर माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून नवीन पिढीला मिळेल. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’चा पुरोगामी चेहरा म्हणून पवारांकडे पाहिलं जात असून सध्या त्यांचं नाव अधिक चर्चेत आहे.

–प्रदीप जाधव

यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार ही सामाजिक-राजकीय पटलावरील गुरु-शिष्य म्हणून आदराने घेतली जाणारी नावं. दोघांनाही समाजाची अचूक नाडी कळली होती. अत्यंत कुशाग्र, बुद्धिमान, संयमी, दूरदृष्टी आणि दूरगामी परिणाम पाहणारे. समाजातील प्रत्येकाशी व्यक्तिगत पातळीवर संबंध ठेवणारे, त्यांच्या सुख-दुःखाची नोंद घेणारे धुरंधर आणि बहुआयामी व्यक्तिमत. समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण हा दोघांच्याही आवडीचा प्रिय विषय. त्यांची कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहिती असून त्यांनी समाजकारण, राजकारणाबरोबरच सहकाराला आकार देऊन त्यावर आपला प्रभाव कायम ठेवला असून ठसा उमटवला आहे. परिस्थिती पाहून सद्यस्थितीचा अभ्यास करून, जमवून घेणारे, चौफेर ज्ञान असणारे प्रभावशाली कर्तृत्ववान आदर्श आणि प्रेरणादायी नेतृत्व.

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण यांच्या बोटाला धरून राजकारणात आलेले शरदचंद्र पवार सर्वच बाबतीत यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा अधिक यशस्वी ठरलेले सत्तेच्या चौकटीतील राजकारणी. महाराष्ट्राबरोबरच देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रेम, शांती, शेती, आरोग्य शिक्षण, रोजगार, स्वावलंबन आणि सामाजिक सलोखा यावर श्रद्धा असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी आपलं ‘सुजलाम सुफलाम’ स्वयंपूर्णतेचं व्हिजन ठरवलं. यशवंतराव चव्हाण यांचे व्हिजन शरदचंद्र पवार यांनी मिशनद्वारे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात महत्त्वाच्या खात्यांमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं असलं, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांनी विशेष छाप पाडली असून त्याची नोंद घेण्यासारखी आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार हे राजकीय पटलावर रोजच अधिक कार्यक्षम आणि सक्रिय झालेले दिसतात. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’चा पुरोगामी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असून सध्या त्यांचं नाव अधिक चर्चेत आलं आहे. पक्षाच्या नेतृत्वाचा दिलेला राजीनामा त्यानंतर कार्यकर्त्यांचे सामुदायिक राजीनामे, ‘साहेब परत या’ अशा कार्यकर्त्यांच्या विनवण्या आणि पुन्हा अध्यक्षपदाचा स्वीकार. लगेचच अजितदादा पवार यांचे अनपेक्षित (अपेक्षित) बंड. बंड जिव्हारी लागला असला तरी घायाळ न होता गांभीर्याने विचार करत आपण जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत या उत्तराने संपूर्ण भारत हादरला. शरद पवारांचे राजकारण हे कुणालाही लगेच स्पष्ट होत नाही, ते कशावरही लगेच भाष्य करत नाहीत. म्हणजेच शरद पवारांचा चेहरा काय बोलतो,ते काय कृती करतील याचं उत्तर ‘जगातल्या कुणाच्याही बापाला देता येत नाही’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

- Advertisement -

शरद पवारांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाविषयी अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून दैनिक वर्तमानपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, वार्षिक विशेषांक, पुस्तक स्वरूपात भरपूर प्रमाणात लिहलं असून ते प्रचंड गाजलेले आहे. त्यातून त्यांच्या गुणदोषांचा आलेखही मांडला आहे. शरद पवार यांचं व्यक्तित्व अधिक गुणवान, प्रभावशाली कसं आहे त्यांचं कार्यकर्तृत्व वेगळ्या पद्धतीनं ‘यशवंतरावांचे व्हिजन शरदरावांचे मिशन’ या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न डॉ. गौतम बेंगाळे यांनी केला आहे. डॉ. गौतम बेंगाळे हे शरद पवार ज्या कॉलेजात शिकले त्याच पुण्यातील बी.एम.सी. कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक. शरद पवार माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन निमित्ताने कॉलेजात येत असतात त्यातून डॉ. बेंगाळे व पवार साहेब यांचा स्नेह वाढला, जवळून पाहता आले, त्यांच्या कार्यपद्धतीतील अनोख्या पैलूंवर दृष्टिक्षेप टाकून ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून केलं आहे.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्याच वेळेस महाराष्ट्राची वाटचाल कशा दिशेने असेल, हे राज्य कोणाचे तर सामान्य माणसांचे, गरिबांचे, कष्टकर्‍यांचे, बहुजनांचे असे ठामपणे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी मानवतावादी व न्यायप्रिय होती. त्यांनी ६३ वर्षांपूर्वी जो विचार मांडला, संकल्पना मांडली, कार्यक्रम दिला, महाराष्ट्राचे व्हिजन काय असावे याचा आराखडा तयार केला. तो पुढे शरद पवार यांनी मिशनद्वारे अमलात आणला याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.

शरद पवार पुणे डेक्कन जिमखाना येथे शिक्षण घेत असतानाच कॉलेजच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनामध्येच नेतृत्व करण्यास सुरुवात केली. अगदी तरुण वयातच युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली. त्यामुळे शरदरावांनी त्यांच्या भावी काळात राजकारणात, समाजकारणात यशवंतराव चव्हाण यांचे व्हिजन मिशन म्हणून स्वीकारले असून सत्यात उतरविण्याचा अखंडितपणे सतत प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच आज भारत देशाचे राष्ट्रीय नेतृव करीत आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व्हिजनला अनुसरूनच महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाची पुढील दिशा काय असावी याचा महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असतानाच शरद पवार साहेबांनी आराखडा तयार केला. शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते हे खूप कमी लोकांना ज्ञात आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असतानाच प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य द्यायचं धोरण तयार केलं व प्रत्यक्षात आणलं.

शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रातील महिला विकासाचे, महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा एक भाग म्हणून १९९४ साली मुलींना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान हिस्सा मिळालाच पाहिजे असे धोरण ठरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री असताना केंद्रात नेहरू सरकार समोर ‘हिंदू कोड’ बिल मांडले होते. यामध्ये भारतातील महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा असावा असा प्रस्ताव होता, परंतु त्यावेळी सरकारने त्यांना योग्य प्रतिसाद न दिल्याने ‘हिंदू कोड बिल’ पास होऊ शकले नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत व्यथित झाले होते. महिलांच्या सर्वांगीण स्वयंपूर्णतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता. शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना संपत्तीत समान हिस्सा देण्याचा कायदा करून डॉ. आंबेडकरांचे स्वप्न काही बाबतीत पूर्ण केले. या देशाला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा लाभला आहे. पवार या महापुरुषांना आदर्श म्हणून त्यांच्या विचाराने चालतात.

शरद पवार यांच्या कार्यशैलीचं कौतुक अनेक मान्यवरांनी केलेलं आहे. त्याची थोडक्यात ओळख या पुस्तकांत दिली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ‘अर्थ कामाची जाण असलेलं समाज नेतृत्व म्हणजे शरद पवार’ या मनोगतात लिहतात…२००४ मध्ये ‘संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देशाचे एक हरहुन्नरी कृषिमंत्री असलेल्या शरद पवारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. देशाच्या कृषी आणि अर्थ क्षेत्राचा वैज्ञानिकदृष्टीच्या अंमलासह विकास करण्याप्रति त्यांची समर्पित वृत्ती ही एक मोठी देणगीच आहे. त्यांनी या देणगीचा पुरेपूर वापर करून भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासाला जोरदार गती दिली. २००४ ते २०१४ या दशकात देशाच्या कृषिक्षेत्राच्या दैदीप्यमान प्रगतीमुळेच आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच बनला नाही, तर अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यातही करू लागला.

यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री म्हणून पवारांची दूरदृष्टी, समर्पित वृत्ती आणि कठोर परिश्रम यांचं योगदान अनमोल आहे. माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला ‘उदारराष्ट्रवादाचा पाईक शरद पवार’ यात लिहतात…आगामी पिढ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शरद पवार यांनी उभारलेल्या मोठ्या शिक्षण संस्था मी पाहिल्या आहेत. शरद पावर हे धर्मनिरपेक्ष आणि महान राष्ट्रवादी नेते आहेत. त्यांनी संरक्षणमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री म्हणून देशासाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला अत्यंत मार्मिक शब्दात महती कथन करतात, ‘आत्मविश्वास आणि करारी बाण्याच्या पवारांच्या अंगी असलेला संयमीपणा आणि आत्मविश्वास मला ते एक नेते, मंत्री आणि संसद सदस्य म्हणून भावतात. पवार संसदेत येताना व्यवस्थित तयारी करून येत असत. विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित आकलन करून तो विचारणार्‍याचे समाधान होईल, अशी वास्तववादी उत्तरे द्यायचे.

त्यांच्या अंगी असलेला एक महत्त्वाचा गुण म्हणजे आपल्या कनिष्ठ सहकार्‍यांनाही पुढे जाण्याची संधी देत असत. अनेक केंद्रीय मंत्री त्यांच्या कनिष्ठांना दबावाखाली ठेवत, पण पवार मात्र संसदेत संधी देत आणि काही चूक झाल्यास त्यांच्या मदतीसाठी तत्पर असत. इतर नेत्यांना त्यांचे हे कनिष्ठ सहकारी म्हणजे त्यांच्या करीअरसाठी भविष्यातील स्पर्धक वाटायचे, परंतु पवारांना ना त्यांची भीती वाटायची ना असुरक्षितता. कारण त्यांचा स्वतःवर तगडा विश्वास होता. पवार हे उत्तम मित्र आणि ‘यारों के यार’ आहेत. तुम्ही संकटात असताना ज्यांच्यावर विसंबून राहू शकता, असे पवार आहेत. पवारांची मैत्री पक्षाच्या पलीकडची आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणतात, चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका थोर सुपुत्राने एक व्यथा बोलून दाखवली होती. चाळीस वर्षांनंतर याच महाराष्ट्रातल्या दुसर्‍या थोर सुपुत्रानं शेतकर्‍यांना प्रोत्साहित करीत कृषिक्षेत्राला उभारी देत देशात दोनशे पासष्ठ लक्ष टन इतकं अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन घडवून आणून क्रांती केलेली आहे.

या मान्यवरांबरोबरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, कृषी शास्त्रज्ञ एस. एस. स्वामीनाथन, शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, रा.सू.गवई, आघाडीची अभिनेत्री शबाना आझमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचीही मनोगते वाचनीय आहेत.

शरद पवार यांंनी यशवंतरावांचे व्हिजन पूर्ण करण्यासाठीच ग्रामीण भागातील कष्टकरीवर्ग, अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे आज या विद्यापीठात ग्रामीण भागातील कष्टकरी, अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला शिक्षण घेत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केल्यामुळेच ग्रामीण भागातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी यशस्वी होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि प्रशासनामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अधिकारी म्हणून टक्का वाढला. याचे सर्व श्रेय सन्माननीय पवार यांना मिळते. कारण यशवंतरावांचे व्हिजन पूर्णत्वास आणण्याचा १०० टक्के प्रयत्न पवार करीत आहेत.

डॉ. गौतम बेंगाळे यांनी यशवंतरावांचे व्हिजन आणि शरदरावांचे मिशन पुस्तक लिहून एक मोठा इतिहास सामान्य जनतेपुढे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या पुस्तकात यशवंतरावांचे सन १९६० साली म्हणजेच महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस त्यांचे काय व्हिजन होते, त्यांचा काय दृष्टिकोन होता, त्यांचा काय विचार होता, त्यांची काय संकल्पना होती, त्यांनी कशाप्रकारे नियोजन केले होते. याचा नवीन पिढीला डॉ. गौतम बेंगाळे यांच्या लिखाणातूनच ओळख होणार आहे आणि खर्‍या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचे व्हिजन काय होते व त्यांच्यानंतर शरद पवारांनी मिशनद्वारे कसे पूर्ण केले याचीही माहिती होणार आहे. या पुस्तकात बर्‍याच ठिकाणी शरद पवार यांचा उललेख ‘जाणता राजा’ असा केला आहे. त्याचा खुलासा करताना ते लिहितात, महाराष्ट्राबरोबरच भारत देशातील प्रत्येक भागाची संपूर्ण जाण, माहिती असलेला एकमेव जाणकार नेता म्हणजे शरद पवार आहेत. अशा अर्थाने जाणता राजा. या पुस्तकाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी महत्वपूर्ण प्रस्तावना लिहिली असून प्रेरणाभूमी प्रकाशन सोलापूर, यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं स्वागत होईल.

- Advertisment -